मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ४१

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४१

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णाव्यासासि मनी आठवे ॥ तोचि लाधे ज्ञानठेवे ॥ येर भवाटवीमाजि धावे ॥ मदे वेडा होउनी ॥१॥

मुनिजनाला स्कंद बोले ॥ तुम्ही व्यासजन्म ऐकिले ॥ पराशरे मग काय केले ॥ तेचि ऐका भले हो ॥२॥

पराशरे निजनुसिंहमूर्ती ॥ घेऊनि आपुलेचि सांगाती ॥ तिये पहाया निघे पुढती ॥ कृष्णातीरी भक्तीने ॥३॥

होय जेथे मन स्थिर ॥ तेथे रहावे हाचि निर्धार ॥ करोनि गेला पराशर ॥ उत्तंक ऋषी म्हणतसे ॥४॥

इकडे वेदव्यासजननी ॥ सुगंधतीर्थी तेजोरूपिणी ॥ स्नान करोनि रुद्रसूक्तांनी ॥ पूजी खलखलेशा ॥५॥

जया सुगंध द्रव्य अर्पण ॥ भक्तिपूर्वक करोनि नमन ॥ मुक्ति मेळवी दुष्टही जन ॥ खलखलेश्वर जाण तो ॥६॥

तदा जोडोनिया कर ॥ म्हणे मातेसि तिचा कुमार ॥ संकटी करिता स्मरण सत्वर ॥ देईन दर्शन तुला हो ॥७॥

ऐसे बोलोनिया व्यास ॥ तेथेचि करी आश्रमास ॥ लोकशिक्षार्थ सुतीर्थास ॥ करोनि वास करीतसे ॥८॥

केले वेदविभागासी ॥ इतिहासादि पुराणांसी ॥ श्रवण पठण करिता जयासी ॥ अज्ञ सज्ञान होतसे ॥९॥

असो खलखलेशपूजा ॥ करिता मस्त्याची आत्मजा ॥ देह जाहला तिचा दुजा ॥ पराशरकृपेने ॥१०॥

पुनरपि कुमारी जाहली ॥ कुरुदेशासि सहज गेली ॥ तिथे शंतनुनृपे वरिली ॥ तिला परम उत्साहे ॥११॥

उत्तंक म्हणे गा याज्ञवल्क्या ॥ ऐसे कथियले चरित्रासि या ॥ श्रवण करितांचि थारा भया ॥ नसे रहाया कुठेचि ॥१२॥

व्यासाख्यान हे पठण करिता ॥ सकळ संपत्ती येत हाता ॥ पळती पातके तीहि तत्त्वता ॥ भक्तिसांठा असावा ॥१३॥

भक्ती नसे गा जया चित्ती ॥ तया देव पाषाण दिसती ॥ साधु सेर सरिसेचि होती ॥ तीर्थे भासती जलमय ॥१४॥

स्कंद म्हणतसे अहो मुनी ॥ भक्तिप्रिया ही कृष्णावेणी ॥ सदा धरावी आपुले मनी ॥ चिंता निराळी नसावी ॥१५॥

आता पुढे मुक्तिदायक ॥ सकामासि जे सुखकारक ॥ तेचि नरहरीतीर्थनायक ॥ सांगेन कथानक तयाचे ॥१६॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति अखंड ॥ एकेचाळिसावा अध्याय हा ॥१७॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये नरहरितीर्थवर्णनं नाम एकचत्वारिंशोऽध्यायः ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP