बाळक्रीडा - ६७४१ ते ६७५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७४१॥
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कईचे वैरभाव ॥१॥
भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरी ॥२॥
वरी हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या ॥३॥
सकळ ही बरी बहुडविले स्थळा । चलावें गोपाळां ह्मणे घरा ॥४॥
राहिली हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलिया डोळें छंदें होतीं ॥५॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसी ॥६॥
त्यांच्या तुका ह्मणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥

॥६७४२॥
समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसी ॥१॥
अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळही ॥२॥
सकळही जन आले गोकुळासी । आनंद मानसी सकळांच्या ॥३॥
सकळांचा केला अंगिकार देवें । न कळतां भावे वांचवी त्यां ॥४॥
त्यां झाला निर्धार हरि आह्मांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥
निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळीक नारायणें ॥६॥
नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका ह्मणे नावां अनुसारे त्या ॥७॥

॥६७४३॥
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥
हें सोंग सारिलें या रुपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥
आहे तुका ह्मणे धर्मसंस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥

॥६७४४॥
अवतार केला संहाराया दुष्ट ॥ करिती हे नष्ट परपीडा ॥१॥
परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो हि भाव आरंभिला ॥२॥
लाविलें लाघव पाहोनियां संधि । सकळांहीं वधी दुष्टजन ॥३॥
दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहती ॥४॥
न साहवे दु:ख भक्तांचे या देवा । अवतार घ्यावा लागे रुप ॥५॥
रुप हे चांगलें राम कृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥
उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जिवें कृष्ण केला ॥७॥
कृष्णरुप त्यासी दिसें आवघें जन । पाहे आपण कृष्ण झाला ॥८॥
पाहीलें दर्पणीं आधिल्या मुखासी । चतुर्भुज त्यासी तोचि झाला ॥९॥
झालीं कृष्णरुप कन्या पुत्र भाज । तुका ह्मणे राज्य सैन्य जन ॥१०॥

॥६७४५॥
सैन्य जन हांसे राया झालें काई । वासपे तो ठायीं आपणासी ॥१॥
आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसी भक्ति नाहीं ॥२॥
नाहीं याचा त्याचा भाव एकविध । ह्मणऊनी छंद वेगळाले ॥३॥
वेगळाल्या भावें ते तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥४॥
हरिला कंसाचा जीवभाव देवें । द्वेषाचिया भावें तुका ह्मणे ॥५॥

॥६७४६॥
द्वेषाचिया ध्यानें हरिरुप झाले । भाव हारपले देहादिक ॥१॥
देहादिक कर्म अभिमान वढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥
नारायण जोडे एकविध भावें । तुका ह्मणे जीवें जाणें लागे ॥३॥

॥६७४७॥
जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥१॥
सावध करितां नये देहावरी । देखोनियां दुरी पळे जन ॥२॥
जन वन हरि झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
झांकूनी लोचन मौन्येंचि राहिला । नाहीं आतां बोळायाचें काम ॥४॥
बोलायासी दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण झालें स्वर्यें रुप ॥५॥
रुप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव जाला ॥६॥

॥६७४८॥
जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥१॥
सावध करितां नये देहावरी । देखोनियां दुरी पळे जन ॥२॥
जन वन हरि झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
झांकूनि लोचन मौन्येंचि राहिला । नाहीं आतां बोळायचें काम ॥४॥
बोलायासी दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण झालें स्वयें रुप ॥५॥
रुप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव झाला ॥६॥

॥६७४८॥
झालों स्वये कृष्ण आठव हा चित्तीं । भेदें भयवृत्ति उरली आहे ॥१॥
उरली आहे रुप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
तोंवरी हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासी तोचि देव ॥३॥
देवरुप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयातीत भेदें ॥४॥
भेदें तुका म्हणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥

॥६७४९॥
वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥
भेद भय गेले नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥२॥
झाली भेटी कंसा हरीशीं निकट । सन्मुखचि नीट येरयेरां ॥३॥
येरयेरां भेटी युद्धाच्या प्रंसगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥
त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका ह्मणे सत्तानायक हा ॥५॥

॥६७५०॥
नारायणें कंस चाणुर मर्दिला । राज्यीं बैसविला उग्रसेन ॥१॥
उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविल अंत अभक्ताचा ॥२॥
अवघेंचि केलें कारण अनंतें । आपुलिया हावें सकळ ही ॥३॥
सकळही केलीं आपलीं अंकित । राहे गोपिनाथ मथुरेसी ॥४॥
मथुरेसी आला वैकुंठनायक । झालें सकळीक एक राज्य ॥५॥
राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता दोन्ही ॥६॥
सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुहा ह्मणे करें शस्त्र धरी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP