कहाणी सोमवारची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं, रहावयास गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ती रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, 'बाई, बाई कुठं जाता ? महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहातों, त्यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलंबाळं होतात, नावडतीं माणसं आवडतीं होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनीं हिला विचारलं, तूं कोणाची कोण ? मी राजाची सून, तुमचेबरोबर येतें ! त्यांचेबरोबर देवळांत गेली.

नागकन्या, देवकन्या वसा वसूं लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो वसा वसता ? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं ? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं. दोन बेलाची पानं घ्यावीं. मनोभावें पूजा करावी. हातीं तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरादेवा, सासू-सासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा ! असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊ नये, दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पांच वर्षं करावा. पहिल्या सोमवारी तांदुळ, दुसर्‍यास तीळ, तिसर्‍यास मूग, चौथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामुठीकरितां घेत जावे.

पहिल्या सोमवारीं सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं आणि दुसर्‍या सोमवारीं हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतनं सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावं पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासू-सासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा ! असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सासर्‍यानं विचारलं; तुझा देव कुठं आहे ? नावडतीनं जबाब दिला, माझ देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत,साप, वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पुजेचं सामान घेतलं, देवाला जाऊं लागली. घरची माणसं मागं चाललीं. नावडते, तुझा देव दाखव, म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता, तिला कांहीं वाटलं नाहीं. ह्यांना कांटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्‍नजडिताचे खांब झाले. हंड्या, गलासं लागलीं. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करूं लागली. गंध-फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा ! असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं. देवळाकडे आणायला गेला तों तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्याने सुनेला विचारलं हें असं कसं झालं ? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला, म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हां होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP