समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय चौदावा

संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.


श्री भगवानुवाच

देहांती ज्या ज्ञाने सर्वहि मुनि परम सिद्धिला गेले ॥

पुनरपि ते मी कथितो सर्व ज्ञानात थोर जे गणिले ॥१॥

या ज्ञान आश्रयाने जे मम रुपास पावले असती ॥

त्या जगदुत्पत्तीला जन्म नसे दुःख ना प्रलय अंती ॥२॥

मोठे ब्रह्म प्रकृती मम योनी गर्भ ठेवितो जीत ॥

प्राणी सर्व तयांची भारत उत्त्पत्ति होतसे तीत ॥३॥

निर्माण जी शरीरें होती कौंतेय सर्व योनीत ॥

ब्रह्म महद्योनित या मी जनक बीज तयास की देत ॥४॥

गुण तीन सत्व रज तम येती प्रकृती मधून जन्माला ॥

देहीच बांधिताती महा बाहो अव्ययहि देहयाला ॥५॥

प्रकाशक सत्व निर्मळ निष्पापा रोगहारी ही आहे ॥

सुख ज्ञान संगानें टाकी बांधून देहधारी हे ॥६॥

विषय प्रीती रज तो तृष्णा आसक्‍ति यास जनक हि तो ॥

कर्म लोभे कौंतेया बंद्धन देहीस हाच की होतो ॥७॥

अज्ञान जन्म तम हा भारत मोहात गुंतवी देही ॥

प्रमाद निद्रा आळस देहीस देहात बांधितो हाही ॥८॥

सत्व सुखी आसक्‍ती भारत रज लोभकार कर्माचा ॥

ज्ञाना आच्छादन तम उत्पादक तोच की प्रमादाचा ॥९॥

रज तम अशक्‍त असता श्रेष्ठ होय सत्व तेवि रज होतो ॥

सत्व तमोगुण दबता सत्य रज दबता श्रेष्ठ तम होतो ॥१०॥

देहात इंद्रियात हि उपजे प्रकाश ज्ञानहि तैसे ॥

तेव्हा समजावे की सत्व गुणावृद्धि झाहली ऐसे ॥११॥

भरतर्षभा रजो गुण वृद्धी होता प्रवृत्ति लोभ तसा ॥

इच्छा अशांति उपजे कर्मा आरंभ हेतुही तैसा ॥१२॥

कुरुनंदन तम वृद्धी समयी अज्ञान मंदता येई ॥

बेसावध पण आंगी मोहोत्पती तयासवे होई ॥१३॥

प्रबळ सत्त्वगुण असता मरतो तो मनुज अमल लोकाला ॥

मिळवी ज्ञानी उत्तम ऐसे जन मिळवितात की ज्याला ॥१४॥

प्रवळ रजात मरे तो येतो जन्मास कर्म संग्यात ॥

बलवान तमी मरता पावे तो जन्म मूढ योनीत ॥१५॥

फल सात्विक कर्माचे असते सात्विक तसेच निर्मल ते ॥

दुःख फल राजसाचे फल जे अज्ञान तामसाचे ते ॥१६॥

ज्ञान निघे सत्वगुणीं राजस गुण लोभ जनक तो आहे ॥

प्रमाद मोह अज्ञान येती जन्मा तमात सर्वच हे ॥१७॥

सात्विक उच्चगतीला राजस जातीच मध्यमा लोका ॥

निकृष्ठ कर्मे कर्त्या मिळे अधोगति तमोगुणी लोका ॥१८॥

कर्ता गुणाविण दुजा नाही ज्ञान्यास समज तो जेव्हां ॥

गुणातीत तो समजे माझ्या रुपास मिळवि तो तेव्हां ॥१९॥

देहाच्या संघाने होणार्‍या तीन या गुणा तरुनी ॥

देही मोक्षा पावे जत्म मृत्यु जरा दुःख ही सुटुनी ॥२०॥

अर्जुन उवाच

तीन गुणाना तरतो चिन्हें त्याची प्रभो कशी असती ॥

आचार तया कैसा तो तरे गुणास ती कशी रीती ॥२१॥

श्री भगवानुवाच

जो न द्वेषी पांडव प्रकृती प्रकाश मोह ही येता ॥

इच्छा न करी यांची यापैकीं एकही मुळी नसता ॥२२॥

स्थीर उदासीन जसा तीन गुणे वृत्ति नाचळे काही ॥

गुण आपुले स्वभावे चळती जाणोन समच जो राही ॥२३॥

सुख दुःखी सम राहे माती कांचन दगड समच मानी ॥

ज्याला स्तुती निंदा सम धीर जो प्रिय अप्रियहि सम मानी ॥२४॥

मानापमान समही मित्र पर पक्ष जयास सम असती ॥

उद्योग सर्व टाकी ऐशाला गुणातीत की म्हणती ॥२५॥

अनन्य भावे भक्‍ती करुनी जो मजसि सर्वदा भजतो ॥

सर्वगुणा तरुनी तो मोक्षपदा योग्य मनुज की होतो ॥२६॥

अमृत अधिकार ऐशा ब्रह्माचे शाश्‍वत धर्म तयांचे ॥

मीच ते वसतिस्थान आत्यंतिक जे अशाहि सौख्याचे ॥२७॥

सारांश

शा.वि.

माता ती प्रकृती पिता समज मी यानी घडे विश्‍व हे ॥

तीन्ही सत्व रजादि तामस जिवा त्या बांधती गूण हे ॥

तो तोडी त्रिगुणा भजे मजसि जो भावे अनन्या अशा ॥

मद्रूपी मिळतो प्रिया प्रिय नसे ज्या भावना ही तशा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP