१.

विहीणबाईची करणी बघा मग बंधूला लेक मागा

विहीण मागते थोड थोड नवर्‍या बाळाला कंठी तोड

त्या ग कंठीच सोन फिक्क बंधु कंगण्या जोग रुप

त्या ग कंगण्या पडल्या काळ्या बंधु आणा हो वेलबाळ्या

वेलबाळ्याला बाजूबंद चोळी पातळ मला दंड

त्या ग पातबिळाची निरी निरी रुतते माझे पोटी

बंधू आणा हो लाल लाल दाटी लाल लाल दाटीचा पिवळा सर

बंधु लावा वो वर भिंग

२.

आंदण देई रे भाऊराया काय देऊ ग बहिणी बया

वासरासहित पाची गया आंदण देई रे भाऊराया

काय देऊ ग बहिणी बया ऊसा सहित पानमळा

आंदण देई रे भाऊराया बहिण परास लेकीची माया

आंदण देई रे भाऊराया

३.

घाणा भरीला । सवाखंडी सुपारी

मांडवी व्यापारी । गणराज

घाणा भरीला । सवा खंडी गहू

नवर्‍या मुलीला गोत बहू । गणराज

घाणा भरीला । सवा खंडी भाताचा

नवरा मुलगा गोताचा । गणराज

मांडवाच्या दारी । उभा गणपती

नवर्‍या मुलाला गोत किती । गणराया

मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण

नवर्‍या मुलाला केळवण । गणरायाला

मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी

मूळ ग वर्‍हाडी । आंबाबाई

मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो

चहूकडे चित्त देतो । गणराज

मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा

लोडाला जागा ठेवा । माणसांच्या

घाणा भरीला । सवा खंडी कणिक

मांडवी माणीक । आंबाबाई

४.

पहात होते चंद्राला

पदर माझ्या कमरेला

बंधु आल्याती नियाला

रजा द्या मला जायाला

मी नाय रजा दियाचा

खारक्या बदाम्या लावायचा

खारकात खारका तोडीन

बैलाला काढून नेईन

चल ग मैना झपझप

शाळू दिवस कानाडा

कशी मी चालू दादाजी

पायातल पैजण गळतय जी

गळतय तर गळू दे करुन आणीन हीनाच

घडवून घालीन चांदीच

५.

अहो अहो विहीणबाई

आमचे मागणे काही नाही

आमचे मागणे थोडे थोडे

नवर्‍या मुलीला पैंजणतोडे

पैंजण जोडव्यांची हौस फार

नवर्‍या मुलीला चद्रहार

चंद्रहाराची हौस मोठी

नवर्‍या मुलीला चिंचपेटी

चिंचपेटीला मोती थोडे

नवर्‍या मुलीला हत्तीघोडे

हत्तीघोडयावर बसती

गावाकडे दोघे जाती

आई पाहते खिडकीतून

बाप पाहतो दारातून

भाऊ पहातो ओटयावरुन

हरणी गेली कडल्यातून

ज्याची होती त्यान नेली

आमची माया वाया गेली

६.

विहीणबाई, विहीणबाई, राग मनातला सोडा

गोरी गोरी वरमाय

तिचे नाजुक पिवळे पाय

गव्हा तांदळान भरल्या कोठया

खोबर्‍या नारळान मी भरीते ओटया

खणा नारळान मी भरीते ओटया

विहीणबाई राग मनातला सोडा

जेवण झाल्यावर हात चोळते साखरीन

दात कोरते लवंगान

घंगाळी रुपये तुम्ही घाला

विहीणबाई राग मनातला सोडा

रेशमी पायघडयावरुन मिरवा

विहीणबाई राग मनातला सोडा

मोठया लोकांचा नवरदेव सासरी रुसला

कंठी गोफासाठी जानोसी बसला

नवरदेवाच्या जोरावर सवाष्णी मागती जानोसा

चिरेबंदी वाडा त्यात जोडीनी हो बसा

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP