मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७१४८ ते ७१५६

भुपाळ्या अभंग - ७१४८ ते ७१५६

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७१४८॥
बोलोनी दाऊं कां तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥
पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । ह्मणऊनी पाय जीवीं धरुनी राहिलों ॥२॥
त्यागें भोगें दु:ख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥३॥
तुका म्हणे माते बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दु:ख पावे विठ्ठले ॥४॥

॥७१४९॥
ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कां ही कळवळा तुह्मा उमटेचि ना ॥१॥
आहो पांडुरंगें पंढरीचे निवासे । लावूनियां आसे चाळवूनी ठेविलें ॥२॥
काय जन्मा येऊनियां केली म्यां जोडी । ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥३॥
तुका ह्मणे खरा न पवेचि विभाग । धिकारितें जग हेंचि लाहो हिशोबें ॥४॥

॥७१५०॥
कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ति झालीसी दिसे ॥१॥
लाज येते मना तुझा ह्मणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥२॥
लाजविली मागें संतांचीं हीं उत्तरें । कळों येतें खरें दुजें एकावरुनी ॥३॥
तुका ह्मणे माझी कोणें वदविली वाणी । प्रसादावांचूनी तुमचिया विठ्ठला ॥४॥

॥७१५१॥
जळो माझें कर्म वांयां केली कटकट । झालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥
आतां पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥२॥
गुणवंत केलों दोष जाणायासाठीं । माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥३॥
तुका ह्मणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥४॥

॥७१५२॥
कामें नेलें चित्त नेदी अवलोकूं मुख । बहु वाटे दु:ख फुटों पाहे हृदय ॥१॥
कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥२॥
प्रभातेसी वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥३॥
येथें अवघें वांयां गेले दिसती सायास । तुका ह्मणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥४॥

॥७१५३॥
जळोत ती येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आतां मज साह्य येथें करावें देवा । तुझी घेई सेवा सकळ्ख गोवा उगवूनी ॥२॥
भोगें रोगा जोडोनियां दिलें आणीकां । अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनी ॥३॥
तुका ह्मणे असो तुझें तुझे मस्तकीं । नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तणें ॥४॥

॥७१५४॥
न संगतां तुह्मा कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहारचि न लगे ॥१॥
परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों देत नाहीं ॥२॥
काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तईपासूनियां समर्थ ॥३॥
तुका ह्मणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनी ॥४॥

॥७१५५॥
तुजसवें आह्मीं अनुसरलों अवळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥
सासुरवासा भीतों जीव ओढें तुजपाशीं । आतां दोहींविशीं लज्जा राखें आमुची ॥२॥
न कळतां संग झाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलाचियावरी ॥३॥
तुका ह्मणे असतां जैसें तैसें बरवें । वचन या भावें वेचूनियां विनटलों ॥४॥

॥७१५६॥
उठा उठा संतजन । करा रामकृष्ण भजन ॥ षड्रियु हे दुर्जन । निसर्जन होतील ॥१॥
गरुडपारी महा द्वारीं । उभे राहूं नाचूं हरी ॥ येथें आलों संसारीं । श्रम भारी भोगिले ॥२॥
चंद्रभागे करुनी स्नान । घेऊं पुंडलिक दर्शन ॥ महा पापांचे निरसन । नीरस्पर्शन भीमेचें ॥३॥
वाळुवंटीं नाचूं भावें । हेंचि देवासी पावे । रामकृष्णाचे गुण गांवे होईल ठावें निजसुखें ॥४॥
पंढरीची महिमा थोर । पाहूं सांडूनियां घोर ॥ नाचूं विठ्ठला समोर । आहों चोर पूर्वीचे ॥५॥
तुका ह्मणे हीत करा । पाय विठोबाचे धरा ॥ भुक्ति मुक्ति येईल घरा । भव हा तरा हरिनामें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP