श्री कृष्णा माहात्म्य - प्रस्तावना

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


प्रस्तावना

भगवान वेदव्यासांनी समस्त मानवजातीला आत्मिक समाधान प्राप्त करून देण्यासाठी अठरा पुराणे रचिली. त्यामध्ये स्कन्दपुराण हे फार मोठे म्हणजे सुमारे ८१ हजार श्लोक असलेले व अनेक तीर्थक्षेत्रांची महती वर्णन करणारे आहे. स्कन्द उपपुराण म्हणून देखील सुमारे १ लाख श्लोकांचे आहे, असे संशोधकांचे मत आहे. परंतु ते सध्या पूर्णपणे उपलब्ध नाही. सूतसंहिता, सह्याद्रिखंड इत्यादि काही भाग उपलब्ध आहेत.

स्कन्दपुराणामध्ये श्रीकृष्णानदीचे माहात्म्य ६० अध्यायात वर्णन केलेले आहे. त्यामध्ये वाई (वैराजक्षेत्र), लिंब-गोवे, माहुली, कराड, नरसोबाची वाडी (अमरेश्वर), औदुंबर (भुवनेश्वरी) इत्यादि तीर्थक्षेत्रांचे महत्त्व मार्मिक कथा सांगून वर्णन केले आहे.

सनातन धर्माच्या तत्त्वानुसार कृत, त्रेता, द्वापार, कलि या युगांमध्ये मानवाची सत्प्रवृती, मानसिक व शारीरिक कार्यक्षमता यांचा उत्तरोत्तर र्‍हास होत असतो. त्यामुळे मानवाकडून पाप जास्त होत असते; परंतु सामर्थ्य कमी होत असल्याने कृच्छ्र-चान्द्रायणादि शरीरकष्टाची प्रायश्चिते करून पापक्षालन करणे अशक्य असते. म्हणून कृष्णास्नान, कृष्णाजलपान, एवढेच काय पण केवळ कृष्णानदीच्या स्मरणाने देखील पातकांपासून मानवाची मुक्ती होते. याच उद्देशाने प्रत्यक्ष भगवान विष्णूच कृष्णानदीस्वरूप झाले व त्यांच्याच आज्ञेने ब्रह्मदेवाने नदी-सागरादी तीर्थक्षेत्र मानवाच्या पापक्षालनार्थ उत्पन्न केली असे कृष्णामाहात्म्यात सांगितले आहे.

या नदीच्या परिसरात जगाच्या उद्धारार्थ देवादिकांनी वस्ती केली. तीच वाई, माहुली, कराड इत्यादी तीर्थक्षेत्र होत. काशीविश्वेश्वरादी देवांचे येथे वास्तव्य झाले म्हणून वाईला दक्षिणकाशी असे म्हणतात.

श्रीकृष्णानदीस सात घाट असून प्रत्येक घाटावर श्रीकृष्णामहोत्सव सुमारे पाच ते सात दिवस साजरा होत असतो. कृष्णेचे पाणी अत्यंत पवित्र आहे. विष्णूंच्या चरणांपासून गंगा उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-26T23:25:13.2670000