मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जय जय कृष्णा माउली ॥ भक्तबाळा कृपासाउली ॥ करोनिया निजपाउली ॥ संकट काळी अहर्निशी ॥१॥

सुकृत लाधता जिचे चरण ॥ काळही बांधू न शके जाण ॥ तात्काल चुके जन्ममरण ॥ ऐसे महिमान अगाध ॥२॥

मागील अध्यायी तीर्थ गोकर्ण ॥ सांगीतले पुण्य पावन ॥ आता श्रोते सावधान ॥ सादर कर्ण असावे ॥३॥

आणोनिया कृष्णा ध्यानी ॥ नारद बैसे निजआसनी ॥ आरंभ करीतसे झणी ॥ महात्म्यवर्णन करावया ॥४॥

श्रीकृष्णेच्या दक्षिणतीरी ॥ गोकर्ण तीर्थाचे पासारी ॥ सहा हजार धनुष्यांवरी ॥ गणिका नाम विख्यात ॥५॥

जरी पातकी असे महान ॥ अनाचारी अतिदारुण ॥ सर्व पापक्षयकारण ॥ तीर्थ जाण निश्चये ॥६॥

एकदा नरनारायण ॥ ब्रह्मयाचे मानसनंदन ॥ पितयासि करूनि वंदन ॥ कृष्णादर्शना निघाले ॥७॥

घेवोनि कमंडलू हाती ॥ बंधु दोघे मार्ग चालती ॥ रम्य स्थळे पाहूनि अमिती ॥ कृष्णातटाकी पातले ॥८॥

कमंडलू ठेविता अवनी ॥ प्रवाह निघे तेथोनि ॥ मिळता कृष्णेसी येवोनी ॥ पावे अभिधान कमंडली ॥९॥

मानसपुत्र निष्पाप ॥ करोनि तया संगमी तप ॥ सिद्धि जोडती अमूप ॥ काळ अल्प होतांचि ॥१०॥

हा तीर्थमहिमा अद्‍भुत ॥ लोकत्रयांमाजि विश्रुत ॥ क्षालन करी पाप त्वरित ॥ नारद सांगत ऋषींसी ॥११॥

गौतमनामे एक मुनि ॥ तेजे जैसा मध्यान्हतरणी ॥ पूज्यता असे वृद्धजनी ॥ महाज्ञानी कुलवंत ॥१२॥

घरी धनधान्यसमृद्धि ॥ दासी ज्याच्या अष्टसिद्धि ॥ बृहस्पतिसारखी बुद्धि ॥ ऐसा थोर ऋषीश्वर ॥१३॥

वेदशास्त्री असे संपन्न ॥ अध्यात्मविद्येमाजी प्रवीण ॥ सदा करी शिवार्चन ॥ अतिथी पूजा विशेषे ॥१४॥

स्वये असे वृद्ध आपण ॥ भार्या रूपवती तरूण ॥ सिंहोदरी हे अभिधान ॥ यथार्थ जाण तियेसी ॥१५॥

जैशी सिंही निजपतीस ॥ तैशी भार्या गौतमास ॥ प्रिय अत्यंत सहवास ॥ उभयतांस जाहला ॥१६॥

प्रार्थी पतीस वारंवार ॥ भोग देई गा सत्वर ॥ आयुष्य असे क्षणभंगुर ॥ तृप्त करी मन माझे ॥१७॥

पुष्पासम माझी काया ॥ योग्य असे रतिसुखा य ॥ आधी शमवावे इंद्रिया ॥ मग लागे तपास ॥१८॥

ऐशी वारंवार प्रार्थना ॥ पतीस करी ती ललना ॥ परि विषयेच्छा नये मना ॥ दुष्टता पाहोन काळाची ॥१९॥

भार्या म्हणे पतिलागून ॥ पोटी नसता पुत्रसंतान ॥ कदा न मिळे स्वर्गभुवन ॥ माझे वचन सत्य पै ॥२०॥

ऐसे ऐकोनि ऋषिवर ॥ होवोनि गेला चिंतातुर ॥ कुसंततीचे भय अपार ॥ फिरू लागले अंतरी ॥२१॥

अस्तासि जाता नारायण ॥ प्रियेशी झाला रममाण ॥ दैवे लाधली गर्भधारण ॥ नारद म्हणे ऋषीसी ॥२२॥

ऐसे नवमास भरल्यावरी ॥ प्रसूत जाहली सुंदरी ॥ पुत्रमुख पाहता अंतरी ॥ सुखावली अत्यंत ॥२३॥

येवोनिया गर्गमुनि ॥ जातक करिता बोले वाणि ॥ अहो ऐस अपुत्र होवोनि ॥ काय लाधले तुम्हांसी ॥२४॥

सुदामा नामे पापी फार ॥ पितृवंशा भयंकर ॥ करील ब्राह्मणसंहार ॥ मातृगामी निश्चये ॥२५॥

निमग्न राहील सुरापानी ॥ कुल टाकील उच्छेदोनि ॥ काळ घालविल दुराचरणी ॥ शांति करी यास्तव ॥२६॥

ऐसे ऐकोनि गर्गवचन ॥ होवोनि पडला मूर्च्छायमान ॥ भार्येसी करी निर्भर्त्सन ॥ क्रोधायमान होवोनि ॥२७॥

पुत्र नसेल ज्याचे घरी ॥ अरण्य नाही त्यासी दुरी ॥ मूर्ख पुत्र येता उदरी ॥ नाही अंतर किमपही ॥२८॥

दुर्वृत्त होती पुत्र ज्यास ॥ विमुख दवडी अतिथीस ॥ धर्मभक्तीचा सदा आळस ॥ नाही अंतर किमपिही ॥२९॥

अग्निहोत्र नसे जया घरी ॥ कधी न जो श्राद्ध करी ॥ भार्येने जिंकिल्यावरी ॥ नाही अंतर किमपिही ॥३०॥

उल्लंघी जो पितृवचन ॥ दुराचारी असे आपण ॥ धिक् तयाचे होय जिण ॥ नाही अंतर किमपिही ॥३१॥

भार्येचे पहोनि वदन ॥ रडो लागला आक्रंदोन ॥ ह्रदय तत्क्षणी गेले फुटोन ॥ पावला निधन झडकरी ॥३२॥

तयाची ती तरुणी भार्या ॥ मदे विव्हल तिची काया ॥ पतिप्रेत सोडोनिया ॥ बाळ टाकोनि गेली पै ॥३३॥

तरुणी रूपसंपन्ना ॥ सिंहकटी सुलोचना ॥ भोगीतसे पुरुष नाना ॥ दुराचारे वर्तत ॥३४॥

नाम पावोनि कामसेना ॥कान्यकुब्जी ती अंगना व राहोनि मेळवी बहु धना ॥ तरुन पुरुष भोगोनि ॥३५॥

आरक्त वस्त्र परिधान ॥ करी शुभ्र गंधलेपन ॥ माणीकमोत्यांचे आभरण ॥ लेईतसे अंगावरी ॥३६॥

बैसे सुवर्णपलंगावर ॥ वारांगनाही सेविती फार ॥ गळा जिचे पुष्पहार ॥ जैसी अप्सरा नंदनी ॥३७॥

ऐशी चतुर्दश वर्षे जाण ॥ गेली सदा उल्लास मन ॥ इकडे पुत्र पापप्रवीण ॥ उत्तरोत्तर वाढला ॥३८॥

नित्य सुदामा बंध तोडून ॥ द्यूतक्रीडेत निमग्न ॥ कोणी केल्या निवारण ॥ वचन तयांचे न मानी ॥३९॥

अखंड राहे मद्य प्राशित ॥ कुलधर्मादि सोडूनि देत ॥ पापे भरले सदा चित्त ॥ व्यसनाधीन जाहला ॥४०॥

चोरांची धरुनि संगत ॥ मार्गस्थांचे सर्वस्व हरित ॥ ब्रह्महत्या असंख्य करित ॥ महापापी सुदामा ॥४१॥

द्रव्याची करुनी वाटणी ॥ सर्वही जात निजभुवनी ॥ तोही कान्यकुब्जा जावोनि ॥ कामलंपट जाहला ॥४२॥

कामसेनेवर बैसले मन ॥ बहु देई तिजला धन ॥ तू कोण आलीस कोठून ॥ ऐसे विचारी तिजलागी ॥४३॥

ऐकोनि सुदाम्याच्या प्रश्ना ॥ हासोनि बोले कामसेना ॥ सत्य सांगतसे खुणा ॥ ऐकोनि घेई समग्र ॥४४॥

गौतम नामे माझा पति ॥ वृद्ध धार्मिक विप्रजाती ॥ मज न देई कदा रति ॥ तरुण होते जरी मी ॥४५॥

निर्भर्त्सना केली फार ॥ तेणे रममाण मजबरोबर ॥ संध्याकालाचा न करी विचार ॥ झाला गर्भ मजलागी ॥४६॥

मी प्रसूत झाल्यावर ॥ पति होवोनि शोकपर ॥ मरण आले त्यास सत्वर ॥ ऐकोनि जातक पुत्राचे ॥४७॥

गृह पुत्र आणि मृत पति ॥ सोडोनि त्यांची संगति ॥ विषयासक्ति धरोनि चित्ती ॥ परदेश मी स्वीकारिला ॥४८॥

ऐसे बोलता बोलता जाणा ॥ साद्यंत सांगीतले वर्तना ॥ ऐकता सुदाम्याच्या मना ॥ अवघ्या खुणा बाणल्या ॥४९॥

पश्चात्ताप होवोनि अंतरी ॥ मस्तक आपटिला खांबावरी ॥ दीर्घस्वरे रुदन करी ॥ म्हणे दुराचारी जन्मलो ॥५०॥

ब्रह्मघातकी सुरापानी ॥ विश्वासघातकी पापखाणी ॥ चांडाळ मी मातृगमनी ॥ कैचा आता तरेन ॥५१॥

ऐसा नाना विलाप करी ॥ अंग आपटी धरणीवरी ॥ मग येवोनि शुद्धीवरी ॥ झाला फार लज्जित ॥५२॥

ओळखोनि पुत्र आपला ॥ लज्जा उत्पन्न झाली तिला ॥ आठवोनि स्वकर्माला ॥ अनुताप थोर करीतसे ॥५३॥

कैची मी ब्रह्मभार्या ॥ की धर्मपत्‍नी पुत्रभोग्या ॥ की जाहले वारमुख्या ॥ काय नवल जाहले ॥५४॥

सांडोनि आपला निजधर्म ॥ आचरिले मी कुकर्म ॥ महापातकांचा संगम ॥ तेणे घडे मजलागी ॥५५॥

ऐसे धिक्कारोनि सोडिले घर ॥ द्रव्य टाकूनि अपार ॥ अरण्यात रिघाली सत्वर ॥ निश्चय करूनि मरणाचा ॥५६॥

ती निघाली पाहुन ॥ सुदामाही विरक्त होऊन ॥ सवेंचि करीतसे गमन ॥ घोर वनी जावया ॥५७॥

पुढे माता मागे सुत ॥ हळू हळू मार्ग क्रमित ॥ तव पुढे अकस्मात ॥ देवल ऋषि भेटला ॥५८॥

ऋषि पुसे तयालागून ॥ तुम्ही कोठील अहा कवण ॥ चिंतीतसा का मरण ॥ दुःखे उद्विग्न दीसता ॥५९॥

चिंतातुरास चिंतामणि ॥ तैसा भेटे देवलमुनि ॥ की अंधासी वासरमणि ॥ ज्ञानदीप उगवला ॥६०॥

दोघे होवोनि सद्‍गदित ॥ सांगते झाले स्वचरित ॥ ऐकोनि त्यांची ही मात ॥ कृपा ऋषीस उपजली ॥६१॥

संतोषोनि बोले ऋषि वचन ॥ तुम्ही करावे कृष्णासेवन ॥ तेणे सकळ दोषदहन ॥ होईल जाणा निश्चये ॥६२॥

ऐसे ऐकोनि ऋषीसी ॥ म्हणे कृष्णा कवण देशी ॥ आम्हा पाप्या प्राप्त कैशी ॥ सांग सत्वर दयाळा ॥६३॥

परिसोनिया उभयवाणी ॥ कृष्णा नमोनि अंतःकरणी ॥ सांगे दोघा देवलमुनि ॥ कृष्णाचरित्र अगाध ॥६४॥

पूर्वेस सह्याद्रिपर्वत ॥ विख्यात असे भूमंडळात ॥ कृष्णाबाई तेथोनि निघत ॥ साक्षात तनू विष्णुची ॥६५॥

सर्व देवतांची माता ॥ जी का सर्वोपनिषदगाथा ॥ पावन करी शरणागता ॥ ऐसे महात्म्य कृष्णेचे ॥६६॥

नरनारायणाश्रमु ॥ जेथे ब्रह्मनदी संगमू ॥ तेथ माघशत स्नानु ॥ करिता पुनीत तात्काळ ॥६७॥

ऐकोनि देवलांचे वचन ॥ दोघी केले साष्टांग नमन ॥ ऋषिचा निरोप घेवोन ॥ सह्याद्रीसी पातले ॥६८॥

नारायणाश्रमी श्रीकृष्णा ॥ घेवोनि जियेच्या दर्शना ॥ रोमांचित तनु कंपायमाना ॥ अष्टभावे दाटले ॥६९॥

म्हणती जयजया अघनाशिनी ॥ कृष्णाबाई जगन्मोहिनी ॥ सद्‍गति आम्हांलागोनि ॥ द्यावी जगन्माते हो ॥७०॥

ऐशी करोनि प्रार्थना ॥ करोनि संगमी स्नाना ॥ वाटे करावे वसतिस्थाना ॥ नारायणाश्रमी तो ॥७१॥

अकस्मात देखोनि ऋषिवर ॥ लज्जेने कोंदले अंतर ॥ कृष्णादक्षिणतीरावर ॥ वास करिती उभयता ॥७२॥

त्रिकाळ करोनिया स्नान ॥ निराहारी शुद्ध मन ॥ केले असे प्रायोपवेशन ॥ मरणालागी निर्धारे ॥७३॥

नंदी पाहोनि गणिकेसी ॥ बोले मग भाषा ऐसी ॥ काय इच्छा असे तुजसी ॥ मज सांगे सत्वर ॥७४॥

हांसोनि बोले तया वचन ॥ कोठे असे रे उमारमण ॥ करीन दुःखनिवेदन ॥ तयालागी कृपाळा ॥७५॥

प्रसाद होता जयाचा ॥ संहार होईल दुःखांचा ॥ म्हणोनि धावा करितसे त्याचा ॥ तुझेनि नोहे ते काही ॥७६॥

ऐसे ऐकता हासोन ॥ जावोनि शिवा करी कथन ॥ म्हणे भक्ता तूचि शरण ॥ कृपासागरा पशुपति ॥७७॥

गणिकेसी होवोनि प्रसन्न ॥ तिचे करावे उद्धारण ॥ ऐसे ऐकोनि नंदीवचन ॥ दर्शन द्यावया निघाला ॥७८॥

गणिकेसमीप येवोनि ॥ तीस बोले हो कल्याणि ॥ वससी का खिन्न मनी ॥ कृष्णानदीतीरी हो ॥७९॥

ऊर्ध्वरेत मुनींचे तपोबळ ॥ की द्वादशाब्द तपांचे फळ ॥ प्राप्त होई ते सकळ ॥ केवळ कृष्णासेवने ॥८०॥

आजन्म ब्रह्मचर्यव्रते ॥ कलीमाजी जे मिळते ॥ ते कृष्णासेवने होते ॥ प्राप्त तियेचे सेवका ॥८१॥

तपे झालीस निर्दोष ॥ अपेक्षित जे मानस ॥ ते तू मागे सावकाश ॥ पुण्यश्लोके कल्याणि ॥८२॥

अभय ऐकोनि गणिका ॥ नमस्कारी गौरिनायका ॥ माझे भाषण हे ऐका ॥ बोलती झाली शिवासी ॥८३॥

देव देव जगन्नाथ ॥ जे मी केले दुष्कृत ॥ ते तुज असे की विदित ॥ पुनरुच्चार कासया ॥८४॥

तू जरी प्रसन्न होशी ॥ माझे मागणे एक तुजशी ॥ जे मूळ असे पापाशी ॥ छेदन करी झडकरी ॥८५॥

निष्पाप झाले ही खूण ॥ नाम माझे स्वये धरून ॥ या स्थळी वास करोनि ॥ राहे देवा महेशा ॥८६॥

हेचि देणे मज द्यावे ॥ या तीर्थास गणिका म्हणावे ॥ स्नान करिता सद्‌गति पावे ॥ माघमाशी महेशा ॥८७॥

ब्रह्मघ्न असो की सुरापानी ॥ जो का रत मातृगमनी ॥ गुरुतल्पग परस्त्रीगमनी ॥ होवो मुक्त महेशा ॥८८॥

विध्युक्त करिता पिंडदान ॥ पितरा मिळो सायुज्यसदन ॥ ब्राह्मण देता हिरण्यदान ॥ पावो सद्‌गति महेशा ॥८९॥

देवाधिदेवा भवनाशना ॥ जाळी समूळ हे वासना ॥ न विसंबो तुझे चरणा ॥ हेचि प्रार्थना महेशा ॥९०॥

ऐकोनि हे गणिकावाणि ॥ तथास्तु म्हणे पिनाकपाणी ॥ तिजला बैसवोनि विमानि ॥ नेली तात्काळ कैलासी ॥९१॥

गणिका जेथ झाली मुक्त ॥ तेचि झाले गणिकातीर्थ ॥ तेथोनि आठ सहस्त्र हस्त ॥ नारायणआश्रम ॥९२॥

आरूढोनि नंदीवरी ॥ गेला स्वधामी अंधकारी ॥ काय वदू कृष्णाथोरी ॥ नारद म्हणे ऋषीसी ॥९३॥

गणिकाख्यान परम अद्‌भुत ॥ ऐकता पापे दग्ध होती ॥ पूर्ण होती मनोरथ ॥ कृष्णाप्रसादे निश्चये ॥९४॥

पुढिले अध्यायी मनोहर ॥ कथा ऐकावी सादर ॥ तुष्ट होईल सिद्धेश्वर ॥ भक्तकामकल्पतरू ॥९५॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ पंचमोऽध्याय वर्णिला ॥९६॥

॥इति श्रीस्कंदपुराणे कृष्णामाहात्म्ये गणिकातीर्थवर्णनं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP