बाळक्रीडा - ६७५१ ते ६७६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७५१॥
धरी दोहीं ठायीं सारखाचि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥
दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्यली ॥२॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें माय बाप ॥३॥
माय हा जगाची बाप नारायण । दुजा करी कोण यत्न यासी ॥४॥
कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका म्हणे ॥५॥

॥६७५२॥
दिनाचा कृपाळू दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत ह्मणों यासी ॥२॥
यासी कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥
धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपिसवें ॥४॥
गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळीं न देखतां ॥५॥
न देखता त्यांसी उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥
वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका ह्मणे वाचा नातुडे तो ॥७॥

॥६७५३॥
तो बोले कोमळ निष्ठुर साहोनी । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥
करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥
दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥
त्यासी होतां कांहीं अरिष्ट निर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥
शरणागता राखे सर्वभावें हरि । अवतार धरी तयांसाठीं ॥५॥
तयांसाठीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥
तळमळ नाहीं तुका ह्मणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥

॥६७५४॥
मारिले असुर दाटिले मेदिनी । होते कोणा कोणी पीडित ते ॥१॥
ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥
वरिले ते दूतीं यमाचिये दंडीं । नुच्चारितां तोंडीं नारायण ॥३॥
नारायण नाम नावडे जयांसी । ते झाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥
कुंभपाकीं सेख वाज वो जयांचा । तुका ह्मणे वाचा संतनिंदा ॥५॥

॥६७५५॥
वास नारायणें केला मथुरेसी । वधूनी दुष्टांसी तये ठायीं ॥१॥
ठायीं पितियाचें मानी उग्रसेन । प्रतिपाळी जनासहित लोकां ॥२॥
लोकां दु:ख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥
देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥
येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥
काया वाचा मन कृष्णीं रत झालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥
ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका ह्मणे चित्तीं ॥७॥

॥६७५६॥
चिंतिलीं पावलें जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥
वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥
चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥
न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतें वांचूनियां ॥४॥
चुकवूनी जन्म दाखवी आपणा । भजा नारायणा तुका ह्मणे ॥५॥

॥६७५७॥
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्तीं हेवा दुजा कांहीं ॥१॥
दुजा छंदु नाहीं तयाचिये मनी । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥
ध्यान ज्यां हरीचें हरीसी तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥
भाग्यें पूर्व पूण्यें आठविती लोक । अवघे सकळीक मथुरेचे ॥४॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥
राज्यकरी गोपियादवांसहित । कर्मिलें बहुतकाळ तेथें ॥६॥
तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥

॥६७५८॥
रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनी गोमटीं नानारत्नें ॥१॥
रत्नें खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥
कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुती उभारिलीं ॥३॥
उभारिलीं दुर्गे दारवंटे फांजी । कोटि चर्यामाजी शोभलिया ॥४॥
शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥५॥
आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥
निवडीना याति समानचि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥
नारायणें दिलीं अक्षई मंदिरें । अभंग साचारें सकळांसी ॥८॥
सकळ ही धर्मसीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥
रचिलें तें देवें न मोडे कवणा । वळियांचा राणा नारायण ॥१०॥
बळबुद्धीनें तीं देवाच सारखीं । तुका म्हणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥

॥६७५९॥
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरी ॥१॥
ऋद्धिसिद्धि दासी दारीं ओळंगती । सकळ संपत्ति सर्वा घरीं ॥२॥
घरी बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसी संगति गोविंदाची ॥४॥
गोविंदे केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका ह्मणे ॥५॥

॥६७६०॥
कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसी राज्य देव ॥१॥
द्वारकेसी राज्य करी नारायण । दुष्ट संहारुन धर्म पाळी ॥२॥
पाळी वेदाआज्ञा ब्राह्मणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥३॥
अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥
अभिमान नाहीं तुका ह्मणे त्यासी । नेदी आणिकांसी धरुं देव ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP