लावणी - पंडित शाहणा आला

अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली.


पंडित शाहणा आला मनामधीं उलटा सुलटा आला जमाना । पाऊस म्हणतो कर्मेना । धरत्रीनें पीक टाकिलें अंतपारी दिसेना ॥ध्रु०॥

दुनयामधिं बंड मातलें जो बळी तो कानपिळी । सुलतानी अस्मानी राव ऐका एकच धुमाळी ।

मोमणानें माग टाकले शिपाई झाले साळी माळी । ज्या योनीला जन्म घेतला त्याची उद्धरली नाहीं कुळी ।

आपलें सांडी देवदंडी त्याला पुर्वेला येईना । आप आपल्यामधीं मर्जी ठेविती मोक्षपदाशीं मिळेना । पंडित० ॥१॥

कळावांतणीची झाली राळ बटकी झाल्या शिरोमणी । दे साळू वाण्याची घाण केली या मारवाडयांनीं ।

गुरुवांचें संधान बुडविलें महार या वाजंत्र्यांनीं । पाटीलपांडे घरीं राहिले पट्‍टी केली कुणब्यांनीं ।

पहा पासरी कितीक ध्यावी सवा हात खचली धरणी । पाऊस अंतरीं शाहाणा मग तो जाऊन बैसला कोकणीं ।

बाबन हकांचा महारधनी याला पुरविल्या येईना । भोपळ्यामधीं सत्व राहिलें तो पाण्यांमध्यें बुडेना । पंडित० ॥२॥

लेक म्हणे बापाला म्हातारा झाला याची शुद्ध गेली । सुन सासुची मर्जी ठेविना फिरुन बोलू ती लागली ।

शिष्य झाले मस्त गुरुची विद्या गुरुवर फिरली । गोरसाला कोणी पुसेना दारु महाग विकू लागली ।

पतिव्रता ही उपाशी मरती तिला मिळेना सावली । चंचल नार बांधीत असे नवें घर एक दरसालीं ।

ब्राह्मण जोशी लटके यांचा ठोका येईना । अनंतफंदी म्हणे गडयांनों ऐकुनि घ्यावे सुज्ञाना ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP