मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मारुतिला राघव बोले ॥ वत्...

मानसगीत सरोवर - मारुतिला राघव बोले ॥ वत्...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


मारुतिला राघव बोले ॥ वत्सा त्वा अनुचित केले ॥धृ०॥

कौसल्या जैसी माता ॥ तैशा मज सर्वहि कांता ॥

हे ठाउक तुज हनुमंता ॥

लाविली कैशि मज चिंता ॥चाल॥

मत्प्राण शत्रु जरि घेते ॥

तरि वत्सा सार्थक होते ॥

नरतनू पुन्हा नच येते ॥

कैसे त्वा अघटित केले ॥मा०॥१॥

तरि तुवा युक्ति योजावी ॥

मत्कीर्ती किमपि न जावी ॥

तव वाणि कधि न भंगावी ॥

विधुसेना रुष्ट न व्हावी ॥चाल॥

मग मारुति जाउन सांगे ॥

म्हणे राम येतो अनुरागे ॥

करि तयार मंचक जागे ॥

चंद्रसेनामुख प्रफुल्लित झाले ॥मा०॥२॥

चाल-अक्रूराची ॥

मग ऐकुनिया पवन-सुताच्या बोला ॥

आनंद तिला बहु झाला ॥

अजि येईल तो दाशरथी मम माहाला ॥

भूषवी बहुत देहाला ॥

अवलोकिन मी प्रेमभरे रामाला

कंठात घालुनी माळा ॥चाल॥

गुंफिला फुलांनी दाट गे ॥

पर्यकी बहु थाट गे ॥

पाहे श्रीप्रभुची वाट गे ॥

रघुतिलक तदा वायुसुतासह आला ॥आनंद०॥३॥

हेमचवरंगी बसउनि श्री रघुराया ॥

करि पुजन धरुनि दृढ पाया ॥

आज कृतार्थ मी झाले पति मारुनिया ॥

चल शयनि केलि मउ शय्या ॥चाल॥

हार गळा घालि करि आरति हो ॥

कोमल पद मंचकावरती हो ॥

ठेविता भ्रमर ते पळती हो ॥

कडकडुनि तळी मोडुन मंचक पडला ॥

अपशकुन प्रभुला घडला ॥मग०॥४॥

येतो आम्हि आता लोभ असू दे ॥

मजवरती रोष नसू दे ॥

तव मानिनि गे अंतरि प्रेम वसू दे ॥

मन्मूर्ति ह्रदयि ठसू दे ॥चाल॥

हे योग्य नसे तुज रामा रे ॥

नाहि पूर्ण केले रतिकामा रे ॥

देहत्याग करिन घनशामा रे ॥

हा काळ कसा अवचित मजवरि फिरला ॥

मत्प्राणपती अंतरला ॥मग०॥५॥

तुजसाठी मी मारुन प्राणपतीला ॥

गुपितार्थ मनींचा कथिला ॥

तप-सामर्थ्ये पाडिन सूर्य क्षितीला ॥

देते शाप अता मारुतिला ॥चाल॥

म्हणे राम ऐक महिकांते ग ॥

द्वापार युगी गुणवंते ग ॥

पट्टराणि करिन मी तूते ग ॥

सत्यभामा तू होशिल आवडति मजला ॥

नमि कृष्णा प्रभुपदकमला ॥मग०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP