विवेकचूडामणी - श्लोक संग्रह २५१-३००

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


मृत्तिकेचे कार्य म्हणजे मृत्तिकेपासुन झालेले जे घटादिक सर्व पदार्थ ते जसे नेहमी मृत्तिकारूपच असतात, तद्वत सद्रूप ब्रह्मापासून उत्पन्न झालेले हे जगत सद्‌रूपच आहे. तस्मात जे काही आहे ते सर्व सद्‌रूप ब्रह्मच आहे. ज्यापेक्षा सद्रूप ब्रह्माहून दुसरे काही नाही, आणि ते सद्रूप ब्रह्मच स्वतः आत्मा आहे. तस्मात अतिशय शांत, निर्दोष, द्वैतरहित असे जे परब्रह्म ते तू आहेस. ॥२५१॥

झोपेत अज्ञानाने कल्पिलेले देश, काल दृश्य पदार्थ, व त्यांना जाणणारा इत्यादिक सर्व जसे मिथ्या आहे, तद्वत् या जागृति अवस्थेमध्येही हे जगत अज्ञानाचे कार्य असल्यामुळे मिथ्या आहे. अशा रीतीने शरिर, इंद्रिये, प्राण, अहंकार इत्यादिक हे सर्व ज्यापेक्षा मिथ्या आहे, त्यापेक्षा अतिशांत, निर्दोष, द्वैतरहित, जे परब्रह्म ते तू आहेस. ॥२५२॥ ॥२५३॥

जाति, निती कुल आणि गोत्र याहून दूर असलेले, नाम, रूप, गुण आणि दोष यांनी रहित, देश, काल आणि विषय यांच्या सीमेबाहेर असलेले असे जे ब्रह्म ते तू आहेस. तस्मात तू या विषयाची भावना आपल्या ठिकाणी कर. ॥२५४॥

सर्वांच्या प्रीतीस पात्र, निर्मल ज्ञानरूप जे नेत्र त्याला मात्र दिसणारे, शुद्ध, चैतन्यघन अनादि असे जे ब्रह्मरूप वस्तु ते तू आहेस. तस्मात तू या विषयाची आपल्या ठिकाणी भावना कर. ॥२५५॥

क्षुधा, तृषा इत्यादिक ज्या सहा उर्मि त्यांचा संबंध जेथे नाही, योगिजनांनी जे आपल्या ह्रदयात चिंतलेले, इंद्रियादिक साधनांनी जे जाणता येत नाही, बुद्धीला जे कळत नाही, असे जे निर्दोष ब्रह्म ते तू आहेस. तस्मात तू या विषयाची आपल्या ठिकाणी भावना कर. ॥२५६॥

भ्रांतीने कल्पिलेले जे अंशमात्र जगत त्याचे जे अधिष्ठान होय, स्वताच्याच आश्रयाने असलेले अर्थात ज्याला दुसर्‍याचा आश्रय नको, कार्य आणि कारण याहून जे विलक्षण, ज्याला अवयव नाहीत, आणि ज्याला उपमा नाही, असे जे ब्रह्म ते तू आहेस. तस्मात् या विषयाची तू आपल्या ठिकाणी भावना कर. ॥२५७॥

जन्म, वृद्धि, परिणाम, अपक्षय आणि नाश या विकारांनी जे रहित आहे, जे अव्यय आहे, आणि जे जगाची उत्पत्ति, स्थिति व संहार यास कारण आहे, ते ब्रह्म तू आहेस. तस्मात तू या विषयाची आपल्या ठिकाणी भावना अक्र. ॥२५८॥

जेथे भेद नाही, ज्याचे लक्षण नश्वर नाही, तरंगरहित समुद्राप्रमाणे जे निश्चल आहे, जे नित्यमुक्त आहे आणि ज्याच्या स्वरूपाचा विभाग होत नाही, ते ब्रह्म तू आहेस. तस्मात तू या विषयाची आपल्या ठिकाणी भावना कर. ॥२५९॥

स्वतः एकटे असून अनेकांचे कारण, दुसरी कारणे दूर करण्यास कारणभूत आणि स्वतः कार्यकारणाहून विलक्षण असे जे ब्रह्म ते तू आहेस. तस्मात तू या विषयाची आपल्या ठिकाणी भावना कर. ॥२६०॥

विकल्परहित, सर्वापेक्षा मोठे, अविनाशी, जीव आणि ईश्वर याहून विलक्षण, नित्य अनश्वरसुखरूप आणि निरंजन असे जे परब्रह्म, ते तू आहेस. तस्मात तू या विषयाची आपल्या ठिकाणी भावना कर. ॥२६१॥

जे सद्रूप ब्रह्म सुरणीसारखे एक असता नाम, रूप आणि गुण या विकारांच्या रूपाने अनेक प्रकारचे भासते; पण स्वतः सदैव निर्विकार असते. ते ब्रह्म तू आहेस. तस्मात या विषयाची तू आपल्या ठिकाणी भावना कर. ॥२६२॥

जे प्रत्यग्‌रूप, एकरस, स्वस्वरूप हेच ज्याचे लक्षण, सच्चिदानंदरूप, अनंत आणि अव्यय असे आहे; आणि जे स्वतः परात्पर आहे; पण ज्याच्यापेक्षा पर कोणी नाही, असे जे ब्रह्म ते तू आहेस, तस्मात् तू या विषयाची आपल्या ठिकाणी भावना कर. ॥२६३॥

तू स्वतः आपल्या बुद्धीने प्रशस्त युक्तीच्या योगाने सांगितलेल्या विषयाचे आपल्या ठिकाणी चांगले मनन कर. म्हणजे तळहातावर असलेल्या पाण्याप्रमाणे तत्त्वज्ञान निःसंशय सुगम होईल. ॥२६४॥

जसा सैन्यात राजा असतो, तद्वत देहादिकांच्या समूहात ज्ञानस्वरूप आणि अतिशय शुद्धतत्त्वरूप असलेल्या आत्म्याला जाणून तू त्याचाच आश्रय कर आणि स्वस्वरूपाचे ठाई सदैव राहिलेला तू ब्रह्माचे ठाई सकल जगाचा लय कर. ॥२६५॥

कार्याहून आणि कारणाहून विलक्षण, सत्य पर आणि अद्वितीय असे ब्रह्म बुद्धिरूप गुहेमध्ये आहे. त्या ब्रह्मरूपाने जो पुरुष या गुहेमध्ये राहतो, त्याला पुन्हा या गुहेत प्रवेश करावा लागत नाही. ॥२६६॥

'मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, अशा प्रकारची जी ही अनादि बलवत्तर दृढ वासना, ती या जिवाला संसार प्राप्त होण्यास कारण आहे म्हणून प्रत्यग्दृष्टीच्या योगाने स्वस्वरूप राहणार्‍या पुरुषाने ब्रह्मतत्त्व जाणले असताही ती वासना प्रयत्नाने घालवावी. कारण, वासना कृश होत जाणे याला मुनी मुक्ती म्हणतात. ॥२६७॥

देह इंद्रिये इत्यादिक अनात्म वस्तूंचे ठाई जो 'मी आणि माझे' असा भाव याचे नाव अध्यास आहे. हा अध्यास ज्ञानी पुरुषाने स्वस्वरूपी राहून घालवावा. ॥२६८॥

बुद्धि आणि तिच्या वृत्ति यांचा साक्षी जो स्वरूपभूत प्रत्यगात्मा त्याला जाणून तोच (आत्मा) मी आहे.' अशा सद्‌वृत्तीने तू अनात्म्यावर असलेली आत्मबुद्धी सोडून दे. ॥२६९॥

लोकास अनुसरणे, देहास अनुसरणे व शास्त्रांस अनुसरणे सोडून देऊन तू स्वताचा अध्यास दूर कर. ॥२७०॥

लोकांवर, शास्त्रांवर आणि देहावर वासना असली तर जीवाला व्हावे तसे आत्मज्ञान होत नाही. ॥२७१॥

संसाररूप कारागृहातून सुटका होण्याची इच्छा करणार्‍या जीवाला वर सांगितलेल्या तीन खंबीर वासना पायांना जखडणार्‍या लोखंडी बेडीसारख्या आहेत, असे तत्त्वज्ञानी म्हणतात. तस्मात या तीन वासनांतून जो सुटला, तो मुक्तीस प्राप्त होतो. ॥२७२॥

जलादिकांच्या संपर्कापासुन उत्पन्न झालेला जो अतिशय दुर्गंध त्याच्या योगाने दबुन गेलेला मलयागराचा सुवास अतिशय घासण्याने वरचा दुर्गंध अगदी नाहीसा झाला म्हणजे जसा स्पष्ट समजण्यात येतो, तद्वत आत असलेल्या अनंत आणि अनिवार्य अशा दुष्टवासनारूप धुळीने अतिशय लिप्त झालेली परमात्म्याची वासना विवेकरूप अतिशय घर्षणाने अतिशय शुद्ध झाली म्हणजे चंदनाच्या सुवासाप्रमाणे स्पष्ट प्रतीतीस येते. ॥२७३॥ ॥२७४॥

अनात्म पदार्थांची जी वासना हीच जाळी त्यांनी झाकून टाकलेली आत्मवासना निरंतर आत्मनिष्ठेने त्या जाळ्यांचा नाश झाला असता स्वतःच स्पष्टपणे प्रकाशित होते. ॥२७५॥

मन जसे जसे प्रत्यगात्म्याचे ठाई स्थिर होते, तसे तसे ते बाह्य वासनांना सोडते. अशा रीतीने संपूर्ण वासना सुटतात तेव्हा स्वरूपाचा अनुभव प्रतिबंधरहित होतो. ॥२७६॥

योग्याचे मन निरंतर स्वस्वरूपीच राहून लयास जात असते, आणि (मन स्वस्वरूपी राहिल्यानेच) वासनांचा क्षय होतो. यासाठी तू आपल्या अध्यासाला दूर कर. ॥२७७॥

रज आणि तत्त्व या दोन गुणांनी तमोगुणाचा नाश होतो सत्वगुणाने रजोगुणाचा नाश होतो आणि शुद्धसत्त्वगुणानेसत्वगुणाचा नाश होतो; तस्मत शुद्धसत्वगुणाचा आश्रय करून तू आपल्या अध्यासाला दूर कर. ॥२७८॥

प्रारब्ध कर्मच शरीराला पोषीत आहे असा निर्धार करून तू स्थिर हो; आणि धैर्य करून प्रयत्नाने आपल्या अध्यासाला दूर कर. ॥२७९॥

'मी जीव नाही. तर परब्रह्म आहे' अशा प्रकारे अनात्म वस्तूंचा निषेध करून वासनेच्या वेगाने प्राप्त झालेला जो आपल्या अध्यास त्याला तू दूर कर. ॥२८०॥

श्रुति, युक्ति आणि स्वताचा अनुभव यांच्या योगाने आत्मा सर्वरूप आहे असे जाणून आपला जो अध्यास क्वचित आभासाने प्राप्त झालेला आहे, त्याला तू दूर कर. ॥२८१॥

आत्मा काही घेत नाही, आणि काही टाकत नाही, म्हणून त्याच्या आंगी किंचित देखील क्रिया नाही. अशा आत्म्याच्या ठाई एकनिष्ठ होऊन तू आपल्या अध्यासाला दूर कर. ॥२८२॥

'तत्वमसि' इत्यादिक वेदवाक्यांपासून उत्पन्न झालेला जो ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचा बोध त्याच्या योगाने 'ब्रह्मच आत्मा आहे' हा भाव दृढ होण्यासाठी तू आपल्या अध्यासाला दूर कर. ॥२८३॥

अहंपणा या देहात पूर्णपणे लय होईपर्यंत तत्पर होऊन तू सावधपणाने आपल्या अध्यासाला दूर कर. ॥२८४॥

सूज्ञा ! जीव आणि जग ही स्वप्नवत (मिथ्या) भाऊ लागेपर्यंत निरंतर तू आपल्या अध्यासाला दूर कर. ॥२८५॥

निद्रा, लोकवार्ता, शाब्दादिक विषय आणि (स्वरूपाचे) विस्मरण यांना कधीही सवड न देता तू आपल्या ठिकाणी आत्म्याचे चिंतन कर. ॥२८६॥

आईबापांच्या मलापासून उत्पन्न झालेले आणि मलमासांनी व्यापलेले अशा या शरीराला चांडालाप्रमाणे दूर सोडून देउन व ब्रह्मरुप होऊन तू कृतकृत्य हो. ॥२८७॥

हे मुने ! जसा घटकाशाचा महाकाशामध्ये लय होतो, त्याप्रमाणे आत्म्याचा (जीवाचा) परमात्म्याचे ठाई लय करून अखंड स्वरूपास प्राप्त झालेला तू निरंतर मौन धरून बैस. ॥२८८॥

तू सद्रूपाने, स्वयंप्रकाश आणि अधिष्ठानरुप ब्रह्म स्वतः होऊन पिंड आणि ब्रह्मांड या दोहोंनाही विष्ठेच्या पात्राप्रमाणे टाकून दे. ॥२८९॥

देहावर असलेली अहंबुद्धि सच्चिदानंदरूप परमात्म्याचे ठाई ठेवून आणि लिंगदेहाचा त्याग करून तू सदैव केवलस्वरूपाने रहा. ॥२९०॥

आरशात जसे नगर दिसते, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हा जगाचा आभास मात्र होतो, ते ब्रह्म मी आहे असे जाणून तू कृतकृत्य होशील. ॥२९१॥

जे आपले स्वरूपभूत ब्रह्म सत्य, पुरातन, चैतन्यरूप, अद्वितिय, आनंदरूप, निराकार आणि निष्क्रिय आहे, त्या ब्रह्मास प्राप्त होऊन या मिथ्याभूत शरीराला, बहुरूपी आपले घेतलेले सोंग टाकतो त्याप्रमाणे सोडून द्यावे. ॥२९२॥

दृश्य वस्तूम्हणून जितकी आहे ती सर्व अगदी खोटी आहे ती 'मी' या शब्दाचा खरा अर्थ (आत्मा) नव्हे. कारण, त्याच्या आंगी क्षणिकपणा दिसत आहे. अहंकारदिक जे क्षणिक पदार्थ आहेत, त्यांच्या आंगी 'मी सर्व जाणतो' अशा प्रकारचा अनुभव कोठून संभवेल ? ॥२९३॥

'मी' या पदाचा खरा अर्थ जो आत्मा तो अहंकारादिकांचा साक्षी आहे. कारण, सुशुप्तीमध्ये देखील त्याचे अस्तित्व नेहमी आढळते. 'आत्मा अजन्मा आणि नित्य आहे,' असे श्रुति कंठरवाने म्हणत आहे. तस्मात प्रत्यगात्मा म्हणून जो आहे तो कार्याहुन आणि कारणांहून वेगळा आहे, विकारी पदार्थांच्या सर्व विकारांना जाणणारा आहे, आणि स्वतः निरंतर निर्विकार आहे. मनोरथ स्वप्न आणि सुषुप्ति यामध्ये कार्याचा व कारणांचा खोटेपणा तर स्पष्टपणे वारंवार आढळात येतो. ॥२९४॥ ॥२९५॥

यासाठी, कालत्रयी ज्याचा नाश नाही, अशा अखंडबोधरूप आपल्या आत्म्याला जाणून तू या मांसपिंडरूप देहावरचा आणि या देहाचा अभिमान बाळगणार्‍या बुद्धिकल्पित अहंकारावरचा अभिमान सोडून दे आणि शांतीप्रत प्राप्त हो. ॥२९६॥

या ओल्या शवाला चिकटून राहिलेला जो कुल, गोत्र, नाम, रूप आणि आश्रम यांच्या वरचा अभिमान आणि लिंगदेहाचे कर्तृत्वादिक धर्म यांना सोडून देऊन तू अखंड सुखरूप हो. ॥२९७॥

पुरुषाला संसार प्राप्त होण्यास कारणभूत असे आढळात आलेले प्रतिबंध एकीकडे राहोत. पण त्या सर्वांचे एकच मूळ कोणते म्हणाल तर पहिलाच विकार अहंकार होय. ॥२९८॥

जोपर्यंत या दुष्ट अहंकाराशी आपला संबंध आहे तोपर्यंत मुक्तीची गोष्ट लेशमात्र देखील नको. कारण ती गोष्टच वेगळ्या प्रकारची आहे. ॥२९९॥

पुरुष अहंकाररूप पिशाच्याच्या हातून सुटला म्हणजे चंद्रासारखा निर्मल, पूर्ण, सदानंदरूप आणि स्वयंप्रकाश होऊन स्वरूपास प्राप्त होतो. ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP