श्री दत्तप्रबोध - अध्याय दुसरा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥

ॐ नमोजी श्रीदत्ता । अविनाशरुपा समर्था । निर्विकारा मायातीता । दुःखहर्ता जगदात्मा ॥१॥

नमो तूतें गा दिगंबरा । त्रिगुणात्मका दयासागरा । चिद्घना तूं सर्वेश्वरा । सदय उदारा महामूर्ती ॥२॥

जयजयाजी महासिद्धा । विमळरुपा आनंदकंदा । चिद्विलासिया परमानंदा । भेदाभेदातीत तूं ॥३॥

जय महामुनी योगिराया । षड्रगुणसंपन्ना गुणालया । आनंदकंदा अभया । तुझिया पायां प्रणम्य ॥४॥

तूं अद्वयपणें निरंतर । तुझा न कळे कवणा पार । तूं सिद्धमुनींत योगींद्र । जोडिती कर देवऋषि ॥५॥

महाराज अत्रितपोधन । कांता अनसूया पतिव्रतापूर्ण । यांचें तोषवावया मन । जालासी नंदन तयांचा ॥६॥

या जगदोद्धारासाठीं । प्रगटसी धरोनी त्रिपुटी । शरणागता देसी भेटी । योग हातवटी दाविसी ॥७॥

जयासि देसी कृपादान । तया करिसी आपणासमान । किंवा भातुकें इच्छित देऊन । हरिसी अज्ञान क्षणमात्र ॥८॥

ऐशा तुझ्या कीर्ति अपार । कीं दत्तमूर्ती उदारधीर । अनाथ दीनांचा अंगीकार करितो उद्धार पतितांचा ॥९॥

म्हणोनिया दीनदयाळा । शरण तुझिया चरणकमळा । कृपा करोनी ये वेळा । पुरवी लळा अंतरींचा ॥१०॥

जयजयाजी अवधूता । तूंचि माझी मातापिता । तूंचि समर्थ माझा दाता । बंधु चुलता सखा तूं ॥११॥

तूंच आप्त आणि स्वजन । तूंचि माझें ऐश्वर्यनिधान । तूंचि माझें यश कल्याण । पाळिता पूर्ण तूंचि माझा ॥१२॥

तूंचि माझें कुळदैवत । परंपरेसी गुरुनाथ । मी बाळ तुझा अंकित । करी सनाथ अनाथा ॥१३॥

मम अंतःकरणींचें गुज । तूं जाणसी महाराज । दीनजनाचें करणें काज । हें तो सहज तुम्हांतें ॥१४॥

मी तों अत्यंत क्रिमीर । हालवू पांहे मेरुमांदार । तुझ्या कृपेवीण कंकर । अणुभार नुचलेची ॥१५॥

तूं जरी कृपा करिसी । तरी मेरुपुष्प मशकासी । म्हणोनी अनन्य तुम्हासी । होवोनि दानासि मागतों ॥१६॥

कांहीं घडावें निरुपण । हेंची इच्छीतसे मन । परी पडलों बुद्धिहीन । म्हणोनी चरण लक्षितों ॥१७॥

केधवां येसी तूं माऊली । करिसी कृपेचि साउली । क्षुधित आशा लागली । ये गे माउली धावून ॥१८॥

कंठ जाला सद्गदित । तुझ्या नांवे पाचारित । तुवां तारिले बहुत । त करी सत्य ब्रीदावळी ॥१९॥

धेनु वत्साते त्यागितां । सिंहे बाळातें मोकलितां । हरणी पाडसा अव्हेरितां । कोण सांभाळितां तयांसी ॥२०॥

ऐसें न करी तूं मातें । मी बाळ तुझें नेणतें । उचलोनी घेइ स्नेहभरिते । लळे पुरते करी माझे ॥२१॥

ऐशी करुणा भाकितां । दया उपजली गुरुदत्ता । शब्दध्वनी अवचिता । जालो ऐकतां कर्णरंध्रीं ॥२२॥

गालवऋषीचे स्थानीं । मम जयंतीच्या दिनीं । तूं संकटीं पडिलासी म्हणोनी । आलों धावूनी भेटलों ॥२३॥

वृद्ध द्विजरुपातें धरिलें । मम जन्मकथन तुज बोधिलें । कीर्तनी सप्रेम श्रोते जाले । नवल वाटलें सकळांतें ॥२४॥

मीच स्वयें कीर्तनीं प्रगटलों । स्वानंद रसातें भरिता जालों । प्रसाद देउनी तूतें गेलों । तैंच पावलों तुज बापा ॥२५॥

आतां कासया प्रार्थीसी । तो आठव आणी मानसीं । मी वसतों भाविकांपासीं । मनोरथासी पुरवीतों ॥२६॥

न करी न करी आतां कल्पना । निववी आतां संतसज्जनां । श्रोते भाविकांच्या मना । तोषवी जनां अबलातें ॥२७॥

घेई लेखणी मसीपत्र । कथा वदे सतेज पवित्र । आत्मचर्चाज्ञान विचित्र । प्रश्नादर श्रोतियांचा ॥२८॥

कांहीं लीला आणि लाधव । सत्कथेचा करी गौरव । जें गुह्य ग्रंथी अपूर्व । वर्णी समुदाव तोषे जेणें ॥२९॥

ही ऐकतां प्रसादवाणी । तन्मय वृत्ती जाली मनीं । सुखसंतोषातें पावुनी । सप्रेम नयनी वाहे नीर ॥३०॥

आठव नसे वदावया । शून्य स्थिती जाली काया । वृत्ती गेली मुरोनिया । सावध व्हावया शुद्धि नाहीं ॥३१॥

श्रोते म्हणती नवल । धन्य वक्ता हा प्रेमळ । गुरुदत्त होवोनि दयाळ । प्रसाद सफळ दिल्हा या ॥३२॥

म्हणती वक्तिया सावधान । क्षुधितां करवी भोजन । आमुचे आवडीचें पक्वान्न । अविट जाण तुजपासीं ॥३३॥

आतां वेगीं सावध होई । अपेक्षित तें आम्हां देई । उदंड भांडार तव हृदईं । ठेविलें पाहीं अवधूतें ॥३४॥

त्याचे विभागी आम्ही श्रोते । म्हणोनी सावध करितों तूंते । अकिंचनपणें आपस्वार्थे । गिळोंनि त्यातें न राहे ॥३५॥

धरी गा आतां उदारता । तोषवि आम्हां भाग्यवंता । अपेक्षित दे पदार्था । वसो सदयता तव हृदयीं ॥३६॥

ऐकोनि श्रोतियांचें वचन । सावधानें करी भाषण । आहो जी तुम्ही सर्वसंपन्न । देतां भूषण पामरा ॥३७॥

मी पतित हीन जड । निर्बुद्धी अत्यंत मूढ । अविचारी कुव्यसनी द्वाड । वाणी धड बोल नसे ॥३८॥

एसियातें श्रृंगारितां । गौरववचनें वाढवितां । सत्कारबहुतचि करितां । परि हें योग्यता कैची येथें ॥३९॥

खराअंगीं चंदन । मर्कटासी भूषण । अस्वलासी प्रावरण । मान्य कवण कैसेनी ॥४०॥

तया आदरें संवादा । करीतसां या मतिमंदा । मी काय जाणें अनुवादा । प्रश्नभेदा भेदावया ॥४१॥

तुम्ही ईश्वराच्या मूर्ती । ज्ञाते सतेज जेवीं गभस्ती । तुम्हांपुढें कायसी मती । मजप्रति निरुपाया ॥४२॥

तुम्ही प्रबोधरुपें धुरंधर । ऋषिमुनींचे अवतार । तुम्हांपुढें मी पामर । काय उत्तर कैसे करुं ॥४३॥

श्रोते म्हणती नोव्हे ऐसें । तुझे बोल अनारिसे । कोमळ आणी मधुरसे । आम्हां सरिसे प्रिय बहु ॥४४॥

पुढतीं विनवी श्रोतियाला । अंगीकाराल या बाळबोला । तरी वेडयावांकुडया शब्दांला । अर्पीन तुम्हांला भलतेसे ॥४५॥

नाहीं मजसी ज्ञानमती । दृष्टी नाहीं ग्रंथअर्थी । कोण कैसिया संमती । मेळ उगती न जाणें ॥४६॥

नाहीं केला वेदाभ्यास । नाहीं पढलों शास्त्रास । नाहीं पाहिलें पुराणास । नाहीं शब्दास ओळखिलें ॥४७॥

प्राकृतातेंही नोव्हे जाणता । नाहीं ऐकिल्या प्राज्ञवार्ता । परी सद्‌गुरु अनंत बोलविता । त्याची सत्ता कळेना ॥४८॥

तोचि श्रोतियांच्या प्रश्नासी । पूर्ण कर्ता कृपाराशी । कर्ता या ग्रंथासी । निमित्तासी सुत पुढें ॥४९॥

तव श्रोते म्हणती पुरें । या संबोधनाचीं अक्षरें । परिसोनी प्रश्न सविस्तरें । सांगे त्वरें आम्हांसी ॥५०॥

तव आकाशीं कथांबुधर । तेथें वेधले मनचकोर । तृप्त करी गा सत्वर । आम्ही सादर पानासी ॥५१॥

श्रोते म्हणती गालवस्थानी । जन्म कथिला श्रीदत्तांनीं । तो निवेदा आम्हांलागुनी । प्रसादवाणी परिसूं ती ॥५२॥

जो तुम्हीं प्रश्न केला । तो यथामति निवेदीन सकळां । आवरोनिया मनचंचळा । कथा सुढाळा श्रवण कीजे ॥५३॥

श्रोता वक्ता सावधानें । उभयां साध्य समसंधानें । तेथें रसानी काय उणें । विशेष गुणें वाढे तो ॥५४॥

श्रवण श्रवणातें देइजे । चित्त कथेसी अर्पिज । एकाग्रता साधिजे । रस घेइजे सांठवणी ॥५५॥

दत्तें द्विजरुपें मज निरोपिलें । तें तुम्हां सांगेन भलें । तें आदरें वहिलें । श्रवण केलें पाहिजे ॥५६॥

अहो जो निर्गुण निर्विकार । निरामय निराभास ईश्वर । मायातीत चिद्धनपर । जो निरंतर निरंजन ॥५७॥

जया आगमनिगम वाखाणिती । श्रुती जयातें वर्णींती । पुराणें भाटीव ज्याचें करिती । जया गाती बहुमतें ॥५८॥

तो हा साकाररुपें करुन । क्षीरब्धिवासी नारायण । जया म्हणती रमारमण । शेषशयन विश्वंभर ॥५९॥

अरुपतेंचि रुपा आलें । अनामासीच नाम जालें । विस्तीर्णरुपें विस्तारलें । तयाचा न कळे पार कोण्हा ॥६०॥

गुणरुपा नाहीं अंत । महिमेसी नाहींच प्रांत । कीर्तिनामा नाहीं गणित । म्हणोन अनंत म्हणती तया ॥६१॥

तया अनंतापासून । जाला असे चतुरानन । त्या ब्रह्मदेवापासून । अत्रि जनन पावला ॥६२॥

तो योगेश्वर अत्रिमुनी । अनुसूया नामें त्याची पत्‍नी । ते पतिव्रता लावण्यखाणी । सदाचरणी सुशीला ॥६३॥

पतिचरणीं सदृढभाव । पतिच असे तिजला देव । पतिवांचोनि अपूर्व । अन्य ठाव दिसेना ॥६४॥

करी पतीचें पूजन । पतिच तिचें जपध्यान । अखंड सेवी पतिचरण । यावीण साधन नेणेची ॥६५॥

सेवी पतीचे चरणतीर्थ । पतिपदीं निवेंदी अर्थ । पतीवांचोनि परमार्थ । नये मनांत दुसरा ॥६६॥

पतीची आज्ञा वंदी शिरीं । पति सांगे तेंचि करी । करकमळें चरण चुरी । लक्ष वरी ठेवोनी ॥६७॥

द्वय कर ते जोडून । करी पतीचें स्तवन । तया न घालितां भोजन । अन्नपान न घेते ॥६८॥

कित्येक असती युवती । जगीं पतिव्रता म्हणविती । वरी भावातें दाविती । अर्थ चित्तीं कनकाचा ॥६९॥

न्यून पडतां किंचित । बोले भ्रतारा विपरीत । मना ऐसे पुरतां अर्थ । गोंडा घोळीत शुनीपरीं ॥७०॥

तैसी नोव्हे ती अनसूया । सत्यपणें जिची क्रिया । न धरीच कोठें मोहमाया । पतिपायां सेवीतसे ॥७१॥

ऐका पतिव्रतेचें लक्षण । षड्‌गुणें जी का संपन्न । श्र्लोकीं बोलिले कविजन । तेचि शोधून काढिले ॥७२॥

श्लोक । कार्येषु मंत्री वचनेषु दासी । भोज्येषु माता शयनेषु रंभा । धर्मानुकूला क्षमया धरित्री । भार्या च षड्‌गुण्यवतीह दुर्लभा ॥७३॥

पतिस्वहितीं सर्वज्ञता । वागे कैसी पतिव्रता । मंत्री जेवी राज्यरक्षिता । स्वामिचित्ता जाणोनी ॥७४॥

नुलंघीच कदापि वचन । सर्व जाणे कार्याकारण । सन्मुख सदा कर जोडून । राखी प्रसन्न भूपातें ॥७५॥

जैसा जैसा प्रसंग पडे । राज्यकार्य जेथें अडे । पडतां संग्राम जावोनी भिडे । पद गाढे रक्षित ॥७६॥

राज्यप्र जावाहिनी । तोषोनि राखी स्नेहेकरुनी । संग्रह समारंभ राजभुवनीं । ठेवी जपोनी साक्षेपें ॥७७॥

केधवां राव काय पुसेल । म्हणोनी सावध राहे पळोपळ । मानापमान जाणे सकळ । धूर्त प्रबळ सर्व काजीं ॥७८॥

राजमंडपीं सांकडें येती । राजाज्ञें परस्परें निवडिती । रात्रंदिवस जागृती । विवरे चित्तीं कामकाजें ॥७९॥

करीं राज्याचे रक्षण । न होय कदा पराधीन । राव दर्पातें वाढवून । यश गहन संपादी ॥८०॥

चातुर्य बळ पराक्रमें । जिंकी परभूप संग्रामें । नीति स्वधर्म जाणोनि क्रमे । सदा रसे सन्मार्गी ॥८१॥

पापदृष्टी अंगीं नसे । सुशिलत्वें सदा वसे । प्रथम गुण ऐसा असे । हाचि विलसे पतिव्रते ॥८२॥

आतां दुसर्‍या गुणाचा क्रम । तो परिसाजी अति उत्तम । वाटे बोलतां सुगम । कठीण परम चालवितां ॥८३॥

द्वितीय गुणाचे ठाईं । दासी पद आणिले पाही । नीच न म्हणा कदाही । उत्तम देहीं गुण घ्यावा ॥८४॥

नीचकार्य गृहधंदा । तेथेंचि राबे दासी सदा । सकळांची राखी मर्यादा । मुखें वादा न घाली ॥८५॥

गृहस्वामी आणि स्वामिनी । लक्ष ठेवी उभय चरणीं । निद्रासनें सिद्ध करोनी । पाद संवाहनीं दिवानिशीं ॥८६॥

प्रभातें उठोनी पिसणें । मग झाडावीं गोठाणे । सडासंमार्जन शुभ्र करणें । बाळें खेळवणें स्वामीचीं ॥८७॥

बाह्य क्रियेसाठीं । उदकसंचय उठाउठी । निसणे टिपणें खटपटी । करितां भ्रकुटी आकर्षीना ॥८८॥

वाती करोनी दीप लावणें । गुरेंढोरें सोडुनी बांधणें । पडलें झडलें सांभाळणें । जीव लावणें प्रपंचीं ॥८९॥

न्हाणीं धुणीं स्वामिनीची । वेणीफणी गुंफणी नगांची । करी भाषणें आवडीचीं । नरकमुताची स्वच्छता ॥९०॥

कामें करितां नाणी मळ । रागें भरतां नव्हे गढूळ । चुकल्या ताडितां गृहमंडळ । सांडोनी पळ साधीना ॥९१॥

क्षण एक बैसे संकोचित । सवेंचि कार्यासि लागत । आज्ञापितां जोडी हात । सादर चित्त सेवेसी ॥९२॥

या गुणांचें जें सार । तो पतिव्रता जाणे विचार । आतां तृतीय गुणप्रकार । तोही सविस्तर सांगतो ॥९३॥

भोजनीचा क्रम सांगतां । उपमेसी आणिली माता । श्रोते म्हणती आश्चर्यता । विकल्प चित्ता वाटतो ॥९४॥

वक्ता म्हणे सावधान । विकल्पित न करावें मन । कवि देखोनि ग्राह्यगुण । पद स्थापन करीतसे ॥९५॥

जाणोनि बालकाची खोड । माता तयापरी करी कोड । मातेमुखीं लागे गोड फार । थोडें तेंहि दे ॥९६॥

जी बाळें आळ घेतली । ती पुरवी प्रेमें माउली । अर्भकाजवळी बैसली । ग्रास घाली आवडीनें ॥९७॥

बाळकें काला चिवडिला । तो मातेनें नाहीं टाकिला । निर्विकल्पें कां स्वीकारिला । नाणी कंटाळा मनांत ॥९८॥

बाळाचा उच्छिष्ट ग्रास । पात्रीं पडिला निःशेष । माता न करी कुसमुस । न बाळकास ताडिते ॥९९॥

बाळ न बैसे भोजनीं । अथवा बैसलें राहे खुंटोनी । तया नाना रीती संबोखोनी । सांगोनी कहाणी जेववी ॥१००॥

जोंवरी भोजनीं बैसे । तोंवरी माते बैसणे तैसे । जेवण थोडें कीं फारसें । जाणतसे ती माउली ॥१॥

नित्याहोनी जेविला थोडें । किंवा अन्न न ने तोंडाकडे । तया दुःखें माता हडबडे । चिंता जोडे चित्ता बहु ॥२॥

चित्तीं होय कासावीस । म्हणे काय झालें बाळास । हात न लावी अन्नास । एकही ग्रास न घेची ॥३॥

बुझाबोनो बोले बाळका । म्हणे जेविला नाहीं आजी सखा । दुजा पदार्थ करितें निका । आवडे जो का तो सांगे ॥४॥

बाळा तूं न जेवितां पाही । मज अन्न गोड न लागे कांहीं । बाळें सांगतांचि लवलाही । तेंचि देई तयातें ॥५॥

माता बाळा निवेदी अन्न । आवडे तेच घाली त्यालागुन । करमुखशुद्धी करवून । करी भोजन पुढें ती ॥६॥

म्हणोनी पतिभोजनी विशेष । हें पद ग्राह्य पतिव्रतेस । आतां चतुर्थ गुणास । वर्णूं सुरस तुम्हापुढें ॥७॥

शयने च रंभा म्हणोनी । हें पद स्थापिलें कवींनीं । यास्तव आतां विवरोनी । श्रोतेजनीं निरोपूं ॥८॥

अहो रंभा म्हणजे स्वर्गवासी । ते कैची प्राप्त भूजनासी । या मिथ्या कल्पनेसी । काय मानसी आणावें ॥९॥

उत्तम गुण आणि चतुरता । कुशलें तोषवी भ्रतारचित्ता । तापा निरवोनी दे सुखता । प्रिय भाषणता दावोनी ॥१०॥

आतां याचा प्रकार । कवण रीती कैसा विचार । हा दावितो करोनी प्रखर । चित्ता स्थीर करावें ॥११॥

स्त्रियेचा संकल्प पतिचरणीं । तया न व्हावी कदा हानी । सेवा भाग लक्षोनि मनीं । घेत धनी पतिव्रता ॥१२॥

ईतें रंभेची असावी युक्ति । म्हणाल ती कोणती । हरे पुरुषाची चित्तवृत्ति । होय चित्ती आनंद त्या ॥१३॥

येतांचि द्यावें अभ्युत्थान । व्हावें सलज्ज अधोवदन । नम्रतेचें करावें भाषण । तेणें मन संतोषें ॥१४॥

आसन द्यावें बैसावया । द्यावें उदक आणोनिया । श्रमभागातें पुसोनिया । चुरुं पायां धाविजे ॥१५॥

दिवा प्रपंचाची गती । वर्तावें विभक्ताचे रीती । एकांतीं वाढवी जे प्रीती । तेहि स्थिति अवधारा ॥१६॥

भाग्यअभाग्य सुखदुःख । असेल तैसें गोड देख । करोनिया विवेक । मानोनि निःशंक धेईजे ॥१७॥

असेल तैसा विलास । करुनी दाविजे सुरस । लावोनिया दीपास । मग सेजेस रचावें ॥१८॥

करुनी ठेविजे हार तांबूल । पीकपात्रें अति सोज्ज्वळ । सुवासिक द्रव्य परिमळ । पुष्पफळ पंचारती ॥१९॥

स्वामी येतां अंतःसदनीं । सामोरें जावें साचोल ऐकोनी । त्वरें उष्णोदक आणोनी । जोडोनि पाणी विनवावें ॥२०॥

स्वकरें पाद प्रक्षाळावे । आसन बैसकेसी द्यावें । नित्य नेम होतां बरवे । पात्र वाढावें यथा रुची ॥२१॥

स्वतः प्राशनासी द्यावें उदक । उष्ण प्रक्षाळणीं आवश्यक । मग प्रसाद सारोनि देख । आवर नेटक साधावा ॥२२॥

करावा हास्य कांहीं विनोद । कामचेष्टा तैशा विविध । जेणें भ्रतार पावे आल्हाद । तोची शुद्ध विचार तेथें ॥२३॥
संतोषतां स्वामी दयाळ । तेथें हे हेतु पुरती सकळ । हें स्त्रीस्वधर्माचें मूळ । सेवन सोज्वळ या भावें ॥२४॥

पतीचे राखिता मनोदय । पतीसी वाटे रंभाचि काय । रंभा तों सोडोनि जाय । अंकित होय हे माझी ॥२५॥

तेथेंचि झाली मात । हा गुण येथेंचि मंडित । आतां पांचव्यासि देईजे चित्त । असे सर्वांत श्रेष्ठ हा ॥२६॥

धन्य त्याची प्रपंचता । सर्वतोपक्षीं साह्य कांता । ती जरी असे अनुचिता । त्याचा फजिता न वर्णवे ॥२७॥

कांता असावी सुशीळ । धर्मानुकुल वृत्ती सुढाळ । पोटीं नसेचि कदा मळ । अति निर्मळ गंगावत ती ॥२८॥

ऐशा उदारधीर युवती । धार्मिक निवडिल्या ग्रंथीं । ती सारकथा निगुती । यथामती लिहितों ॥२९॥

कांती-नगरीचा राव श्रियाळ । कांता चांगुणा वेल्हाळ । सकुमार सान चिल्लाळबाळ । भक्त प्रेमळ शिवाचे ॥३०॥

धर्मशील उदार पूर्ण । आल्या अतीथा देती भोजन । अपेक्षिता देती दान । करिती पूजन शिवाचें ॥३१॥

धर्मी न वागेचि कल्पना । करी नित्य असंख्य दाना । कीर्ति भेदित गेली गगना । कोण्ही परतेना याचक ॥३२॥

शिवस्मरणीं अत्यंत रत । उभयतांही आनंदयुक्त । तंव तेथें अकस्मात । आला त्वरित नारदमुनी ॥३३॥

नृपें करोनी साष्टांग नमन । केलें नारदाचें पूजन । नृपआदरातें देखोन । धार्मिक पूर्ण ओळखिला ॥३४॥

मग पुसोनी नृपातें । नारद जाय स्वर्गपंथे । लोकालोक पाहोनि कैलासातें । जावोनि शिवातें भेटला ॥३५॥

शिवें देखोनि नारदासी । परस्पर हर्षती मानसीं । नारद स्तवित शंकरासी । अतिप्रेमेंसी आदरें ॥३६॥

देव भक्ता झाल्या भेटी । आनंदें उभयतां पडल्या मिठी । आनंद न समायें पोटीं । जिवींच्या गोष्टी बोलती ॥३७॥

शिव म्हणे नारदऋषी । कोठोनि येणें झालें तुम्हासी । येरु म्हणे भूलोंकासी । पाहोनि वेगेसी आलोंसे ॥३८॥

मग वदे उमापती । तुज फिरण्याची बहुत गती । कांहीं अधिकोत्तर कथी । पाहिलें नेत्री असें जें ॥३९॥

मुनी म्हणे सर्व पाहिलें । अपार भक्त तुझे देखिले । मागेंहि बहुत झाले । महिमा न कळे तयांचा ॥४०॥

परि प्रस्तुत कांतीपुरीं । श्रियाळराव असे निर्धारी । कोण्ही भक्त तयाची सरी । पावे अंतरी न दिसे मज ॥४१॥

चांगुणा नांमें त्याची कांता । साध्वी माउली पतिव्रता । तव भक्तीसी उभयता । लीन धार्मिकता आगळी ॥४२॥

श्रीशंकर म्हणवून । आदरें करिती अतिथिपूजन । इच्छेऐसें देती दान । अति सन्मान करोनी ॥४३॥

उदास न होती मानसीं । कंटाळा न येची त्यांसीं । भक्तिप्रेमा अहंर्निशी । तयापासीं मूर्तिमंत ॥४४॥

तयालागीं एक बाळक । सकुमार चिल्लाळ नामें देख । पाहतां मना वाटलें सुख । अति हरिख धर्मीं तया ॥४५॥

अजी शंभो जाश्वनीळा । हा नृप असे सत्त्वागळा । ऐसा दुजा न देखें डोळां । या भूमंडळा शोधितां ॥४६॥

धन्य देवा पशुपति । असंख्य तुझे भक्त असती । परि या श्रियाळाची स्थिती । पाहोनी चित्तीं आनंद ॥४७॥

ऐकोनी नारदाचें कथन । परम हर्षला उमारमण । नारदा करविलें अमृतपान । तें फिकें गौण यापुढें ॥४८॥

आज्ञा मागोनि ते वेळां । अन्य लोकां नारद गेला । शिवगुज सांगे पार्वतीला । निजभक्त डोळां पाहीन ॥४९॥

लीलालाघवी उमाधव । रुप तैं धरीतसे अपूर्व । पहावया भक्तभाव । करी लाघव अनुपम ॥५०॥

कुश्चळ मलिन विकारभरित । सर्वांगीं चिंध्या वेष्टित । पूरक्त वाहतें बहुत । सुटली अद्‌भुत दुर्गंधी ॥५१॥

अक्राळविक्राळ त्राहाटका । हांकापाठीं मारी हांका । पाहतां भय जनलोका कोण्ही न ये का जवळी पैं ॥५२॥

न कळे कोणासही हा कोण । उगेच पाहती सर्व दुरुन । योगी पाहे निरखून । हे तों अज्ञान सर्वही ॥५३॥

रत्‍नाचे परीक्षक जोहारी । जेवी लक्ष न ठेविति कांचेवरी । हिराच शोधोंनी झडकरी । घेती करीं आदरें ॥५४॥

तेवी सकळ जनाची घेर सोडोन । योगी पावला नृपसदन । महाद्वारीं उभा राहोन । हांक दारुण मारिली ॥५५॥

अरे मी असे बहु क्षुधित । दे भोजन मज गा अपेक्षित । ऐशा वचने रायाचें चित्त । पिसा परीक्षित तेधवां ॥५६॥

अतीतशब्द पडतां श्रवणीं । श्रियाळ आला त्वरें धावूनी । तात्काळ प्रेमें लागला चरणीं । कर जोडोनी ठाकला ॥५७॥

म्हणे जी स्वामी कृपावंता । काय आज्ञा सांगा जी समर्था । योगी म्हणे होसी दाता । पुरवी अपेक्षिता माझिया ॥५८॥

नृप वदे योगिराया । परिपूर्ण आहे तुझी दया । तुझे हेतु पुरवावया । वेळ कासया पाहिजे ॥५९॥

तन मन आणि धन । राज्यसंपत्ती वैभव पूर्ण । कलत्रासहित शिवालागुन । लक्षोनी चरण असें कीं ॥६०॥

जी अपेक्षा स्वामीचित्तीं । तीच सांगणें दासाप्रती । योगी म्हणे या नृपती । राज्यसंपत्तिवैभव नको ॥६१॥

मी तरि असें क्षुधातुर । इच्छित भोजन घाली सत्वर । ऐकोनी तव किर्ति अपार । हेतुपुरःसर पावलों ॥६२॥

नाना अन्नें पक्वान्नें भक्षिलीं । परि इच्छा असे एक उरली । तीचि पाहिजे पुरविली । याचि वेळीं सत्वर ॥६३॥

राव म्हणे तो अर्थ कोण । सांगता पुरेल न लगतां क्षण । योगी वदे नरमांसभोजन करितां मन संतोषे ॥६४॥

अवश्य म्हणे तैं श्रियाळ । ऐकतां बोले पयःफेनधवळ । तूं सत्ताधारी धनपाळ । देवोनि मोल आणिसी ॥६५॥

चोर जार बंदी दीन । स्यांचें न करीच मी सेवन । किंवा देसी मोलें आणून । स्पर्श त्यालागुन न करीच ॥६६॥

राव होवोनिया विनीत । पुढतीं योगियासी बोलत । आपण आज्ञा कराल निश्चित । तेंचि त्वरित अर्पितों ॥६७॥

योगी वदे पवित्र सुशील । धार्मिक अंतरीं निर्मळ । दे शिवभक्तीसी जो प्रेमळ । नको चांडाळ खळ दुरात्मा ॥६८॥

श्रियाळ चरणीं ठेवी माथा म्हणे मज अंगीकारी समर्था । तंव उत्तर झाला शिव देता । मागत्याचा पिता तूं होसी ॥६९॥

उभय संवादा ऐकून । त्वरें चांगुणा आली धावून । पद योगियाचे वंदोन । उभी राहून विनवीत ॥७०॥

जी जी योगिया दीनदयाळा । पतित पावना तूं कृपाळा । आपण न अंगीकरितां भूपाळा । दासी कमळां विनटली ॥७१॥

हें शरीर स्वामीकाजीं । वेंचावें वाटे मज आजी । कृपा करोनी स्वीकारा जी । असें राजी आत्मसुखें ॥७२॥

न करा जी आतां अव्हेर । करा दासीचा अंगीकार । सद्गद हृदय नेत्रीं नीर । योगेश्वर पाहतसे ॥७३॥

तंव अतीत म्हणे तूं माता । आम्हा मागत्याची निश्चिता । आहारीं तुज सेवितां । दोष माथा पडे कीं ॥७४॥

तंव चांगुणा आणि श्रियाळ । उभय जोडोनिया करकमळ । प्रार्थिती होवोनि विव्हळ । चरणीं भाळ ठेवोनी ॥७५॥

जी स्वामिया दयाघना । परमपुरुषा दीनपावना । योगेश्वरा भाकितों करुणा । नये मना हे वपु ॥७६॥

कोण पदार्थ रुचला मानसी । ती आज्ञा कीजे सेवकासीं । सेवा घेउनी रक्षी सत्यासी । वाद त्यासी नाणिजे ॥७७॥

तंव योगी बोले वचन । तुझा एकुलतां एक नंदन । कोमल सकुमार चिल्लाळ पूर्ण । तो आणुन मज देई ॥७८॥

मज असे तयाची प्रीती । तो भोजनीं देई सत्वर गति । अनुमान करितां निश्चिती । करीन हंति सत्वाची ॥७९॥

उभय ऐकुनी झाले चकित । म्हणे होऊं पाहे सत्वघात । तैसियामाजीं अकस्मात । ये त्वरीत चिल्लाळ तो ॥८०॥

माता म्हणे ये बा चिल्लाळा । सगुणा राजसा कोमळा । तूं बहु आवडसी जाश्वनीळा । पयःफेनधवळ शंकरा ॥८१॥

अतीत तुझी वाट पाहे । धावोनी येगे त्वरें माये । वंदी योगियाचे पायें । तृप्त सदयें करी त्या ॥८२॥

तैं चिल्लाळ आला धावत । भावें मातापितयांसी नमित । दृष्टी देखोनिया अतीत । तया प्रणिपात करीतसे ॥८३॥

तंव मातापिता म्लानवदन । संकोचित देखिलें चिन्ह । योगियाचें चंचळ मन । चिलया विचक्षण ओळखी ॥८४॥

चिल्लाळ विनवी अतीतासी । कोण अर्थ सांगा मानसी । योगी म्हणे भोजनासी । नरमांसासी मागतों ॥८५॥

मग मातेसी म्हणे सकुमार । अतीता जेववी सत्वर । आज्ञे ऐसा विचार । करोनि योगींद्रा तोषवा ॥८६॥

चांगुणा म्हणे बाळका । हा तो न स्वीकारी आणिका । स्ववपु आम्ही अर्पिता देखा । तेथेंहि शंका स्थापितो ॥८७॥

तुझे ठाई त्याचें मन । चिल्लाळ बोले करा अर्पण । कांहीं न करावें अनमान । सत्व रक्षण करावें ॥८८॥

ऐकोनिया बाळबोला । योगी मनी आनंदला । हिरा घण ऐरणीला । सोनें कसाला पाहती ॥८९॥

तेवी परीक्षावया अंतर । अट्टहास्य करी योगेश्वर । क्षुधिता द्या रे इच्छिला आहार । मज तो धीर न धरवे ॥९०॥

श्रीयाळनृप चांगुणाराणी । विनविते झाले तैं प्रार्थुनी । हा चिल्लाळबाळ अर्पण चरणीं । कृपा करोनी घेइजे ॥९१॥

तंव बाळ बोले जी सर्वोत्तमा । शरणागतासि कीजे क्षमा । मज स्वीकारोनि तोषवा आम्हां । सुखविश्रामा योगिया ॥९२॥

मागुती होय क्रोधायमान । कठोरत्वें करी भाषण । मूर्खपणें देतां दान । मातें हीन देखोनी ॥९३॥

मी काय वृक व्याघ्र रीस । फाडोनी भक्षूं बाळास । कुशळ म्हणवितां आपणांस । वाटे उळगास वारितां ॥९४॥

तुम्ही सत्व धीर आणि उदार । जाणतां सकळ सारासार । हा मिथ्याचि बडिवार । कळलें साचार मज आतां ॥९५॥

करुनी सत्वा तुमच्या हानी । मी जातों स्वस्थानीं । येरु धावोनि लागती चरणीं । ऐसे मनी नाणिजे ॥९६॥

जैसी कराल आम्हां आज्ञा । तेवीच आचरुं सर्वसुज्ञा । अव्हेर करावया प्राज्ञा । नाहीं गुणज्ञा आम्हांसी ॥९७॥

योगी म्हणे सत्व रक्षणें । तरी बाळमांसातें छेदणें । परिपाकोनी स्वच्छ मनें । दिव्य भोजनें मज द्यावीं ॥९८॥

अवश्य म्हणे राजभाजा । कडे घेतले आत्मजा । नमोनी बोले योगीराजा । पाक ओजा सारितें ॥९९॥

त्वरें जावोनी पाकशाळें । चिलयासी मांडिये घेतलें । आवडीनें मुख चुंबिलें । वदन कुरवाळिलें तयाचें ॥२००॥

म्हणे बाळा तूं उदार । योगिया दान केलें शरीर । कांहीं न उगेचि अंतर । केला उद्धार कुळाचा ॥१॥

बाळा तुझें रे वय सान । परि प्रौढबुद्धी तुझें ज्ञान । तुज तोषोनि कैलासरमण । पदीं दे ठाण अक्षईं ॥२॥

तै बाळ बोले मातेसी । क्षुधानळें पीडिलें अतितासी । तूं न गुंते गे मोहासी । साधीं कार्यासि सत्वर ॥३॥

धन्य भाग्याचा हा सुदिन । मद्वपुचें योगिया भोजन । त्या प्रसादें शिवचरण । आतांचि पाहिन शीघ्रगती ॥४॥

ऐकोनि बाळाच्या उत्तरा । सद्गद माय झाली अंतरा । स्वकरें पुसोनी शस्त्रधारा । चिलया सामोरा धरी वेगीं ॥५॥

श्रीशंकर मनीं आठवोनी । कंठ छेदिला तत्‌क्षणी । षड्‌रस अन्नें रांधूनी । मांस पचवोनी सिद्ध केले ॥६॥

शिर बाळाचें मोहें ठेविलें । मांस धडाचें रांधिलें । नाना पक्वानें करोनि दाविले । पात्र विस्तारिलें योगिया ॥७॥

रायें मांडोनि आसन । केलें योगियाचें पूजन । चांगुणा पात्र आणून । दावी निरउनी प्रकार ॥८॥

तंव अंतःसाक्षी तो शिवयोगी । पाहोनि पात्र उठे वेगीं । अपवित्र अन्न संयोगीं । मजलागीं जेवविता ॥९॥

कळली तुमची उदारता । कपटें मसी विवंचिता । जातों करोनी सत्त्वघाता । बोलोनि उठता योगी होय ॥१०॥

राव दृढ धरी तयाचें चरण । म्हणे महाराज अपराध कोण । प्रकट न करितां उठोन । कारितां गमन स्वामिया ॥११॥

योगी म्हणे तुम्ही सुज्ञ । जाणते आणि विचक्षण । सर्वेषु गात्रेषु शिरःप्रधान । तेंचि चोरुन ठेविलें ॥१२॥

अपवित्रातें रांधिलें । तेंचि मातें विस्तारिलें । केवीं जाईल भक्षिलें । वायां गेलें करा ऐसें ॥१३॥

राव कांतेकडे पाहे । चांगुणा म्हणे सत्यचि आहे । आतां पचविते लवलाहे । उशीर काये स्वामिया ॥१४॥

तंव योगी बोले माते । मम आज्ञा मान्य तुम्हांतें । तरी मम सन्निधान शिरातें । घालोनि उखळातें कांडा वेगीं ॥१५॥

येरी सत्वर जाऊन । शिंक्याचें शिर आणिलें उतरोन । उखळीं तयातें घालून । करी कंडन स्वहस्तें ॥१६॥

मुखावरी पल्लव घेतला । हृदयीं सद्‌गद वेल्हाळा । तंव योगी बोले तये वेळां। मोहे डोळां अश्रू कां ॥१७॥

हें दुःखरुपी दान । मज कासया पाहिजे पूर्ण । आतां जातो मी उठोन । करा रुदन पुत्रमोहें ॥१८॥

उभयतां धावोनी मागें जाती । पदावरी भाळ ठेविती । मधुर शब्दें विनविती । कृपामुर्ती न करा ऐसें ॥१९॥

कृपें समर्थें पाळावें । चुकल्या आपणचि सांभाळावे । सेवादान आम्हां द्यावें । त्वरें फिराव योगिया ॥२०॥

तुमची आज्ञा आम्हां प्रमाण । कदा न करुंचि अवमान । न मळे चित्त देतां दान । ही तो खुण जाणतसां ॥२१॥

ऐकून बोलाची चातुरी । योगी बैसे आसनावरी । म्हणे चांगुणे अंतरी । गोष्टी धरीं सांगतों ॥२२॥

तळी उखळामध्यें कमळ । करकमळें ताडितां मुसळ । गीत गाई तूं मंजुळ । अतिनिर्मळ सप्रेम जें ॥२३॥

मंगळ गीतातें गावें । श्रीशंकर तोषवावें । परिपाकीं रांधावें । भोजन द्यावें आदरें ॥२४॥

अवश्य म्हणोनी ते अवसरीं । मुसळ घेतले सव्यकरीं । गीत आरंभिलें कुसरी । जेणें अंतरी निवे योगी ॥२५॥गीत॥

चिल्लाळा उदारा । कोमळा सकुमारा । धन्य कुळोद्धारा । जन्मलासी ॥२६॥

पूर्वीचें सुकृत । तुझें शुचिष्मंत । म्हणोनी उदीत । दीनकाजीं ॥२७॥

काया हें अर्पितां । न वाटे भय चिंता । वदनीं उमाकांता । आठवीसी ॥२८॥

स्वहित त्वां बा केलें । परलोक जिंकिले । कीर्तीनें भरलें त्रिभुवन ॥२९॥

कैलासीचा राजा । तुज संतोषला । तूंचि त्यासी जाला । आवडता ॥३०॥

जावोनी बैससी । शिवअंकावरी । बाळा तुझी थोरी । अनुपम ॥३१॥

आम्हीं पापराशी । म्हणोनी त्यागीसी । शिवलोका जासी । एकलाची ॥३२॥

आम्हासाठीं तेथें । विनवी शंकरा । आणि गा दातारा । मायबापा ॥३३॥

देई आठवण । वेळोवेळीं शिवा । मायामोहगोवा । सोडवी हा ॥३४॥

पोटीं जन्मोनियां । कुळ शुद्ध केलें । सकळ उद्धरिलें । पूर्वजांसी ॥३५॥

अगा तूं शंकरा । येई दीनोद्धारा । चरणापासीं थारा । देई आम्हां ॥३६॥

ओंवी॥ चांगुणा सप्रेमें गाय गीत । योगी आनंदे डोलत । म्हणे कार्य उरलें किंचित । कृपावंत व्हावया ॥३७॥

स्तब्ध योगी न करी भाषण । तव चांगुणा मांसातें सांवरोन । लवडसवडी पचवून । पात्र वाढून आणिलें ॥३८॥

योगी बैसे भोजनासी । संकल्पिता बोले रायासी । आम्हा यजमान तूचि होसी । ये पंक्तीसी झडकरी ॥३९॥

भोजना योगी पाचारीत । राव मनी जाला चकित । वाटे ओढवला अनर्थ । परम घात होऊं पाहे ॥४०॥

मग विनवी योगिया । की जे स्वामी आतां दया । आपुले भोजन जालिया । प्रसाद ठाया ठेविजे ॥४१॥

स्वस्थे मनें सारिजे भोजन । उरलें शेष घेऊं मागून । योगी वर्म लक्षोन । काय वचन बोलत ॥४२॥

आपण भोजनीं न बैसता । सत्य हरोनी होईन जाता । योगियाची देखोन तीव्रता । रायासि कांता विनवीत ॥४३॥

नवमास वाहिला म्यां उदरीं । तो जड जाला काय तुम्हा क्षणभरी । मान रक्षणा ये अवसरी । बैसा सत्वरी सत्वकाजीं ॥४४॥

भोजन करोनि योगी जातां । आपणहि जाऊं बाळपंथा । कासया विकल्प वाढावतां । त्या शिवा समर्था आठवा ॥४५॥

असो योगियाच्या संतोष मना । राव ताटी बैसला भोजना । मागुतीं वदे योगिराणा । तूं ही चांगुणा ये वेगी ॥४६॥

अवश्य म्हणोनी ते अवसरीं । चांगुणा बैसली झडकरी । म्हणे स्वामी दया करी । अंगीकारी भोजना ॥४७॥

तंव एकाएकीं तये वेळां । योगी उठोनी उभा राहिला । म्हणे न सेवीं मी अन्नाला । दोष घडला तुम्हांतें ॥४८॥

बाळहत्यारे निपुत्रिक जाण । म्हणोनी न सेवावें तुमचें अन्न । आतां जातों मी परतोन । सत्त्व हिरोन येधवां ॥४९॥

तव येरें जोडोनि पाणी । करिते जाले विनवणी । आपण आज्ञा केली म्हणोनी । केली हानी बाळाची ॥५०॥

आपणची आम्हां आज्ञापितां । वर्तल्या दोष आरोपितां । अहो योगिया समर्था । काय आतां म्हणावें ॥५१॥

योगी वदे उभयतांसी । चिल्लाळा पाचारा वेगेसीं । तरी बैसेन भोजनासी । लाग वेगेसीं झडकरी ॥५२॥

येरु देती प्रतिवचन । एकुलता होता चिलयानंदन । दुसरा आणावा कोठून । सांग निपुण तूं होसी ॥५३॥

पिसा बोले तयांतें । तुम्ही भजतां शिवातें । काय उणें आणि ब्रीदातें । तया अतौतें प्रार्थावें ॥५४॥

तंव उभयतां अट्टाहास करिती । शिवस्तवना आरंभिती । सद्गद नेत्रीं अश्रु वाहती । झरे चालती नीराचे ॥५५॥

जयजयाजी शंकरा । जयजयाजी गंगाधरा । जय वृषभ वाहन पन्नगहारा । कृपा करा ये वेळीं ॥५६॥

जयजयाजी मोक्षदानी जयजय शिवशूळपाणी । आमुचिया करुणावचनीं । ये धावोनी विश्वेशा ॥५७॥

जयजयाजी कर्पूरगौरा । जयजयाजी दिगंबरा । जयजयाजी उमावरा । दीनोद्धारा पाव आतां ॥५८॥

जयजय पाशुपतधारणा । जय डमरुधर शंखवादना । जय भस्मोद्‌धूलितभूषणा । करुणाघना कपर्दिना ॥५९॥

जय स्मशानवासी कैलासनाथा । सर्वाधिशा हिमनगजामाता । चंद्रचूडा कृपावंता । पाव आता अतित्वरें ॥६०॥

जय विरुपाक्षपंचवदना । कामांतका त्रिपुरदहना । भक्तपते पतितपावना । संकटनाशना पाव त्वरें ॥६१॥

आम्ही अनाथ अपराधी । तुझे म्हणवितों कृपानिधी । पडिलों संकटाचे संधीं । कंठीं व्याधीं पीडिलों ॥६२॥

हे शिवसनातना । धाव न सोसे यातना । होऊं पाहे घातना । उभयतांना ये काळीं ॥६३॥

नेत्रीं वाहती प्रेमांबुधारा । अंगें कांपती थरथरा । हें जाणोनि सर्वेश्वरा । दया अंतरां उपजली ॥६४॥

तत्काळ प्रगटला तो शंकर । नंदीवहनी कर्पूरगौर । जटाजूट गंगाधर । पन्नगहार नीळकंठीं ॥६५॥

अर्धांगीं शोभली गौरी । पुढें चिलया नंदीवरी । शंख त्राहाटितां ते अवसरीं । पाहती वरी उभयतां ॥६६॥

श्रीयाळ चांगुणा धावोनी । सप्रेमें लागतां दृढ चरणीं । दंडप्राय पडतां मेदिनीं । शूळपाणी उठवीत ॥६७॥

शंकरें दिधलें आलिंगन । करी उभयतांचे समाधान । म्हणे झालों मी प्रसन्न । इच्छित पूर्ण मागा मज ॥६८॥

विनविती जोडुनी दोन्ही कर । अतीत असे क्षुधित फार । त्याचें तोषवावें अंतर । अट्टाहास्य थोर यासाठीं ॥६९॥

तंव तो बोले उमापती । अतीतरुपें मींच निश्चितीं । पहावया तुमची सत्त्ववृत्ती । नाना विपत्ती दीधल्या ॥७०॥

तुमची भक्ति अनिवार । भावनिष्ठा बळ थोर । परम धार्मिक उदार । न ढळे अंतर छळितांहि ॥७१॥

म्हणोनि स्तवनीं प्रगटलों । तुम्हांलागीं प्रसन्न झालों । प्रेमभावातें भुललों । कैलास आलों टाकोनी ॥७२॥

जी इच्छा वागेल मानसीं । तेंचि मागावें मजपाशीं । न्यून पडे निश्चयेसी । अनन्यांसी पुरवितां ॥७३॥

ऐकोनि विनविती उभयतां । तुझिया कृपें नसे निवंता । चरणीं ठाव आतां । उमाकांता अम्हां दीजे ॥७४॥

असो जैसे भक्त मागती । तैसेंचि मनोरथ गा पुरविती । अनन्यभावें प्रीती । जया चित्तीं तो धन्य ॥७५॥

हें श्रियाळ-चांगुणेचें आख्यान । एक्या गुणार्थ काढिलें शोधून । मागील कथेचें अनुसंधान श्रोते सूज्ञ जाणती ॥७६॥

या पांचव्या गुणाची गती । नोव्हेच कोण्हा बाळेसि प्राप्ति । परी ऐशा पतिव्रता युवती । धुंडिता निघति क्वचितची ॥७७॥

भुवनत्रयीं धुंडितां । सहस्त्रांत एक पतिव्रता । तयांमाजी शोधितां । लक्षणयुक्ता अल्पचि ॥७८॥

आतां सहावें लक्षण । तेंही करितों निरुपण । आदरें परिसावें आपण । क्षमागुण कैसा तो ॥७९॥

अहो या धरणी ऐसे । क्षमागुण कोठें नसे । कृषि नांगरी वखरी विशेषें । विदारितसे अन्य रीती ॥८०॥

कोण्ही पेवें बळदे खांदिती । विहीर बारवा उकरिती । कूप खणोनी खोरिती । ताळ तळाटी खासोर ॥८१॥

पाये खोदोनी इमारतां । होय साळी जाळोनि रोपितां । कोण्ही उकरोनी चिखल करितां । दुःख वार्ता न बोले ॥८२॥

कोण्ही नाना पात्रें मुशी करुन । अग्निमाजी जाळिती पूर्ण । शौचविधी लघवी जाण । करितां दूषण न मानी ॥८३॥

नाना मळमूत्र टाकिती वरी । मेलिया शवा अधि पुरी । कितेक जाळिती अंगावरी । तरी अंतरीं क्षोभेना ॥८४॥

कोण्ही निर्मिती उत्तम स्थळ । कोण्ही आचरती पापाचळ । कोण्ही सुशीळ वसती अमंगळ । समान निर्मळ दोपक्षीं ॥८५॥

सुखदुःखाचा हर्षखेद । मनीं नाणी न करी द्वंद्व । धरितीचें हें क्षमापद असे अतिशुद्ध आगळें ॥८६॥

हे षड्‌गुणऐश्वर्यता । बाणली ती लक्षणयुक्ता । सकळ पतिव्रतेची माता । भासे पाहतां अनसूया ॥८७॥

सकळ गुणें संपन्न । पतिव्रता ती पतीअधीन । पतीवांचोनी आन । दिसे वमन तिजलागीं ॥८८॥

ऐसी माता ते अनसूया । सदा सेवीतसे पतिपायां । सांडोनिया लोभ इतर माया । पर्वतठायां वसतसे ॥८९॥

ऐसी बहु काळ करी सेवा । परि दुःख न मानी कांहीं जीवा । सदा आनंदयुक्त काम बरवा । वाढवीत नवा नित्य प्रेमा ॥९०॥

तेवीच तो अत्रिमुनी । सदा सावध तपाचरणीं । क्रोध अणुमात्र नुपजे मनीं । स्वानंदभुवनीं क्रीडत ॥९१॥

त्रिकाळ स्नान संध्या जप होम । वेदचर्चा नित्यनेम । अतीतअभ्यागतादि क्रम । काळ उत्तम सारिती ॥९२॥

शांत दांत आणि वेदांत । भक्तिज्ञानवैराग्ययुक्त । सत्स्वरुपीं सदा रमत । साधोनि एकांत राहिले ॥९३॥

जेवी गौतमऋषि परम पावन । कांता अहिल्या लावण्यरत्‍न । पतिसेवे दक्ष पूर्ण । उभय आनंदघन सर्वदा ॥९४॥

प्रपंचीं परमार्था साधिती । दुकळीं साळी स्वयें पेरिती । मध्यान्हीं कणसिद्ध करिती । मग पचविती स्वकरें ते ॥९५॥

जीवमात्रासी अन्न द्यावें । मिष्ट भाषणें तोषवावें । परम प्रीतीं सेवन करावें । शीण वारावे अतितांचे ॥९६॥

अत्यंत सेवेची आवडी । अतीत-अभ्यगतीं विशेष गोडी । नित्य उत्पन्न करोनी तांतडी । भोजनें सुरवाडी प्रीति दे ॥९७॥

अहल्यापति आज्ञेसि वंदून । दहा सहस्त्र वर्षें करी सेवन । कष्ट न मानोनि आनंदे पूर्ण । लक्षी चरण पतीचे ॥९८॥

उभयतां युक्त आनंदवृत्ती । सुखसंतोषें वनीं वसती । तपबळें जीवां जीवविती । उबग न मानिती मनांत ॥९९॥

तेवीच अत्रि आणि अनसूया । आनंदे आचरती तपःक्रिया । भोजनें देति आलियां । सत्कारिती तयां प्रेमादरें ॥३००॥

धन्य धन्य हे पुण्यपरायण । कीर्तीनें भरलें त्रिभुवन । यांचे करितां नामस्मरण । पापें जळोन सर्व जाती ॥१॥

धन्य साधु हे सत्पुरुष । दिगंतरी कीर्ति विशेष । हें गाय तो पावे यश । टळे अपेश निर्धारें ॥२॥

अद्‌भुत संतांचें महिमान । श्रवणमात्रें करी पावन । ऐसियांचे सेविती चरण । होय कल्याण तयांचें ॥३॥

या संतांची पूर्ण होतां दया । दोष जाती सर्व लया । गुंतों न देती अपाया । करोनी छाया रक्षिती ॥४॥

संतचरणीं सुख अपार । त्याचा न कळे कोण्हा पार । संतकृपें सर्वेश्वर । भेटी सत्वर पैं दे तो ॥५॥

संतचरणीं जरि मन जडे । मोक्षसायुज्यता सहज जोड । यम न पाहे त्याचेकडे । वैकुंठ जोडे सत्य पैं ॥६॥

या संतचरणाची नवलाई । वर्णूं किती म्हणोनी काई । सकळ तीर्थे पर्वकाळ पाही । मुक्त पाईं । होताती ॥७॥

म्हणोनिया अनंतसुत । लडिवाळें संतांसि विनवीत । चरणसेवा अखंडित । तुम्हां मागत द्या प्रेमें ॥८॥

अनन्यभावें जालों दास । माझी पुरविणें तुम्हीं आस । कृपायोगें ग्रंथरस । अतिसुरस चालवा ॥९॥

पुढील कथा अलोकिक । अत्रिनारदभेटी सम्यक । विचित्र कथा सुखदायक । श्रवणीं सुख श्रोतियां ॥१०॥

अनंतसुत विनवी श्रोतयां सज्जनां । नारदलीलेची अद्‌भुत रचना । सद्‌गुरु करविता निरुपणा । सावध श्रवणा होइजे ॥११॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । नारदपुराणातें संमत । भाविक परिसोत संतमंहत । द्वितीयाध्याय गोड हा ॥३१२॥

॥ इति द्वितीयोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP