विवेकचूडामणी - श्लोक संग्रह ५१-१००

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


मुले इत्यादिक लोक बापाला ऋणांतून मुक्त करणारे असतात; पण संसारबंधनांतून सोडविणारा स्वतांहून दुसरा कोणीही नाही. ॥५१॥

मस्तकावर ठेवलेल्या ओझ्याचे किंवा दुसर्‍या कशाचे दुःख इतर लोक (ओझे वगैरे हलके करून) दूर करू शकतात, पण क्षुधादिकांपासून झालेले दुःख स्वतावाचून कोणाच्यानेहि ते दूर करवत नाही. ॥५२॥

जो रोगी पथ्य करतो. आणि औषधसेवन करतो, त्याला आरोग्य प्राप्त झाल्याचे आढळात येते; पण रोग्याच्या ऐवजी दुसरा जर कोणी पथ्य व औषधसेवन करू लागेल तर त्याच्या योगाने रोग्याला आरोग्य प्राप्त झाल्याचे आढात नाही. ॥५३॥

आत्म्याचे स्वरूप अपरोक्ष ज्ञानरूप नेत्राने स्वतालाच समजण्यास शक्य आहे. पण ते पंडिताच्या द्वाराने प्रत्यक्ष जाणण्यास शक्य नाही. जसे चंद्राचे बिंब स्वताच्या नेत्रांनीच प्रत्यक्ष दिसू शकेल, पण इतर लोकांच्या द्वाराने ते आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकेल का ? ॥५४॥

शेकडो कोटी कल्प गेले तरी; अविद्या, काम, कर्म इत्यादिक पाशांच्या बन्धाला सोडविण्यास स्वतावाचून दुसरा कोण समर्थ होईल ? ॥५५॥

योग, सांख्य, कर्म, अथवा विद्या यांच्या योगाने मोक्ष होत नाही. तर जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्यज्ञानानेच मोक्ष होतो. अन्यथा नाही. ॥५६॥

सतारीचा सुंदर आकार व तिच्या तारा छेडण्यामध्ये कुशलता, हे सर्व जनरंजनमात्र आहे; यापासून काही मोक्षप्राप्ति होऊ शकणार नाही ! ॥५७॥

तद्वत् शब्दांची केवळ झारीच अशी विद्वानांची वैखरी वाणी, त्यांचे शास्त्राची परिस्फुटता करण्याचे कौशल, तशीच त्यांची विद्वत्ता हे सर्व भोगासाठी आहे; मोक्षासाठी नाही. ॥५८॥

आत्म्याचे स्वरूप जाणले नाही तर केलेला शास्त्राभ्यास फोल होय. तद्वत् आत्मस्वरूप जाणल्यानंतर शास्त्राभ्यास फोल होय. ॥५९॥

शब्दजाल हे एक मोठे जंगल आहे. ते चित्ताला भांबावून सोडण्यास मात्र कारण आहे. यासाठी (शब्दजालात न पडता) प्रयत्नाने तत्त्वज्ञानापासून आत्मतत्त्व जाणावे. ॥६०॥

अज्ञानरूप सर्पाने ज्याला दंष केला अशा मनुष्याला एका ब्रह्मज्ञानरूप औषधावाचून; वेद, शास्त्रें, मंत्र आणि लौकिक औषधे यांच्या योगाने काय होणार आहे ? काहीही होणार नाही. ॥६१॥

औषध प्याल्यावाचून केवळ औषधाचे नाव घेतल्याने रोग जसा जात नाही तद्वत् अपरोक्ष ज्ञान झाल्यावाचून केवळ 'ब्रह्म ब्रह्म' असा जप केल्याने जीव मुक्त होत नाही. ॥६२॥

(अनात्मज्ञानाने) दृश्य पदार्थांचा लय केल्यावाचून व आत्मतत्त्व जाणल्यावाचून; केवळ कंठशोष हेच मात्र ज्याचे फल अशा पोकळ शब्दांनी मनुष्यांना मोक्ष कोठून होणार ? व्हावयाचा नाही. ॥६३॥

शत्रूंचा नायनाट केल्यावाचून व सकल पृथ्वीचे ऐश्वर्य मिळविल्यावाचून केवळ 'मी राजा मी राजा' असा घोष केल्याने कोणी राजा होण्यास पात्र होत नाही. ॥६४॥

भूमीत पुरून ठेवलेले द्रव्य काढण्याला; प्रामाणिक मनुष्याने सांगण्याची, खणण्याची, तशीच त्यावर असलेली शिळा वगैरे एकीकडे करण्याची आणि ते हस्तगत करून घेण्याची जशी आवश्यकता आहे. केवळ बाहेर पुष्कळ ओरड केल्याने ते जसे निघत नाही, तद्वत मायेने आणि तिच्या कार्याने झाकलेले युद्ध आत्मतत्त्व परोक्ष ब्रह्मज्ञान्याला उपदेश, मनन, ध्यान इत्यादिक उपायांनी प्राप्त होते. कुतर्कांनी होत नाही. ॥६५॥

तस्मात्, रोगादिक जाण्याविषयी जसा स्वतःच प्रयत्न केला पाहिजे, तद्वत भवबंधनातून सुटका होण्यासाठी शहाण्या मनुष्यांनी स्वतःच सर्वथा प्रयत्न केला पाहिजे. ॥६६॥

जो तू आता प्रश्न केलास तो सर्वोत्कृष्ट आहे; शास्त्रज्ञांना मान्य आहे; सूत्रभूत आहे; त्याचे उत्तर गुप्त आहे; आणि तो मुमुक्षुजनांनी जाणण्याजोगा आहे. ॥६७॥

सुज्ञा ! या प्रश्नाचे जे मी उत्तर सांगतो; ते तू चित्त देऊन श्रवण कर, याचे श्रवण केल्याने तू खरोखर भवबंधनातून मुक्त होशील. ॥६८॥

अनित्य वस्तूंच्या ठिकाणी वैरग्य हे मोक्षाचे पहिले कारण सांगतात. आणि त्या मागून शम, दम, तितिक्षा व चिकटलेल्या सकल कर्मांचा. अत्यंत त्याग ही मोक्षाची साधने सांगतात. ॥६९॥

तदनंतर वेदान्तश्रवण, श्रवण केलेल्याचे मन आणि मध्ये खंड न पाडता एकसारखे पुष्कळ काळपर्यंत निदिद्यासन ही मुमुक्षूला मोक्षाची साधने सांगितली आहेत. परिपूर्ण निदिध्यासन झाल्यानंतर निर्विकल्प अशा परब्रह्म स्वरूपास प्राप्त होऊन ज्ञानी या लोकीच मोक्षसुखाला पावतो ॥७०॥

आता तुला जे आत्मा आणि अनात्मा यांचे विवेचन समजून घ्यायचे ते मी उत्तम रीतीने सांगतो. ते श्रवण करून तू आपल्या चित्तात ठसवून घे. ॥७१॥

मी आणि माझे अशा नात्याने प्रसिद्ध असे जे हे मोहाचे स्थानभूत शरीर ते मज्जा, अस्थि, मेद, मांस, रक्त, चर्म आणि त्वचा या नावांच्या धातूंनी वेढले आहे, आणि पाय, मांड्या, उर, बाहु, पाठ आणि मस्तक या अंगांनी व उपांगांनी युक्त आहे. या शरीराला विद्वान् लोक स्थूल शरीर म्हणतात ॥७२॥

आकाश, वायु, अग्नि, जल आणि भूमि ही पाच सूक्ष्म भूते आहेत. ती परस्परांच्या अंशांनी युक्त होऊन स्थूल होतात. आणि स्थूल देहाच्या घटनेस कारण होतात. पाच भूतांच्या ज्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा त्यांना विषय म्हणतात. त्या भोक्त्याला सुख देतात. ॥७३॥॥७४॥

जे मूढ पुरुष, तोडण्यास अतिशय कठिण अशा राग-रूप जबरदस्त फासाने या विषयांचे ठाइ बद्ध झालेले असतात, ते स्वताचे कर्म हाच एक दूत त्याने झपाट्याने नेले होत्साते अतिशय अधोगतीस आणि ऊर्ध्वगतीस जात येत असतात. ॥७५॥

स्वताच्या गुणांनी बांधलेले हरिण, हत्ती, पतंग, मत्स्य आणि भुंगा हे पाच प्राणी शब्दादिक पाच विषयांपैकी अनुक्रमे एकेक विषयावर आसक्त झाल्यामुले मरण पावतात. तर मग पाचा विषयांचे ठाई आसक्त झालेला मनुष्यप्राणी विषयांच्या पाई मरणप्राय दुःख पावेल यात काय सांगायचे आहे ॥७६॥

कृष्ण सर्पाच्या विषापेक्षाही विषय आपल्या आंगच्या दोषाने फार जलाल आहे. असे म्हणण्याचे कारण, कृष्णसर्पाचे विष खाणाराची मात्र हानि करते; पण विषय तर आपल्याकडे नुसती दृष्टि टाकली की लगेच त्याला पछाडतो ॥७७॥

अतिशय प्रयासाने सुद्धा सुटायचा नाही, अशा विषयवासनारूप जबरदस्त पाशातून जो मनुष्य मोकळा झाला. तोच मोक्षास प्राप्त होऊ शकतो. बाकी, सहा शास्त्रे जाणणारा असला तरी देखील मोक्षास प्राप्त होऊ शकत नाही. ॥७८॥

(ठसलेले नसल्यामुळे) दिखाऊ मात्र वैराग्य ज्यांच्या आंगी असते असे जे मुमुक्षुजन संसार समुद्राच्या पैलतीरास जाण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यांना, विषयांची आशा हीच सुसर झपाट्याने गळ्याशी धरून आणि परतवून मध्येच म्हणजे भर संसारसमुद्रात बुडविते. ॥७९॥

विषयांची आशा हीच सुसर तिला ज्याने दृढ वैराग्यरूप तरवारीने मारले, तो निर्विघ्नपणे संसारसमुद्राच्या पार जातो. ॥८०॥

जो मलिनबुद्धीचा पुरुष विषयरूप खडतर मार्गांनी जात असतो, त्याच्यावर पावलोपावली मृत्यु चाल करतो असे समजतसेच, जो पुरुष आपले हित इच्छिणारा आणि सज्जन अशा गुरूचे सांगणे आणि स्वताची युक्ति या सुमार्गाने जात असतो, त्याला अवश्य फलाची सिद्धि होते, असेच समज. ॥८१॥

तुला जर मोक्षाची इच्छा असेल तर तू विषयांना विषाप्रमाणे अगदी दूर एकीकडे टाक आणि संतोष, दया, क्षमा, सरळपणा, शम आणि दम यांचे अमृताप्रमाणे नित्य आदराने सेवन कर. ॥८२॥

अनादि अविद्येने केलेले जे बंधन, त्यातून सुटका करून घेणे हे जे आपले अवश्य कर्तव्य ते एका बाजूला ठेवून जो पुरुष कोल्ह्याकुतर्‍याच्या भक्ष्यस्थानी पडणार्‍या या देहाचे पोषण करण्यात मात्र गुंतलेला असतो, तो स्वताच आपल्याला दुःखी करतो. ॥८३॥

जो मनुष्य शरीरपोषणावर लक्ष ठेऊन आत्म्याला जाणू इच्छितो, तो ' (तरून जाण्याच्या उपयोई पडणारे) हे एक लाकूड आहे' अशा भ्रमाने सुसरीला गच्च आवळून धरून नदीपार जाऊ इच्छितो. ॥८४॥

शरीरादिकांवर जो मोह तोच मुमुक्षु मनुष्याला महामृत्यु होय. त्या मोहाला ज्याने जिंकले तोच मुक्तिपद पावण्यास पात्र होतो. ॥८५॥

शरीर, स्त्री, पुत्र इत्यादिकंचे थाई जो मोह हाच एक महामृत्यु, त्याचा समूळ नाश कर, कारण, त्या मोहाला जिंकून मुनि विष्णूंचे जे प्रसिद्ध पद (मोक्ष) त्याप्रत प्राप्त होतात. ॥८६॥

हे स्थूल शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायु, मेद, मज्जा आणि अस्थि यांनी वेढलेले व मलमूत्रांनी भरलेले असल्यामुळे निंद्य आहे. ॥८७॥

आत्म्याचे सुखदुःख भोगण्याचे ठिकाण असे हे स्थूल शरीर पंचीकृत स्थूलभूतांपासून प्राक्तन कर्माने उत्पन्न झाले, जागृति ही त्या स्थूल शरीराची अवस्था आहे. कारण, त्या अवस्थेमध्ये स्थूल विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान होत असते. ॥८८॥

जीव, बाह्य जी श्रोत्रादिक इंद्रिये त्यांच्या द्वारा माळा चंदन, स्त्रिया इत्यादिक नानाप्रकारच्या स्थूल पदार्थांचा उपभोग या स्थूल शरीराच्या रूपाने स्वतः घेत असतो, म्हणून जागृती अवस्थेत स्थूल शरीर असते, अशी या शरीराच्या संबंधाने प्रसिद्धी आहे. ॥८९॥

जसे गृहस्थाश्रम्याचे घर, तसे हे स्थूल शरीर आहे असे समज, कारण, पुरुषाचा सर्व बाह्य प्रपंच या स्थूल देहावर अवलंबून आहे ॥९०॥

उत्पत्ति, वृद्धापकाळ, मरण, इत्यादिक धर्म, स्थूलपणा, कृशता, बाल्यादिक याप्रमाणे बहुत प्रकारच्या अवस्था, वर्णाश्रमादिकासंबंधी पुष्कळ प्रकारचे नियम, अनेक प्रकारचे रोग, पूजा, अवमान, बहुमान इत्यादिक प्रकार स्थूल देहाला लागू आहेत ॥९१॥

श्रोत्र, त्वचा, चक्षु, घ्राण आणि रसन ही शब्दादिक विषयांना जाणतात, म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात वाणी, हात पाय, गुद आणि उपस्थ ही भाषणादिक कर्मांचे ठाई प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना कर्मेंद्रिये म्हणतात ॥९२॥

एकच अंतःकरण आपल्या (अंतःकरणाच्या) भिन्न भिन्न वृत्ति असल्यामुळे मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त अशा नावांनी म्हटले जाते, संकल्प, विकल्प इत्यादिक वृत्तींच्या योगाने अंतःकरणाला मन म्हणतात, 'अमुक पदार्थ आहे,' असा निश्चय करणे या वृत्तीच्या योगाने अंतःकरणाला बुद्धि म्हणतात, या शरीरवर 'मी मी' असा अभिमान करणें या वृत्तीच्या योगाने अंतःकरणाला अहंकार म्हणतात, आणि स्वतांच्या विषयावर अनुसंधान ठेवणे या वृत्तीच्या योगाने त्याला चित्त म्हणतात. ॥९३॥॥९४॥

जसे सुवर्ण अथवा उदक आपले भिन्न भिन्न विकार (परिणाम) असल्यामुळे भिन्न भिन्न नावांनी ओळखले जाते, तद्वत हा प्राण स्वताच्या भिन्न भिन्न वृत्तीमुळे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असा पाच प्रकारचा गणला आहे. ॥९५॥

वाणी आदिक पाच कर्मेंद्रिये, श्रोत्रादिक पाच ज्ञानेंद्रिये, प्राणादिक पाच प्राण, आकाशादिक पाच भूते, बुद्ध्यादिक चार अंतःकरणे, अविद्या, काम आणी कर्म या आठ नगरींना सूक्ष्म शरीर म्हणतात. ॥९६॥

श्रवण कर, ज्यांचे पंचीकरण झाले नाही अशा पंचभूतांपासून उत्पन्न झालेले, वासनांनी युक्त, कर्मफलांचा भोग देणारे, असे हे सूक्ष्म किंवा लिंग शरीर स्वताच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे आत्म्याला अनादि उपाधिरुप आहे. ॥९७॥

स्वप्न ही या लिंगशरीराची वेगळी (स्वतंत्र) अवस्था होय, कारण, या अवस्थेत लिंगशरीर मात्र एकटे उरलेले असते. जागृति अवस्थेच्या वेळच्या नानाप्रकारच्या वासनांनी कर्ता, कार्य इत्यदिक रूपाला प्राप्त होऊन या अवस्थेत बुद्धि आपले काम करीत असते. या अवस्थेत बुद्धि मात्र ज्याला उपाधि आहे आणि सर्वांचा साक्षी असा हा परमात्मा स्वतः शोभत असतो, आणि बुद्धीने केलेल्या कर्मांच्या लेशाने देखील लिप्त होत नाही. ज्यापेक्षा तो परमात्मा असंग आहे म्हणूनच तो उपाधीने केलेल्या कर्मांनी किंचित देखील लिप्त होत नाही. ॥९८॥॥९९॥

सुताराला आपले सर्व काम करण्याचे साधन जसे वाकस वगैरे असते, त्याप्रमाणे चैतन्यस्वरूपी आत्म्याला सर्व व्यापार करण्याचे साधन असे लिंग शरीर आहे. म्हणूनच आत्मा हा स्वतः असंग आहे. ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP