मानसगीत सरोवर - कृपा करूनी पुनित करावे म...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


दत्ताचे गाणे

कृपा करूनी पुनित करावे मजला श्री दत्ता ॥

काया वाचा मन भावाने प्रार्थितसे दुहिता ॥कृ०॥धृ०॥

पुण्यवान बहु वाडिक्षेत्र ते कृष्णातिरवासी

औदुंबरतरुतळि गुरु बसले भासे मज काशी ॥

पायि पादुका घालुनि जाती संगमि स्नानासी ॥

भस्मोध्दूलन करुनि नेसले भगव्या वसनासी ॥

रुद्राक्षाच्या घालुनि माळा यज्ञोपवितासी ॥

धारण करुनी रात्रंदिन तो रक्षित भक्तांसी ॥

जोडुनि पाणी लववुनि चरणी ठेवितसे माथा ॥

भवसागर हा तरुन कशी मी जाऊ तरी आता ॥काया०॥१॥

दत्तदर्शना आलि उत्तरेहुन कृष्णाबाई ॥

नमुनि गुरूला वळुन दक्षिणे पूर्वेकडे जाई ॥

सुजन मिळुनी प्रातःस्नाना जाती लवलाही ॥

पुनित होउनी जलघट भरुनी ओतिति गुरुपायी ॥

पंचामृतादि पुजा करूनी धूपारति होई ॥

बसुनि विमानी बघती सुरवर ऐका नवलाई ॥

कृपाकटाक्षे अवलोकी गुरु कनवाळू दाता ॥

भक्तासाठी सदा तिष्ठतो जनजननी-ताता ॥काया०॥२॥

प्रातःकाली चंदन उटि ती चर्चुनी अंगाला ॥

शमी तुळसिदळ बिल्वपत्र ते वाहति सुमनाला ॥

रुद्राक्षाच्या कुणि स्फटिकाच्या कुणी तुळसिमाळा ॥

मोति पोवळी पुत्रवंतिच्या घेउनि नर अबला ॥

प्रथमपासुनी लक्ष घालिती प्रदक्षिणा गुरुला ॥

कर्पुरारती करुन घालती लोटांगण घाला ॥

मिठाइमेवा पायस केळी त्वरित आणा आता ॥

नैवेद्यासी अर्पुनि विनवा भक्षा गुरुदत्ता ॥काया०॥३॥

जप करिती कुणि तप करिती कुणि कुणि ध्याने धरती ॥

कुणि गुरुलीला श्रवण कराया लगबग जाताती ॥

कुणी वाचिती कुणी ऐकती कुणि गीते गाती ॥

तीर्थप्रसादा सेवुनिया कुणि सदनाप्रति जाती ॥

जान्हविसंनिध स्त्रिया येउनी हळदकुंकु देती ॥

थोर थोर बहु साधु संत ते वंदुनि विनवीती॥

पतितपावना दीनदयाघन करुणा करि आता ॥

विनवी कृष्णा दिनरजनी तुज शांतवि मम चित्ता ॥काया०॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T20:21:58.0830000