सती हृदय - श्लोक १२१ ते १३०

दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.


१२१.

मदोन्मत्त या पातवयांच्या विनाशा

करी साह्य तूं पांडवांना रमेशा

नतद्रष्‍ट हे नष्‍ट होतील जेव्हां

मला मिष्‍ट आहार लागेल तेव्हां.

१२२.

तुवां पांडवां धैर्यधारी करावें

मनोधैर्य त्यांचें कधीं ना खचावें

तयांच्या मनीं बिंबवी वैर-हेतू

करी येवढें कार्य नारायणा तूं.

१२३.

उदासीन ठेवूं नको नाथ आतां

करी सिद्ध हे वीर श‍त्‍रु-विधाता

अविश्रांत आयास सोसून यांनीं

विनाशास न्यावींत शत्‍रु-घराणीं.

१२४.

निजाधीनता पाहिजे पांडवांना

तुझें शस्त्र-भांडार दे शीघ्र यांना

हरे सर्व हे वीर धर्मानुयायी

न होतील ते त्यामुळें आततायी.

१२५.

नसे ही कथा ऐकल्या द्रौपदीची

विचारांत घे गोष्‍ट सार्‍या स्त्रियांची

विनादंड हे पातकी मुक्त होतां

अनाचार सर्वत्र माजेल ताता.

१२६.

म्हणूनी तुला प्रार्थितें देवदेवा

तुवां दंड या पातक्यांना करावा

जगीं लोक सन्मार्गगामी रहाया

तुला हेंच कर्तव्य आहे कन्हैया.

१२७.

मुकुंदा समुत्कर्ष निःश्रेयसाचें

मुदें घेतलें वाण आम्ही सतीचें

अहोरात्र ही ध्येय-निष्‍ठा स्फुरावी

मनीं आमुच्या जाग ही नित्य ठेवी.

१२८.

प्रभो आमुचे हेच अंतस्थ हेतू

करुं साध्य यत्‍नें बलायुष्य दे तूं

सदिच्छा असे ही स्वयंप्रेरणेची

व्यथा ना मुळीं मानसा संकटांची.

१२९.

तुला मंगला ऐक आतां विनंती

पराधीनता घालवी ही दिगंतीं

यशस्वी करी आमुचे यत्‍न सारे

शुभाशीर्वचा पांडवां दे मुरारे.

१३०.

तुझा सर्वदा योग कृष्णा घडावा

भला मार्ग आम्हांस तूं दाखवावा

कृपा-हस्त ठेवी तुझा मस्तकीं या

जयश्री मिळो नित्य आम्हां कन्हैया.

- जय जय जगदीश समर्थ -

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP