मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६३९६ ते ६४१४

अभंग - ६३९६ ते ६४१४

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६३९६॥
माहेरेंचा काय येईल निरोप । ह्मणऊनी झोंप नाहीं डोळां ॥१॥
वाट पाहें आस धरुनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी वाहे ॥२॥
बोटवरी माप लेखीतों दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥३॥
काय नेणों संतां पडिला विसर । कीं नव्हे सादर मायबाप ॥४॥
तुका ह्मणे तेथें होईल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥५॥

॥६३९७॥
परी तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडो नेदी ॥१॥
बहु कानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥२॥
सांगितल्याविणें अंतरींचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥३॥
बहुमुखें कीर्ति आइकिली कानीं । विश्वासही मनीं आहे माझ्या ॥४॥
तुका ह्मणे नाहीं जात वांयाविण । पाळितो वचन बोलिलों तें ॥५॥

॥६३९८॥
यावरी न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होईल पुढें ॥१॥
करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥२॥
जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हे भरोवरी करी चित्त ॥३॥
आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचेही वेग वावडती ॥४॥
तुका ह्मणे तेव्हां होतील निश्चळ । इंद्रियें सकळ निरोपानें ॥५॥

॥६३९९॥
होईल निरोप घेतला यावरी । राऊळाभीतरीं जाऊनियां ॥१॥
करुनियां दधिमंगळ भोजन । प्रयाण शकून सुमुहूर्त ॥२॥
होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥३॥
येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधानें होतीं संतीं ॥४॥
तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहती कळस परतोनी ॥५॥

॥६४००॥
ऐसी ते सांडिली होईल पंढरी । येत वारकरी होते वाटे ॥१॥
देखिले सोहळे होती आठवत । चालती ते मात करुनियां ॥२॥
केली आइकिली होईल जे कथा । राहिलें तें चित्ता होइल प्रेम ॥३॥
गरुडटके टाळ मृदंग पताका । सांगती ते एकां एक सुख ॥४॥
तुका म्हणे आतां येती लवलाहीं । आलिंगनीं बाहीं देइन क्षेम ॥५॥

॥६४०१॥
क्षेम मायबाप पुसेन हें आधी । न घलीं हें मधीं सुख दु:ख ॥१॥
न करीं तांतडी आपणांपासूनी । आइकेन कानीं सांगती ते ॥२॥
अंतरींचें संत जाणतील गुज । निरोप तो मज सांगतील ॥३॥
पायांवरी डोई ठेवीन आदरें । प्रीतिपडिभरें आळिंगून ॥४॥
तुका म्हणे काया करी न कुरवंडी । ओंवाळून सांडीं त्यांवरुन ॥५॥

॥६४०२॥
होईल माझीं संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥१॥
शृंगारुनी माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥२॥
क्षेम आहे ऐसें होईल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ ॥३॥
अवस्था ह्मणे सवें येईल मुर्‍हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥५॥

॥६४०३॥
दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥
करिती निरास नि:शेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥२॥
लौकिकाची तरी धरतील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥३॥
अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥४॥
व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका ह्मणे मना मन साक्ष ॥५॥

॥६४०४॥
बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन तेचि सोई ॥१॥
घडीघडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥२॥
न बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥३॥
इंद्रियांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली येचि ठायीं ॥४॥
एकसरें सोस माहेरासी जावें । तुका ह्मणे जीवें घेतलासे ॥५॥

॥६४०५॥
नाहीं हानि परि न राहावे निसुर । न पडे विसर काय करुं ॥१॥
पुसाविसी वाटे मात करुनियां । पाठविती न्याया मूळ मज ॥२॥
आणीक या मना नावडे सोहळा । करितें टकळा माहेरींचा ॥३॥
बहु कामें केलें बहु कासावीस । बहु झाले दिस भेटी नाहीं ॥४॥
तुका ह्मणे त्याचें न कळे अंतर । अवस्था तों फार होते मज ॥५॥

॥६४०६॥
तोंवरि म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥१॥
कोणाचिया मुखें तंट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥२॥
दिसे हानि परि निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव ॥३॥
आपुलिया भोगें होईल उशीर । तोंवरि कां धीर केला नाहीं ॥४॥
तुका म्हणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठावी आहे ॥५॥

॥६४०७॥
माहेरींचें आलें मज माहेर । सुखाचें उत्तर करीन त्यासी ॥१॥
पायांवरी माथां आलिंगीन पायीं । घेईन लवलाहीं पायवणी ॥२॥
सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥३॥
आपुलें जीवींचें सुखदु:ख भावें । सांगेन आघवें आहे तैसें ॥४॥
तुका ह्मणे वीट नेघें आवडीचा । बोलिलीच वाचा बोलवीन ॥५॥

॥६४०८॥
वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥१॥
विसरु न घडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥२॥
कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें ॥३॥
निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥४॥
तुका ह्मणे हित चित्तें ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥५॥

॥६४०९॥
आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥१॥
सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥२॥
काय लाभ झाला काय होतें केणें । काय काय कोणें सांटविलें ॥३॥
मागणें तें काय धाडिलें भातुकें । पुसेन तें सुखें आहेतसीं ॥४॥
तुका ह्मणे काय सांगती ते कानीं । ऐकोनियां मनीं धरुनी राहें ॥५॥

॥६४१०॥
काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥१॥
काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी तेचि खरी ॥२॥
काय म्यां तेथींचें रांधिलें चाखोनी । तें हें करी मनीं विवंचना ॥३॥
आणीकही त्यासी बहुत कारणें । बहु असे जिणें ओढीचेंही ॥४॥
तुका ह्मणे आह्मां बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥५॥

॥६४११॥
आम्हां आराणूक संवसारा हातीं । पडिली नव्हती आजीवरी ॥१॥
पुत्रदाराधन होता मनीं धंदा । गोवियेलों सदा होतों कामें ॥२॥
वोडवलें ऐसें दिसतें कपाळ । राहिलें सकळ आवरोनीं ॥३॥
मागें पुढें कांहीं न दिसे पाहातां । तेथूनियां चिंता उपजली ॥४॥
तुका ह्मणे वाट पाह्याचें कारण । येथींचिया हीन झालें भाग्य ॥५॥

॥६४१२॥
बहु दिस नाहीं माहेरींची भेटी । झाली होती तुटी व्यवसायें ॥१॥
आपुलाल्या होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगे आठवलें ॥२॥
तोडिलें तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥३॥
बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळीच पर एक तेंही ॥४॥
काय जाणों मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका ह्मणे ॥५॥

॥६४१३॥
होतीं नेणों झालीं कठिणें कठीण । जवळीच मन मनें ग्वाही ॥१॥
आह्मी होतों सोई सांडिला मारग । घडलें तें मग तिकूनही ॥२॥
निश्चिंतीनें होतें पुढिलांचि सांडी । न चाली ते कोंडी मायबापा ॥३॥
आह्मां नाहीं त्यांचा घडला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥४॥
तुका ह्मणे झालें धर्माचें माहेर । पडिलें अंतर आह्मांकूनी ॥५॥

॥६४१४॥
आतां करावा कां सोस वांयांवीण । लटिकाचि सीण मनासी हा ॥१॥
असेल तें कळों येईल लवकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥२॥
बहु विलंबाचें सन्निध पातलें । धीराचें राहिलें फळ पोटीं ॥३॥
चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी पाउलांची ॥४॥
तुका ह्मणे आसे लागलासे जीव । ह्मणऊनि कींव भाकीतसे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP