श्री दत्तप्रबोध - अध्याय चोवीसावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.

श्रीगणेशाय नमः । श्रीसद्‌गुरुदत्तात्रेयाय नमः । श्रीकुलस्वामिने नमः ।

जयजय जगद्‌गुरो जगन्निवासा । अविनाशा तूं चित्सुखविलासा । तूं रंजिता सज्जनमानसा । आणि तापसा योगीजना ॥१॥

स्वामी दयाळा श्रीदत्ता । तूं अज्ञानतिमिराचा हर्ता । सदय होसी तूं ज्ञानदाता । नुरविसी चिंता दासातें ॥२॥

सद्‌गुरु तूं अविनाश अभंग । करिसी दासाचा भवभंग । प्रबोधें करिसी निःसंग । आत्मरंग बाणविसी ॥३॥

या जगदोद्धारासाठीं । आत्मज्ञानाची खोलोनिया पेटी । निरोपणें सांठविसी मायपोटीं । सर्वा घटीं भरावया ॥४॥

आदरितां अनसूयच्या प्रश्ना । त्रासा न मानी धरिसी सहिष्णा । उत्तरें वारिसी तिची तृष्णा । शांतवोनि उष्णा वारिसी ॥५॥

गत कथाध्यायीं मातेसी । निवेदिलें तया पिंडोद्भवासी । ते ऐकतां सुख मानसीं । धन्य निरोपिसी म्हणे दत्ता ॥६॥

आजिचिया प्रसंगीं । श्रोते सावध होइजे वेगीं । मन न घालिजे आन उद्वेगीं । श्रवणरंगीं रंगावें ॥७॥

दत्तअनसूया संवाद । परिसोनि जाणिजे त्याचे भेद । मायिंक निरसेल अवघा खेद । श्रवणीं आनंद उपजेल ॥८॥

तुम्ही संत श्रोते शिरोमणी । तुम्हां योग्य हे असतीं लेणीं । म्हणोनि प्रार्थितों कर जोडोनि । भूषणें श्रवणीं लिइजे ॥९॥

भक्तिज्ञानवैराग्ययुक्त । तुम्ही ज्ञानी विचक्षण पंडित । सिद्ध साधु संत महंत । भाविक भावार्थ जाणते ॥१०॥

या आध्यात्मिकाचें ज्ञान । तुम्हांवांचोनि जाणेल कोण । तुमचा अधिकार श्रेष्ठ वोळखोन । करितों निवेदन कथा हे ॥११॥

कथा निवेदन करुं म्हणे । हेंही म्हणतां दिसे उणें । भास्करा उजेड दावणें । वातीपणें काय तें ॥१२॥

आपण ज्ञानाचे सागर । वाड दावी पुढें मी थिल्लर । तुम्ही शांत सतेज अंबुधर । काजवा समोर तैसामी ॥१३॥

न देखोनि आपुला अधिकार । बृहस्पतीसि भिडे जेवीं पामर । तोचि म्यां अर्भकें मांडिला विचार । तुम्हांसमोर होऊनी ॥१४॥

नसता कांहीं मजसी ज्ञान । न करितां ग्रंथ अवलोकन । कांहीं न करितां विद्याधारण । दावी शहाणपण मूर्खत्वें ॥१५॥

वेदांत सिद्धांत आध्यात्मिक । नाहीं केलें श्रवण चोख । अनधिकारी मी अर्भक । बोले सन्मुख तर्कटें ॥१६॥

ऐसा मी अपराधी खरा । तुम्ही जाणतसां दातारा । इच्छेऐसा दंड करा । वोपिलें शिरा तुमचे पदीं ॥१७॥

अन्याय करोनि अगणित । तुम्हां जालों शरणागत । तुम्ही अनाथाचे नाथ । करवि सनाथ शिक्षोनी ॥१८॥

तंव संत श्रोते योगी सज्जन । बोलती सकृपें काय वचन । त्वां पद घोवोनिया सान । दिधलें थोरपण आम्हांसी ॥१९॥

श्रीमदृत्तकृपें करोनी । तुझी वदतसे ग्रंथीं वाणी । आम्ही न म्हणों तुझी करणी । वदविता धणी वेगळाची ॥२०॥

रायें घातलें पाठीसी । कोण सांग दंडींल त्यासी । अर्धांगीं बैसवितां दासी । निंद्य तिजसी कोण म्हणे ॥२१॥

रायें दुर्बळाचें बाळ । पट्टीं बैसविलें होवोनि कनवाळ । तया वंदी प्रजा सकळ । प्रधान दळ समवेत ॥२२॥

तेवीं या अवधूतें । कृपा केली सत्य तूतें । आम्हांमाजीं केलें सरतें । उणीव यातें कोण आणी ॥२३॥

पूर्वी निंद्य गांवींचा ओहोळ । परी गंगोस मिळतां गंगाजळ । तेवीं संतसागरी तुझा मेळ । दूषित विटाळ कैचा आतां ॥२४॥

लोहो परिसासी लागला । कृष्णपणा त्याचा समूळ गेला । सुवर्ण गोळ अवघा जाला । मोला चढला अपार ॥२५॥

तेवीं सद्‌गुरुकृपें करुन । तुज दत्तें केलें पावन । स्वकृपेचें देवोनि दान । वदवी महिमान आपुलें ॥२६॥

भूपाअंगीं सर्वसत्ता । होयचा मी दाम चालविता । शिक्षाचि लागे अव्हेरितां । वंदणेंचि माथा आज्ञा ती ॥२७॥

तेवीं दत्तसत्ता ही थोर । न घडे तियेचा अनादर । त्याचेचि कृपेचे उद्गार । करवी विस्तार या ग्रंथीं ॥२८॥

दत्तप्रबोध नाम ग्रंथा । येथें दत्तचि असे बोलविता । कोठोनि येईल न्यूनता । सर्व साहित्या पुरवी तो ॥२९॥

तूं निमित्तासी कारण । पत्रीं करिता होय लेखन । न धरोनि कांहींच अभिमान । चरणीं ध्यान असों दे ॥३०॥

दत्ताचें ठाण असे मुखीं । तो पडों नेदी कोठें चुकी । कथा चालवील नेटकी । न पडे फिकी गोड बहु ॥३१॥

अनुपम्य ही कथा गोड । दावी अज्ञानासी निवाड । परमार्थीचे पुरवी कोड । साधवी जोड साधकां ॥३२॥

तरी परियेसी अनंतसुता । आठवोनि त्या सद्‌गुरुदाता । चालवी आध्यात्मिकाची वार्ता । सुख संतोषता आम्हां तेणें ॥३३॥

सर्व रसाहोनि आगळें । श्रेष्ठ हें तें अमृत वर्णिलें । परी आम्हांतें गौण भासलें । सेवुनी पावले मृत्युलोका ॥३४॥

तया अमृताचे सेवून । येवोनि पावावें मृत्युभुवन । येणेंचि आलें तया दूषण । श्रेष्ठपण कैंचे या ॥३५॥

या अमृताहोनि विषेश । दत्तकथामृत असे सुरस । आवडी सद्भावें सेवितां तयास । पद अविनाश पाववी ॥३६॥

ही कथा करितां श्रवण । पापे जाती दग्ध होऊन । श्रवणाचें घडतां मनन । निवटे अज्ञान ज्ञान होय ॥३७॥

मनीं धरितां निजध्यास । साक्षात्कार होय त्यास । निःसीम आचरतां धारणेस । जन्ममरणास मिटवी ॥३८॥

कथा नोव्हे हीं निवृत्ती । उडवी भवभयादि भ्रांति । द्वैत नसोनी अद्वयस्थिती । उपजवी प्रीती आत्मत्वाची ॥३९॥

आत्मत्वी जडतां मन । मग तें सहजची होय उन्मन । सकळ सुखांचें सुखस्थान । तेंचि आपण होइजे ॥४०॥

यासाठीं आम्हां श्रवणीं चाड । वक्तिया कथींते कथा गोड । प्रश्नोत्तरी जडली आवड । पुरवी कोड निवेदी ॥४१॥

जी जी म्हणोनिया वक्ता । विनवी ठेवोनिया पदीया माथा । अनसूया म्हणे गा दत्ता । उद्भववार्ता निवेदिसी ॥४२॥

बाह्य देवाचे विवरण । तें म्यां ऐकिले निरोपण । परी अंतर्गर्भ निवडोन । सांगे संपूर्ण विस्तारें ॥४३॥

अवधूत म्हणे वो जननी । बरवा प्रश्न केला शोधोनी । तो तुज सांगतो विवरोनी । सांठविजे श्रवणी आदरें ॥४४॥

नव नाडी असती देहीं । त्या पृथक सांगतों पाहीं । नामें ऐकोनिया घेईं । स्थानें तेहीं निवेदिन ॥४५॥

सकळ नाडींचें अधिष्ठान । तें हें कुंडलिनीनामें जाण । आठ पृथकत्वें भिन्न भिन्न । किजे श्रवण सांगतो ॥४६॥

हंसरुपिणी प्राणवाहिनी । इडापिंगळा चौघी जणी । गांधारी आणि हस्तिनी । पुखा शंखिनी आठवी ॥४७॥

एवं नाडी ह्या नवं । यांचा कोठोनि कैसा ऐक प्रभाव । कर्णापासून करी धांव । गांधारी वैभव हस्तिनीचें ॥४८॥

पुखा शंखिनी भल्या । नेत्रांपासोनि निघाल्या । चरणांगुष्ठांतें पावल्या । तेथेंचि स्थिरावल्या जाणिजे ॥४९॥

इडा पिंगळ द्राणाहुनी । कंठीं राहिल्या व्यापुनी । हंस आणि प्राणवाहिनी । पावल्या जावोनी टाचेसी ॥५०॥

या आठींतें आवरुन । असे कुंडलिनीचें स्थान । तिचे बळें बळावोन । केलें आकर्षण देहासी ॥५१॥

आणीक एक असे गुज । तें मी निवोदितों तुज । सुषुम्णा वज्‍रनाडी सतेज । येथील गुज गुरु जाणे ॥५२॥

वज्‍रदंड मणिपुरमार्ग । तेथेंचि तिचा असे प्रसंग । तया जाणावयाचें अंग । करितां लाग न करवे ॥५३॥

हे नवाहोनि आगळी दावी । हे श्रीगुरुमुखें ओळखावी । त्या कृपेनेंचि गती साधावी । येरां ठावी न पडे ती ॥५४॥

जेवीं उदकीं संधी अवलोकून । नळिकायंत्रीं प्रेरिजे बाण । भेदिती मच्छाचा वाम नयन । टाकी भेदून तेवीं हें ॥५५॥

असो आतां सांधे सोळा । तुज मी सांगतो पाहे डोळां । घोटे गुडघे आणि कंठस्थळां । साही मेळा उभय पक्षीं ॥५६॥

मणगटें खुबे कोपर । साही मिळोनि दोन्ही कर । आतां उरले जे का चार । तोहि प्रकार निवेदितों ॥५७॥

एक हृदयातें जाणिजे । एक तो कंठ ओळखिजे । भव शिर दोनी देखिजे । एवं घेइजे ओळखी यांची ॥५८॥

हे प्रत्यक्ष सोळा सांधे असती । आतां बाहात्तर कोठयांची व्युत्पत्ती । निवडोनि सांगतों तुजप्रती । धरीं चित्तीं माते तूं ॥५९॥

आधारचक्रीं असे एक । स्वाधिष्ठानींचा दुजा देख । नाभिस्थानीं दहा चोख । द्वादश चोख अनुहातीं ॥६०॥

दोन स्थूळ उदरींचे । सोळा जाणिजे कंठींचे । चार वायोयंत्रींचे । ध्वनी सांठवणीचे दोन पैं ॥६१॥

अग्निचक्रीचे दोन सुरस । एवं झाले हे पन्नास । पश्चिमेचे एकवीस । एक उर्ध्वास ओळखी ॥६२॥

बहात्तर कोठडया नेमून । तुज म्यां केल्या निवेदन । अंतीं बीजरजाचें प्रमाण । तेहिं निवडून सांगतों ॥६३॥

या देहामाजीं सतेज । सवा घट असे रज । औटपळें दिव्य वीज । करित काज उद्भवाचें ॥६४॥

तंव अनुसया वदे सज्ञाना । निरोपणीं तोषविसी मना । परी आणिक पुसते लक्षणा । तें मज सगुणा सांग तूं ॥६५॥

पूर्वाध्यायीं पिंड निवेदिला । रजबीजापासोनि उद्भवला । वायो तिसरा मिश्रित केला । परी न निवडिला भाग त्याचा ॥६६॥

मातापितयाची वांटणी । कैसी ते सांग विवरोनी । काय झाले या वायोपासुनी । विभक्तलेणीं लेववी ॥६७॥

अविनाश म्हणे माते बरवे । ऐसेचि त्वां प्रश्न करावे । आनंदें तूतें म्यां निवेदावें । संवादी बोधावें मुमुक्षां ॥६८॥

रज अंश हा मातेचा । बीजांश हा होय पित्याचा । तृतीय भाग तो पवनाचा । वास त्रिगुणाचा ती ठायीं ॥६९॥

रजोगुण असे रजाचा । तमोगुण बीजाचा । सत्त्वगुण वायूचा । ऐसा तिघांचा नेम माते ॥७०॥

तिन्हीं ठायीं मात्रा तीन । तेवींच दैवतेंही जाण । देहभाग कवणाचा कवण । कीजे श्रवण तोहि आतां ॥७१॥

बीज अंशाचा भाग जाण । तेथोनि अस्थि त्वचा निर्माण । मेद मांस रजापासोन । भाग हे दोन दोघांच ॥७२॥

आतां पवनाचा प्रकार । दशविध तयाचा विस्तार । त्यांचें वावरतें घर । नाडी निर्धार असती ॥७३॥

हे त्रिभाग म्यां तूतें । निवडोनि सांगितलें माते । तंव अनसूया म्हणे संख्येतें । करोन अस्थींतें दावी मज ॥७४॥

यावरी बोले तो अवधूत । तीनशें साठ हाडें देहांत । त्यामाजी एक अद्‌भुत । गणतीस राहात हाड एक ॥७५॥

परि हें योगिसिद्धसाधकांचें स्थान । भ्रमरगुंफेची हे खूण । या शवामाजीं असती तीन । जाणिजे लक्षण बरवें हें ॥७६॥

त्या तिहींचा पाहे लाग । त्रिस्थानींचे तीन मार्ग । त्रिकुटाचळींचा संधान भाग । हा तंव योग साधकांचा ॥७७॥

अनंत सिद्धांचे सिद्धांत । तो हा योग आणिजे लक्षांत । सर्व सुखाचें सुख प्राप्त । आहे तुम्हांत मजमाजीं ॥७८॥

वडील ठेवीचें गुप्त धन । दारिद्रय भोगी मंदिरीं असोन । तें प्राप्त व्हावयालागोन । पाहिजे प्रयत्‍न करावया ॥७९॥

तेथें पायाळूच सांगेल । परितया अंजन लागेल । मग तो पाहोनि परीक्षील । बोलतां बोलेल काय ऐका ॥८०॥

म्हणे पैल हें धन दिसे । तेथें रक्षणास बैसले असे । पंचाक्षर्‍यावांचोनि सांधेल कैंसें । हें तों न दिसे तो म्हणे ॥८१॥

तैं पंचाक्षरी उत्तम चांगला । दैवदशें हातीं लागला । तेणें बळी वोपोनि साधिला । उत्तम लाभविला द्रव्यघट ॥८२॥

तेवींच माते हेंहि जाण । सद्‌गुरु पंचाक्षरियावांचुन । न लाधे हा लाभ पूर्ण । तयासी शरण जाइजे ॥८३॥

असो कान डोळे नाक । ह्या तिन्ही वाटा चोख । येथील वर्म हें अलौकिक । भोगिल सुख तो धन्य ॥८४॥

आणीक एक भले । छपन्न सांधे असती उरले । तेही स्थानें वेगळाले । पाहिजे ऐकिले जननीये ॥८५॥

चरणांगुळीचे तेरा असती । द्वय मिळोन सव्वीस गणती । करांगुळीचे पंधरा दिसती । युग्में होती तीस पैं ॥८६॥

तीस आणी सव्वीस । छपन्न जाणावे गणतीस । प्रथम सोळा मिळवितां त्यास । आले भरतीस बाहात्तरीं ॥८७॥

सांधे कोशे बरोबरी । माते असती देहांतरीं । दश इंद्रियांची परी । मागेच उजरी केली तुज ॥८८॥

तंव अनसूया आणिक पुसे । अंतःकरणचतुष्टय कैसें । ऐकावया हर्षित मानसें । निवेदी विशेषें पृथकत्वें ॥८९॥

तंव बोलतसे योगेश्वर । मन बुद्धिचित्त अहंकार । हें चतुष्टय जाणिजे निर्धार । त्याचा प्रकार निवेदितों ॥९०॥

मन संकल्पविकल्प करी । बुद्धि बोधव्य लक्षण विवरी । अहंकार तो अभिमान धरी । चेतना करी चित्त हें ॥९१॥

आणि एक गुज खूण । ते तुज करितो मी निरोपण । शरीरीं वावरे प्राणपवन । गमनागमन दिवानिशीं ॥९२॥

कोण अक्षरीं येतसे बाहेर । कोण अक्षरीं करी संचार । हा तुज निवेदितों विचार । बहुत अक्षर नसती ते ॥९३॥

हं क्षं अक्षरें दोन । येणें त्रैलोक्य गेलें व्यापोन । हं तोचि शिव जाण । क्षं कार पूर्ण शक्तिरुपें ॥९४॥

हं अक्षरें श्वास बाहेरी । क्षंकारें प्रवेशे अंतरीं । अहोदिन अहोरात्रीं । रमतीं येरझारी संयुक्त ॥९५॥

क्षं वामदलीं इडेचे ठायीं । हं दक्षणदळीं पिंगळेसी पाही । येरयेरां सोडोनि नाहीं । वर्तणें काहीं तयांतें ॥९६॥

ऐकोनि दिगंबराचे बोल । आनंदें अनसूया देतसे डोल । म्हणे बा शब्द तुझे अमोल । परम रसाळ वाटती ॥९७॥

ऐकावेंचि वाटे निरोपण । यालागीं वारंवार करितें प्रश्न । किती वाचा सांगें नेमून । जाल्या कोठून काय नामें ॥९८॥

अवधूत म्हणे ऐकिजे मात । चारी वाचा असती निभ्रांत । नामें तयांची विख्यात । असती विभक्त पृथकचा ॥९९॥

परा आणि पश्यंती । मध्यमा वैखरी म्हणती । आतां जन्मल्या या कैंसे रीतीं । हेंहि निगुतीं परिसिजें ॥१००॥

मनासहित पवन । गगनीं आदळे जाऊन । तेथींचें ध्वनींचेपासून । परा जनन पावली ॥१॥

तेथुनी पवन मुरडतां । पश्चिमनळेमाजी भरतां । काकी मुखासी येतां । होय उद्भवता पश्यंतीसी ॥२॥

तेथूनि वायो उदेला । तो हृदयामाजीं भरला । तया स्फुरणें मध्यमेला । जन्म जाला पाहे माते ॥३॥

समीर उसळला तेथोनी । पावला येवोनि नासिकस्थानीं । वैखरी जन्मली तेंथोनी । चौघी जणी ऐशा ह्या ॥४॥

एवं ह्या वाचा चारी । तुज निरोपिल्या निर्धारीं । पांचवी वाचा निराकारी । जाणिजे परी अनिर्वाच्य ॥५॥

तेविंच चार देह असती । स्थूळ सूक्ष्म कारण म्हणती । चौये महाकारण बोलती । पांचवें निश्चिति अतिकारण ॥६॥

या देहींच देह जाणावे । विचारेंचि यातें वोळखावें । दश देहांतें अनुभवावें । सुख भोगावें देहींचें ॥७॥

अनुसूया म्हणे बरवें बोलसी । ते दश देह सांगें आम्हांसी । कैसेनि वोळखावें त्यांसी । त्या खूण मुद्रेसी निवेदी ॥८॥

एक एक देहा आंत । कोण वस्ती काय प्राप्त । तो पृथक निवडोनि तेथील भावार्थ । सांगें प्रचीत जेणें घडे ॥९॥

बहुत अथवा थोडा । विस्तारु असेल तैसा निवाडा । तो करुनी दावीजे उघडा । साधे रोकडा ऐसें करी ॥११०॥

अवधूत म्हणे तुज । सांगतों ऐक येथिंचें बीज । आम्हां योगीया हें सहज । बरवी वोज तूं राखी ॥११॥

हें ज्ञान जाणावया । पाहिजे सद्‌गुरुची दया । तरीच लाभेल माते तया । निरोपण वायां नवजे मग ॥१२॥

तुझा आग्रह पडला थोर । म्हणोनि सांगणेंचि साचार । तरी वृत्ति आतां करी स्थिर । राखी आवर बहुसाळ तूं ॥१३॥

येरळ नोव्हे हें बोलणें । शुद्ध खरेंचि हें नाणें । यातें गुरुपुत्रचि एक जाणें । तुजसी घेणें तरी घेई ॥१४॥

माते विनवितों तुज पाहीं । श्रवणीं एकाग्र लक्ष देई । हृदयीं सांठवोनिया घेई । वदतों दाही देहवार्ता ॥१५॥

प्रथम स्थूळ देहाचे ठायीं विलास । तो तुज सांगतों ऐक सुरस । पृथ्वीतत्व ऋग्वेद यास । वर्ण विशेष पीत तो ॥१६॥

र्‍हस्वमात्रा रजोगुण । अकारपूर्वक तेथें पवन । अवस्था जागृती नेमोन । इंद्रियकारण तेथींचें ॥१७॥

वाचा नेमिली वैखरी । विश्व अभिमानी निर्धारीं । उदात्त वाहिजे त्या स्वरीं । या त्रिकुटपरी जाणिजे ॥१८॥

सलोकता तेथें मुक्ती । अंगासन ते होय निश्चिती । अहंदीक्षा शोभे निगुतीं । घडे वस्ती सत्यलोकीं ॥१९॥

अन्न कोश वडवाग्नी । क्रिया शक्तीची असे रहणी । क्षर निर्णय तये स्थानीं । गायत्री नेमुनी प्रथम पदा ॥१२०॥

विघ्नेशतेयिंची दैवता । वाद्यतंतू होय वाजता । नेत्रस्थान दिसे पाहतां विष्टयानंदता जाणिजे ॥२१॥

तेथें पाहतां घटाकाश । गुप्त षण्मुखी मुद्रा विशेष । पिपीलिकामार्ग कळा ऊर्मीस । चाचरीमुद्रेस योजिलें ॥२२॥

एवं हे स्थूळाचें प्रकरण । पूर्ण त्रिकुटीचें परि ज्ञान । तूतें केलें म्यां निरोपण । सूक्ष्माचें श्रवण करी आतां ॥२३॥

श्रींहाटीचा प्रकार । सूक्ष्मदेह निर्धार । आपतत्त्व ऋषीश्वर । अनाहत स्वर सत्त्वगुण ॥२४॥

यजुर्वेद मध्यमा वाचा । तैजस अभिमानी साचा । जन मुक्ती समीपतेचा । कुंभक पवनाचा रीघ तेथें ॥२५॥

कोशअंशें प्राणमय । स्वप्न अवस्था तेथींची होय । त्वमहं दीक्षेची तया सोय । लोकठाय वैकुंठ तो ॥२६॥

तेथें नेमिला वर्णश्वेत । भास्कर सतेज असे दैवत । ज्ञानशक्ति परम विख्यात । निर्णय होत अक्षराचा ॥२७॥

उदराग्नी सत्यत्त्वें नेमिला । नेमोनि योगानंद बोलिला । द्विपरा गायत्री जपाला । कंठस्थान कळा जाणिजे ॥२८॥

मठाकाश उभारिलें सत्य । वितंतवाद्य तेथें वाजत । उन्मनी मुद्रा अंतर्गत । मार्ग विख्यात विहंगम ॥२९॥

नेमिली असे धूम्रकळा । भूचरीमुद्रा बाह्य लीला । गुरुलिंगाचा सोहोळा । भक्ति सुढाळा विष्णुत्वें ॥१३०॥

दीर्घ मात्रैक कारण । हें सूक्ष्मदेहींचें विवरण । आतां कारण देहींचें लक्षण । तेंहि निरोपण अवधारीं ॥३१॥

आतां गोल्हाटीचे जाणिजे भेद । ते मी सांगतो कारणी विविध । अंतःकरण करोनिया शुद्ध । करी सावध श्रवण हें ॥३२॥

तेथें शिवलिंग असे सुढाळ । रुद्रभक्ती वसे प्रेमळ । तमोगुणाचें असे बळ । मात्रा प्रज्वाळ स्फुल्लिंग ॥३३॥

सुषुप्तिअवस्था श्यामवर्ण । प्राज्ञ तेथींचा अपान । प्रत्याहार रेचक पवन । वाचा जान पश्यंती ॥३४॥

स्वरित तेथिला स्वरु । सरुपता मुक्ति निर्धारु । मनोमय कोश गंभीरु । दीक्षा विचारु कोहंत्वें ॥३५॥

लोक पाहतां कैलास । अद्वैतानंदीं विलास । शोकाग्नीचा तेथें वास । विचार कूटस्थास निर्णय ॥३६॥

येथें इच्छा शक्ती जाणिजे । विष्णुदेवता वोळखिजे । त्रिपदा गायत्री जपिजे । साम समजे वेद येथें ॥३७॥

या देहींचें हृदयस्थान । महदाकाश असे व्यापून । वाद्य वाजे पाहतां सघन । शांभवी जाण अंतर्मुद्रा ॥३८॥

कपीमाग असे निका । ज्योतीकळा ती साम्यका । बाह्य अगोचरी मुद्रा देखा। वर्मिक निका वर्म जाणे ॥३९॥

आतां अनाहतीचा संवाद । तुज निरोपणीं करितों बोध । जाणवितों पर्यें विविध । श्रवणीं सावध सांठवी ॥१४०॥

अनाहती देह महाकारण । जंगमलिंग असे स्थापन । ईश्वर देव स्वयें आपण । सेवाधन वेंची तेथें ॥४१॥

नीलवर्ण औटपीठीं । अर्धमात्रा वसे गोमटी । तेथें परा वाचा बरवंटी । वेदराहटी अथर्वणी ॥४२॥

वायुऋषि प्रसिद्ध । तुर्यावस्था विदेहानंद । त्राहाटक पवनाचा छंद । विकार विविध चित्ताचे ॥४३॥

गुरुप्रसाद जंव पाविजे । तवं सायुज्जमुक्ती भोगिजे । धारणा अंग वोळखिजे । आणीक ऐकिजे सांगतों पुढें ॥४४॥

येथील कोश विज्ञानमय । शिवोहं दीक्षा येथें होय । लोक येथिंचा आश्रय । आत्मनिर्णय जाणिजे ॥४५॥

येथील देवी आदिशक्ती । रुद्र दैवत होय निश्चिती ॐकार चतुष्पदा गायत्री । वाद्य असती वोषादी ॥४६॥

प्रत्यगात्मा अभिमानी । स्थान पाहतां मूर्ध्नी । प्रज्वलत्वें तो कामाग्नी । राहिलें विस्तारोनी चिदाकाश ॥४७॥

आत्मनिमुद्रा चांग । अति सोज्वळ मीनमार्ग । ज्वाळा कळा अव्यंग । खेचरीसंग मुद्रेचा ॥४८॥

एवं हे देह चार । यांचा निवेदिला विस्तार । आतां पंचम देहाचा प्रकार । होवोनि सादर ऐकिजे ॥४९॥

आतां भ्रमरगुंफा अगोचर । जाणती गुरुचे कुमर कुळवर्ण तेथें निरंतर । तो देह सुंदर अतिकारण ॥१५०॥

तेथें प्रसादलिंग असे । भक्तिसी सदाशिव विलसे । आकाश तत्त्व ऋषी भासे । अनिर्वाच्य वसे वाचा ते ॥५१॥

प्रतिशब्दें करोनी । ज्ञानदेह म्हणिजे त्यालागोनी । सूक्ष्म वेदांत ये स्थानीं । अवस्था उन्मनी तेथींची ॥५२॥

आनंदमय कोश सुंदर । कैवल्यमुक्ती मनोहर । अनामयोहं दीक्षा परिकर । ब्रह्मानंद निर्धार ते ठायीं ॥५३॥

तेथील निराश्रय लोक । ब्रह्माग्नि हा प्रदीप्त देख । क्षेत्रज्ञ निर्णय सुरेख । परा देख शक्ती तेथें ॥५४॥

शक्तिच तेथील दैवता । अनाहत वाद्याची ध्वनिता । निरंजन अभिमानी पुरता । शिखास्थानता जाणिजे ॥५५॥

तेथील गायत्री म्हणसी कोण । पंचपदा परमार्थपद जाण । निराकाश तेथें विस्तिर्ण । घ्यावे वोळखून गुरुमुखें ॥५६॥

अंतमुर्द्रा पूर्ण बोधुनी । शेषमार्ग तये स्थानीं । कळातीत कला भव्यपणीं । बाह्य लक्षणीं अलक्षमुद्रा ॥५७॥

हे पंच देह निवेदिले । माते तुवां श्रवण केले । तेविं साहव्याचीं भलें । लक्षणें ऐकिले पाहिजे ॥५८॥

साहावें तें गुणगुज । तें मी सांगतों आतां तुज । कठिण असे तेथील समज । बहुतांसि उमज न पडे तें ॥५९॥

तेथें ब्रह्मरंध्राचें स्थान । तेथें महालिंग प्रभायमान । तेथें पुरुष स्वयें आपण । करी अर्चन निष्ठध्यानीं ॥६०॥

तया महालिंगापासीं पाहीं । हेतुविकार समूळ नाहीं । तेथें निश्चळयोगें पाहीं । समाधिस्थ राही कोटियुगें ॥६१॥

ते प्रकाश परं ज्योती । वाटे कोटि भानु तपती । परि दाहकत्त्व नसे निश्चिती । लज्जित होतीं मंडळें ॥६२॥

भास कोटि शशकांचा । म्हणूं तरी लेश नसे शीताचा । तो स्वामि अनंत ब्रह्मांडींचा । तेथें चंद्रसूर्याचा कोण केंवा ॥६३॥

अद्‌भूत तेजाचा बंबाळ । तया पुढें अग्नी पांगुळ । त्याहून सर्वही निर्मळ । खेळोनि खेळ निराळे ते ॥६४॥

त्यासी उपमाचि नाहीं । तें अनुपम असे पाहीं । त्याची अद्‌भूत नवलाई । सांगतांचि कांहीं न येते ॥६५॥

जया सद्‌गुरु असेल श्रेष्ठ । तोचि दावील तेथींची वाट । केवीं साधितील वाचक चावट । करितां वटवट न लभे ते ॥६६॥

असो त्या ब्रह्मरंध्रापासोनी । महालिंग तें ऐलस्थानीं । तया पैल जातां वोलांडोनि । तेथील पाहणी वेगळीच ॥६७॥

ते निर्गुण निरामय । निर्विकार निराभास होय । तयाची आणावया सोय । न चले उपाय आगमनिगमा ॥६८॥

हें अद्‌भूत तुजसी कथिलें । गुप्त तेंचि प्रगट केलें । असो जगदोद्धारार्थ भलें । उपयोगा आलें योगिसंतां ॥६९॥

माते तुझियायोगें करुन । बहुतांचे होतअसे कारण । साधक साधील गुरुसेवन । त्यासी हें धन लाभेल ॥१७०॥

अनसूया म्हणे योगिराया । परी अवसानिक बोलसी सखया । चारी देह ठेविसी निरोपणी या । हें मम हृदया कळों आलें ॥७१॥

बोलतां बोल समवावे । आजिच्या निरोपणा संपवावें । हेंचि इच्छिलें तुझिया जिवें । जाणें मी बरवें शब्दरसें ॥७२॥

परिसोनि उत्तर मातेचें । गजबजिलें चित्त दत्ताचें । इनें परिक्षिलें मज साचें । संपविलें कैसें निरोपण ॥७३॥

देखोंन श्रवणाची अर्थता । मातेसी अविनाश जाला विनविता । माते सत्य परीक्षिलें ममचित्ता । धन्य योग्यता तुझी हे ॥७४॥

निरोपणीचें शेष राहिलें । माते मन तुझें तेथें गुंतलें । यदर्थी मज त्वां सावध केलें । मजही कळलें श्रवण तुझें ॥७५॥

वक्तियासी सावध करुन । श्रोता भावें करी श्रवण । तरि तो जाणिजे विशेष गुण । त्याचेनि पावन अन्य श्रोत्यां ॥७६॥

श्रेष्ठ तयाचा अधिकार । प्रेमें आलिंगी श्रीकरधर । देवही तिष्ठती जोडोनि कर । देती आदर श्रेष्ठासनी ॥७७॥

ज्याची श्रोतव्यता सावधान। भावार्थ आवडीं प्रेमपूर्ण । तयालागीं तो नारायण । न विसरे आपण अंकीं घे ॥७८॥

श्रोते बहुतेक असती । कीर्तनपुराणीं जाऊनी बैसती । कितेक बहुमान तेथें इच्छिती । न होता पावती दुःख मनीं ॥७९॥

अवमानींच कोण्ही परतले । कोण्ही लोकेषणासाठीं बैसले । भोळें भाविक बहु दाटले । श्रेष्ठ बैसले श्रेष्ठासनीं ॥१८०॥

वैदिक पंडित शास्त्रज्ञ । पुराणिक प्रौढज्ञानी सुज्ञ । दशग्रंथी ज्योतिषी प्राज्ञ । चतुर गुणज्ञ विद्यार्थी ॥८१॥

संत साधु योगिजन । ज्ञानी अनुभवी सिद्ध पूर्ण । आबाल वृद्ध अवघे जन । करुं श्रवण बैसले ॥८२॥

जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती । प्रकृति ऐसेंचि श्रवण करिती । आपुलाले गुणें विलोकिती । पावता होती हर्षयुक्त ॥८३॥

आपुल्या ऐसा गुण नसे । खालाउनी मान उगा बैसे । चित्त त्यांचे श्रवणीं नसे । उगाच विरसे मनांत ॥८४॥

कोण्हीं शोधिती वर्णासी । कोण्ही निरसिती शब्दासी । कोण्ही पाहती अर्थासी । कोण्ही कथारसीं लुब्धले ॥८५॥

कोण्ही ऐकती सुरताल । तेथेंचि खाती स्वयें झोल । कोण्ही विनोदें देती डोल । कोण्ही कलकल करिताती ॥८६॥

कोण्ही ऐकती कोण्ही बोलती । अन्य वार्ता श्रवणीं करिती । उपलक्षणें शिक्षितां दुखवती । दंश धरिती अविवेके ॥८७॥

वक्ता चुकतां निरोपणीं। कागपरी करिती तेच क्षणीं । हीनत्व आणिती वक्तिया लागुनी । विरुढ अपमानी होताती ॥८८॥

कितेक कीर्तनीं येवोनि बैसती । प्रापंचराजिक गोष्टी बोलती । कितेक कीर्तनीं झोंपीं जाती । आळेपिळे देतो दुर्मती ॥८९॥

कितेक मान कलांडोन । कितेक भिंती खांबी ठेवून । कितेक घालिती दंडासन । कीर्तनीं राहून काय तें ॥१९०॥

कोणा लोडी टेकून बैसती । कोण्ही कीर्तनी तांबूल सेविती । कोण्ही हुक्का झर्झरी लाविती । वेष्टोन बैसती कितेक ॥९१॥

माते ऐसे हे अवगुणी । काय बैसोनिया कीर्तनीं । अधिकची पावती बंधनीं । दुराचरणीं गर्भवासा ॥९२॥

कैसेनि सुटे त्यांचें बंधन । केला कीर्तनीं तेणें अवमान । तयांसी दंडी सूर्यनंदन । भोगीपतन नरकवास ॥९३॥

म्हणसील जरी कां ऐसें । जेविं अपराध दंड तैसे । याचे भोग कोण कसे । श्रवणीं सरसें भरवितों ॥९४॥

जेथें होय कीर्तनपुराण । तेथें तिष्ठतसे नारायण । वक्ता यथामती करुन । करी निरोपण श्रोतियां ॥९५॥

ती कीर्ति वाखाणितां । परमानंद वाटे अनंता । एकविध श्रोते न ऐकतां । क्षोभे चित्तां माधव ॥९६॥

अवमान होतां कीर्तनाचा । तोचि शत्रु होय त्या हरीचा । म्हणोनि वरी दंड यमाजीचा । योग तया भोगाचा योजिला ॥९७॥

कीर्तनीं बडबड जे करिती । ते बेडुकजन्म पावती । मृत्तिकाभक्षण तयांप्रती । भोग निश्चिती भोगणे ॥९८॥

निद्रा घेती जे कीर्तनीं । ते महांडुळ अजगर पडती होउनी । जे कां बैसती वेष्टोनी । ते कोसला होउनी मरती घरीं ॥९९॥

कीर्तनी तांबूल भक्षण । तें रजस्वलेचें शोणित जाण । कागजन्म तयालागून । करी भक्षण नरक मांस ॥२००॥

कीर्तनीं वोढी झर्झरीस । तया यमदंडी आणी हरिस । तया नेमिला जन्म रीस । अहा रीस म्हणोनी अवमानिलें ॥१॥

कीर्तनीं इच्छी जो लोडतिवासा । तेणें अवमानिलें जगन्निवासा । तया स्थळ न मिळेची निवासा । रवरववासा जन्म पावे ॥२॥

कीर्तनाचा उच्छेद करी अनादर । तो जन्मोनि भोगी रोग उदर । वपु न राहे कदा सुंदर होउनी वांदर वनी वसे ॥३॥

कीर्तनीं वाद करी वक्तियासीं । तो पडे गा सदां आयासीं । पोटशूळ जाची तयासी । नेमिला यासी उलूकजन्म ॥४॥

असो ऐसे सांगतां बहु प्रकार तरी ग्रंथीं वाढेल विस्तार । पुढील निरोपणा होईल उशीर । म्हणोनि आवर पैं केला ॥५॥

श्रोता असावा शांत । भाविक प्रेमळ विरक्त । श्रवणींच जडे ज्याचें चित्त । न करी मात येरं वांया ॥६॥

ज्ञानी व्युत्पन्न असोनि चतुर । निरभिमानें श्रवणीं सादर । युक्त भाषणी नम्र फार । न करीं अनादर वक्तियाचा ॥७॥

वक्ता निरोपणीं चाचरतां । त्याची करावी साह्यता । विरसीं होय रस भरवितां । त्या नांव श्रोता ज्ञानी तो ॥८॥

श्रोता असोनि सर्वज्ञ । वाढवी वक्तियाचें महिमान । श्रवणीं चुकों नेदी संधान । आवडी करोन स्वीकारी ॥९॥

यातेंच म्हणावें सत्‌श्रोता । उद्भवे आनंद उभय चित्तां । त्यागुणें होय रस वाढता । धन्य सार्थकता श्रवणाची ॥२१०॥

माते असें तुझें श्रवण । प्रीतियुक्त दिसे सावधान । येणेंचि उल्हासलें माझें मन । सरसावे निरोपण करावया ॥११॥

देह सहा तुज निवेदिले । तंव त्वां मज आणिक पुसिलें । चार देह किमर्थ ठेविले । तेही निरोपिलें पाहिजे ॥१२॥

हे तुवां जे आज्ञा केली । ते म्यां सत्य शिरीं वंदिली । निरोपितों सांठवी हृदयकमळीं । भोगिजे नव्हाळी तेथींची ॥१३॥

अर्धशून्य देह एक । ऊर्ध्वशून्य दुसरा देख । तृतीय मध्यमशून्य आवश्यक । चौथें निःशंक महाशून्य ॥१४॥

असे हे चारी देह असती । करोनि निवेदिली म्यां विभक्ति । चारी मिळोनि निश्चिती । एकचि व्यक्ती महाशून्य ॥१५॥

तया शून्यापासोनिया । साकारलें हें रमावया । विस्तारिली हे ईश्वरी माया । अंत ना तया पार कांहीं ॥१६॥

जया शून्याचेनि बळें । उभारलीं हें तिन्ही ताळें । एकवीस स्वर्गाचीं अंतराळें । सप्त पाताळें मंडले तारा ॥१७॥

जीव जंतु काष्ठ पाषाण । वाणी खाणी वर्णावर्ण । कांहींच नसे त्यावीण । लयोत्पत्तिस्थान शून्य हे ॥१८॥

शून्य कैसेनि वोळखा । तयासि नाहीं नामरुप देखा । अगोचर असे देह देखा । अनुपम्य जे का अपरंपार ॥१९॥

तेथें रात्र ना दिवसमान । जागृती नाहीं कांहीं स्वप्न । दृश्य ना अदृश्य भान । आपणचि दर्पण होवोनि ठेलें ॥२२०॥

हे व्यापक अभ्यंतरी । यावीण नसे कांहींच निर्धारीं । यातें जाणितलियावारी । कैंची उरीं ते मग उरे ॥२१॥

यातें जाणलियावांचोन । मिथ्याचि अवघें सर्वं ज्ञान । आम्ही नायकूं त्याचे भाषण । अनुभवावांचून कांहीं तें ॥२२॥

न करी अनुभवीं अभ्यास । वृथाचि बडबडी वायस । भुंकतां भुंकणें श्वानास । काय ऐसियास करावें ॥२३॥

वितंड भाषणिक ज्ञान । येणें नोव्हेचि समाधान । अनुभव असल्यावांचोन । कोरडा पाषाण जाणावा ॥२४॥

अनुभवज्ञान पाहिजे । तेणें सद्‌गुरुसी शरण जाइजे । सेवोनि कृपा संपादिजे । विनयें अनुभविजे तें ज्ञान ॥२५॥

अनुभवाची जया चाड । तेथें उपजे पूर्ण आवड । सद्‌गुरुसेवनीं तो जोडी जोड । पुरती कोड सत्वर त्याचे ॥२६॥

तंव अनसूया म्हणे हें सत्य । तूं हितार्थ उपदेशिसी कृत्य । याचा अभ्यास ठेवील जो नित्य । तोचि वस्तु अगत्य पावेल ॥२७॥

तुझिया निरोपणें आम्हांस । सुख वाटे दिवसेंदिवस । लाभ घडत सेवी शेष । म्हणोनि प्रश्नास तुज करीं ॥२८॥

आतां एक मातें आठवलें । पुसतां पाहिजे निवेदिलें । चंद्र सूर्य त्वां मातें कथिले । तयांचें राहिलें निरोपण ॥२९॥

चंद्रसूर्यासी असती कळा । तयासी म्हणती बारा सोळा । तयांचा नामभाग सांगे निराळा । सत्रावी कळा ते सांग ॥२३०॥

ऐकोनि प्रश्न मातेचा । स्वामी आनंदला योग्यांचा । पुढिले प्रसंगीं निवाडा याचा । करील साचा अवधूत ॥३१॥

अवधूत दयेचा सागर । पूर्ण ज्ञानाचा होय आगर । श्रोत्यांचे मनोरथ समग्र । पुरवी कृपाकर जगद्‌गुरु ॥३२॥

याचि कारणासाठीं । येणें अवतार धरिला सृष्टीं । जीव कळवळा बहु पोटीं । कृपादृष्टीं न्याहाळी ॥३३॥

अनन्यातें ओळखोन । तया देतसे कृपादान । अनाथासी करी पावन । हें महिमान दत्ताचें ॥३४॥

अनंतरुपीं हा अनंत । लीला दावीतसे स्वामी दत्त । यातें जाणती साधुसंत । भाविक महंत योगीजन ॥३५॥

म्हणोनि संतांचे सेवनीं । अनंतसुत रतला अनुदिनीं । लक्ष ठवोनिया चरणीं । कृपादानीं तिष्ठत ॥३६॥

दीन वत्सलातें देखोन । गाउली धांवे हुंबरोन । मोहें चाटी पान्हा घालोन । करवोनि पान संरक्षी ॥३७॥

तेविं हे संतमाउली । कळवळे मज दीनातें द्रवली । करोनि कृपेची साउली । पूर्णत्वें न्याहाळी कूर्मदृष्टीं ॥३८॥

अंतरींचें जाणोनि आर्त । पूर्ण करिती मनोरथ । न्यून पडतां सांभाळित । धन्य संत उदार हे ॥३९॥

मज दीनाचा प्रतिपाळ । करिती हे संतदयाळ । मज आधार त्यांचें चरणकमळ । अर्पिला मौळ निजभावें ॥४०॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । श्रीनारदपद्मपुराणींचें संमत । ते परिसोत भाविक संत । चतुर्विंशोध्यायार्थ गोड हा ॥२४१॥

॥ इति चतुर्विशोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP