लावणी - जमाना आला उफराटा

अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली.


जमाना आला उफराटा । सुन सासूला लावी बट्टा ॥धृ०॥

लेक बापाशीं लावी आवभाषी । शिष्य गांजितो गुरुशीं । जावई सासूला म्हणतो तूं काशी ।

लवंडून देतो मातेशीं ॥चाल॥ मेहुणीचा चालवी लाड । बहिणीला म्हणे तूं रांड । चाल निघ घरांतुन द्वाड ।

तुझी नाहींग मजला चाड । माझी बायकोच मजला गोड । नाहीं सासर्‍याची ठेवली भीड ।

बेटा लबाड पाहून बापाला लटका धरी ताठा । जमाना आला आला उफराटा ॥सून० ॥१॥

धन्यावर चाकर झाले फिखान । उलटून पडले बेइमान । सावकाराशीं कुळ गेलें बदलून ।

करीती मुदत लबाडीनें ॥चाल॥ अशी कलियुगाची रीत । सोय नाहीं दरबारांत । खर्‍याचें खोटें होत ।

पाटील हकिमाचें मत । कीं बुडवावी रयत । खासदार झाले राऊत । शिपाई हाकिती आऊत ।

झाले भवानीचे भूत । जोशी झाले पंडीत । भट करी वटकिशीं मोहोबत । दप्तर पडलें सांदींत ।

आतां तरी पाहे अक्कल धरी भटा । जमाना आला आला उफराटा ॥सुन० ॥२॥

मारवाडयानें दुनया नाडली फार । करिती भलताच व्यापार । साळी कोष्‍टी शिंपी सोनार ।

हे तो झाले सरदार ॥चाल॥ असा कलीचा वारा । गरती जाती परदारां । दोहीं कुळीं पाडिती आंधारा ।

तेलाचा उणा पावशेरां । तुटपुंज्या करितो तोरा । फुगून बसला पीसारा । ताथावर हाणीतील वारा ।

तो या काळा मधें बरा । फंदी म्हणे अक्‍कल धरा । मज गव्हरा । दे कलगीवर सोटा । जमाना आला० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP