भगवद्गीतास्तोत्र - अध्याय तेरावा

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७७३३॥
पूर्व प्रसंगीं ऐकिलें । भक्ति साकल्य वर्णिलें ॥
तेणें आशंका घेतले । ह्मणोनि प्रश्न हे साहा ॥१॥
देहामाजिल लिगाडें । निवारुनीयां नीवाडें ॥
उघड शुद्धता सांपडे । ऐसें कांहीं कल्पी तूं ॥२॥
अहो तो दाटुगा पार्थिव । दांडाइत त्याची ठेव ॥
यास्तव पुसे वासुदेव । वश झाला जाणून ॥३॥
तेथें तुकयाचे संगती । कांहीं प्रसाद पंगती ॥
लाभे ऐसी केली युक्ती । नका घेऊं कंटाळा ॥४॥

॥७७३४॥
देव शिरोरत्ना योगिया चिद्रत्ना । ऐकावें जी प्रश्ना दुर्बळाच्या ॥१॥
यया देहामाजीं ठाणेदार राजी । बसले ते आजी चाळवीती ॥२॥
ऐसे कांहीं भासे तरी बोला कैसें । प्रकृतिविलासे आणि पुरुष ॥३॥
क्षेत्र क्षेत्रज्ञातें कळों हें इच्छितें । ज्ञानही ज्ञेयातें तुका ह्मणे ॥४॥

॥७७३५॥
षड्‍गुणालंकृत भगवान बोलत । लावी बापा चित्त सांगतों गा ॥१॥
शब्दाच्या आशंका अल्पा भेऊं नका । पूतना सविखा जिर्विली म्यां ॥२॥
देह हेंच क्षेत्र ह्मणुनी पवित्र । ह्मणिजे जे तें विचित्र कुंतीपुत्रा ॥३॥
यास जो जाणेल क्षेत्रज्ञ होईल । तद्वेत्याचा बोल ऐसा तुर्की ॥४॥

॥७७३६॥
क्षेत्रज्ञ सर्वाचें जो तो निश्चयाचें । मीच ऐसा वाचें सांगतों गा ॥१॥
भारता तूं जाण न धरी अनुमान । दोहींत जें ज्ञान ज्यांचें असे ॥२॥
तें ज्ञान माझेंची गोष्टी संमताची । तुका ह्मणे तेंची बोलेलकीं ॥३॥

॥७७३७॥
तें क्षेत्र जे जैसें ज्यानें कल्पीलसें । विकारी जें जैसें जयास्तव ॥१॥
क्षेत्रज्ञ तो जाण प्रकारेंच खूण । संक्षेप लक्षण सांगूं एक ॥२॥
तुका ह्मणे हीत सांगे भगवंत । मायीक साद्यंत तोडावया ॥३॥

॥७७३८॥
ऋषीश्वरी बहुविध स्वानुभवु । वैदीक समूहू वर्णीलेंसे ॥१॥
नाना युक्ती त्यांच्या भाषा गीर्वाणीच्या । सिद्धांत गर्भीच्या ठेवण्या ज्या ॥२॥
वाक्याचे प्रबंध ब्रह्मसूत्र बोध । करुनी विवीध अपादीलें ॥३॥
तुका ह्मणे वाणी प्राकृत शिराणी । झाली हे काहाणी नका ह्मणूं ॥४॥

॥७७३९॥
महाभूतें पांच अहंकार साच । जाणपां ऐसाच बुद्धि भेद ॥१॥
अव्यक्त आठवें हें तर्केची घ्यावें । इंद्रिय मेळावें विपंचक ॥२॥
मन त्या अगळें शब्द स्पर्श कळे । पंचक प्रबळें विषयीक ॥३॥
तुका ह्मणे ऐसें चोवीस या मीसें । मीच जीव भासें वाचाद्वारें ॥४॥

॥७७४०॥
द्विद्वाश ऐसी मिळणी संघातासी । क्षेत्र इच्छा तैसी सुखासुखें ॥१॥
द्वेषप्रतीती हे वृत्तीची सत्यहे । धारणा जाण हे तद्विकारु ॥२॥
तुका ह्मणे ऐसें खटलें सांचलेंसें । तेथें चाले कैसें शाहाणीव ॥३॥

॥७७४१॥
श्लाघेचा आधार दंभही साचार । त्याग शांतिसार अवक्रता ॥१॥
भक्ति श्रीगुरुची स्वामीण गुणाची । कीं ज्ञानमार्गीची दिवटी जे ॥२॥
शौच स्थिरत्व गा चित्त निग्रहो गा । आणी वीतरागा विषयांच्या ॥३॥
वैराग्य असावें निरहंकारभावें । तरी सुख भोगावें तुकयाचें ॥४॥

॥७७४२॥
जन्म हा ओखटा अद्वैतीं वसोटा । झाला वारा वाटा उधळी जो ॥१॥
मळमुत्रीं शीणला योनिद्वारें आला । पुढें गंधीयाला योनीची गा ॥२॥
लांचावला हाटी सोडीना पिनकुटी । मागें पुढें दाटी तीची करी ॥३॥
ऐसें जन्म जाणें तेणें न्यायें मरणें । जरा रोग घेणें नित्य दु:ख ॥४॥
हा दोष पाहातो तो हा ज्ञानी होतो । मुक्त लीलें जातो तुक्या ऐसा ॥५॥

॥७७४३॥
आसक्त झालीया लिंपे न कुरुराया । पुत्र किंवा जाया पडे दृष्टी ॥१॥
चांगले सदन सामग्री साधन । इष्टत्वादि करुन अनिष्टादि ॥२॥
इष्ट झाल्यावरी फुगा रानधरी । समानची वरी वृत्तिराखे ॥३॥
सखया सुमित्रा पार्था क्षत्रपुत्रा । सर्व दया पत्रा वाची तुका ॥४॥

॥७७४४॥
अद्वैत योगाचें भजन याचें । माझीया रुपाचें लागेवेड ॥१॥
भक्तीची सिराणी परी अव्यभिचारिणी । कांता पुण्य़खाणी नाथसेवे ॥२॥
एकांताची प्रीती जन पदीं खंती । कांटाळा ज्या चित्तीं राजसभे ॥३॥
तुका ह्मणे जीणें धन्य झालें पणें । लोह पालटणें परीसेंनी ॥४॥  

॥७७४५॥
अध्यात्मविचारें बोधा जाणें खरें । परी तें प्रखरें नित्यत्व गा ॥१॥
जडीं अजड हें निवडी संदेहें । हाचि अर्थ पाहे निज ज्ञानीं ॥२॥
पार्था हीं लक्षणें शुद्ध ज्ञानी होणें । आमुचें राहणें तया गर्भी ॥३॥
हाची उलटा योग अज्ञान प्रयोग । तुका ह्मणे सोंग वायां जाये ॥४॥

॥७७४६॥
आतां तूं ह्मणशी ज्ञेयवार्त्ता कैसी । ते तूझ्या कर्णासी लावीतसों ॥॥
जया ज्ञानें मोक्ष आतुडे प्रत्यक्ष । न उरे त्या लक्ष चौर्‍याशींगा ॥२॥
अनादी अनंत शुद्धाशुद्धि देत । जेथें मुरे चित्त चांचल्यता ॥३॥
नसत नासत उचित संवाद । तुका ह्मणे भेद निमे जेथें ॥४॥

॥७७४७॥
तें दोर अही या देहाचिया ठायां । पाय नेत्र तया शिरें मुखें ॥१॥
सर्वत्र तें श्रोत्रयुक्तचि पवित्र । व्यापूनि सर्वत्र असे तेजें ॥२॥
वैष्णवांच्या राया ऐके शब्दा यया । श्रुति संमती या मिळे स्मृती ॥३॥
आतां याच बोले होईल रुप केलें । द्वय लोकीं भलें मानी तुका ॥४॥

॥७७४८॥
इंद्रियें ज्या सत्तें विषयास घेती । किंवा वोळखती खोटें चांग ॥१॥
विषय इंद्रियें भासक झालें जें । परी ना विरजे जयामाजी ॥२॥
जीविती किंवा रे गुण भोगाठायीं । दीपवत पाही साक्षी सदा ॥३॥
जे कां राया ऐसें निर्गुण ह्मणावें । तुक्यानें जाणावें सर्वाधार ॥४॥

॥७७४९॥
ब्रह्म अंतरंग सर्व भूतांलागीं । वायु नभ अंगीं व्यापकत्वें ॥१॥
स्थावर जंगम तेणें न्यायें वागें । शूण्य तरी जागे सर्व काल ॥२॥
अतींद्रियपणें आकळे योगींद्रा । दूरी जे कां इंद्रा संनिध तें ॥३॥
तेथें तो घेणारा निवडीत तुका । जो कां झाला असका निका मुका ॥४॥

॥७७५०॥
नसोनी वेगळें भूतमात्राठायीं । वागे हे नवाई असंभाव ॥१॥
ऐसा जैं सेवीतो वेगळीचीपणें । त्याचें काय कोणें कीजेलगा ॥२॥
गिळीतो उगळी सर्व भूतां तोची । परी नाघे त्याची ओळखण ॥३॥
तोची ज्ञेयरुप तुका ह्मणे पाहे । धरी ही मही हें ऐसें बळ ॥४॥

॥७७५१॥
जें कांहीं प्रकाश आत्मा तो तयाचा । काम जे रंग त्याचा पालटेना ॥१॥
अंधाराचें कुंडें काळोखें निजबीज । असोनी निस्तेज ज्योतिर्मय ॥२॥
ज्ञान ज्ञेय ज्ञान लभ्यतें अर्जुना । सर्व हृद्भुवना  सत्ताधार ॥३॥  
अधिष्टूनी ऊरे जगत्रयांत जें । न लागे अंत जैं वस्तु तुका ॥४॥

॥७७५२॥
थोडक्या गोष्टींत तुज आह्मी वदों । पाल्हाळें विवादो ऐसें नसे ॥१॥
क्षेत्र सांगूनीयां ज्ञान दर्शवीलें । अज्ञाना वर्णिलें थोडक्यांत ॥२॥
ज्ञेय तरी हेंच क्रमानें बोलीलों । भक्तीनें भुललों तुझ्या सख्या ॥३॥
मत्स्वरुपा याचे तोची तुक्यासम । जो कां जाणे वर्म याचें वीरा ॥४॥

॥७७५३॥
प्रकृती आणीक पुरुष पैं द्वय । ज्या भेदीं अद्वय विकारलें ॥१॥
अनादीच पार्था यांची क्रीडा दीसे । जेथुनी उमसें भूतलोकु ॥२॥
आतां रजसत्वतमादि त्रिगुण । विकार उत्पन्न झाला जी कां ॥३॥
तुका जीणें झालें प्रकृती पासूनी । प्रकृती असूनी अक्षयी नसें ॥४॥

॥७७५४॥
अगळीक दीसे इचे कर्तेपणीं । पुरुषा करणी चिव्र दावी ॥१॥
कार्य कीं कारण हेतु प्रकृतीचा । श्रवणें जीवींचा बोधू पाहे ॥२॥
सुखा आणि दु:खाच्या भोग्तृत्वीं जो हेतु ॥ तुका ह्मणे होतु पुरुष स्वयें ॥३॥

॥७७५५॥
भोगी प्रकृतीचे गुणांसि पुरुष । तज्जळीं विशेष बिंबूनियां ॥१॥
नानाविध योनी निर्मी तया पार्था । पुरुषास आस्ता भोगी वासु ॥२॥
अर्जुना गा तोची दुजा देहीं भोक्ता । पुरुष अनुरक्ता प्रतिबिंबे ॥२॥
मार्ग दुर्लभ तो जेथें कां सांपडे । तुकयास वेडें जेणें केलें ॥३॥

॥७७५६॥
जो द्रष्टा जाणता भर्त्ता परमात्मा ॥ परेश चिदात्मा अव्यय जो ॥१॥
अर्जुना गा तोची दुजा देहीं भोक्ता । पुरुष अनुरक्ता प्रतिबिंबे ॥२॥
मार्ग दुर्लभ जेथें कां सांपडे । तुकयास वेडें जेणें केलें ॥३॥

॥७७५७॥
जाणेल कीं जो या पुरुषास कोणी । प्रकृतीसी गुणीं विकाराच्या ॥१॥
प्रपंचीं जरी कां वर्तला तो नर । न बाधे शरीर द्वंद्व त्याच्या ॥२॥
जान्हवी तटाकीं मेल्या मंगळ जें । ऐशा स्थळीं विरजे आत्मा तुका ॥३॥

॥७७५८॥
पाहाती जे योगी निर्विशेष आत्मा । ध्यानीं सच्चिदात्मा लक्षूनीयां ॥१॥
कोणी कितेक ते सांख्याचे विचारें । विश्वात्मा हा बरें न्याहाळीती ॥२॥
योगेंही कर्मेही ब्रह्म ऐसे कीती । आपुलाले मतीं सारीखे गा ॥३॥
तुका ह्मणे पथ ज्यास जो आवडे । तेणें केलें उघडें लोकांतैसें ॥४॥

॥७७५९॥
आत्मा नेणोनी ही कोणी । ऐकुनि तैसें वाखाणी ॥१॥
अन्य उपासिती भावें । मृत्युसिंधुस तरावें ॥२॥
ते ही तप्तर श्रवणीं । तुका ह्मणे ज्ञानखाणी ॥३॥

॥७७६०॥
उपजे जे जे कां प्रतीत । सृष्टीकारण संभूत ॥१॥
चराचरी जेव्हां जेव्हां । न सुटे चित्त अव्हा सव्हा ॥२॥
क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगें । द्वैत विंध्ये संप्रयोगें ॥३॥
जाण भरतर्षभा तें तूं । तुक्या होय पारंगतू ॥४॥

॥७७६१॥
सर्वाभूतीं जो समान । नसे ऊंच नीचस्थान ॥१॥
परमेश्वर आहे तया । लावी मानस अक्षया ॥२॥
अनित्यांत हि नित्या । घेतूं प्रतीतीने सत्या ॥३॥
तोचि डोळस जो पाहे । तुका व्यापी अंतर्बाह्ये ॥४॥

॥७७६२॥
असा पाहे पटींत तूं । देउन दृष्टीला एकांतू ॥१॥
समईश्वरा सर्वत्र । पाहे अदेखणें नेत्र ॥२॥
आत्मघाती न एकतो । देहासह पावन होतो ॥३॥
त्यावरि जाय मुक्ती पदां । तुकया नलगे आपदा ॥४॥

॥७७६३॥
सर्व क्रिया प्रकृतीनें । करिजेताती सुमनें ॥१॥
असें पाहे तो सर्वदा । नेघे पातक आपदा ॥२॥
पैं गा तेव्हां आत्मयाचें । तो पाहतो अकर्त्याचे ॥३॥
अकर्तृत्वीं कैंचा दोष । जैसा तुकाच निर्दोष ॥४॥

॥७७६४॥
तरंगातें देखे जड । परी बुद्धिचा नीवाड ॥१॥
एका चैतन्यसागरीं ॥ बाबुड विकल्प लहरी ॥२॥
विस्तारतो त्यापासुन । गंधी व्यापिती सुमन ॥३॥
तुका ह्मणे सांडी मावा । ब्रह्म पावतो तेधवां ॥४॥

॥७७६५॥
अनादित्वें जो कां असे । निर्गुणत्वें तो विलसे ॥१॥
चिदात्माच ह्मणती ज्यास । अज पाहतां अविनाश ॥२॥
असोनीही सर्व शरीरीं । अकर्त्ताच निर्विकारीं ॥३॥
नव्हे लिप्त हें नवल । तुकया प्रेमे देतो डोल ॥४॥

॥७७६६॥
नभ लिंपेना कौंतेया । वसवूनी छिन्न ठायां ॥१॥
सर्व स्थळांत सूक्ष्म जें । स्थळ दोष ना आप जे ॥२॥
सर्वा देहांत सर्वत्र तेवि व्याप्य व्यापी सूत्र ॥३॥
आत्मा लिप्त तेव्हां होये । तुका पीडे कलिभयें ॥४॥

॥७७६७॥
एक जैसा प्रकाशिं तो । सर्वही जग भास्कर तो ॥१॥
सर्व क्षेत्रां तें क्षेत्रज्ञ । प्रकाशित एक सुज्ञ ॥२॥
ऐक भरतवंशोप्तजा । भारती तूं भक्तराजा ॥३॥
भक्तराज तुका कैसा । धन लोभ्या जैसा पैसा ॥४॥

॥७७६८॥
हा क्षेत्रज्ञ क्षेत्र भेद । तुज दर्शवूं प्रसाद ॥१॥
ज्ञान दृष्टीनें क्षेत्रही । दाखविलें येथें पाही ॥२॥
भूतसंसार जडत्व । जाणें सोडोंत्या मुक्तत्व ॥३॥
तुका विनवितो संतां । ऐका मागील संमता ॥४॥

॥७७६९॥
झालें प्रसंग पैं तेरा । जनार्दन मुख्य गिरा ॥१॥
येथें ज्ञान आणि जड । क्षेत्र क्षेत्रज्ञ नीवाड ॥२॥
केला पुढें चौदाव्यास । ऐका ठेवूनी मनास ॥३॥
वदे संजया कुरुपती । श्रोत्या तुकया संगती ॥४॥
शेवटीचें अध्ये साहा । ज्ञानकांड असे पाहा ॥५॥
सुटे पाप ताप बोध । पदप्राप्तीचें अमोघ ॥६॥
शिष्य शिष्याचा सेवक । प्रार्थी तुकयाचा रंक ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP