मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
वृंदाजालंदराख्यान

कीर्तन आख्यान - वृंदाजालंदराख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


भूमिका -

एकदा इंद्राने श्रीशंकराकडे न पाहता त्यांच्या द्वितीय नेत्रावर वज्राने प्रहार केला . तो नेत्रांतून एक भयंकर आकृती उभी राहिली. शंकराने त्यास समुद्रात टाकून दिले. समुद्रात तो असता त्याचे नाव ब्रह्मदेवाने जालंदर असे ठेवले.

कालनेमीची कन्या अत्यंत सुंदर असून तिचे नाव वृंदा असे होते. तीच जालंदराची पत्‍नी झाली. काही काळाने जालंदराचे मनात ’तू समुद्रपुत्र आहेस. समुद्रांतून निघालेली चौदा रत्‍ने ही तुझीच संपत्ती असता देवांनी बळकावली आहे’ असे त्याचे मनात भरुन दिले. ते ऐकून तो खूप खवळला. त्याने इंद्राकडे माझी चौदा रत्‍ने माझ्याकडे दे असे कळविले. जालंदराने युद्धाची तयारी करुन तो देवांवर चालून गेला. देवांचा पराभव झाला.

नारदांनी त्याचा मतभेद असा केला की, ’अरे या रत्‍नांपेक्षा अत्यंत सुंदर रत्‍न पार्वती आहे. त्या पार्वतीलाच तू प्राप्‍त करुन घे.’ हे त्यास सहज पटले व ’द्या निज पार्वतीला । शंकरा ॥’ म्हणून शंकरापासून पार्वतीला मागितली व पार्वतीला घेऊन तो चालला.

पार्वती अत्यंत घाबरली आणि तिने श्रीविष्णूचा धावा केला. धावा करताच महाविष्णू पार्वतीस येऊन भेटले. महाविष्णूंनी काही युक्‍ती करुन तिला सोडवली. नंतर पार्वतीने जशास तसे वागावे हा सूज्ञाचा धारा सांगितला व त्या दुष्टाने परस्त्रीवर लक्ष ठेवले, तसेच आपण त्याच्या पतिव्रतेचे पातिव्रत्य हरण करावे. यांत जशास तसे वागल्याचा दोष न येता आपले कार्य होईल. कारण जेथपर्यंत या पतिव्रतेचे पातिव्रत्य शिल्लक आहे तेथपर्यंत जालंदराच्या केसासही धक्का लागणार नाही.

पुढे मायेचे ऋषी, मायेचीच वानरे करुन मायिक जालंदराचा वध वृंदेसमोर महाविष्णूंनी घडवून आणला. ती अत्यंत आक्रोश करु लागली. तेव्हा त्या ऋषींनी तिला आश्‍वासन देऊन जालंदराला जिवंत केल्याचे दाखविले. तो जिवंत झालेला मायिक जालंदर गुप्‍त झाला व त्याचे ठिकाणी जालंदराए रुप घेऊन महाविष्णू प्रगट झाले व तारेकडे जाऊन मी विजय संपादून आलो आहे. मला आता तुझ्या समागमाचे सुख दे. ही कपटरचना वृंदेस मुळीच कळली नाही. सुरतप्रसंगी वृंदेने डोळे झाकताच तिला श्रीमहाविष्णूची प्रतिमा दिसावी व डोळे उघडताच जालंदर दिसावा. हे कपट तिने ओळखले. महाविष्णुंनी ’प्रियकरणि मीच जालंदर, मीच गदाधर, मीच मदनारी, अनुमान नको करुं नारी’ अशी तिची समजूत केली. परंतु तिने क्रोधाने तडफडून भगवानास शाप दिला की, ’केले हें अनुचित पाप, तुला घे शाप, जगदोद्धारा, तूं करशील दारा दारा ॥’ हीं पदे हृदयाचा अत्यंत ठाव घेणारी आहेत. ही कविता मुळातून वाचताना कोणाचेही हृदय हालल्यावाचून राहात नाही.

’टाकोनी हृदयांतली गोविंदा ।

चेतवोनि जात वेदीं उडी घालिता श्रीवृंदा ।

भस्म झाली क्षणार्धे ॥’

नंतर ’प्रभु त्या दुःखें आक्रंदे म्हणे हा वृंदे हा वृंदे’ प्रभूने तिच्या शरिराच्या राखेपाशी बसून अत्यंत शोक केला. या राखेपासून अत्यंत सुंदरसे तुळशीचे झाड निघाले व भगवान श्रीविष्णूंनी या झाडापाशी अखंड वसती केली.

१.

ओवी

होणार वर्तलें एके काळीं । शक्रें न जाणतां चंद्रमौळी ॥

वज्र हाणतां ज्वाळ भाळीं ॥ नेत्रांतुनी प्रगटला ॥१॥

२.

श्‍लोक

भो अनाथनाथ तारकांत तात शंकरा ॥

श्रीभवानिकांत अपराध हा क्षमा करा ॥

शक्र वक्रताही उग्र विषतुल्य त्र्यंबका ।

अंगिकारी वक्रतुंड बाल गालचुंबका ॥१॥

३.

श्‍लोक (पृथ्वी छंद)

सहस्त्र नयनांपुढें प्रबल जो उभा राहिला ॥

तृतीय नयनाग्नि तो उदकिं शंकरें टाकिला ॥

शिवांश सुर वाढला उदरिं जन्मला सिंधुच्या ॥

म्हणून वसति पतीसहित लक्ष्मी बंधुच्या ॥

४.

पद

धाकें दिग्गज हिंमत टाकी ॥

बाळ स्फुंदत सिंधुतटाकीं ॥ध्रु॥

ती ब्रह्मांडाच्या कांटाळीं ॥

टाहोची तिडकत टाकी ॥१॥

स्वर संतापें तापुन आटली ॥

नदिजल सिंधुतटाकी ॥२॥

गर्जति सुरवर लिहितां विधीची ॥

लेखणि फडकत टाकी ॥३॥

वाजती कर्णे ढोल नगारे ॥

ते फुटति तट्ट तटाकी ॥४॥

विष्णुदास म्हणे परि समजेना, खंडीचे धन शत टाकी ॥५॥

५.

ओवी

म्हणे सागर वेदवक्‍त्रा । वेदवंद्या परम पवित्रा ॥

अंकीं घेऊनि माझिया पुत्रा ॥ स्वमुखें नाम या ठेवी ॥१॥

६.

आर्या

शक्रें सूत हा दिधला वज्र शिवाला हाणून येक मला ॥

बहुधा स्वरुप गुणानें आगळि याहुन म्हणूं नये कमला ॥१॥

७.

श्‍लोक (शा.वि.)

अंकीं घेऊनि ब्रह्मदेव प्रितिनें बाळासि त्या लाडवी ।

तो ओढी विधिची सकूर्च भृगुटी आंबोधि त्या सोडवी ॥

त्या जालंदर नाम ठेवुनि विधिपूर्व स्थळीं पातला ।

ऐसा सागर बाळ जन्मसमयीं वृत्तान्त हा वर्तला ॥१॥

८.

साकी

त्रिभुवनिं अनुपम विधिनें घडविली करुन यत्‍नें वृंदाची ॥

वाटे एक चित्तिं तरुणी लावण्यरत्‍न वृंदाचि ॥

जालंदर वनिता ॥ कालनेमीची दुहिता ॥१॥

९.

पद (चाल-उद्धवा शांतवन कर जा )

दुखांबर पडलें माथा ॥ तें काय वदुं नृपमाथा ॥ध्रु॥

पहा देव आणि दैत्यासि वाढलें वैर वैरानें ॥

घर्षिला अचल मंदाद्रि ॥ रविदंड वासु दोरानें ॥

संमतें आम्ही आणि त्यांनी घुसळिला सिंधु जोरानें ॥

जी दुर्लभ नाना यत्‍नें ॥ तीं लाभलीं सर्वं प्रयत्‍नें ॥

चवदाहि निघालीं रत्‍नें ॥ तीं गेलीं शत्रुचे हातां ॥१॥

आम्ही एक सुधाघट हरिला ॥ तेराचें दुःख साहूनी ॥

त्यातेंही सहन न झालें ॥ हारि झाला कपटरुप मोहनी ॥

किंचित मी सावध होतें । अवघ्यासि गुंगवी मोहनी ॥

चाल-घट पडतां विष्णुचे हातीं । दैत्यांचे मुखामधें माती ॥

मत्कंठ सुराच्या पंक्‍ती ॥ छेदिले अमृत पीता ॥२॥

जी सिंधुगर्भिचीं रत्‍नें । तिजवर ती करिती सुरसत्ता ॥

तूं पुत्र सिंधुचा तुझी ती सर्व मालधन मत्ता ॥

ती आपण सर्व आणावी । हें वर्म जाणुनि चित्ता ॥

चाल-जालंदर संतोषाला, बोलवा म्हणे सुरेशाला ॥

दंडावें उशीर कशाला ॥ म्हणे विष्णुदास तरि आतां ॥दुःखांवर॥३॥

१०.

ओवी

शीघ्र शक्रासि कळवी वार्ता ॥

सरितानाथ तो माझा पिता ॥

त्याचिया वित्तावरि मज परता ॥

सत्ताकर्ता कोण तूं ॥१॥

११.

आर्या

किंवा विधिनें दिधली रत्‍नें आम्हांसि दान चवदा तीं ।

त्वां या दत्त फळाची चाखुन पाहावी कदा न चव दांतीं ॥१॥

१२.

घनाक्षरी

प्रखर सिंधुचा कुमर । उठे जाळाया समर ॥

पळति संतापें अमर । जसे भ्रमर दशदिशा ॥

१३.

ओवी

शुक्रमंत्र जपोनि ओठीं ॥ उठवि आसुरांच्या कोटी ॥

तेणें देवगणाच्या पोटीं ॥ धैर्योत्साह ठरेना ॥

१४.

आर्या

जालंदरासि भजति नमिती स्तविती न कोणि शक्राला ॥

तैलंग देशीं जेवी दुग्धाहुनि अधिक मानि तक्राला ॥१॥

१५.

साकी

खल जालंदर सकल पदश्री हरण करी अमराची ॥

वज्रधरा सामरान उरली किंचित हाव समराचि ॥१॥

१६.

आर्या

कमला म्हणे तुम्ही नच मारावें सिंधुच्या कुमारा हो ॥

प्रभु मज भावजईच्या स्थिरता चिरकाळ कुंकुमा राहो ॥१॥

१७.

घनाक्षरी

तूंचि दुर्जय निधान ॥ अन्य तुज सप्रयोधान ॥

तुझें पाहुन संधान ॥ समाधान वाटतें ॥१॥

काय इच्छित तें सांग ॥ देतों दुर्लभ वर माग ॥

स्नेहधर्मानें वाग ॥ आम्ही राग सोडला ॥२॥

१८.

ओवी

माझ्या मंदिरीं क्लेशरहित । रहावे तुम्ही लक्ष्मीसहित ॥

येणें योगें परमहित ॥ मी मानीन आपुलें ॥१॥

१९.

पद (चाल-ये धावत माझे आई)

तो सागरसुत शत यत्‍नें, त्रिभुवन रत्‍नें, स्वगृहीं स्थापी ॥

आलंदर परम प्रतापी ॥

जिंकुनि सुरवर राजश्री, विमल जयश्री, वीर महाबाहो ॥

तद्‌भाग्य किती तें पहा हो ॥

वर्ते त्या सदनिं आशंकित, होउनि अंकित, लक्ष्मीनाहो ॥

वचनांसि म्हणे ना ना हो ॥

नारदासि म्हणति विनवुन बहु, हा नवीन उन्मत्त पुरवाहो ॥

हें आमुचें मत्त पुरवाहो ॥ हा खळनिधि आटवा लवकर,

माहान भयंकर, महासंतापि ॥१॥

श्रीमत्‌बह्मपरायण, करी पारायण, कृष्ण मुरारि ॥

नारायण जय जय हारी ॥

करि ब्रह्मविणा चित्रांकित, गात पदें संगीत,

राग मल्हारी अवसान देत मल्हारी ॥

जो सकल सभांगणिं नारद, सन्मुनि नारद,

सुर कैवारी ॥ भवसंकट कोटि निवारी ॥

२०.

घनाक्षरी

सकल रत्‍न स्थित कोश ॥ राज्यवैभव निर्दोष ॥

गर्जे कीर्तिचा घोष ॥ स्वसंतोष सर्वदा ॥१॥

तुझा त्रिजगीं अधिकार ॥ परी पर्वत अहंकार ॥

धरुन करितो धिःकार ॥ चमत्कार वाटतो ॥२॥

त्याजपाशी बा खाण ॥ आहे रत्‍नाची खाण ॥

तशी कोठें नसे जाण ॥ तुझी आण असुरा ॥३॥

२१.

साकी

सांगा तरी मुनि मजसि कोणतें चुकुनी रत्‍न उरलें तें ॥

पाहिलें असतें तें तें तरी मी करुन य‍त्‍न उरलें तें ॥

तें हार पद कमला, द्या नमितों पदकमला ॥१॥

२२.

पद (पुरवणी)

कैलासगिरिच्या शिखरिं, त्रिभुवन मुखरी चंपकमाला ॥

वर्णिता नये आम्हांला ॥ वाटते ती करिता धारण,

चढविल धारण, अधिक नामाला ॥ असावि पितृमामाला ॥

अति गतवय गलित रुपाला,शिवतरु पाला ॥

गणि विषमाला ॥ आवडे समची समाला ॥१॥

२३.

साकी

सुरवर म्हणती सर्व गर्व रस वमवाया अधमासी ॥

विधितनये, भली दिली चाटाया , वर माखुन मधमासी ॥

आली न ओळखाया ॥ जो सजला खळ खाया ॥२॥

२४.

ओवी

जन्मस्थानिं पडली भ्रांती ॥ ज्ञानपंथीं पडली माती ॥

होय साकार तनू पालथी ॥ प्राणज्योति मावळे ॥१॥

२५.

श्‍लोक

धाडि दुर्मति दुर्मतीस दुर्गा शंभूस मागावया ॥

गंधर्वादिक बाप पाप म्हणती झाली सिमा गावया ॥

वेगें भस्म करो भवानिपतिचा नेत्राग्नि या द्या स्मरा ॥

याचे नाविच मंत्र फाल्गुन जपा टाकून माघ स्मरा ॥

२६.

पद

द्या निज पार्वतीला । शंकरा ॥ध्रु.॥

वृद्ध पतीनें घालुं नये तनु तरुणिचि कर्वतिला ॥१॥

काय उचित जोग्याचे समागमें हें गजचर्म तिला ॥२॥

भांग कसा पासी वसति परि । वाटति शर्म तिला ॥३॥

या कुटिकेहुन सुख त्या सदनीं लागेल सर्व तिला ॥४॥

जालंदरवर सुंदर सुखकर लाभल पर्व तिला ॥शंकर॥५॥

विष्णुदास म्हणे बहु खळ बोले सोडुन मुर्वतिला ॥शं.॥६॥

२७.

ओवी

न धरवे तमोगुणाचा तबक ।

नेत्रांतुन उसळे पावक ॥

तिहीं लोकीं गाजली हांक ।

पिनाकपाणी क्षोभला ॥१॥

२८.

श्‍लोक

बोले नमुनि गिरिजा प्रभु शंकराला ॥

मारोनि काय फळ त्या तारि चाकराला ॥

तो दांडगा खळ मदांधक पापराशी ॥

जाळा त्वरीतचि जालंदर कापुराशी ॥

२९.

साकी

वृत्तांत कळता असुर खळदळ घेवुनि कैलासि ॥

गेला जालंदर त्या पाहुनी बैल हंसे बैलासी ।

पतंग पामर तो । झगटुनि दीपा मरतो ॥१॥

३०.

पद (पुरवणी)

ते शुंभ निशुंभादिक खळ, जमले पुष्कळ, पक्षी असुराचे ॥

प्रतिपक्षी भार सुराचे ॥ जाहलें एक मय वर्ण, कढा आलें वरण, उडिद मसुराचे ॥

पेटले कटक खदिराचे ॥ तडफडती पडती, दणाणा उठती, नाना शब्द सुरांचे ॥

बहु पडती ढीग निसुरांचे ॥ तो केवळ पातक लोभी ।

सोडिना हट्ट तथापि । जालंदर परम प्रतापि ॥१॥

३१.

ओवी

शुक्र मंत्र जपोनि ओठीं । उठवी दैत्यांचिया कोटि ।

तेणें देवगणांच्या पोटीं ॥ धैर्योत्साह ठरेना ॥१॥

३२.

पद

काय विचित्र तरी नवलाई ॥

कोण युद्धात आली ही बाई ॥ध्रु.॥

नये गणतिस किती शरिराची उंची ॥

पांघरलि काळि गगनाची कुंची ॥

काळीच दिसे जैसी शाई ॥१॥

विक्राळ दरिमुख भ्यासुर दाढा ॥

निवडुन टाकुन या मुरदाडा ॥

जिवंत दैत्यासि खाई ॥कोण.॥२॥

करि सर सगटचि गटधंड मुंडा ॥

कोठून आली ही चामुंडा ॥

इज कोण प्रसवली आई ॥३॥

कल्पांतकालाचि ही भगिनी ।

शुक्रास कोंडुन टाकित भगिनी ॥

लागली भक्‍ति हातिं पायीं ॥४॥

विष्णुदास म्हणे जय विसराची ॥

आटली अवघी चमु असुराचि ॥

सुटली एकचि घाई ॥५॥

३३.

ओवी

शंकरासि घालुनि मोहनी ॥

गीतनृत्याच्या ध्यानिं लावुनि ॥

आपण शंकररुप घेऊनी ॥

अंतरगृहीं प्रवेशला ॥१॥

३४.

श्‍लोक

गळां माळा घाली त्रिशुळ डमरु वाजवि करीं ॥

शिरीं गंगा अंगा विपुल विभुती चर्चन करी ॥

प्रतीबिंबीं बिंबें, टवटव शशी शेखराचे ॥

महापापी जालंदर रुप धरी शंकराचें ॥१॥

३५.

पद (चाल-ललिताची)

करि करुणा माधवा ॥ध्रु.॥

धाव कृष्णा वनमाळी ॥

पाव आम्हांसी ये काळीं ॥

नांव आपुलें सांभाळी ॥

दीनवत्सला केशवा ॥१॥

घननीळा मेघःश्यामा ॥

मनमोहना विश्रामा ॥

नको उपेक्षूं तूं आम्हां ॥

मधुसूदना माधवा ॥२॥

नारायणा नरहरि ॥ संकट हें परिहारी ॥

दुष्ट पापी संहारी ॥ करि शिक्षा दानवा ॥३॥

भावे बोले विष्णुदास ॥ आशा न करी उदास ॥

येवढी पुरवावि आस ॥ करि शिक्षा दानवा ॥करी ४॥

३६.

घनाक्षरी

कर्णी कुंडले झगझगट ॥ शंखचक्राच्या सगट ॥

चित्ति चिंतीता प्रगट ॥ हरी प्रगट जाहला ॥१॥

३७.

पद

उमापति डोले रमापति पार्वतिला बोले ॥ध्रु॥

ऐके गिरिजाबाई । दयाळे श्री अंबाबाई हो ॥

सांग मज लवलाही ॥ येवढी कां केली घाई ॥

करुन बहु घाई ॥ आलों मी धांवतचि पाईं ॥

स्मरण कशाला केलें ॥१॥

शशिधर स्वरुपाला ॥ धरी मनीं चिंतुनि पापाला ॥

लपत गृहीं आला ॥ कपटि तो जालंदर मेला ॥

विलोकुनि त्याला । केशवा जीव माझा भ्याला ।

म्हणुन तुज स्तविलें ॥रमा २॥

नको करुं चिंता, वर्म मी सांगतों तुज आतां ॥

पुण्यशील सरिता ॥ तयाची पतिव्रता कांता ॥

खटपट बहु करितां ॥ कुणाच्या तरी नये हाता ॥

मला एक सुचलें ॥ रमापति ॥३॥

कपट जसें तेणें केलें तसें आपणही करणें ॥

बोलती शहाणे । जशासी तैसेचि होणें ॥

सत्वहानि दुसरी युक्‍ति न जाणवीणें ॥

वचन मानवेल ॥रमापती॥४॥

३८.

ओवी

विलोकुनी मन रमणी वृंदा ॥ लागली झुरणी गोविंदा ॥ध्रु॥

प्रभु जो सर्वांतरसाक्षी ॥विसरला कमला कमलाक्षी ॥

वृंदेच्या मुखकमला लक्षी ॥भ्रमरसा आदरें अपेक्षीं ॥

सुरस मकरंदरसगंधा ॥लागली झुरणी गोविंदा ॥१॥

दाटला निद्राभर नयनीं ॥पहुडली लतिका सुखशयनीं ॥

घालुनी सुमनकली स्वप्नीं ।लाविली चिंतेच्या तपनी ॥

सुकली टवटवी रसगंधा ॥२॥लागली ॥

३९.

ओवी (पुरवणी)

स्वप्नीं जालंदराची जाया ॥ पाहे खंडित पुरुषछाया ॥

सौभाग्यहीन झाली काया ॥ ही भ्रममाया विष्णुची ॥१॥

४०.

पद (पुरवणी)

ती, वृंदा सुंदर चित्रचि पाहे विचित्रचि दुःस्वप्नाला ॥

वाटेना चैन मनाला ॥ नावडति, सख्य, सखीजन, त्यजिले, भोजन-सुखशयनाला ॥

येइना झोप नयनांला ॥ शरिराचि जाहली काहाली ॥

नाहींच नाहाली ॥ त्यागि जिवनाला ॥

वन मानी गृहभुवनाला ॥ आक्रोश करी गुण राशि ॥

सकळ शरिराशी । विरहज्वर व्यापी ॥१॥

४१.

पद (पुरवणी)

लागला वणवा गृहभुवनीं ॥ सर्वही दिसे फिरली अवनी ॥

चहुंकडे पुरि माजली यवनी ॥ धेनु भयाभित अंतःकरणीं ॥

कोणता न सुचे गृह धंदा ॥ लागली झुरणी गोविंदा ॥१॥

४२.

ओवी

जालंदराचि गोरटी ॥ दुःखें आलापित एकटी ॥

दोघे राक्षस त्या संकटीं ॥ पाठीमागे लागले ॥१॥

४३.

पद

गाठिली व्याघ्रानें हरणी ॥ पळे भयाभित अंतःकरणीं ॥

धावतां जड झाली चरणीं ॥ पदोपदीं पडे उलथुन धरणीं ॥

कोसळे दुःखाची बाधा ॥ लागली झुरणी गोविंदा ॥१॥

४४.

श्‍लोक

शोकें व्याकुळ अश्रुयुक्‍त दिसती आरक्‍त नेत्रोत्पलें ॥

ठायीं ठायिं तदा तुटून पडती नक्षत्र मुक्‍ताफळें ॥

होवोनि विगलीत वेणि सुटले गुंफीत गंगावन ॥

वाटे पाठिस लागला जणुं कि या सीतेसि तो रावण ॥१॥

४५.

पद (पुरवणी)

म्हणे कोठुनि लागली कटकट, पाठिस बळकट मेलें मी बाई ॥

कसे करुं अगाई आई ॥

हे राक्षस खळ मज खातिल, पुष्कळ करतील, तरी छळ नाही ॥

मरते मी वाचत नाहीं ॥

तो दिसला सन्मुख भागी । एक महायोगी ।

तरुतल ठाई वाटला मनीं धिर कांहीं ॥

कौपिन जटाजुटमंडित, वेदश्रुत पंडीत, खरा वहुरुपी ॥१॥

४६.

साकी

अहो तुम्ही मुनिमहाराज कृपानिधी रक्षण माझे करा हो ॥

या कृतउपकारापुढें वरकड जपतप आन्हिक राहो ॥१॥

४७.

ओवी

विलोकुनि अन्याय कृती । क्षोभली ब्राह्मणाची प्रकृती ।

हुंकारितां राक्षसा कृती ॥ गुप्‍त झालि क्षणार्धें ॥२॥

४८.

दिंडी

थोर टळलें आरिष्ट राक्षसाचें ।

किती वर्णूं सामर्थ्य तापसाचें ॥

श्रेष्ठ भाग्य मातेच्या पायसाचें ॥

म्हणुन झाले हे प्राप्‍त पाय साचे ॥१॥

४९.

पद (चाल-माझा कृष्ण देखिला का)

येकदा प्रसन्नवदने मसी, बोला मुनिवर्या ॥ध्रु.॥

पडले कर्मगतिच्या फंदा ॥ सोडुन आले वनीं गृह धंदा ॥

या देहाला म्हणती वृंदा ॥ जालंदर भार्या ॥१॥

अवलंबुनि या वैर क्रमासी ॥ पति गेले सुर संग्रमासी ॥

ते कधि येतील परत गृहासी ॥ साधुन शुभकार्या ॥२॥

अपेशाची काजळी काळी ॥ नाहीं लागली आजवर भाळी ॥

न कळे शुभाशुभ सांप्रत काळी ॥ कशी दिनचर्या ॥३॥

माझी विनंति जावी न वाया ॥ यास्तव स्वामी लागते पायां ॥

विष्णुदास म्हणे श्रुत सदुपाया ॥ गातील पद आर्या ॥४॥

५०.

श्‍लोक

न बोलेची कांहीं सचकित मुनी स्वस्थ बसला ॥

तदा वृंदेला तो विपारित मनीं भाव दिसला ॥

म्हणे माझ्या आतां सकल दुर करा संशयासी ॥

खरे बोला स्वामी किमपिहि नसे दोष यासी ॥१॥

५१.

ओवी

ऋषेश्‍वराचा चमत्कार ॥ दिसे प्रत्यक्ष साक्षात्कार

वृक्षाग्री देत भुभःकार ॥ दोघे वानर पातले ॥१॥

५२.

साकी

त्या कपिला तो अवलोकन करी भृसंकेत तपराशी ॥

ते वृंदेच्या पुढें टाकिती पतिची धड शिराशी ॥१॥

५३.

दिंडी

अती आक्रोशें रुदन करी वृंदा ।

दुःख दाटे पशुपक्षी वृक्षवृंदा ॥

विलोकीता त्या सुवदनरविंदा ॥

वाटे झाले तपसिद्ध त्या मिलिंदा ॥१॥

सोडुनि तुम्ही इकडिल आस्था, तिकडेचि बसतो, महिनो महिनी ॥२॥

भ्रमलें, वनोवनी दिनवाणी नसे कोणी सदनिं, सासु दिर वहिनी ॥३॥

समराचि हा टाकावि, माझी ऐकावि, युक्‍ति ही सोपी ॥४॥

५४.

पद (पुरवणी)

शोकाचें कढत मग आधण ॥

पाहसी आत वदनकमल बुडवाया ॥

साजणी नको रडुं वाया ॥

मोह कर्दम भर उमरीचा, या तसबिरीचा, रंग उडवाया ॥

साजणी नको रडुं वाया ॥१॥

अविवेक गजाचे पदतळीं ।

नवनित पुतळी देसि तुडवाया ॥२॥

हा जीव सुखाचा साथी, सहज दिवसांती ॥

गेला झोपी जालंदर ॥३॥

५५.

पद (पुरवणी)

तपोनिधीची त्या निर्वाणीं । ऐकुनी अभयाश्रय वाणी ॥

आटोपून नेत्राचें पाणी । प्रार्थना करी जोडुन पाणी ॥

म्हणे या तोडी भवबंदा ॥ लागली झुरणी गोविंदा ॥१॥

५६.

ओवी

सत्‌पुरुषाच्या लागतां पदा ।

जन्मांतराच्या हरति आपदा ॥

नाहीं झाली अमर्यादा ॥

या वचनाची आजवरी ॥१॥

५७.

आर्या

उठला जालंदर वर उठली वृंदा मुखप्रभा उठली ॥

उठला सकाम मुनिही उठली धर्मलक्ष्मी उठली ॥१॥

५८.

पद (पुरवणी)

झाडुन पदधुळ पदरानें, अति आदरानें, म्हणे मृगनयनी ॥

वल्लभा चला सुखशयनीं ॥ ध्याति सतत रमति साधु भजना ॥

समर्थाचि लीला भवनिधिमधें तारक जना ॥१॥

५९.

पद

त्या सुंदर मृगनयनेंसि भुलला ॥

कपटरुपें हरी मंदिरीं आला ॥

तो चकोरापरि अनुपम रुपमुख ॥

चंद्रासि पाहुनी लंपट झाला ॥१॥

सकल तनु निर्मल अलंकचि ॥

एक कलंक तिळ गोंदिले गाला ॥२॥

कशि होईल मज धारण कंठीं ती नवसुवर्ण चंपकमाला ॥३॥

विष्णुदास म्हणे कुमुदिनी कशि वश होइल या भ्रमराला ॥४॥

६०.

कामदा

चिंतिताचि जो काम श्रीहरी ॥

कामसक्‍त तो होय श्रीहरी ॥

ये कशी म्हणे सद्य शहाणी ॥

ही पतिव्रता थोर शाहाणी ॥१॥

६१.

श्‍लोक

व्यभीचारें गोपी सकल हरिनें मोक्षसदना ॥

कळेनाची त्याची अघटित लिला एकवदना ॥

सदा गाती ध्याती सतत रमती साधु भजना ॥

समर्थाची लीला भवनिधिमध्यें तारक जना ॥

६२.

पद (पुरवणी)

हरि भले तें, भलत्या समयीं, भलत्या ठायीं, भलतेंच मागें ॥

भलतेच अकल्पित सांगें ॥

कधीं अगदिंच मौन धरावें, निष्ठुर रागें,

कधिं अनुरागें, आनंद वाटे अमरांगें ॥

ती कनकलता चव कशी, कसली जशी, तशी तशी वागे ॥

घे म्हणुन या वाहवा गे ॥

मग टाकुन अवघे साधन, सप्रेम धन, तन मन वोपी ॥३॥

६३.

आर्या

देवी म्हणति न हरली ती वृंदा परि हरीच हरला गे ॥

अबला खरीच प्रबला भिल्लिणें मागे तरीच हरि लागे ॥१॥

६४.

पद (पुरवणी)

पाहिल्यावाचुन गजगमना ॥ हरिला घटकाभर गमना ॥

उपक्रम केले सकल मना ॥ त्रिभुवन वाटे विकल जना ॥

निशिदिनीं पडला तिचे फंदा ॥ लागली झुरणी गोविंदा ॥

६५.

दिंडी

सहजलीलेच नयन शर पिसारे ॥

लागतांची मज लागले पिसारे ॥

तुझा चंद्रानने ओष्ठ सुधा सारे ॥

मानितों मी हें तुच्छ जगत सारें ॥१॥

६६.

ओवी

या देहाची चैतन्य ज्योति ॥ जी गत झाली विझली होती ॥

सिद्ध पुरुषानें ती मागुती ॥ चेतविली वल्लभे ॥१॥

त्याची आजपर्यंत सीमा ॥ चालतां होवुनि गेली सीमा ॥

तुजसि सोडुन निजधामा ॥ जाणें आम्हा लागतें ॥२॥

ऋषेश्‍वराच्या कृपेचें फळ ॥ तुझ्या सौभाग्याचें बळ ॥

पूर्ण झाली कामना सकळ ॥ दैव सबळ आमुचें ॥३॥

लाभली जी सुंदर काया ॥ ती सुंदरी न जावी वाया ॥

उभय लोकीं सुख व्हाया ॥ होय भार्या विष्णूची ॥

६७.

आर्या

आहे तुमचा आमचा वधुवर विधिचा संबंध कां नाहीं ॥

सोडुन काय नासिक जाईल सांगा सुगंध कां नाहीं ॥१॥

६८.

पद (पुरवणी)

शुभवदने मीच जालंदर, मीच गदाधर, मीच मदनारी ॥

अनुमान नको करुं नारी ॥

कैवल्य सदनसमर्पित, मी घन नळ पीत पितांबरधारी ॥१॥

ही करणी विहितचि केली, होवुन गेली, गोष्ट होणारी ॥२॥

तुज दाविन बहु धामासी ॥३॥

उभय सुखासी, पायरी सोपी ॥४॥

६९.

पद (पुरवणी)

चित्सुखामृताची लहरी ॥ प्रगट जाहाला हरी ॥ध्रु.॥

किरिट कुंडलें अपार ॥रत्‍नजडित मुक्‍तहार ॥

चमकताति शंखचक्र । मीरवे करीं ॥१॥

स्वरुप घन सावळे ॥ कटिस वसन पीवळें ॥

सजल अमल कमलनयन । सकल दुःख संहरी ॥२॥

पाहातां पदारविंद ॥ मनचि होतसे मिलींद ॥

विष्णुदास देववी वास ॥ केशवास अंतरीं ॥३॥

७०.

कामदा

प्रगटला हरी रंगमाहलीं ।

जलधिची स्नुषा तप्‍त जाहली ॥

कपट साधुनी माझिये व्रता ॥

बुडविलें म्हणे ती पतिव्रता ॥१॥

७१.

पद (पुरवणी)

केलें हें अनुचित पाप, तुला घे शाप,

जगदोद्धारा तूं करशील दार दारा ॥

वनवास प्राप्‍त तुज होईल, तुझि वधु जाईल, राक्षसदारा ॥तूं॥१॥

तूं मर्कट गारुडी होशील, वनोवनीं फिरशिल, वाहातिल धारा ॥२॥

विष्णुदास म्हणे ती वृंदा ॥ श्रीगोविंदा ॥ यापरि शापी ॥३॥

७२.

ओवी

टाकोनि विरहानळी गोविंदा । चेतवोनी जातवेदा ॥

उडी घालतांची वृंदा ॥ भस्म झाली क्षणार्धे ॥१॥

 

७३.

पद (पुरवणी)

प्रभु त्या दुःखें आक्रंदे ॥ म्हणे हा वृंदे हा वृंदे ॥

तुझी प्रित मजवरती असुं दे ॥ एकदा आलिंगन मज दे ॥

विष्णुदासाभिमानी सदा ॥ लागली झुरणी ॥१॥

७४.

श्‍लोक

ती वृंदा गुणवल्लिका पुनरपि श्रीमाधवा लाधली ॥

श्रीरंगासह ती अखंड तुळसीवृंदावनीं शोभली ॥

घेतां साक्षपे जी करील सति ती लोकत्रया पावन ॥

विष्णूदास म्हणे चरित्र पठतां तोषे जगज्जीवन ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP