मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६४२८ ते ६४७८

अभंग - ६४२८ ते ६४७८

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६४२८॥
वाळॊ जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥
सांडुनि लौकिक झालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे झालों तुका हरिरता ॥३॥

॥६४२९॥
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥
रात्रंदिस पाहिजे जवळी । क्षण त्या निराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातिलें अनंता तुका म्हणे ॥३॥

॥६४३०॥
झालिया नि:शंक फिटला कांसोटा । आतां मणगटा लावा चुना ॥१॥
हाचि नेम आतां न फिरे माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाच्या ॥२॥
घर रिघी झालें पट्टराणी बळें । वारलें सांवळें परब्रह्म ॥३॥
बळियाचा अंगसंग झाला आतां । रतलें अनंताचिये पायीं ॥४॥
तुका म्हणे आम्हा नाहीं लाज आतां । भय धाक चिंता तुका म्हणे ॥५॥

॥६४३१॥
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सरती लोकांमाजी झालें ॥२॥
न धरावा लोभ कांहीं मजविशीं । झालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥

॥६४३२॥
विसरलें कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥
मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी झालें ॥३॥

॥६४३३॥
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥
सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥

॥६४३४॥
दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनियां ॥१॥
बळियाच्या आह्मी झालों बळिवंता । करुं सर्व सत्ता सर्वावरी ॥२॥
तुका ह्मणे आह्मी जिवाच्या उदारा । झालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥

॥६४३५॥
क्षणभरी आह्मीं सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दु:खाचिया ॥२॥
तुका ह्मणे येथें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥

॥६४३६॥
आह्मां आह्मी आतां वडिल धाकुटीं । नाहीं पाटी पोटीं कोणी दुजें ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आह्मांसवें सर्व भोगी ॥२॥
तुका ह्मणे अंगसंग एके ठायीं । असो जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥

॥६४३७॥
सर्व सुख आम्ही भोगूं सर्वकाळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठीं सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरुं । औषध जें करुं फळ नव्हे ॥३॥

॥६४३८॥
एका जीवें आतां जिणें झालें दोहीं । वेगळिक कांहीं नव्हे आतां ॥१॥
नारायणा आम्हां नाहीं वेगळिक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥
तुका म्हणे झालें सायासाचे फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥

॥६४३९॥
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवा सुखें करुं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥

॥६४४०॥
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिने बाइयानों ॥१॥
न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥
तुका म्हणे झालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥

॥६४४१॥
शिकविलें तुम्ही तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥
प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥

॥६४४२॥
सांगतों तें तुम्हीं आइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूम नका ॥१॥
जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥
तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥

॥६४४३॥
आजिवरी तुम्हां आम्हां नेणपण । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥
आतां अनावर झालें अगुणाची । करुं नये तें चि करीं सुखें ॥२॥
तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्हीं । कुळें एक मनीं नारायण ॥३॥

॥६४४४॥
सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चिं ॥१॥
सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥
न व्हावी ते झाली आमची भंडाई । तुका म्हणे कायी लाजों आतां ॥३॥

॥६४४५॥
मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥
आतां तुम्ही पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥
तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसी संग सरी तुम्हां आम्हां ॥३॥

॥६४४६॥
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें शीर ॥१॥
संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥
तुका म्हणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥३॥

॥६४४७॥
आइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥१॥
नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥२॥
तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥३॥

॥६४४८॥
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥
भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरुनि मना बंद द्यावा ॥२॥
तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥

॥६४४९॥
बहुतांच्या आम्ही न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥

॥६४५०॥
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥१॥
मागिलांचें दु:ख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥
तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥३॥

॥६४५१॥
न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥
मानेल त्या तुम्ही आइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही फिरावें बहुतीं । माझी तों हे गती झाली आतां ॥३॥

॥६४५२॥
न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥
आतां तुम्हां पुढें जोडितसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥
तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥

॥६४५३॥
एकली राणा गोविंदा सवें । गेलें ठावें तें झालें ॥१॥
मज न ह्मणा न ह्मणा शिंदळी । नाहीं विषम जवळी आतळलें ॥२॥
नव्हती देखिली म्यां वाट । ह्मणोनि हा धीट संग केला ॥३॥
भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥४॥
सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवें ॥५॥
आहेव मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥६॥
तुका ह्मणे सेवटा नेलें । संपादिलें उभयतां ॥७॥

॥६४५४॥
होतें बहुत हें दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ॥
व्हावी भेटी ते झाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसी वो ॥१॥
स्थिर स्थिर मज चि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ॥
येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपात आलें तें दुसरें वारा वो ॥२॥
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी ॥
नाहीं लौकिक स्मरला आवडीं । आतां येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥३॥
उदयीं उदय साधिला आवकाश । निश्चिंतीनें निश्चिंती सावकाश ॥
धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता नये दिवस वो ॥४॥

॥६४५५॥
स्वयें सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ॥
अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्व साक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥
आपाआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न सांडिती बोल ॥
एका मेघ:शामें जलधर बोल । रसी उताविळ हृदय सखोल वो ॥२॥
एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरी ॥
अंध बहिर हे प्रेत लोकाचारी । त्याची कीर्ती गाईली पुराणांतरीं वो ॥३॥
स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर ॥
परस्परें हें सादरासादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥४॥
भक्तिवल्लभ न तुटे चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ॥
दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरी वो ॥५॥
तुका लाधला हें उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून ॥
पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥६॥

॥६३५६॥
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥
परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासुनि ॥२॥
झालें तरीं काय तंट । आतां घट न संडे ॥३॥
तुका म्हणे चक्र चाळे । वेड बळें लाविलें ॥४॥

॥६४५७॥
याचा तंव हा चि मोळा । देखिला डोळा उदंड ॥१॥
नेदी मग फिरों मागें । अंगा अंगे संचरे ॥२॥
कां गा याची नेणां खोडी जीभा जोडी करितसा ॥३॥
पावरे तें बहु काळें । घोंगडे ही ठायींचें ॥३॥
अंगीं वसेचिना लाज । न ह्मणे भाज कोणाची ॥४॥
सर्वासाक्षी अबोल्यानें । दुश्चित कोणें नसावें ॥५॥
तुका ह्मणे धरिला हातीं । मग निश्चिती हरीनें ॥६॥

॥६४५८॥
कोंडिलागे माज । निरोधुनि द्वार ॥ राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥
हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी ॥ घाला गांठीं धरी । जीवें माय त्रासाया ॥२॥
तेंचि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड ॥ लावुनी चरफड । हात गोउनी पळावें ॥३॥
संशयाचें बिरडें । याचे निरसले भेटी ॥ घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥४॥
तुका येतो काकुलती । वाउगिया सोड ॥ यासीच निवाड । आह्मी भार वाहिका ॥५॥

॥६४५९॥
तन मन माझे गोविंदाचे पायीं । वेधियलें बाई न सुटे चि ॥१॥
गोत वित्त चित्त नाठवेसें झालें । मन विसरलें मनपणा ॥२॥
लज्जा भय चिंता द्वेष मोह दु:ख । तहान ही भूक विसरलें ॥३॥
विसरलें कूळ यातीचा स्वभाव । मिराशीचा गांव एक झाला ॥४॥
लागली समाधी नाठवे दुसरें । झालें एकसरेम तद्रूपचि ॥५॥
चिदानंदीं वृत्ती झालीसे निमग्न लावियले लग्न स्वरुपेंसी ॥६॥
अखंड समाधी गोविंद नामाची । असे माझें मींचि तदाकार ॥७॥
तदाकार वृत्ती गोविंदाचे पायीं । तुका ह्मणे नाहीं दुजें आतां ॥८॥

॥६४६०॥
वेधियेलें मन विसरलें देह । पती सुत गेह धन वित्त ॥१॥
नाठवेचि भोग नाना उपचार । पडला विसर वासनेचा ॥२॥
चिंता भय लज्जा निमालें हें दु:ख । वोसंडलें सुख ब्रह्मानंद ॥३॥
विसरली मान पीदा करीजन । दिसे नारायण विश्वामाजी ॥४॥
तुका ह्मणे देह दिला पंढरीशा । तेव्हां ऐशी दशा आंगा आली ॥५॥

॥६४६१॥
हसूं रुसूं आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवा सुखें करुं आनंदवचन । आह्मी नारायण एका एकीं ॥२॥
तुका ह्मणे आतां झालें उदासीन । आपुल्या आधीन केला पती ॥३॥

॥६४६२॥
आलियें धांवति धांवति भेट होइल म्हूण । तंव ते टळली वे वो माझा उरला सीण ॥१॥
आतां काय करुं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥२॥
लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दु:ख पावल्यें पीडा ॥३॥
जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥४॥

॥६४६३॥
हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥
आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥२॥
पारखियासी सांगतां गोष्टी । घरची कुटी खातील ॥३॥
तुका ह्मणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं धणीवरि ॥४॥

॥६४६४॥
धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥
चोरुनियां तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥२॥
दोन्हीं ठायीं समाधान । सम कठिण बहुतचि ॥३॥
तुका ह्मणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥४॥

॥६४६५॥
उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया ॥१॥
वेटाळिला भोंवता हरी । मयुर फेरी नाचती ॥२॥
मना आलें करिती चार । त्या फार हा एकला ॥३॥
तुका ह्मणे नारायणीं । निरंजनीं मीनलिया ॥४॥

॥६४६६॥
आलिंगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥
न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥२॥
वचनासी वचन मिळे । रिघती डोळे डोळियांत ॥३॥
तुका ह्मणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥

॥६४६७॥
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥
अवघियांची जगनिंद । झाली धिंद सारखी ॥२॥
अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥३॥
तुका ह्मणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥४॥

॥६४६८॥
येथील जे एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥
किती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥२॥
अवघे दिवस गेले कामा । नाहीं जन्मा खंडण ॥३॥
तुका ह्मणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥४॥

॥६४६९॥
जैशा तुह्मी दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥१॥
नका येऊं देऊ आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥२॥
अवघा हाचि राखा काळ । विक्राळचि भोंवता ॥३॥
तुका ह्मणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥४॥

॥६४७०॥
बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥१॥
बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥२॥
नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगऋणी ॥३॥
ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे धांवे खाऊं ॥४॥

॥६४७१॥
काय करावें तें आतां । झालें नयेसें बोलतां ॥१॥
नाहीं दोघाचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥२॥
होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥३॥
तुका ह्मणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥४॥

॥६४७२॥
हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥१॥
केला ऋणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥२॥
घालोनियां भार माथां । अवघी चिंता वारली ॥३॥
तुका ह्मणे वचनासाठीं । नाम कंठीं धरोनि ॥४॥

॥६४७३॥
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥
याची झाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥२॥
बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥३॥
तुका ह्मणे मुळें । खंड झाला एका वेळे ॥४॥

॥६४७४॥
न गमे न गमे न गमे हरिविण । न गमे न गमे न गमे । मेळवा शाम कोणी गे ॥१॥
तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा ओसा वो ॥२॥
नाठवे भूक तान विकळ झालें मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥३॥
जरी तुह्मी नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥४॥

॥६४७५॥
एक वेळे तरी जाईन माहेरा । बहूजन्म फेरा झाल्यावरी ॥१॥
चित्ता हे बैसली अविट आवडी । पालट ती घडी नेघे एकी ॥२॥
करावें तें करी कारण शरीर । अंतरीं त्या धीर जीवनाचा ॥३॥
तुका म्हणे तरी होईल विलंब । परी माझा लाभ खरा झाला ॥४॥

॥६४७६॥
उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥१॥
जिव्हाळ्याच्या काठी उबाळ्याच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥२॥
तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥३॥
तुका ह्मणे ऐसी नोवर्‍याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥४॥

॥६४७७॥
एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी ॥१॥
कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥२॥
जाउनि पडे दुर्धटवनीं । श्वापदानीं वेढिली ॥३॥
मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें ॥४॥
मागील मागे अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥४॥
तुका ह्मणे चिंतीं यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥५॥

॥६४७८॥
पडली घोर रजनी । संगीं कोणी नसे चि ॥१॥
पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥२॥
कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥३॥
मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥४॥
तुका ह्मणे कैंची उरी । दोहीपरी नाडिलें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP