संदर्भ - इतर १

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


इतर

सरव्या बापा परास

गुरु माझो बाप भलो

सोरगीच्या वाटे

त्याने रस्तो मोकळो केलो ।१।

सरख्ये आई परास

गुरु माझी आई भली

सोरगीच्या वाटे

तिने फुलाची दाली दिली ।२।

सरख्या बंधू परास

गुरु माझो बंधू भलो

सोरगीच्या वाटे

त्याने शेल्याचो शेव दिलो ।३।

सरख्या भैनी परास

गुरू माझी भैन भली

सोरगीच्या वाटे

तिने नारळ घोटी दिली ।४।

इलो नि गुरुबाप

बैसलो वडातला

त्याने वाजविला सख

धावोनी आला लोक ।५।

गुरुचे मांड्येवरी

मीया बैसली बालपणी

गुरुने सांगितले कानी

नाही उरले माझे ध्यानी. ।६।

लामनी माझे केस

सरशेवटी मारी गाठ

साधुच्या संगतीक

मला घडली एकादस ।७।

शंभू दिसे म्हातारा

गिरीजा दिसे नवरी

माटवाचे दारी

हंसती जनपरी ।८।

दरीया झाला येती

कबुतरा पाणी पिती

मूर्ख विचारीती

किती दरीया पान खोल

माते परास पिता थोर

लागेना दरीयाचा अंतपार ।९।

पाऊस नि गे लागे

पाणी शेताला पुरेना

आई वाचोनी माया

लोकाना लागेना ।१०।

पाऊस नि गे लागे

लागता झिरी मिरी

तारु भरीला कोथंबिरी

तारु चालला रत्नागिरी

रत्नागिरीच्या किल्यावरी ।११।

माझी गे चाडी निंदा

करिची एकी दोघी

चुलीच्या खुरालागी

तू पासलां घे गे वगी ।१२।

माझ्या नि दारावैल्यान

पानीया गेली वाट

दुष्ट विचरती

कोणा देशाच्या कलावत

भल्याची मी लेक

परतून नाही दिली जाप. ।१३।

दारातले केळी

वाकडा तुझा बीण

नेणता तान्हा बाळ

शिरी कंबाळ त्याचा तॉण ।१४।

तिननी सानी झाल्यो

दिवो लावी मी लोणीयाचो

चंद्रिमा सोनियाचो

दाशि माझ्या उगवलो ।१५।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:00:32.0570000