निर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


स्नानादि विधि सारल्या नंतर तुकारामबावांनीं देवास व पंचभूतांस आपआपले भाग विभागून देऊन देह निर्वाण केला.

॥६५८१॥
अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघीच दान दिली भूमि ॥१॥
अवघाचि काळ दिनरात्र शुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥२॥
अवघींच तीर्थ व्रतें केले योग । अवघेंचि तें सांग झालें कर्म ॥३॥
अवघेंचि फळ आलें आह्मा हातां । अवघेंचि अनंता समर्पिले ॥४॥
तुका ह्मणे आतां बोलूं अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥५॥

॥६५८२॥
झाला प्रेतरुप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥१॥
रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया ह्मणती हायहाया यमधर्म ॥२॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेसी ॥३॥
फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब झाली ॥४॥
दिली तिळांजुळी कुळनामरुपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥५॥
तुका ह्मणे रक्षा झाली आपोंआप । उजळला दीप गुरुकृपा ॥६॥

॥६५८३॥
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो झाला सोहळा अनुपम्य ॥१॥
आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग झाला ॥२॥
एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें झाला सुकाळ हा ॥३॥
फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी झालों ॥४॥
नारायणें दिला वसतीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥५॥
तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावुनियां ॥६॥

॥६५८४॥
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीसीं ॥१॥
एकवेळ झालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥२॥
अमृतसंजीवनी निवविली खाई । अंगें बये ठायीं हरपलीम ॥३॥
एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥४॥
अवघीं कर्मे झालीं घटस्फोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥५॥
तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥६॥

॥६५८५॥
पिंडदान पिंडें ठेविलें करुन । तिळीं तिळवण मुळत्रयीं ॥१॥
सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रम्हार्पण सेवटींच्या ॥२॥
सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥३॥
पित्यापुत्रत्वाचें झालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥४॥
आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥५॥
तुका ह्मणे केला अवघ्यांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥६॥

॥६५८६॥
हातीं घेऊनियां काठी । तुका लागला कळिवरा पाठी ॥१॥
नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥२॥
काढिलें तें ओढें । मागील उपचाराचे पुढें ॥३॥
नाहीं वाटों आला भेव । सुख दु:ख भोगिता देव ॥४॥
याजसाठीं हें निर्वाण । केले कसियेलें मन ॥५॥
तुका ह्मणे अनुभव बरा । नाहीं तरी शास्त होय चोरा ॥६॥

॥६५८७॥
पिंड पदांवरी । दिला आपुलिया करीं ॥१॥
माझें झालें गयावर्जन । फिटलें पितरांचे ऋण ॥२॥
केलें कर्मांतर । बोंब मारिली हरीहर ॥३॥
तुका ह्मणे माझें । भार उतरलें ओझें ॥४॥
====

अभिमानाचा त्याग करुन देहाचें निरसन केल्यावर सर्वांच्या ऋणांतून मुक्त होऊन प्रतिज्ञा केली होती तिज प्रमाणें आपली काया ब्रह्म केली.

॥६५८८॥
शोधितांचि नये । म्हणोनि ओळंगितो पाय ॥१॥
आतां दिसों नये जाणा । ऐसें करा नारायणा ॥२॥
परतोनी मन । गेलें ठायींच मुरोन ॥३॥
विसरला तुका । बोलों चालों झाला मुका ॥४॥

॥६५८९॥
तान्हे तान्ह प्याली । भुक भुकेनें खादली ॥१॥
जेथें तेंचि नाहीं झालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥२॥
वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥३॥
शेष उरला तुका । जीवीं जीवा झाला चुका ॥४॥

॥६५९०॥
रज्जु सर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥१॥
म्हणोनि आठवितों पाय । घेतों अलाय बलाय ॥२॥
दृश्य द्रुमाकार लाणी । केलें सर्वस्वासी धणी ॥३॥
तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनी उरला लोकां ॥४॥

॥६५९१॥
म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥१॥
हाचि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥२॥
सरतें कर्तृत्व माझ्यानें । परि मी त्याहीहूनी भिन्न ॥३॥
तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥४॥

॥६५९२॥
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥
अवघें एकमय राज्य बोलों चालों नये ॥२॥
दुजयाची सत्ता । न चलेसी झाली आतां ॥३॥
आतां नाहीं तुका । पुन: हारपला लोकां ॥४॥

॥६५९३॥
जन्ममरणांची विसरलो चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥
होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय अनिवार निरसिलें ॥२॥
लिगाडाचें मूळ होतीं पंचभूतें । त्यांचें त्यापुरतें विभागीलें ॥३॥
तुका ह्मणे झाला प्रपंच पारिखा । जीवासी तूं सखा पांडुरंग ॥४॥

॥६५९४॥
एक वेळे केलें रितें कलेवरा । आंत दिला थारा पांडुरंगा ॥१॥
पाळण पोषण न लागे ते सोई । देहाचे ते कांहीं सर्वभाव ॥२॥
माझिया मरणें झाले हे वसती । लागली ते ज्योती अविनाश ॥३॥
झाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका ऐसा कांहीं बोलों नये ॥४॥

॥६५९५॥
नभोंमय झालें जळ । एकी सकळ हरपलें ॥१॥
आतां काय सारासारी । त्यांच्या लहरी तयांत ॥२॥
कैंचा तेथें यावा सांडी । आप कोंडी आपणां ॥३॥
तुका ह्मणे कल्प झाला । अस्त गेला उदयीं ॥४॥

॥६५९६॥
कोणापाशीं द्यावें माप । आपींआप राहिलें ॥१॥
कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥२॥
एकें दाखविले दाहा । फांटा पाहा पुसुनी ॥३॥
तुका ह्मणे सरलें ओझें । आतां माझें सकळ ॥४॥

॥६५९७॥
कोणापाशीं द्यावें माप । आपींआप राहिलें ॥१॥
कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥२॥
एकें दाखविले दाहा । फांटा पाहा पुसुनी ॥३॥
तुका ह्मणे सरलें ओझें । आतां माझें सकळ ॥४॥

॥६५९७॥
पदोपदीं दिल्हें आंग । झालें सांग कारण ॥१॥
रुधवुनी ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥२॥
पुढती चाली मना लाहो । वाढे देहो संतोष ॥३॥
तुका म्हणे क्षर भागीं । झालों जगीं व्यापक ॥४॥

॥६५९८॥
ठकिलें काळा मारिली दडी । दिल्ही कुडी टाकोनियां ॥१॥
पांघरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥२॥
नये ऐसा लागवरी । परतें दुरी लपालें ॥३॥
तुका ह्मणे आड सेवा । लाविली हेवा धांदली ॥४॥

॥६५९९॥
आनंदाचे डोहीं आनंदतरंग ॥ आनंदचि अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगों झालें कांहिंचिया बाहीं । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाच्या आवडी मातेचा डोहळा । तेथिंचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥

॥६६००॥
पाणी पात्र दिगंबरा । हस्त करा सारिखे ॥१॥
अवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥२॥
भिक्षा कामधेनू ऐसी । अवकाशीं शयन ॥३॥
पांघरुन तुका दिशा । केला बास अलक्षीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP