मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संत तुकाराम गाथा|
अभंग संग्रह ३१०१ ते ३२००

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ३१०१ ते ३२००

तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य.

Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.


३१०१

जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥

येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥

पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥२॥

तुका म्हणे ज्यावें । सत्य कीर्तीनें बरवें ॥३॥

३१०२

सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥

नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥

रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥

तुका म्हणे कीर्ति वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥

३१०३

तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरि लागे छंदु हरिनामें ॥१॥

येर कर्म धर्म करितां ये कळी । माजी तरला बळी कोण सांगा ॥ध्रु.॥

न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥२॥

न साधवे योग न करवे वैराग्य । साधा भक्तिभाग्य संतसंगें ॥३॥

नव्हे अनुष्ठान न कळे ब्रम्हज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥

तुका म्हणे वर्म दावियेलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥५॥

३१०४

लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥१॥

त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥

कोटिगोहत्यापातक । त्यासी घडेल निष्टंक ॥२॥

मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥

तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥

३१०५

देह जाईंल जाईंल । यासी काळ बा खाईंल ॥१॥

कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥

लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥

शरीरसंबंधाचें नातें । भोरड्या बुडविती सेतातें ॥३॥

अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढें दगा ॥४॥

३१०६

मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥

ऐसें ठावें जालें मज बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥

माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥२॥

अझुनि कां नये तुम्हासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥३॥

तुका म्हणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥४॥

३१०७

कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥

तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता जालें जिणें ॥ध्रु.॥

पतितपावन राहिलों या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥

आतां कोण करी माझा अंगीकार । कळलें निष्ठ‍ जालासी तूं ॥३॥

तुका म्हणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास तुजसाटीं ॥४॥

३१०८

तरि कां मागें वांयां कीर्ती वाढविली । जनांत आपुली ब्रिदावळी ॥१॥

साच करितां आतां फिरसी माघारा । ठायींचें दातारा नेणवेचि ॥ध्रु.॥

संतांसी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यांसी सांगईंन ॥२॥

घेईंन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥३॥

तुका म्हणे आधीं राहिलों मरोनि । तूं कां होसी धनी निमित्याचा ॥४॥

३१०९

आम्ही तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥१॥

तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥

तुझें नाम कंठीं । आम्हां संसार आटी ॥२॥

तुका म्हणे काळ । करी आम्हांसी विटाळ ॥३॥

३११०

लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥१॥

आम्ही नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥

बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥२॥

तुका म्हणे देवा । रोकडी हे मोडे सेवा ॥३॥

३१११

आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय ॥१॥

परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥

समाधान त्याचें तो चि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥२॥

तुका म्हणे होय पीडा ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥३॥

३११२

भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥

तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥

जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥

तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥

३११३

सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥

न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥

घातला तो आशा । मोहोजाळें गळां फासा ॥२॥

सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥३॥

करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥४॥

लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥

तुका म्हणे याचें । नांव सोंवळें साचें ॥६॥

३११४

तुज करितां होती ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥१॥

परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥

उलंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥२॥

पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥

अवघें हेळामात्रें हरि । मुक्त करी ब्रम्हांड ॥४॥

तुका म्हणे खेळे लीळा । पाहे वेगळा व्यापूनि ॥५॥

३११५

पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥

पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥

खोलीं पडे ओली बीज । तरीं च हाता लागे निज ॥२॥

तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥३॥

३११६

करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥

अहंकार आड । आम्हां जगासी हा नाड ॥ध्रु.॥

येथें भुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥

तुका म्हणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥

३११७

घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥

तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आम्हां तारूं ॥ध्रु.॥

रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥

बुडत्यासाटीं उडी । घालितील कां हे जोडी ॥३॥

सारितील कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥४॥

तुका म्हणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥

३११८

नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥

अनुभव येथें व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढें ॥ध्रु.॥

निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥२॥

तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम ॥३॥

३११९

न करि त्याचें गांढेपण । नारायण सद्धि उभा ॥१॥

भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥ध्रु.॥

याचे सोईं पाउल वेचे । मग कैचे आडथळे ॥२॥

तुका म्हणे खरें खोटें । न म्हणे मोटें लहान ॥३॥

३१२०

रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥

वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥

भ्रमणांच्या मोडीं वाटा । न भरें फाटा आडरानें ॥२॥

तुका म्हणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥३॥

३१२१

पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें ॥१॥

आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां हो ॥ध्रु.॥

कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥२॥

कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरिली ॥३॥

किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥४॥

तुका म्हणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥५॥

३१२२

देव जाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥

बरवें जालें बरवें जालें । चत्ति धालें महालाभें ॥ध्रु.॥

दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥

तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वाहाळासी ॥३॥

३१२३

बहुत प्रकार परि ते गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी ॥१॥

सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥

घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥२॥

तुका म्हणे रस राहिला वचनीं । तो चि पडताळूनि सेवीतसें ॥३॥

३१२४

आम्हां सोइरे हरिजन । जनीं भाग्य निकंचन ॥१॥

ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥

भुके तान्हे चत्तिीं । सदा देव आठविती ॥२॥

तुका म्हणे धन । ज्याचें वत्ति नारायण ॥३॥

३१२५

म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥

खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा ॥ध्रु.॥

आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥

तुका म्हणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुम्हां ठावा ॥३॥

३१२६

जळालें तें बाहए सोंग । अंतर व्यंग पडिलिया ॥१॥

कारण तें अंतरलें । वाइट भलें म्हणवितां ॥ध्रु.॥

तांतडीनें नासी । तांतडीनें च संतोषी ॥२॥

तुका म्हणे धीर । नाहीं बुद्धि एक स्थिर ॥३॥

३१२७

चत्तिाचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥

अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥

ब्रम्हांड कवळे आठवणेसाटीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥२॥

तुका म्हणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न सुटतां॥३॥

३१२८

दुखवलें चत्ति आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥

कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥

आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥२॥

तुका म्हणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥३॥

३१२९

धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥

परारब्धगति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे ॥ध्रु.॥

आणीक रोगांचीं नांवें घेऊं किती । अखंड असती जडोनियां ॥२॥

तुका म्हणे नष्ट संचिताचें दान । पावे खातां पण सुख नेदी ॥३॥

३१३०

भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥

येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥

भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥२॥

तुका म्हणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥३॥

३१३१

जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चत्ति ठेवीन मी ॥१॥

जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥

जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥२॥

विठ्ठलासी जिहीं दिला सर्व भाव । त्यांच्या पायीं ठाव मागईंन ॥३॥

तुका म्हणे रज होईंन चरणींचा । म्हणविती त्यांचा हरिचे दास ॥४॥

३१३२

काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥

निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥

तुका म्हणे भावभक्ति हे कारण । नागवी भूषण दंभ तो चि ॥३॥

३१३३

देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥१॥

मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥

गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥२॥

तुका म्हणे संग । केला दुरि नव्हे मग॥३॥

३१३४

माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चत्तिीं पांडुरंगा ॥१॥

भांडवल गांठी आलें सपुरतें । समाधान चत्तिें मानियेलें ॥ध्रु.॥

उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा ॥२॥

तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं म्हुण ॥३॥

३१३५

एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥

म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥

बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥२॥

तुका म्हणे आगा जीवांच्या जीवना । तूं चि नारायणा साक्षी माझा ॥३॥

३१३६

राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥

करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥

देईंन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥२॥

तुका म्हणे देवा । साटी करोनियां जीवा ॥३॥

३१३७

तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥

स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला कळिकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥

अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥२॥

तुका म्हणे आम्हां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥३॥

३१३८

मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई वळिवतें ॥१॥

काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥

अहंकारास उरलें काईं । पांचांठायीं हें वांटे ॥२॥

तुका म्हणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥३॥

३१३९

आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥

तें तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसान ॥ध्रु.॥

अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥२॥

तुका म्हणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ति मागें ॥३॥

३१४०

आजिचें हें मज तुम्हीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥

आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥

तुका म्हणे तुम्हीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥

३१४१

स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥

आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥

इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥

तुका म्हणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाटीं ॥३॥

३१४२

लोह कफ गारा सद्धि हे सामुग्री । अग्नि टणत्कारी दिसों येतो ॥१॥

सांगावें तें काईं सांगावें तें काईं । चत्तिा होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥

अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥२॥

तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥३॥

३१४३

बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान ॥१॥

काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥

ठेविलिये ठायीं । चत्ति ठेवुनि असें पायीं ॥२॥

करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा ॥३॥

न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥४॥

तुका म्हणे बुद्धि । अल्प असे अपराधी ॥५॥

३१४४

जाणतों समये । परि मत कामा नये ॥१॥

तुम्ही सांगावें तें बरें । देवा सकळ विचारें ॥ध्रु.॥

फुकाचिये पुसी । चिंता नाहीं होते ऐसी ॥२॥

तुका म्हणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥

३१४५

द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥

आपुलिया शरणागता । वाहों चिंता नेदावी ॥ध्रु.॥

वचना या चत्ति द्यावें । असो ठावें पायांसी ॥२॥

तुका म्हणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥

३१४६

दोहीं बाहीं आम्हां वास । असों कास घालूनि ॥१॥

बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥

एकसरें आज्ञा केली । असों चाली ते नीती ॥२॥

तुका म्हणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥३॥

३१४७

ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥

सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥

जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी म्हुण ॥२॥

तुका म्हणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर म्हणवूनि ॥३॥

३१४८

बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥

घडलें हें बहुवा दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥

बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥२॥

दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥३॥

पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली ॥४॥

तुका म्हणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥

३१४९

तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति । आश्चर्य हें चत्तिीं वाटतसे ॥१॥

काय जाणों काय होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥

भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥२॥

तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥३॥

३१५०

सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥

काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शक्तिहीन जाले दिसां ॥ध्रु.॥

विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥२॥

तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥३॥

३१५१

खेळतां न भ्यावें समर्थाच्या बाळें । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥

तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥

अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी म्हणऊनि ॥२॥

तुका म्हणे माझें ऐसें आहे देवा । म्हणऊनि सेवा समर्पिली ॥३॥

३१५२

निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥१॥

पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥

लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥२॥

तुका म्हणे नव्हतें ठावें । जालें भावें वाटोळें ॥३॥

३१५३

नव्हती भेटी तों चि बरें । होतां चोरें नाडिलें ॥१॥

अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ध्रु.॥

चिंतनांचें मूळ चत्ति । नेलें वृत्ति हरूनि ॥२॥

तुका म्हणे मूळा आलें । होतें केलें तैसें चि ॥३॥

३१५४

जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे ॥१॥

पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥

आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥२॥

तुका म्हणे नारायणा । सेवाहीना धिग वृत्ति ॥३॥

३१५५

सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥

आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥

माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥२॥

तुका म्हणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥

३१५६

नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥

चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालती ॥ध्रु.॥

नामरूपें रंगा आलीं । ते चि चाली स्वभावें ॥२॥

तुका म्हणे पांडुरंगे । अंग संगें कवळिलें ॥३॥

३१५७

खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंतें ॥१॥

माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ध्रु.॥

प्रसादाची वाणी वदें ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥२॥

तुका म्हणे रस वाढितिया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥३॥

३१५८

अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥

याची जाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥ध्रु.॥

बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥२॥

तुका म्हणे मुळें । खंड जाला एका वेळें ॥३॥

३१५९

अवघा भार वाटे देवा । संतसेवा न घडतां ॥१॥

कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ध्रु.॥

चुकलोंसा दिसें पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥

तुका म्हणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥३॥

३१६०

आतां तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥

गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥

वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥२॥

तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥३॥

३१६१

सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥

गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥ध्रु.॥

अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥२॥

तुका म्हणे, पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥

३१६२

धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तीं च दिसती ॥१॥

आलें आवडीस फळ । जालें कारण सकळ ॥ध्रु.॥

घेईंन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥२॥

तुका म्हणे लाड । विठोबा पुरवील कोड ॥३॥

३१६३

बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥

येथें सावकासें घेईंन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥

बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमश्रमें होता ॥२॥

बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि जाला ॥३॥

बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥४॥

तुका म्हणे येथें जालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥५॥

३१६४

पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥

आतां काशासाटीं जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥

ऐते अपाहार । आणूनियां भरी घर ॥२॥

मानिली निश्चिंती । नरका जावया उभयतीं ॥३॥

झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥४॥

तुका म्हणे बेट्या । भांडवल न लगे खट्या ॥५॥

३१६५

एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥

जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥

काळिमेचें जिणें । जीऊनियां राहे सुनें ॥२॥

तुका म्हणे गुण । दरुषणें अपशकुन ॥३॥

३१६६

पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥

पांडुरंग बाळमूर्ति । गाईंगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥

एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । म्हणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती॥२॥

पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि । निषेधाची वसति ॥३॥

पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । रीग न घडे कल्पांतीं ॥४॥

महाक्षेत्र हें पंढरी । अनुपम्य इयेची थोरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथींचे ॥५॥

३१६७

देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥१॥

काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥

नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥२॥

तुका म्हणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥३॥

३१६८

त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥

आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंद्रियें सकळें काया मन ॥ध्रु.॥

सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥२॥

तुका म्हणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥३॥

३१६९

दावूनियां बंड । पुरे न करी तें भांड ॥१॥

जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥

घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥२॥

तुका म्हणे धीरें । देवें नुपेक्षिलें खरें ॥३॥

३१७०

न पालटे जाती जीवाचिये साटीं । बाहे तें चि पोटीं दावी वरी ॥१॥

अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥

घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥

तुका म्हणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥

३१७१

दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥

समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥

काकुळतीसाटीं सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥

तुका म्हणे यश कीर्ति आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥

३१७२

विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥

तंव जाला साहए हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥

उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥

तुका म्हणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥

३१७३

आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धि तो ॥१॥

विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥

भुलल्यांचें अंग आपण्या पारिखें । छंदा च सारिखें वर्ततसे ॥२॥

तुका म्हणे दुःख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥३॥

३१७४

केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥१॥

होय तैसें होय आतां । देह बळी काय चिंता ॥ध्रु.॥

पडिलें पालवीं । त्याचा धाक वाहे जीवीं ॥२॥

तुका म्हणे जीणें । देवा काय हीनपणें ॥३॥

३१७५

आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौन्य चि ॥१॥

नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥ध्रु.॥

वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥

तुका म्हणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥३॥

३१७६

चत्तिाचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥

नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥

चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥२॥

तुका म्हणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी ॥३॥

३१७७

करितां तडातोडी । वत्सा माते सोईं ओढी ॥१॥

करित्याचा आग्रह उरे । एक एकासाटीं झुरे ॥ध्रु.॥

भुके इच्छी अन्न । तें ही त्यासाटीं निर्माण ॥२॥

तुका म्हणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥३॥

३१७८

निघालें दिवाळें । जालें देवाचें वाटोळें ॥१॥

आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥ध्रु.॥

गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥२॥

तुका म्हणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥३॥

३१७९

तीर्थाचिये आस पंथ तो निट देव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥

म्हणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥

संकल्पारूढ तें प्रारब्धें चि जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥२॥

तुका म्हणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥

३१८०

क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥

नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥

संतासमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्था ॥२॥

तुका म्हणे येह लोकीच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥

३१८१

कोणाशीं विचार करावा सेवटीं । एवढ्या लाभें तुटी जाल्या तरे ॥१॥

सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥

घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥

तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाव कार्या येतो ॥३॥

३१८२

असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥१॥

आम्हीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥

चिंतन चि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥२॥

तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥

३१८३

अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा ॥१॥

नातळे तो धन्य यासी । जाला वंषीं दीपक ॥ध्रु.॥

करवितो आत्महत्या । नेदी सत्या आतळों ॥२॥

तुका म्हणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि ॥३॥

३१८४

इच्छिलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥

क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥

भाग्याविण कैचें फळ । अंतर मळमूत्राचें ॥२॥

तुका म्हणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥३॥

३१८५

काशासाठीं आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥

कैसें नेणों तुम्हां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥

समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥२॥

तुका म्हणे अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाटीं ॥३॥

३१८६

नाहीं तुम्हां कांहीं लाविलें मागणें । कांटाळ्याच्या भेणें त्रासलेती ॥१॥

एखादिये परी टाळावीं करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ध्रु.॥

पायांच्या वियोगें प्राणासवें साटी । ने घवेसी तुटी जाली आतां ॥२॥

तुका म्हणे तुम्हां मागेन तें आतां । हें चि कृपावंता चरणीं वास ॥३॥

३१८७

जग अमंगळ । लागे देखतां विटाळ ॥१॥

धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥ध्रु.॥

नव्हे माझें मत । साक्षी करूनि सांगें संत ॥२॥

तुका म्हणे जीवें । दावी उमटूनि अनुभवें ॥३॥

३१८८

दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा ॥१॥

नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥

पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥२॥

तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥

३१८९

आम्ही पापी तूं पावन । हें तों पूर्वापार जाण ॥१॥

नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें तेणें ॥ध्रु.॥

राखावा तो ठाव । मिरासी करोनि उपाव ॥२॥

वादें मारी हाका । देवा आइकवी तुका ॥३॥

३१९०

पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥१॥

नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥

लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥२॥

तुका म्हणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥३॥

३१९१

भजनें चि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥

येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥

करितां सरोबरी । कांहीं न ठेवावी उरी ॥२॥

तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसीं च धुरे॥३॥

३१९२

जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥

वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥

पतितपावन ब्रिद साच करीं देवा । यालागी कुढावा करीं माझा ॥२॥

अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलों भारी संवसारें ॥३॥

कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें जालें देवा ॥४॥

हा ना तोसा ठाव जाला पांडुरंगा । नये चि उपेगा काय करूं ॥५॥

आपुलिया नांवा धांवणिया धांवें । लवकरी यावें तुका म्हणे ॥६॥

३१९३

प्रेमभेटी आळिंगण । मग चरण वंदावे ॥१॥

ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥

न संगतां सीण भाग । पांडुरंग जाणतसे ॥२॥

तुका म्हणे कृपावंतें । द्यावें, भातें न मागतां ॥३॥

३१९४

वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥

परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥

अश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥

तुका म्हणे वरावरी । जातों तरी सांगत ॥३॥

३१९५

कां रे तुम्हीं ठेवा बहुतां निमित्ती । माझिया संचितें वोडवलें ॥१॥

भक्तिप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥

पुसिलें पडळ त्रिमिर विठ्ठलें । जग चि भरलें ब्रम्हानंदें ॥२॥

तुका म्हणे केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळावरी वसे ॥३॥

३१९६

आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन॥१॥

अवघियां केली काळें तडातोडी । अवश्वरु घडी पुरों नये ॥ध्रु.॥

वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥

आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥

काम तरी क्रोध बुद्धि मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळिले शांती ॥४॥

तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥

३१९७

ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥

भवव्याधि येणें तुटेल रोकडी । करूनियां झाडी निश्चयेसी ॥ध्रु.॥

आणिकां उपायां अनुपान कठिण । भाग्यें बरें सीण शीघ्रवत ॥२॥

तुका म्हणे केला उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥३॥

३१९८

जपाचें निमत्ति झोपेचा पसरु । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥

ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥

सेवेविशीं केलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥२॥

तुका म्हणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आम्ही ॥३॥

३१९९

परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्त । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥

ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥

सकट आंबलें तें अन्न । शोधीं तें चि मद्यपान । विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥२॥

तुका म्हणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय हित । मोलें घ्यावें लागतें ॥३॥

३२००

भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥

कुळिकेसी लांस फांस । डोईं दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥

विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तो चित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥२॥

आज्ञापालणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका म्हणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP