मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ७

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ७

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

ऐकोनि कृष्णासिंहध्वनि ॥ पापकुंजर जाती पळोनी ॥ कृष्णा सुखाची रत्‍नखाणी ॥ दुःखनिरसनी श्रीकृष्णा ॥१॥

ब्रह्मकुमार ऋषींप्रती ॥ सांगे कृष्णा धरोनि चित्ती ॥ काय वानू कृष्णास्तुति ॥ पन्नगपतीही कुंठित ॥२॥

कृष्णानदीच्या दक्षिणेस ॥ धूतपापासाव कोस ॥ तीर्थ असे जे तयास ॥ बोलती सत्य ऋषीश्वर ॥३॥

येईविषयी कथा पावन ॥ तपननामा असे ब्राह्मण ॥ तया असती पुत्र दोन ॥ सत्य आणि वेद ऐसे ॥४॥

तर्कशास्त्र तया शिकवून ॥ केले चांगले विद्वान ॥ प्रौढ झाले हे पाहून ॥ पिता बोलवी तयांसी ॥५॥

म्हणे मजपाशी विपुल धन ॥ घ्यावे तुम्ही विभागून ॥ धर्मकार्यार्थ करावे साधन ॥ ऐशी असे मम इच्छा ॥६॥

मी तरी विषय सोडिला ॥ त्रिवर्ग येणेचि साधिला ॥ एक आशय मनी राहिला ॥ योगे आत्मदर्शन ॥७॥

तरी तुम्ही अगस्ती मुनी ॥ साक्षी करोनि घ्या विभागोनि ॥ जे का भवनगिरीत पुरोनि ॥ ठेविले मी धन बहु ॥८॥

ऐसे त्यास बोलोनि पिता ॥ गेला वनी तपाकरिता ॥ अगस्तीसी आणिती तत्त्वता ॥ पुत्र दोघे विभागासी ॥९॥

सत्य म्हणे मी वडील ॥ म्हणोनि श्रेष्ठांश मज येईल ॥ वेद ऐकोनि हे बोल ॥ म्हणे मूढा काय वदसी ॥१०॥

सवेचि सत्ये एक चापट ॥ मारिता वेद अति तापट ॥ हाती घेवोनि एक लकुट ॥ ताडण करी अग्रजा ॥११॥

ऐसे देखोनि यापरी ॥ अगस्त्य दोघांही निवारी ॥ परी ते परस्परवैरी ॥ ऋषिवैखरी नायकती ॥१२॥

धनलोभे दोघेजण ॥ एकमेका करिती ताडण ॥ ऋषि हांसे पोट धरून ॥ विस्मित होवोनि मानसी ॥१३॥

तधी सत्य पितयापाशी ॥ जाऊनि सांगे गोष्टी ऐशी ॥ ऐकोनि म्हणेरे कायसी ॥ बुद्धी तुम्हा उपजली ॥१४॥

थोर कुळी उपजोन ॥ जे करिती दुराचरण ॥ धिक तयांचे होय जीण ॥ व्यर्थ माता प्रसवली ॥१५॥

धन असे धर्माचे फळ ॥ धर्म करुणेचे आलवाल ॥ करुणा सौंदर्याचे मूळ ॥ ऐक बालका निर्धारे ॥१६॥

विष्णुसी नार्पिले जे कर्म ॥ की धन असे रहितधर्म ॥ नाही जाणिले ईश्वरवर्म ॥ ज्ञान व्यर्थ कासया ॥१७॥

की उपकारावीण देह ॥ की अतिथीवीण गेह ॥ सत्याविण जिणे इह ॥ व्यर्थ जाण बालका ॥१८॥

जीवन ज्याचे धर्मास्तव ॥ तोचि जाणे ज्ञानभाव ॥ ज्ञाने ध्याने तोषिला देव ॥ तरीच जीवनमुक्त तो ॥१९॥

परमेश्वरे ब्राह्मणदेही ॥ उपभोगहेतु ठेविला नाही ॥ तप करोनि विदेही ॥ अनंतसुख मिळवावे ॥२०॥

जी कर्मे असतील प्रशस्त ॥ तीच ठेवावी हस्तगत ॥ दुष्कर्मै वर्जावी समस्त ॥ जी का वेदनिंदित ॥२१॥

संतुष्ट ठेवावे आपुले मन ॥ सर्वत्र ठेवावे सम नयन ॥ इंद्रियांचे करोनि आकलन ॥ सत्यप्रिय रहावे ॥२२॥

मन असावे शांत दांत ॥ ब्राह्मणे रहावे दयावंत ॥ परियोषितेवरी न ठेवी चित्त ॥ पारुष्य हिंसा नसावी ॥२३॥

लोकवार्तेचा न येवो आळ ॥ परोपकारी घालवी काळ ॥ ऐसा धर्म आचरोनि बाळ ॥ मुक्ति मेळवी निर्वाण ॥२४॥

नर जैशी करील कृति ॥ तैशीच त्यास मिळे गति ॥ दुष्कृतीचे फल निश्चिती ॥ याच जगी मिळतसे ॥२५॥

ऊर्ध्व बाहू करोनि आपुला ॥ सत्य सांगतो ऐक बाळा ॥ धर्म लाधे अर्थकामाला ॥ ऐसे वर्म न जाणशी ॥२६॥

पूर्ववयी धर्म न करीत ॥ होईल तोचि स्वार्थभ्रष्ट ॥ याचिकारणे धर्म सतत ॥ बुद्धिमंते करावा ॥२७॥

मरण येतांचि सहसा ॥ बांधवांचा काय भरवसा ॥ शून्यमार्गी जाशील कैसा ॥ धर्मावीण सांग बा ॥२८॥

जैसा बुडबुडा पाण्यावरू ॥ तैसा देह क्षणभंगरू ॥ जीव अनित्य जेवि पाखरू ॥ ऐक बाळा एकचित्ते ॥२९॥

महापुरी काष्ठे मिळती ॥ तैशी स्त्रीपुत्रसंगती ॥ कैसा निजलासि मूढमति ॥ सावध सत्वर होई गा ॥३०॥

जवळी नसे धर्मपाथेय ॥ सोडिता सद्‌गुरूचे पाय ॥ घोरमार्गी बहुत अपाय ॥ कैसा जाशील एकटा ॥३१॥

जपतपक्षमेची करोनि नाव ॥ तरोनि जाई भवार्णव ॥ कृष्णेवरी ठेवोनि भाव ॥ साक्षात देव होशी तू ॥३२॥

कृष्णामृताचा ऐकोनी घोष ॥ जन्मजन्मांतरींचे दोष ॥ नष्ट होवोनि देवेश ॥ कृपा करी तात्काळ ॥३३॥

तीन वेळा कृष्णास्नान ॥ करिता श्रीकृष्णेचे ध्यान ॥ कृष्णरूप होसी हे जाण ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३४॥

ऐसे ऐकोनि सुधावचन ॥ सद्‌गदित झाले तयाचे मन ॥ शीघ्र नमोनि पितृचरण ॥ कृष्णातीरी पातला ॥३५॥

दूत पाठवून एक कोस ॥ कृष्णातटी केला वास ॥ करिता शिवाचा निजध्यास ॥ तुष्ट गौरीश जाहला ॥३६॥

देखोनि तयाची शुद्ध मती ॥ शांत सम निंदास्तुति ॥ जया सारखी कनक माती ॥ स्वच्छकांती शिवभक्त ॥३७॥

अगस्तीचे धरोनि पाय ॥ लाधे मंत्र नमः शिवाय ॥ जपता तोषोनि कैलासराय ॥ म्हणे काय इच्छिसी ॥३८॥

जे का असेल तव कामना ॥ दुर्लभ जरी देवादिकांना ॥ तरी देईन मी वरदाना ॥ कैलासराणा म्हणतसे ॥३९॥

साष्टांग करोनि नमस्कार ॥ सत्ये याचिला योगवर ॥ जेणे दिसे उमावर ॥ चराचरव्यापी जो ॥४०॥

ऐकोनि तयाचे भाषण ॥ योगिध्येय उमारमण ॥ आत्माराम जो सर्वपुर्ण ॥ बोले वचन तेधवा ॥४१॥

मन कर्म आणि वाणी ॥ याही अपपर एक जाणि ॥ सर्वभूतस्थ शूलपाणी ॥ मोक्षदानी तेधवा ॥४२॥

सर्वांभूती असे ईश्वर ॥ हेचि ज्ञानतप सुंदर ॥ मोक्षसाधन हेचि सुकर ॥ ज्ञानी निरंतर बोलती ॥४३॥

ऐशी योगाची हे स्थिती ॥ सांगता झालो तुजप्रती ॥ ग्रहण करिता होय स्फूर्ति ॥ आनंदमूर्ति मी असे ॥४४॥

यापरी हे योगरत्‍न ॥ केले मी तुझे आधीन ॥ नित्य ठेवी करोनि जतन ॥ राही निमग्न आनंदी ॥४५॥

ऐसे हे परमगुह्य ॥ सांगता झाला मृत्युंजय ॥ ऐकोनि बोले तदा सत्य ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥४६॥

सत्यनामे व्हावे तीर्थ ॥ सत्यनामे रहावे येथ ॥ आणिक मागतो किंचित ॥ वर द्यावा मजलागी ॥४७॥

तत्त्वसंवाद हा आपुला ॥ ऐके जो भक्तपाळा ॥ तोचि पावो तत्त्वपदाला ॥ हेचि तुजला मागतो ॥४८॥

माझे अनुजाची अहंता ॥ त्वत्प्रसादे नाशवंता ॥ व्हावी असे उमाकांता ॥ चिंताहरा मागणे ॥४९॥

माझे दर्शन होता तया ॥ नैश्वरबुद्धि जावो लया ॥ तत्त्वज्ञानी करी सदया ॥ नमोनि पाया मागणे ॥५०॥

तथास्तु म्हणोनि महेश्वर ॥ विदेही करोनि सत्य सत्वर ॥ गेला तत्काल कैलासावर ॥ भवानीवर पिनाकी ॥५१॥

पुढिले अध्यायी दयाबंधु ॥ तुष्ट होता सत्यबंधु ॥ तपन होईल मुक्तबंधु ॥ आनंदकंदु झडकरी ॥५२॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ सप्तमोऽध्याय वर्णिला ॥५३॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये सत्यतीर्थवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP