मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
स्त्रीला नमस्कार हा !

स्त्रीला नमस्कार हा !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


भोळा शंभु दिसे वरी, परि महाकोपी बळी तापसी,

ज्याची नौबत दण्‌दणे त्रिभुवनीं, जाळी स्मरा साहसी,

त्याला भिल्लिण नाचवी बहुपरी वृद्धापकाळीं अहा !

आतां कोण म्हणे स्त्रियेस अबला ? स्त्रीला नमस्कार हा ! १

ब्रह्मांडें रचितां कुतूहल जिरे, ये शीण गात्रांप्रत,

वेदाभ्यास करोनि बुद्धि जड हो, ब्रह्मा जरापीडित;

डोळे तो मिचकावि पाहुनि सुता, चाळे करी, ही स्पृहा !

आतां को म्हणे स्त्रियेस अबला ? स्त्रीला नमस्कार हा ! २

विष्णू क्षीरसमुद्रशेषशयना सोडी, त्यजी इंदिरा

लत्ता स्वर्गविलासिं दे, तळमळे सेवोनि दुःखी धरा;

वृंदेकारण तो झुरोनि तुळशीखालीं पडे ईश हा !

आतां को म्हणे स्त्रियेस अबला ? स्त्रीला नमस्कार हा ! ३

वाटे स्त्रीच सुधा, हलाहलही ती, ती वारुणी दारुण,

दृष्टिक्षेप पुरे, उठे मृत, मरे प्राणी, पडे झिंगुन !

ब्रह्माविष्णुमहेश लोळति पदीं, स्त्रीचा दरारा पहा !

आतां को म्हणे स्त्रियेस अबला ? स्त्रीला नमस्कार हा ! ४

N/A

कवी - भा. रा. तांबे

वृत्त - शार्दूलविक्रीडित

ठिकाण - लष्कर -ग्वाल्हेर

दिनांक - नोव्हेंबर १९३३

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP