निर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


आळंदीस एकादशीस किर्तनकाळीं काया ब्रह्म
करण्याविषयीं संकल्प केला.

॥६४७९॥
भक्तितें नमन वैराग्यतो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥१॥
देहाच्या निरसणें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥२॥
उदक अग्नि धान्यें झाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥३॥
तुका ह्मणे मज कळते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥४॥
====

मग शंकाकारांस उत्तर दिलें.

॥६४८०॥
वर्ण धर्म करिशी चोख । तरी तूं पावशी उत्तम लोक ॥१॥
तुजला तें नाहीं ठावें । जेणें आंगें ब्रह्म व्हावें ॥२॥
जरी तूं झालासी पंडित । करिसी शब्दांचें पांडित्य ॥३॥
गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥४॥
जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पुजा यंत्र ॥५॥
करिसी साधनाच्या ओढी । जळो याच्या मोडामोडी ॥६॥
तुका ह्मणे देही । संत झाले ते विदेही ॥७॥
====

पुन: शंकाकारास प्रत्युत्तर दिल्हें.

॥६४८१॥
घोंटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं । मुक्तां आत्मस्थिति सांडविन ॥१॥
ब्रह्मभूत होते कायाच किर्तनीं । भाग्यतरीं ऋणी देव ऐसा ॥२॥
सांडविन तपोनिधां अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥३॥
तिर्थभ्रमकांसीं आणिन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥४॥
भक्ति भाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निज ठेवा ॥५॥
धन्य म्हणविन इहलोकीं लोकां । भाग्यें आम्ही तुका देखियेला ॥६॥
====

लोहगांवच्या लोकांच्या प्रेमावरुन तुकोबांचा त्यांच्याकडे ओढा.

॥६४८२॥
तृषाकाळें उदकभेटी । पडे मिठी आवडिची ॥१॥
ऐसियांचा होकां संग । जिवलग संताचे ॥२॥
मिष्टान्नाचा येक भुके । ह्मणतां चुके पुरे ऐसें ॥३॥
तुका म्हणे कळवळा । माय बाळा मध्यें तो ॥४॥
====

लोहगांवीं किर्तन करीत असतां परचक्रानें गांव लुटून लोकांस
त्रास दिला तो सहन झाला नाहीं ह्मणून आपणांस वैकुंठीं
नेण्यास देवाचा धांवा केला ते अभंग

॥६४८३॥
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दु:खी होतें ॥१॥
काय तुह्मी येथें नसालसें झालें । आह्मीं न देखिलें पाहिजे हें ॥२॥
परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥३॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें झालें ॥४॥

॥६४८४॥
काय म्यां मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥
उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥२॥
पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षीसी रोकडें साक्ष आलें ॥३॥
तुका ह्मणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥४॥

॥६४८५॥
भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दु:खी होतां जना न देखवे ॥१॥
आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुह्मी दातारा नेणां ऐसें ॥२॥
भजनीं विक्षेप तेंची पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥३॥
तुका ह्मणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥४॥

॥६४८६॥
बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझ्यागांठीं ॥१॥
जाता आतां आज्ञा घेऊनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करुं कोठें ॥२॥
न घडे यावरी न धरवे धीर । पीडतां राष्ट्र देखोनि जग ॥३॥
तुका म्हणे तुह्मी दिसे मोकलिलें । काय आतां आलें जिवित्वाचें ॥४॥

॥६४८७॥
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणो पोटीं आहे ॥१॥
तरीच नेद्याजी उत्तर । दु:खी राखिलें अंतर ॥२॥
जावें वनांतरा । येणें उद्देशें दातारा ॥३॥
तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥४॥

॥६४८८॥
येईल तुझ्या नामा । लाज म्हणून पुरुषोत्तमा ॥१॥
धीर राहिलों धरुनी । त्रास उपजला मनीं ॥२॥
जगा कथा नाव । निराशेनें नुपजे भाव ॥३॥
तुम्ही साक्षी कीं गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥४॥

॥६४८९॥
नेणें जपतप अनुष्ठान याग । काळें जव लाग घेतलासे ॥१॥
रिघालों या भेणें देवाचे पाठिसीं । लागे त्याचे त्यासी सांभाळावें ॥२॥
मापे माप सळे चालिली चढती । झाली मग राती काय चाले ॥३॥
तुका ह्मणे चोरां हातीं जे वांचले । लाभावारीं आलें वरी लेखूं ॥४॥

॥६४९०॥
कळों आलें ऐसें आतां । नाहीं तुम्हां संतांसीं ॥१॥
तरी विर्ये नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥२॥
आड ऐसें येतें पाप । वाढे ताप आगळा ॥३॥
तुका ह्मणे झाला । हा विठ्ठल हिणशक्ति ॥४॥

॥६४९१॥
लागों दिल्हें आंग । ऐसें कां गा सन्निध ॥१॥
कोण्या पापें उदो केला । तों देखिला प्रळय ॥२॥
न देखवे पीडिला सर्प । जया दर्प विषाचा ॥३॥
तुका ह्मणे भलें । मज तों नवजे साहीलें ॥४॥

॥६४९२॥
धांवा शिघ्रवत । किंवा घ्यावे दंडवत ॥१॥
तुमचा जातो बडिवार । आह्मी तों हीणवर ॥२॥
न धरवे धिर । धांवा नका चालों स्थिर ॥३॥
तुका म्हणे वाणी । माझी लाजिली जी गुणी ॥४॥

॥६४९३॥
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामि जाणे ॥१॥
मनाचिये मुळीं सहावें बैसोन । अकशावे गुण पायांपासीं ॥२॥
भेटीचे तातडी करितसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥३॥
तुका म्हणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रिद साचें ॥४॥

॥६४९४॥
उद्वेगासी बहू फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥
आतां कोण यासि करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥२॥
मज तो अत्यंत दरुषणाचि आस । झाला तरी हो नाश जीवित्वाचा ॥३॥
तुका म्हणे आहे वचनाचि उरी । करितों तोंवरी विज्ञापना ॥४॥

॥६४९५॥
नये नेत्री जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥
तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥२॥
न फळे उत्तर । नाहीं स्वामि जों सादर ॥३॥
तुका म्हणे भेटी । जवें नाहीं दृष्ट दृष्टीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP