केशवस्वामी - श्लोक संग्रह ५

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.

सर्वेश्वरा सौख्यकरा उदारा । निरंतरा भक्त परा अपारा ॥

परात्परा पूर्ण निजावतारा । धरा धरा दे निजधाम थारा ॥२०१॥

दया करा चिन्मय नागरा रे । निरंतरा अक्षय नागरा रे ॥

सनातना पूर्न घना समाना । निरंजना मोक्षकरी निधाना ॥२॥

निष्काम राम बरवा मज वोळला रे । तेणेचि शोकमय हा तरु वाळला रे ॥

गेला लया साधन योगसाचा । झालो निधी परम मंगळ चित्सुखाचा ॥३॥

अनुग्रहो पूर्ण करोनि माते । प्रकाशिले तत्व अनाथनाथे ॥

तेणेचि मी तत्व स्वरुप झालों । अनाथ होवोनि निवांत ठेलो ॥४॥

विस्तारला राम समग्र लोकीं । हे जाणिजे पावन रामलोकी ॥

ते सर्व लोकांहुनि कीं निराळे । नसे ति हे लोक तया निराळे ॥५॥

करुनिया शास्त्र विचार वेगे । विचारिला ईश्वर सानुरागे ॥

तेणेचि हे भेद दशा निमाली । जडाजडी अक्षर प्राप्ति झाली ॥६॥

करुनिया पावन पादछाया । नेली लया तामस घोरमाया ॥

ऐसा सखा आणिक कोण आहे । कवी ह्मणे पाद जळीच राहे ॥७॥

कामासि ते आश्रय देत नाहे । संसार चिंता परिहोत नाहे ॥

रामे विना आणिक घेत नाही । जन्मासि ते मानव येत नाहो ॥८॥

करुनिया मद मत्सर होळी । निजसुखें करवी निजकेळी ॥

अति बळि समचित्प्रद राजा । कवि ह्मणे गुरु केवळ माझा ॥९॥

कवळुनि त्दृदयीं भगवंता । निरसिली रस पंचक चिंता ॥

ह्मउनी भवबंधन गेले । मुनि जनी बहु सार्थक केले ॥२१०॥

कंदर्प ज्याच्या भजने पळाला । संतापसर्पा प्रतिनाश झाला ॥

दर्पेचि हा भेद समुद्र आटे । तो नाथ माझा मज माजी दाटे ॥११॥

कामासि मारी श्रमजाळ सारी । संसारवारी जड जीव तारी ॥

चिन्मूर्ती योगी समसार भोगी । प्रसन्न झाला मजलागि वेगी ॥१२॥

कटक कुंडल कांचन जैसे । हरि दिसे जन कानन तैसे ॥

ह्मणवुनि स्थिर होवोनी वेगे । विचारतो आभीर्भय योगे ॥१३॥


क्रियायोग हा सर्वजाचा निवाला । सदा पूर्ण स्वानंद लाभे निवाला ॥

तया स्वामिचे लक्षिता पाय दोन्ही । जगज्जाळ जंजाळ गेले विरोनी ॥१४॥

करी वस्तिजो भक्ति विश्रांति क्षेत्री । परी सर्वदा प्रिती आध्यात्मशास्त्री ॥

अंतरी हरी ओळखे श्रूतमात्री । वरी मोक्षे हा लक्षितो त्यासि नेत्रीं ॥१५॥

काम वृक्ष मन घालुनि मोडा । कर्मपाश अतिसादर तोडा ॥

शोक मोह दुरि नेउनि सोडा । पादपांशं हरिचे मग जोडा ॥१६॥

करुनिया सद्गुरु ध्यानवेगें । जे डुल्लती अमृत पानयोगें ॥

झाले सुखी अक्षर मात्र ते हो । त्याच्या मते हा नभ पुष्पदेहो ॥१७॥

कळेना कदा पार शेषा सुपूर्णा । जये जाणता वर्ण नेत्रे अवर्णा ॥

अवर्णातया वर्णीजे केवि वर्णी । असे वर्णीता मुक्त मी सर्ववर्णी ॥१८॥

करुनिया बोध जना वनाचा । निरंजनी योग करी मनाचा ॥

नेदी उरो ठाव मनासि तेथें । तो चिंतिता सन्मय रुप होते ॥१९॥

करुनिया त्रिविधा मळ झाडा । नित्य मुक्त वसती जन वाडा ॥

पूर्ण ब्रह्मा तरिते अविनाशी । सौख्यमूर्ति ह्मणती श्रुति त्यासी ॥२२०॥

करुनिया नाश मनासि वेगें । संरक्षिले लोक समाधि योगें ॥

ते लक्षितां संत समर्थ मूर्ती । होते चिदानंद स्वरुप वृत्ती ॥२२१॥

करुनिया संत पदी मिराशी । विलोकिती नित्य परा वराशी ॥

घेती सदा सर्व सुखासि पाही । पंचत्व हे जाण तयासी नाही ॥२२॥

वारुनिया सर्व उपाधिरक्षा । म्या घेतली आत्म समाधि दीक्षा ॥

जन्म मरणा लागि ह्मणोनि नेणे । नाही कदा कर्म पुरासि येणें ॥२३॥

कवळिता हरि चिद्‌घन आंगा । विसरले मन या जड भागा ॥

हरिपदीं रमता अति धाले । हरि सुखे हरि केवळ झाले ॥२४॥

करुनिया जन काननि वासरे । अतिश्रमे श्रमती भवदासरे ॥

विसरले हरि हा अवि नाशरे । ह्मणवुनी न तुटे तनुपाश रे ॥२५॥

करुनिया विविधा मति सांडणें । भव क्रिया सकळा दुरि सांडणे ॥

हरि पदीं करणे स्थिर मांडणें । समसुखे बरवे मग नांदणे ॥२६॥

करुनिया प्रेम प्रदक्षिणा रे । दे देशिकाते मन दक्षिणारे ।

वाक्यार्थ लक्षुनि क्षणा रे । अलक्ष तूं होयि सुलक्षणारे ॥२७॥

किति करु सजणी करुनामी । उबगले बहया करुणामी ॥

उचलुनि कडियेवरी घ्यावो । सुखघनी मज सोडुनि द्यावो ॥२८॥

कवळिता हरि चिद्‌घन पायीं । त्रिभुवनी भवबंधन नाहीं ॥

ह्मणवुनी गुरुनंदन गर्जे । न भजता जन व्यर्थचि भर्जे ॥२९॥

कर्माकर्मीं वर्तता कर्म नेणे । धर्माधर्मी देह धर्मान जाणे ॥

धर्मात्मा तो सद्गुरु नाथ मोठा । आलो त्याच्या आत्म लाभार्थ पोटा ॥२३०॥

कळा कळा तीत कळा जयाची । घाली गळा कीर्तन माळ त्याची ॥

तेणे गुणे भेद अभेद नासे । नाशा अनाशा पर तो प्रकाशे ॥३१॥

करुनिया संत पदाब्जि थारा । मारा शिवा शिघ्र जिवेची मारा ॥

मारा क्रिया सर्व विकार वारा । पावा परानंद शिवा अपारा ॥३२॥

करुनिया निश्चळ सर्व वृत्ती । भजा सदा संत दयाळ मूर्ती ॥

धरा मनी बोधनिधी त्रिकाळी । नका घडो बोधक शोक जाळी ॥३३॥

त्रिभुवन जनकाची मूर्ति मी पूर्ण आहे । ह्मणवुनि रुप माझे सर्वदा मीच पाहे ॥

मजविण मज कांहीं दुसरे गुह्य नाहीं । कवि ह्मणे दृढ माझे प्रेम माझ्याच ठायीं ॥३४॥

त्रैलोक्य हे शून्य करोनि ठेवी । साधू चिदात्मा ह्मणवूनि सेवी ॥

तों साधुचे सत्य स्वरुप जाणे । साधू दशातथ्य तयासि बाणे ॥३५॥

रती पती टाकुनि शिघ्र देती । क्षमापती सेवुनि तप्त होती ॥

रची खची काळ जगत्र यासी । तो सर्वथा दृश्य नव्हे तयासी ॥३६॥

राहे सदा निश्चळ काननी जो । जपे रमा वल्लभ आननी जो ॥

तो माननी लागि कदा न मानी । पदोपदी चिन्मय रामवानी ॥३७॥

त्रिकाल हा काम नव्हेचि जागा । ऐसे तुह्मी संत पदीच लागा ॥

हरा सुखे द्वैत विकार नाना । पुढे कधी देह धरुनि याना ॥३८॥

रति पती शमला समयोगे । ह्मणवुनी त्यजिले भव रोगे ॥

शिवपदीं बरवी गति झाली । निजसुखें यतिचि मति धाली ॥३९॥

रविहुनी कवि ची मति फाकली । अनुभवे मति संपत्ति झांकली ॥

गतिविना गति हे अति गोमटी । निजपदीं घडली पडली मिठी ॥२४०॥

रक्षी सुखें संगति अग्रजाची । हे भारती मंगळ पत्र वाची ॥

स्वर्थासि नेघे मति मानवाची । यालागि त्यातें भव फार जाची ॥२४१॥

रति पति श्रमतो स्तवितो हे । दशदिशा भ्रमतो सवितो हे ॥

तरि हरी न दिसे नकळे हो । अनुभवे जवळी विलसे हो ॥४२॥

रामचंद्र हृदयाप्रति आणा । सर्वकाळ स्वरुपी मज न्हाणा ॥

शांत होय त्रिविधा तनु घाणी । याचि लागि रिचवा शिवपाणी ॥४३॥

त्रिभुवनी भ्रमता मन मारुता । न लपिती सहसा तनु मारुता ।

न पडती स्थिर ते मन मारुती । ह्मणवुनी स्मरतो पद मारुती ॥४४॥

राम नाम जपता मन धाले । चित्त प्रेमभुवनी स्थिर झाले ॥

द्वैत ताप सरला श्रम गेला । आत्म बोध गुरुने मज केला ॥४५॥

जनी राम संपूर्ण विस्तारला हा । श्रुती सार विस्तार शोधूनि पाहा ॥

नका सर्वथा व्यर्थ संदेह मानू । बरा वोळखा भानुचा नीज भानू ॥४६॥

जेथूनिया भक्त फळोनि गेले । संगी सदा संत निवांत ठेले ॥

तो सर्वथा कल्पित पाश तोडा । क्षरीचया अक्षर राम जोडा ॥४७॥

जैसा रमानाथ निजावतारी । तैसेचि हे सज्जन देहधारी ॥

या कारणे मंगल पाद सेवा । साधूसिरो रत्‍न करुनि ठेवा ॥४८॥

ज्यांचे जगत्पावन पादपाणी । ज्याची अती मंगळरुप वाणी ॥

ज्याची दया चिन्मय रत्‍नखाणी । ते मंदिरा संत समर्थ आणी ॥४९॥

जो नातळे काम क्रिया कलापा । जो नायके गोमतिच्या विलापा ॥

तो पावला सर्वसमाभिरामा । रहस्य सांगे रविराव आह्मा ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP