मृदंग पाटया - ६८७० ते ६९१४

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६८७०॥
मागें पुढें पाहें सांभाळूनी दोन ठाय । चुकावूनी जाय गडी राखे गडियांसी ॥१॥
मुरडे दंडा दोहीं तोडें गडियां सावध करी । भेटतियासंगें तया हाल तुजवरी ॥२॥
गडियां गडी वांटुनी देई । ज्याचा सोडी तेचि ठायीं ॥३॥
अगळ्या बळें करील काय । तुज देणें लागे डोय ॥४॥
नवां घरी पाउला करीं । सांपडे तो तेथें धरीं ॥५॥
जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥६॥
सांपडोनी डाई बहु । काळ गुंतलासी ॥७॥
बळिया गडि फळी । फोडी न धरतां त्यांसी ॥८॥
चुकांडी जो खाय मिळोनी अंगीं जाय । गुंतलासी काय तुका ह्मणे अझूनी ॥९॥

॥६८७१॥
पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥
जागा रे गोपाळानों ठायीं ठायीं जागा । चाहुलिनें भागा दूर मजपासूनी ॥२=0,;'\
 रिघता ठाव आह्मां ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपा ॥३]ojhgbv तुका म्हणे हातां चढे जीवाचिये साठीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥४॥

॥६८७२॥
डाई घालूनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकविलीं ॥१॥
खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥२॥
मारिती माया घेती जीव । नाहीं किंव अन्यायें ॥३॥
तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥४॥

॥६८७३॥
आतां हेंचि जेऊं हेंचि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥
हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधन ॥२॥
चवीं चवीं घे घास । ब्रह्मरस आवडी ॥३॥
तुका ह्मणे गोड लागे । तों तों मागें रसना ॥४॥

॥६८७४॥
अवघेंचि गोड झालें । मागलिये भरी आलें ॥१॥
साह्य झाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥२॥
थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥३॥
तुका ह्मणे गेलें । स्वप्नींचें जागें झालें ॥४॥

॥६८७५॥
तुजसवें येतों हरी । आह्मां लाज नाहीं तरी ॥ उचलिला गिरी । चांग तई वांचलों ॥१॥
मोडा आतां खेळ । गाई गेल्या झाला वेळ ॥ फांकल्या ओढाळ । नाहीं तोचि आवरा ॥२॥
चांग दैवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आह्मी नाहीं भय धाक या अनंता ॥३॥
खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती ॥ भोंवतां भोंवेल । आह्मां वाटतें हें चित्तीं ॥४॥
तुका ह्मणे उरी नाहीं तुजसवें । शाहाणिया दुरी छंद भोळियांसवें ॥५॥

॥६८७६॥
नको आम्हां सवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥१॥
कोण धांवे त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥२॥
न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥३॥
तुका ह्मणे तूं राख मनेरी । मग त्या येरी आह्मी जाणों ॥४॥

॥६८७७॥
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥
तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥२॥
वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥३॥
तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥४॥

॥६८७८॥
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडीतां ॥१॥
तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥२॥
आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥३॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥४॥

॥६८७९॥
वरता वेंधोनी घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥
हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्याला ठावा नाहीं ॥२॥
भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥३॥
तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥४॥

॥६८८०॥
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता ह्मणती गेला ॥१॥
आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥२॥
चुकलों आह्मी खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥३॥
तुका ह्मणे धांवती थडी । न घाली उडी आंत कोणी ॥४॥

॥६८८१॥
भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळी तो ॥१॥
आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥२॥
जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दु:खा ॥३॥
तुका ह्मणे हा लाघवी मोठा । पाहे खोटा खरा भाव ॥४॥

॥६८८२॥
काळिया नाथूनी आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥
दुसरिया भावें न कळें कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥२॥
रुपा भिन्न पालट झाला । गारे सांवळेंसा पै देखिला ॥३॥
आश्वासीत आला करें । तुका खरें ह्मणे देव ॥४॥

॥६८८३॥
हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीवींचिया ॥२॥
योगियांच्या ध्याना जो नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥३॥
तुका ह्मणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास हाका मारी ॥४॥

॥६८८४॥
धांव कान्होबा गेल्या गाई । न ह्मणे मी कोण ही काई ॥१॥
आपुलियाचें वचन देवा । गोड सेवा करीतसें ॥२॥
मागतां आधीं द्यावा डाव । बळिया मी तो नाहीं भाव ॥३॥
तुका म्हणे ऐशा सवें । अनुसरावें जीवेंभावें ॥४॥

॥६८८५॥
आणीक काय थोडीं । परि तीं फार खोटीं कुडीं ॥१॥
सदा मोकळींच गुरें । होती फजीत तीं पोरें ॥२॥
सदा घालिती हुंबरी । एक एकांचें न करी ॥३॥
तुका ह्मणे घरीं । माय वेळो वेळां मारी ॥४॥

॥६८८६॥
बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥१॥
बरें केले नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥२॥
माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥३॥
तुका ह्मणे काई । किती ह्मणों बाप आई ॥४॥

॥६८८७॥
गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥
चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुह्मी गोपाळा छंद केले ॥२॥
मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥३॥
मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥४॥
निर्दाळिले दुष्ट भक्तां प्रतिपाळी । ऐसा ह्मणों बळी आमुचा स्वामी ॥५॥
तुका म्हणे सरसी असों येणें बोधें । लागोनी संबंधें सर्वकाळ ॥६॥

॥६८८८॥
आजी कां वो तूं दिससी दुश्चिती । ह्मणे एका मन लगे तुझ्या चित्तीं ॥
दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरि चित्तीं वो ॥१॥
सर पर परती झालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड ॥
व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं झाला खंड वो ॥२॥
होतें तैसें तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी ॥
नाहीं मर्यादा नि:संग बावरी । मन हें गोविंदी देह काम करी वो ॥३॥
नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें ॥
नाहीं अचळ सावरावा ठावे । देखों उदासीन तुज गे देहभावें वो ॥४॥
कोठें नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवतीं बहुत ॥
दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥५॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासुसुना ॥
परा भक्ति हे शुद्ध तुह्मी जाणा । तुका ह्मणे ऐसें कळों यावें जना वो ॥६॥

॥६८८९॥
भरिला उलंडूनी रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट ॥
चाले झडझडां उरांतुनी वाट । पाहे पाळतुनी उभा तोचि नीट वो ॥१॥
चाळा लावियेले गोप गोपीनाथें । जाणें आवडीचें रुप जेथें तेथें ॥
दावी बहुतांच्या बहुवेष पंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥२॥
मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनी आधार ॥
उगा राहे कां मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥३॥
धरिली खोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मशीं संगें ॥
मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकीं पडिलीं तुझीं सोंगें वो ॥४॥
सुख अंतरींचें बाह्य ठसठसी । ह्मणे विनोद हा काय सोंग यासी ॥
तुज मज काय सोयरीक ऐसी । नंदानंदन या थोरपणें जासी वो ॥५॥
करी कारण तें कळो नेदी कोणा । सुख अंतरींचें बाह्य रंग जाणा ॥
मन मिनलें रे तुका ह्मणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥६॥

॥६८९०॥
आजी नवल मी आलें येणें रानें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें ॥
गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥१॥
गेलें होऊनी न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं ॥
अंगीं जडला मग उरलें ते काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥२॥
बहुत कामेम मज नाहीं आराणूक । एक सारितां तों पुढें उभें एक ॥
आजी मी टाकोनी आलें सकळीक । तंव रचिलें आणीक कवतुक वो ॥३॥
चिंता करितां हरिली नारायणें । अंगसंगें मिनतां दोघेजणें ।
मुखें निर्भर झालियें त्याच्या गुणें । तुका ह्मणे खुंटलें येणें जाणें वो ॥४॥

॥६८९१॥
मैं भुली घरजानी बाट । गोरस बचन आयें हाट ॥१॥
कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरुं देखे गोपाल ॥२॥
काहां पग डारुं देख आनेरा । देखें तों सब वोहिन घेरा ॥३॥
हुं तों थकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥४॥

॥६८९२॥
हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥१॥
क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥२॥
कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारुं उसपर तन ॥३॥
तुका प्रभु कब देखें पाऊं । पासीं आऊं फेर न जाऊं ॥४॥

॥६८९३॥
भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥१॥
आगळ आवो देवजी कान्हा । मैं घरजोडी आहे ह्याना ॥२॥
उनसुं कळना नव्हे तो भला । खसम अहंकार दादुला ॥३॥
तुका प्रभु परबळ हरी । छपी आहे हुं जगाथी न्यारी ॥४॥

॥६८९४॥
नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करुं न साहावे मज बहु होतो उबारा ॥
मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमारा ॥१॥
सखिया वेशिया तुह्मी प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ॥
उमटली अंगीं वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥२॥
नये कळों नेदावे हे दुजियासी मात । घडावा तयासी उत्कंठा एकांत ।
एकाएकीं साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळें होईल नेणों भाग्य उदित ॥३॥
स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन ॥
अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका ह्मणे दर्शनापें आलें जीवन ॥४॥

॥६८९५॥
पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट ॥
मागें सांडोनी सकळ बोभाट । वंदी पदांबुजें ठेवूनि ललाट वो ॥१॥
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धि । होतें वहिलें लपाला आतां खांदीं ॥
कोठें आड आली हे देहबुद्धि । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥२॥
मागें बहुतांचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणें केला त्याग ॥
पहिलें पाहातां तें हरपलें अंग । खुंटली वाट नाहीसें झालें जग वो ॥३॥
शोकें वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ॥
केला उच्चार रे घडल्या दोषांचा । झाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥४॥

॥६८९६॥
काय उणें कां करितोसी चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी ॥
पर परतां तूं पळोनी जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात ॥
न पुरे अवसरु हेंचि नित्यानित्य । तूंचि सोडवीं करुनी स्थिर चित्त वो ॥२॥
बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकवूनी हरी ॥
करितां लाग न येसीच पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥३॥
तुज ह्मणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोळियां परता ॥
न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकया स्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥४॥

॥६८९७॥
घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिली कां पडिली दुश्चिती ॥
कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजी शून्य शेजे नाहीं दिसे पति वो ॥१॥
बोले दूतिकेशी राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण ॥
ह्मणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥२॥
धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये वो सीता ॥
लाजिनली रुप न ये पालटितां । झाला भीमकी आपण राम सीता वो ॥३॥
सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी ॥
तुळे घालितां न ये कनक वो रासी । सम तुकें एक पान तुळसी वो ॥४॥
मज भुली पडली कैशापरी । आह्मां भोगूनी ह्मणे मी ब्रह्मचारी ॥
दिली वाट यमुने माये खरी । तुह्मां आह्मां नकळे अद्यापवरी वो ॥५॥
जाणे जीवींचे सकळ नारायण । असे व्यापूनी तो न दिसे लपून ॥
राधा संबोधिली प्रीती आलिंगून । तुका ह्मणे येथें भावचि कारण वो ॥६॥

॥६८९८॥
मिळोनी गौळणि देती यशोदे गार्‍हाणीं । दहीं दूध तूप लोणी शिंकां नुरे कांहीं ॥
मेळवूनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥१॥
हरि सोंकला वो हरि सोंकला वो । सोंकला तो वारीं तुज लाज नाहीं तरी ॥
आह्मां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥२॥
तुज वाटतसे कोड यासी लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो ॥
आह्मी जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगो भांडखोरी लाज वाटे आह्मां ॥३॥
मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तंव दसवंती ह्मणे आणा शीक लावूं ॥
थोर आणिला कांटाळा घरींदारीं लोलपाळां । डेरा रिघोनी गुसळा तेथें लोणी खाय ॥४॥
मिळोनी सकळा दावें लावूनियां गळा । कैशा बांधिती उखळा तेथें राहे उगा ॥
बरा सांपडलासी हरी आजिच्यानें करिसील चोरी । डोळे घालूनियां येरी येरीकडे हांसे ॥५॥
फांकल्या सकळा उपडूनियां उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही ॥
उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥६॥

॥६८९९॥
बाळपणीं हरि । खेळे मथुरे माझारी ॥ पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी ॥
मुख पाहे माता । सुख न माये चित्ता ॥ धन्य मानव संचिता । वोडवलें आजी ॥१॥
बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो ॥ ह्मणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें ॥
जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥२॥
मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती ॥ नाहीं आठव त्यां चित्तीं ।
देहभाव कांहीं ॥ विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेंकुरें ॥ धाक सांडोनियां येरें ।
तान भूख नाहीं ॥३॥
एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनी वोसरी । तेथीं जाऊं पाहे ॥
लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज ॥ सुख सांडोनियां सेजे । तेथें धाव घाली ॥४॥
वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा ॥ बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या ॥
कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं ॥ दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥५॥
वैरभाव नाहीं । आप पर कोणी कांहीं ॥ शोक मोह दु:ख ठायीं । तया निरसलीं ॥
तुका ह्मणे सुखी । केलीं आपणासारिखीं ॥ स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥६॥

॥६९००॥
गोरस घेऊनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें ॥
झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥१॥
सर जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां ॥ नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥२॥
आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी ॥
आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥३॥
आह्मी येथें अधिकारी मागें केली तुह्मी चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें ॥
बोलिल्या हांसुनी आह्मी सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरुनी करी मात कांही ॥४॥
वांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं ॥
जडला जिव्हारीं फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें धरी जाऊं पाहे तियेचें ॥५॥
तया हातीं सांपडल्या हाटीं पाटीं चुकाविल्या । कृष्णमिळणीं मिळाल्या त्याही न फिरती ॥
तुका ह्मणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोडवलें आजी ॥६॥

॥६९०१॥
हरी तुझी कांरि रे सांवळी । मी रे गोरी चांफेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥
उगला राहें न करी चाळा । तुज किती सांगोरे गोवळा ॥ तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥२॥
तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी ॥ घरीचें बाहेरील आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥३॥
मज ते हांसती जन । धि:कारिती मज देखोन । अंगीं तुझे देखोनी लक्षण ॥ मग विटंबणा होईल रे ॥४॥
तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन वचन मोडी नेदी हात । कळले न साहेची मात ॥
तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करुनी भोगी ॥६॥

॥६९०२॥
सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गार्‍हाणें देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळेंचि कैसें ॥
दहीं दूध लोणी शिंकां नुरेचि कांहीं कवाड जैशाचें तैसें । चाळवूनी नाशिलीं कन्याकुमरें आमच्या सुनांसी लाविलें पिसें गे बाइये ॥१॥
अझुनी तरी यासी सांगे बरव्या परी नाहीं तरी नाहीं खरी जीवेसाठी । मिळोनी सकळै जणी करुं वाखा सखीं तुज मज होईल तुटी गे बाईये ॥२॥
नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलते करी । पाळतुनी घरीं आह्मी नसतां तेथें आपण संचार करी ॥
सोगया चुंबन देतो आलिंगन लोळे सेजाबाजावरी ॥
शिंकीं कडा फोडी गोसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाईये ॥३॥
आतां याची चाड नाहीं आह्मां भीड सांपडतां कोड पुरवूं मनींचें । सोसिले बहु दिस नव्हता केला निस ह्मणूनि एकुलतें तुमचें ॥
चरण खांबीं जीवें बांधेन सरिसा जवें न चले कांहीं यांचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलतें हो या जिवाचें बाईगे ॥४॥
घेउनी जननी हाती चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां । निष्ठुर वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाईल माझ्या बाळा ॥
जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥५॥

॥६९०३॥
विरहतापें फूंड छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवेंचि दुश्चित ॥
न सांभाळूनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळीच पडों पाहे कुळाहूनी याती ॥१॥
खुंटलीसी झाली येथें अवघियांची गती । आपलीं परावीं कोण नेणें भोंवतीं ॥
त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपति । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥२॥
बाहेरीच धांवें रानांन धरी च घर । न कळे बंधना झाला तेणे संचार ॥
विसरुनी गेली सासुरें कीं माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येयें सर्वथा बळा ॥
त्याचा त्याच्या मुखें अवघियांचा निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा ॥४॥

॥६९०४॥
ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें ॥
कळों नेदी माया त्यांचे त्यास ठाउकें । खेळतोंसे दावी लक्षलक्षापें मुकें ॥१॥
अखंडित चट त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया त्या संकल्प वाहाती मना ॥
काया वाचा मनें रुपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेऊनियां राना ॥२॥
अवघियांचा जाणें झाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें तया भीतरी ॥
कळों नेदी घरिंच्या करी गोवूनी चोरी । हातोहातीं नेती परपरत्या दुरी ॥३॥
आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें पारिखें जन ॥
एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका ह्मणे एका नारायणावांचून ॥४॥

॥६९०५॥
खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्नचि या नारी तेथें देखियेल्या ॥
मांडिलें विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥१॥
ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां रे न सोडी नेदी साउलां रे ॥२॥
साडया साउलीं पातळें गोंडें कसणिया चोळ्या । बुंथी घेउनी सकळा कळंबावरी पळे ॥
खांदी करुनियां करीं दृष्टि घालोनि सामोरी । बैसे पाला वोढी वरी खदखदां हांसे ॥३॥
आनंदें कल्लोळ वाळा खेळती सकळ देती उलटिया चपळ । एकी एकीहूनी ह्मैस वेल सुर काडी ॥
एकी उगविती कोडीं । नानापरीच्या निकडी खेळ मांडियेला ॥४॥
एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तंव नारी । ह्मणे नाहीं नेलें चोरी काय जाणों केव्हां ॥
केला सकळीं हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां ह्मणतील घरां जावें कैशा परी ॥५॥
तंव हांसे वनमाळी वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात ॥
लाज राखावी गोपाळा आह्मांजणींची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥६॥
जोडोनियां कर या गे सकळी समोर । वांयां न बोलावें फार बडबड कांहीं ॥
भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन । करा एक चित्त मन या मे मजपाशीं ॥७॥
एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे । ह्मणे चला आतां सये जाऊं तयापाशीं ॥
जोडोनियां हात कैशा राहिल्या निवांत । तुका ह्मणे केली मात लाज राखिली तयांची ॥८॥

॥६९०६॥
धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें ॥
एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें अवघड या राणें रे ॥१॥
सोडीं पालव जाऊं दे मज हरी । वेळ लागल्या रे कोपतील घरीं ॥
सासू दारूण सासरा आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥२॥
सख्या वशिया होत्या मजपाशीं । तुज फावलें रे फांकतां तयांसी ॥
होतें अंतर तर सांपडतें कैसी । एकाएकीं अंगी जडलासी रे ॥३॥
कैसी भागली हे करितां उत्तर । शक्ति मावळल्या आसुडितां कर । स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा लोकाचार वो ॥४॥

॥६९०७॥
गाई गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनी जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटीं । चला चला ह्मणती पाहूं दृष्टी वो ॥१॥
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी ॥ मिस पाणियाचे करितील घरीं । बारा सोळा मिळोनी परस्परीं वो ॥२॥
चिरें चोळिया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्ण मूर्ती । कोणा नाठवे हे कोण कुळ याती । झालीं तटस्थ सकळ नेत्रपातीं वो ॥३॥
दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाइके जनमात ॥ करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो ॥४॥

॥६९०८॥
कोठें मी तुझा धरुं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥
सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥२॥
रुपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ति । न देखें भोंवतीं मी ते माझी ॥३॥
तुकयाचा स्वामी माझे जीवींच बैसला । बोलींच अबोला करुनियां ॥४॥

॥६९०९॥
कोणी एक भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥
देखिला डोळां बैसला मनीं । तोचि वदनीं उच्चारी ॥२॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥३॥
तुका ह्मणे हांसे जन । नाहीं कान तें ठायीं ॥४॥

॥६९१०॥
कान्हो एकरी रे एकली रे । तुजसवें चुकलें रे ॥ भय वाटे वनीं मज अवळा धाकली रे ॥१॥
निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥२॥
लोक वाटा सांगती खोटा । परी मे चटा लागलियें ॥३॥
पिकल्या बोरी झालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥४॥
आड खुंट झालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥५॥
तुका ह्मणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥६॥

॥६९११॥
वयाला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥
बहु दिसीं झाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥२॥
कोवळें बोलतो मना आवरतें । डोळियाचें पातें ढापवेना ॥३॥
आजी सकळांसीं आलें चोलूनियां । कां गो पाटी वांयां पुलविली ॥४॥
तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥५॥
तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥६॥

॥६९१२॥
आतां न ये मागें । मी आलें याच्या रागें ॥ काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥१॥
कां गो कलित्यां कोल्हाल । तुह्मी भलत्या च सकल ॥ वेचाल ते बोल । झुटे होती बोलिले ॥२॥
याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन ॥ वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥३॥
काज काम नको झालें । बीजें नावरे बोलिलें ॥ याचिया भेदिलें । कामवाणीं अंतर ॥४॥
या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें ॥ घेतलें तें मनें । आतां मानें न फिरे ॥५॥
आतां मोटी वार । माझी नका धरुं चार ॥ तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥६॥

॥६९१३॥
हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥
अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥२॥
वाचा वाच्यत्वासी न ये । कोठें काय करावें ॥३॥
तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥४॥

॥६९१४॥
गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखों आज ॥ सांपडवूनी माज । घरांत धरुनी कोंडूं ॥
उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥
नित्य सोंकवला नेदी सांगो चित्त बोला ॥ आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥२॥
जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी । गडियां ठेवूनी बाहेरी पूर्वद्वारें शिरे ॥
त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें । पाहे तंव देखियलें नवनीत पुढें ॥३॥
उतरोनी सिंकें । पाहे चाखोनियां निकें ॥ गोड तेंचिअ एका एकें । हातीं लांबवितो ॥
जाणे राखती तयांसी । तेथें अधिकचि नासी ॥ माग लावीं हात पुसी । चोरी जाणावया ॥४॥
जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी ॥ मग कोंडूनी भीतरी । घरांत धरियेला ॥
कां रे नागविसी । माझे मुळीं लागलासी ॥ आणवीन तुजपासीं । मागे खादलें तें ॥५॥
दोहीं संधीं वाहे । धरुनी नेती माते पाहे ॥ काय नासी केली आहे । घरामाजी येणें ॥
तुका म्हणे मुख । त्याचें वाढों नेदी दु:ख ॥ दसवंती कवतुक । करुनी रंजविल्या ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP