मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
थट्टा - अशी ही थट्टा । भलभल्यासी ...

भारुड - थट्टा - अशी ही थट्टा । भलभल्यासी ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

अशी ही थट्टा । भलभल्यासी लाविला बट्टा ॥ध्रु०॥

ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी । थट्टेनें हरविली बुद्धी । केली नारदाची नारदी । अशी ही थट्टा ॥ १ ॥

थट्टा दुर्योधनाने केली । पांचळी सभेमाजीं आणिली । गदाघायें मांडी फोडिली । अशी ही थट्टा ॥ २ ॥

थट्टा गेली शंभोपाशीं । कलंक लाविला चंद्रासी । भगें पाडिलीं इंद्रासी । बरी नव्हे थट्टा ॥ ३ ॥

थट्टेने मेला दुर्योधन । भस्मासुर गेला भस्म होऊन । वालीही मुकला आपुला प्राण । अशी ही थट्टा ॥ ४ ॥

थट्टा रावणाने केली । नगरी सोन्याची बुडविली । थट्टा ज्याची त्यास भोवली । बरी नव्हे थट्टा ॥ ५ ॥

अरण्यांत होता भृगु ऋषी । थट्टा गेली त्याचेपाशीं । भुलवुनी आणिला अयोध्येस । बरी नव्हे थट्टा ॥ ६ ॥

विराटराजाचा मेहुणा । नाम तयाचें कीचक जाणा । त्याणें घेतलें बहुतांचे प्राणा । बरी नव्हे थट्टा ॥ ७ ॥

थट्टेपासून सुटेले चौघेजण । शुक भीष्म आणि हनुमान । चौथा कार्तिकस्वामी जाण । त्याला नाही बट्टा ॥ ८ ॥

एका जनार्दन म्हणे सर्वांला । थट्टेला भिऊनी तुम्ही चाला । नाहीं तर नेईल नरककुंडाला । अशी ही थट्टा ॥ ९ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP