॥सर्ग॥ ११७

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

॥अभंग॥ वेडावली वाणी वेदाची बोलतां । देव पाहो जातां अनिर्वाच्य ॥१॥
अनिर्वाच्य देव वाचा बोलूं गेली । जिव्हा हे चिरली भूधराची ॥२॥
भूधराची जिव्हा जाहली कुंठित । दास ह्मणे अंत न कळे त्याचे ॥३॥

॥वोवी॥ जया देवाचा करितां शोध । वेदवाणी ते जाली मंद । शेष शाहणा तो जाला स्तब्ध । जीभ चिरोन जाली द्विधा ॥१॥
जया देवाचा न लागे आंत । अटक्य पडे थोरथोरांत । वार्तिकार ते चालीले भ्रमत । विदित इतरांत काय हें ॥२॥
देव तो आद्य अगोचर । निर्विकल्पीं नित्य निराधार । अनिर्वाच्य अनाम्य अगोचर । निजनिर्गुण निरंजन ॥३॥

॥अभंग॥ कां देव कळेना श्रोतेनो ह्मणाल । भिन्नत्वाच बळें न चाले ची ॥१॥
मायामय सर्व सारुनिया माग । करुं जातां लाग परात्परी ॥२॥
वृत्ति ना निवृत्ति नाही मीतूंपण । तदाकारी खूण न सांगवें ॥३॥
जेथें यतो वाचोनिवर्तंते श्रुती । दुजी नेति नेति अनिर्वाच्य ॥४॥
अप्राप्य मनसा सह दूजी खूण । बोलण चालणें तेथें कैच ॥५॥
सीणले ज्यासाठीं आगम नीगम । स्वयें आत्माराम सर्वातीत ॥६॥

॥वोवी॥ देव आहे हें सर्वां ठाऊक । प्रत्यक्ष पाहणें घडे कौतुक । तेथें चि जन्माचें होय सार्थक । न चोजे कां अटक भ्रमाचा ॥४॥
तंव श्रोतयांनीं उभविला प्रश्न । देव तो अनंतु नामरुपविहिन । तरि सगुणाकार येवढा जाला कोठुन । जी ऐकाव वचन समर्थ ॥५॥

॥अभंग॥ देव निराकार त्या नाहीं आकार । तरी हा विस्तार०॥च०॥६॥

॥वोवी॥ निर्विकारी कांहीं च न घडे । विकारें विकार वाढे मोडे । देवद्वार उघडे कैवल्य जोडे । कर्त्यांची वळखी धरिल्यानें ॥६॥

॥पद॥ धाट सद्गुरु सेवीतां० ॥चंचळ चपळ रे प्राणनाथ । जातां न लगे वेळ रे ॥धृ०॥ बोलवि चालवितो तो प्राणनाथ । नयेन हालवितो ॥१॥
देखत चाखतसे तो प्राणनाथ । बोलत ऐकतसे ॥२॥
हुंगत सांगतसे तो०॥ देतसे मागतसे ॥३॥
सुखदु:खे भोगीतो तो०। आनंदतो सीणतो ॥४॥
सकळ कळे तो चि तो तो० । निजतत्व तो चि तो ॥५॥
पाहतां जवळी तो० । कल्पना विवळीतो ॥६॥
बहु शरिरें चालवितो प्राणनाथ । श्रुष्टी सकळ हालवितो तो ॥७॥
स्वर्गमृत्य पाताळी तो० । खेळतितो तीहीं ताळीं ॥८॥
नर अमर पतंग तो० । खेळवि सकळ जग ॥९॥
आखंड जवळी आसे तो० । त्यासी तो चि विलसे ॥१०॥
स्वामी सेवक वर्तवितो प्राणनाथ दाखवीतसे कवी ॥११॥

॥वोवी॥ प्राणनाथ जो सर्वाकारण । तो रमतां फिरोन आपणि आपण । जडमाया ते जाय निरसूण । देव तो सघन होय स्वयें ॥७॥
ऐसियापरी करीत प्रबोध । स्वयें स्वरुपीं होउनि सित्ध । क्रिया जनीं या दावीत शूत्ध । पर्याटत चालिले कोण ऐका ॥८॥
समर्थदासाचा सिष्य विख्यात । कल्याणस्वामी थोर सद्भक्त । याचे सिष्य जो मान्य संतात । शिवाजीबावा अपचंदकर ॥९॥
पाहोन जयाची उदासस्थिती । गुरु वदती याला रक्षो रघुपती । गळा पडलीसे न सुटे विरक्ती । शूर सद्वंशी सुंदरु ॥१०॥
अचूक जयाच पाठांतर । श्लोकादि चौर्‍याऐसी हजार । लवाभिधानी जो श्रीरामपुत्र । अंशावतार होय तयाचा ॥११॥
सखा जालासे पवननंदन । निस्पृही मोठे ज्ञानसंपन्न । बहुत जनाला केलें पावन । ऐका चरित्र मुळींहुनी ॥१२॥
लीळा वानाया न पुरे मुख । अभंग बोलिला जो समर्थदेशिक । रहणीं तयाच्या होतो सार्थक । ऐकोन आणा हो ध्यानासी ॥१३॥

॥अभंग॥ धन्य त्याच कुळ धन्य त्याचा वंश । जे कुळीं हरिदास अवतरला ॥च०॥१०॥

॥वोवी॥ चरणपदबंदीवत चरित्रें । जालीं पुढारीं कळेल विस्तार । प्रस्तुत ऐका होऊन सादर । लीळा गुरुची मुळींहुनीं ॥१४॥
ग्रामनाम वदती वैराट वांई । देशपांडे तेथील गुणग्राही । शंकरपंत तो जाला तपस्वी । भार्या अक्काई पतिव्रता ॥१५॥

॥अभंग॥ धन्य तो चि नर इछितु सार्थक । जाला पुण्यश्लोक बळें जगीं ॥१॥
धन्य तो गृहस्थ संकल्पसंताप । टाकुनीया तप साधीतसे ॥२॥
धन्य पतिव्रता नातळे अधर्मा । सदां मनीं प्रेमा परमार्थ ॥३॥
धन्य ऐसियाच उंदरीं अवतार । केला योगेश्वर तारुं जगीं ॥४॥
मुख्य आत्माराम जाला जेथ वस्य । घडावा सहवास ऐसियाचा ॥५॥

॥वोवी॥ पंत तो लिंबाचा सेउनि रस । अन्य पदार्थी न धरितां ध्यास । त्रयचारमहिने वरिस षण्मासा । कष्टतां हरी आसे प्रसन्न ॥१६॥
कळा न उतरे न वाळे काया । न ये चंचळता न झोंबे माया । परमार्थाचा ध्यास लागुनिया । उदास आसती सर्वकाळीं ॥१७॥
सुज्ञ उदारी तपस्वी मोठा । सुकृतांशाचा होऊनि साठा । पुण्यवंत प्रतापी आले पोटा । जाले त्रय पुत्र येक कन्या ॥१८॥
करुनी तयाच उपनैन लग्न । अति उदासी जाला सुज्ञ । गुरुरायाच करीत शोधन । डोंबगावासि पातले ॥१९॥
कल्याणस्वामी आसे महंत । मुक्तिप्रदाता हा वळखोन सत्य । षडवर्ग ही जाले अनुग्रहित । सेवा संपादित राहिले ॥२०॥
देखोन तयाच भक्तिभाव पूर्ण । संतोष पावले गुरु दयाघन । प्रपंचमिरासी आस्था टाकुन । वैराग्यपंथीं वेधलें ॥२१॥
शिवाजीबावा वडील पुत्र । प्रपंच नावडे जया अणुमात्र । भार्या गंगाई सुंदरा पवित्र । जाली शाहणी कुळवंती ॥२२॥
परि बावामानसी नसे वासना । न ठावा ज्याला कामना कल्पना । विवाहसमई न घालितां मना । अग्रहोन लग्न केलेति ॥२३॥
शंकरराय तो पिता सर्वज्ञ । संतोष पावती वळखोन चिन्ह । मायबाईला न कळे खूण । ममता झोंबुन बुत्धि सांगे ॥२४॥
न ऐकतां तेणेंचिंतेनें माता । गुरुरायासि कळवितां वार्ता । स्वामींनीं ही कसवटी लावितां । न डंडळे चि मन ज्याच ॥२५॥
गुरुराज तेणें हौउनि प्रसन्न । झोळी काठी मेखळा निशान । वोपितां महंतीच बानीं धरुन गुरुरायात तोषविलें ॥२६॥
पाहोन येकदां येकांत समय । कांतेस पूसती जासील काय । धाडितील माहेरा सण ही आहए । भावोन त्रिवारे हो ह्मणतिली ॥२७॥
पाहोन कृपेनें आले बाहेरी । श्रीरामरुपीं मिळाली नारी । शोचिता मातेनें नानापरी । खुणोन पित्यानें समजाविलें ॥२८॥
उदरा आलासे हा सद्वंशरत्न । ब्रह्मचारी व्रतस्छा निपुण । लीळा जयाची करील पावन । जत्तन करी वो मन राखी ॥२९॥
तरी ही मायेला न सुटे ममता । पुन्हा उजळिजे हे धरुन आस्था । होऊं गुरुआज्ञा पुसायां जातां । हांसोन बोलिले ऐक बाई ॥३०॥
जंव संभ्रमानें मांडिल लग्न । तंव घातल आसे यांनीं कौपीन । साह्य जालासे अंजनीसूत । करुं द्या महंती कां खटपट ॥३१॥
हे गुरुवरदानें तुष्टली आई । कन्या ते राहिली श्वश्रूरग्रहीं । घेउनि समुदाया शिवगोसावी । तीर्थक्षेत्र पाहवीत चालिले ॥३२॥
जिकडे तिकडे पावती मान । संतसाधु ते करिती प्राण । ऐकतां जयाच सयोग्य कीर्तन । शरणांगत होती जन बहु ॥३३॥
शापानुग्रहसामर्थ्यवंत । तो शंकराजीबावा पीता समर्थ । येऊनि राहिले वढेहाळात । तुळजापुरापैलीकडे ॥३४॥
तो पिता योग्याचे सिष्यामाजीं । संग्रहीं होता येक तो भानजी । गांवकरी ते होउन राजी । करुनि दीधले मठस्थळ ॥३५॥
आसतां ते स्छळीं शिवरामदेशिक । केशवनामा कोणी भाविक । विनवितु पाई ठेउनि मस्तक । विद्यादान माते वोपिजे ॥३६॥
काय विद्या ते म्हणतां तुष्टुन । करीन ह्मणे मी सर्वदा कीर्तन । तो वरदयुक्त येक सिकविलें वचन । कर्ता गुरुराज भाउनी ॥३७॥

॥पद॥ धाटी । खेळे पुतनारी० ॥नित्य स्मर तुं कल्याण वाचे ॥धृ०॥ दोष दु:ख सर्व तापत्रयादिक ।
शांत होती जीवाचे ॥१॥
सांडुनिया सर्व माईक धंदा । तोडोनि पाश भवाचे ॥२॥
सर्व मनोरथ सफळित जाले । ज्याचेनि पूर्ण शिवाचे ॥३॥

॥वोवी॥ तेणें बुत्धि ते जाली विषाळ । लिहोन दीधले भरणा पुष्कळ । कीर्तन करुं लागला रसाळ । गुरुराज प्रसन्न याहेतु ॥३८॥
धन्य पिता तो तपस्वी पुरुष । मिळे लिंबाचा प्रसाद ज्या रस । प्रबुत्ध तात्काळी होती सिष्य । वरवाक्य खालीं न पडे ची ॥३९॥
भाळोन सर्वदा तप हृदयधामीं । वास्तव्य केलासे रामदासस्वामी । वसिष्ठमुनि जसा प्रपंचधर्मी । वर्तोन केला जन्म सफळ ॥४०॥
राहिले त्या गांवी कांही दिवस । कळवोन सर्वत्रां गुज रहस्य । सस्वरुपीं जाले समरस । विधान सर्व ही सारिलें ॥४१॥
समंधी भले आसे त्या ठाउक । ब्रह्मवेत्याला न कीजे दु:ख । भिक्षा साहित्य वरुनि हरिख । उत्साव केले यथास्थित ॥४२॥
जगन्नाथबावा तडवळेकर । आणिखी सत्पुरुष थोर थोर । आले सुखविलें संतोषभरें । गाईले कीर्तनीं स्वल्प ऐका ॥४३॥

॥पद॥ श्रीगुरुचरणीं चित्त लावी रे बापा ॥धृ०॥ माझें माझें बकतोसि वायांविण थिंकतोसी घडी घडी काळ टपलावी ॥१॥
द्रव्यदारा गारा सारा सर्वासि पाहिजे थोरा । सेवट हे माया मोकलावी रे ॥२॥
चक्रवती आले गेले नेणो जीव किती मेले । बुत्धि हे अंतरीं निवळावी रे ॥३॥
येथुनीया तेथेंवरी शाश्वत कल्याण हरी । पांच ही पंचक नीवेदावि रे ॥४॥

(॥धा०लावोनिया लो०॥) देवाधिदेव मुख्य प्राप्तीचा नरदेह ठाव तयासि नेणतां व्यर्थ जाय रे ॥१॥
जन्मुनि साधिलें सार काय रे । मिथ्याभूतमाया सर्व पाहे रे ॥धृ०॥
सर्व देवामध्यदेव तो हा श्रीगुरुपाव । कां रे आव्हेरिले त्या पाया रे ॥२॥
पूर्णब्रह्म सदोदित नित्य शाश्वत संचल । खूण ठाकेना कल्याण पदठाया रे ॥३॥

(धा० देहाभिमान वाहे)॥) लवण सिंधु जेव्हां । वेगळ नुरे तेव्हां ॥१॥
शरण तसा जासी तैं ब्रह्म रुप होसी ॥धृ०॥ वोहळ मिळे गंगा । तैं नाव काय पैंगा ॥२॥
शर्करा क्षिरीं गेली तैं भिन्न कोण केली ॥३॥
जगजीवनप्रभूसंगीं । ते अळी होय भृंगी ॥४॥

॥वोवी॥ व्याख्यान करकरुं केलें कीर्तन । स्वस्थळासि गेले पावोन मान । पिताचे शिवाजीबावाचे सद्गुण । वानोन कळविती बहुतासी ॥४४॥
तिघे पुत्र ही प्रतापवान । कां काशांत सांगा पडेल नून्य । करुन समाधीवृंदावन । भानजीस नेमिले पूजावया ॥४५॥
शिवरामस्वामी पितरभक्त । जाणोन चिंता लागली मातेतें । पुत्रीस भेटउं बांधवासहित । कानुडामुलकासी पातले ॥४६॥
निष्ठा जयाची गुरुपादपद्मीं । तेणें प्रसन्नु रामदासस्वामी । बहुतांस वागउं सांप्रदायक्रमीं । बुद्धि देउन धाडिले ॥४७॥
नरावणगावीं होते सोई रे । ते तरले भक्तीनें तोषले सारे । श्रीरामभक्तिचे लाउन फरारे । राहिले स्वामिनीं भक्तिस्तव ॥४८॥
नरावण सलगरा चिंचमसूर । अर्णकल्लु रटकल्ल मडकी नागुर । कलबरगा मुडवळ चित्तापुर अवरंगाबाद तळघाट ॥४९॥
सिष्यवर्ग जाले या पुण्यपात्रगांवी । आणिखी बहुदेशीं ठाई ठाई । सिष्यवर्ग जाले गृहस्थ निस्पृही । तपपुण्य जयाच अगाध ॥५०॥
सातारामाजीं आसती सिष्य । कोल्हापुरप्रांती नांदती बहुवसें । समागमीं वागती पुण्यपुरुष । सेवा संपादित हित साधित ॥५१॥
रामजीबावा रामकृष्णबावा । गंगाजीबावा दामोदरबावा । रामबा भीमबा शामबावा । अपाजीबावा सहदंपती ॥५२॥
चिमा बहिणाई कासीबाई । आणिखि ही थोरसान निस्पृही । यासहित येकदां गुरुगोसावी । अपचंद शिंवारीं पातले ॥५३॥
लाहन खेडा तो नाममात्र वोस । बाभळ बन दाटी भय ही आसे । नदितटीं उतराया मुसाफरास । धैर्य न होय जाती पुढें ॥५४॥
तो कवण्याच्याही न पडतां दृष्टी । सन्मुखी पातला भीम जगजेठी । सांगे मम मूर्ती आसे भूपोटीं । काढुन स्थापी पूजा करी ॥५५॥
उपासना वाढवी या गावांत । प्रीत वाटेल रामदासांत । पैलाडराणीं कंठींहणुमंत । आसे दर्शन घेई पां ॥५६॥
वदोन यापरी होता गुप्त । सद्गुरुधण्याला वाटल विस्मित । मग चिंतन सुराहुन अंबलगेंत । येऊन राहिले भक्ताघरीं ॥५७॥
सत्शिष्य तेथील रायाजी पंत । श्रीरामनौमीला देतां साहित्य । तें आणोनिया रटकल्लमठांत । उत्छाव केलें ससांग ॥५८॥
भक्तजन मिळाले यात्रा फार । भिक्षा ही येतसे वरचेवर । गावींचा यजमान मराठा क्रूर । तो ही सर्वदा रुजु आसे ॥५९॥
सकळास कळविलें क्रमादिरीती । अद्यापी तेथें चाले पत्धती । कीर्तन जयाच ऐकोन वृत्ती । पालटोन शरण बहु आले ॥६०॥
श्रीरामजन्म अहिल्योत्धार । सैंवरादिसिंहासनविस्तारे । वानिले त्यांतील येक दोन सुंदर । वाक्य ऐका हो प्रीतीनें ॥६१॥

॥पद॥ (धाट जाग जोगी०) शंभुमहादेवाचें देणें । जालें रावणाकारणें ॥धृ०॥ पूर्वी होतें करंटपण । दरिद्रि रावण ॥१॥
तेणें धरुनि येक भाव । पूजिला महादेव ॥२॥
सीराहात वाळविला । रावण हाता केला ॥३॥
देवा पुढे नि:शंक नाचे । देव म्हणे वाचे ॥४॥
बहू नीकट सेवा केली । सीर ते वाहिली ॥५॥
देव भक्तीस भुलला । रावणा वोळला ॥६॥
राज्य दीधले लंकेचे । चौदा चौकडयाचें ॥७॥
दाहा सीरें वीस भूजा । त्रिकुटीचा राजा ॥८॥
भाग्य चाललें अपार । नाहीं पारावार ॥९॥
बहूत दीधली संपती । जाहली संतती ॥१०॥
असंभाव्य घोडेस्वार । कुंजराचे भार ॥११॥
रथ धांवती अपार । बळाचे निशाचर ॥१२॥
उदंड छत्रसुखासनें । पताकानिशानें ॥१३॥
मेघडंब्र सूर्यपानें । बहूविध याने ॥१४॥
हुडे गड कोठ माहाल । अखंड खुसीयाल ॥१५॥
लंका सोन्याचें नगर । रत्नाचे डोंगर ॥१६॥
ऐसी हजार अंत:पुरें । सुंदरें सुंदर ॥१७॥
केले शंभूनें न्याहाल । मुल्लुक माहाल ॥१८॥
अखंड सुवर्णाच्या भिंती । रत्नें ढाळ देती ॥१९॥
लंका पाहों जातां किती । इंद्राची संपती ॥२०॥
महा दैत्य राजे जाले । लोक पीडावले ॥२१॥
अवघें त्रैलोक्य जिंकिलें । दैत्याव मांडले ॥२२॥
केलें देवासि बंधन । पीडावले जन ॥२३॥
बहुत दानवाची थाटें । निघती कडकडाटें ॥२४॥
जैसे पर्वत उठिलें । मेघ उचलले ॥२५॥
आठरा क्षोणी वाजंतरें । दळें तीं अपारें ॥२६॥
वारा घेती बाबरझोटा । मस्तकीच्या जठा ॥२७॥
माथा सिंधुर वोतिली । शस्त्रें लखलखिलीं ॥२८॥
माहाकुर्मांचे टवके । धरिलीं खटकें ॥२९॥
सुरवर जेर जाले । राजे ही जिंकिलें ॥३०॥
वोस जालें भूमंडळ । खंडळ मंडळ ॥३१॥
मद्यप्राशन करिती । सागरीं पोहती ॥३२॥
दंत दाढा विक्राळा । नेत्रामध्यें ज्वाळा ॥३३॥
बळें मर्यादा सांडिली । निती वोलांडिली ॥३४॥
देव घातले बांदोडीं । केलें देशधडी ॥३५॥
ग्रह ग्रहानें भुतले । वाटेसी घातले ॥३६॥
वस्त्रें वन्ही तो पाखाली । इंद्र जाला माळी ॥३७॥
ब्रह्मा पातडया वाचितो । चळचळां कांपतो ॥३८॥
नाव्ही जाला मल्हारी । हज्यामती करी ॥३९॥
गणेश अंतरीं धाकतो । गाढवें राखतो ॥४०॥
राहे राणवसाभीतरी । सटवी कष्ट करी ॥४१॥
छेत्रे धरीतो मयंक । देव जाले रंक ॥४२॥
वायो झाडुनिया जातो । वरुण सींपीतो ॥४३॥
देव बहु जाजावले । रघुनाथ पावले ॥४४॥
सीता चोरुनिया नेली । विवशी उदेली ॥४५॥
राज्य महादेवानें दिल्हें । पापानें बुडविलें ॥४६॥
नाहीं अक्रावा पूजिला । मारुति क्षोभला ॥४७॥
रीस वान्नर मिळाले । उदंड गोळा जाले ॥४८॥
पहिलें दूत पाठविला । अक्षया मारिला ॥४९॥
रामें सिंधु पालाणिला । त्रिकुटासि गेला ॥५०॥
लंका सामर्थ्ये जिंकिली । सीताशुत्धि केली ॥५१॥
युध्य मांडलें तुंबळ । राक्षसाचें दळ ॥५२॥
दूत जाउनिया आला विरोध मांडला ॥५३॥
भारेभार उठावले । मारीत सूटले ॥५४॥
कपी देवाचे अवतार । सामर्थ्य आपार ॥५५॥
काळ आला महाकाळ । थोर हलकल्लोळ ॥५६॥
बळावरी बळ आलें । निर्वाण मांडलें ॥५७॥
रजनीचर हाका देती । भार कलकलिती ॥५८॥
लंका घेतली वान्नरीं । जाली मारामारी ॥५९॥
सिळासिखरें टाकिती । बळें भुभु:कार देती ॥६०॥
आवघे दैत्य सित्ध जाले । वान्नर भीडले ॥६१॥
नाना शस्त्राचे खणाण । पडती दणाण ॥६२॥
गदा मुसळें तोमरें । वाहती रुधिरें ॥६३॥
निकट जाले वान्नर । चालीयले भार ॥६४॥
कपी चपेटा मारिती । दैत्य लौदाडिती ॥६५॥
लाता बुक्या परस्परें । हाणिती पापारे ॥६६॥
थापा चपेटा मारिती । वीर चूर होती ॥६७॥
येकी येक वेटळिले । पिळून पाडिलें ॥६८॥
कपी तोंडास डसती । उदर फाडिती ॥६९॥
वीर पालथे उताणें । पडिले दैन्यवाणें ॥७०॥
पाईं धरुन आपटिलें । मस्तक फुटलें ॥७१॥
हातापायाची टिकोरें । मोडिलीं अपारें ॥७२॥
झोटधरणी जाली । प्रेत नदी आली ॥७३॥
गळे पिळुन टाकियले । वीर झोंबी आले ॥७४॥
झोंब्या लागल्या उदंड । रांडा घेती तोंडा ॥७५॥
वीरेंवीर संहारले । भार मागें आले ॥७६॥
कपी टाकिती डोंगर । कोट केला चुर ॥७७॥
रथ उदंड निघाले । रणांगणा आले ॥७८॥
मस्तहस्त घोडेस्वारे । धावती अपार ॥७९॥
विरें वीर खवळला । मारित सूटला ॥८०॥
येकमेका संव्हारती । मागुती धावती ॥८१॥
हस्तें हस्त रथें रथ । मारिती समस्त ॥८२॥
धुरा धुरेसी पाडिती । उदंड संव्हारती ॥८३॥
बाणीं घातला मंडप । जाला भूकंप ॥८४॥
तारा पडती जैशा गारा । उठिला धुळारा ॥८५॥
रण दाटली उदंड । ढीग धंडमुंड ॥८६॥
भुत औटकोटी आली । स्वापदें मिळालीं ॥८७॥
गीदभार आले तेथें । केत भूतें प्रेतें ॥८८॥
शस्त्राअस्त्रांचें भांडण । जाहालें निर्वाण ॥८९॥
पुत्र मित्र रणा आले । समस्त निमाले ॥९०॥
राम रावण समोर । बाणीं अंध:कार ॥९१॥
कोप खवळला रावण । सोडिताहे बाण ॥९२॥
अवघा धुंधकार जाला । प्रळय मांडला ॥९३॥
येक येकासी भेदिती । सामर्थ्य छेदिती ॥९४॥
रामें रावण मारिला । बंद् सोडविला ॥९५॥
अवघे देव सुखी जाले । भुवनासी गेले ॥९६॥
राज्य बिभीषणा दिधलें । दैत्याव मोडलें ॥९७॥
सुख जालें विश्वजना । आनंद सज्जना ॥९८॥
बंधु भरथा भेटी जाली । अयोध्या देखिली ॥९९॥
रीस वान्नर जेविले । मार्गस्थ जाले ॥१००॥
अवघें रामराज्य जालें । दासाचें मांडलें ॥१०१॥

॥वोवी॥ गृहस्थ विप्र गाविचे नेणती चर्या । रम्य चाली नाना नीट क्रीया । वळोन तशाला भक्ति लाउनिया । जाणते केलें कृपेनें ॥६२॥
जोतिबा कुलकरणी सिष्य जाला । सांप्रदायक्रमाचा आसरा केला । भिक्षान्न महिमा मुख्यादिकांला । दाऊन पुढारी चालिले ॥६३॥
घेउनिया परिवारमंडळी । उतरले कंठी मारुती जवळी । भिक्षादि सामुग्री बहुत जाली । संतर्पण जाले यथाविध ॥६४॥
मग सरकारामाजीं कळवोन मात । पातले सुमुहूर्ती आपचंदांत । भक्तजन ही मिळाले बहुत । ऐकोन वृतांत सौख्यकर ॥६५॥
साहित्य अपसया होतसे सित्ध । वैराग्य जयाचें असोन अगाध । सहनता नसे क्रिया अबत्ध । सर्वासि वेध श्रीरामीं ॥६६॥
वृद्ध जनाच्या अनुमतें स्थान । खणितां निघाला अंजनीसुत । बसावयाच करुनि ठिकाण । उचलितां मूर्ति न ढळे ची ॥६७॥
भक्त येक होता गुप्तरुप वाणी । पाहोन तयाला सकृपें स्वामींनीं उचलीं गा ह्मणतां शक्ती प्रेरुनि । आणोन ठेविला ठायावरी ॥६८॥
मग करविलें त्वरेनें गर्भ देउळ । भक्तजन विप्री मिळाले पुष्कळ । तेथें चि मठाच नेमुनि स्थळ । मारुतीराया प्रतिष्ठिलें ॥६९॥
धनधान्यवस्त्र फराळ भोजन । पूजनसाहित्य प्रबोध कीर्तन । येणें जनाच आदरमान । न पडे चि नुन्य त्यांत कांहीं ॥७०॥
हरिदास संताची उरकल्या कथा । कीजे स्वामींनीं हे सकळा आस्था । जाणोन उठिले शिवगुरुदाता । कथांतीं वानिलें हरिमहिमा ॥७१॥

॥पद॥ धाट (रघुवीरवंश) ॥ पिंगाक्ष भव्यवदना । देवा निर्भयभक्तसदना ॥ध्रु०॥ चंचळरुप वितंड स्वरुप । दया रघुभूप उदंड करी ॥१॥
पुछें लपेटुन दैत्य झपेटुन । काळ चपेटुन नेत असे जयवंत हरिवर ॥२॥
भव्य भयानक तो कपिनायक । मज वरदायक दास ह्मणे महिमा न गणे हर ॥३॥

॥श्लोक॥ भीमभयानक तो सिकलावी । भडकला सकळा भडकावी ॥श्लोक॥५॥

॥पद॥ प्रतापरुद्रा भिमराया । अरिविरमर्दन विवराया । प्राणा तैं तुं रघुराया । वान्नरकुळभूषणराया ॥१॥
मघवारिचा आरिला । आला आघात वारीला । तैं त्वां आणिलें गिरिवराला । रघुवीर वरला भववरला ॥२॥
रामदासा पाळक तूं । विघ्ना वरिवर वारक तूं ॥३॥
कल्यानमूर्ति कारक तूं । शिवादि अंतर चाळक तूं ॥४॥

॥वोवी॥ संपल्यावरी करणें कीर्तन । सूर्यकवी तो थोर प्रवीण । गुरुरायाचें मांडिलें स्तवन । फारांत स्वल्प श्रवण करा ॥७२॥

॥श्लोक॥ सारासारविचार अर्थ करिती नाना मतें शोधिती । भेदाभेद मुळीं नसे श्रुतिमतें ऐक्यत्व संस्थापिती । नित्यानंद पदारविंद नमुनी । विश्रांतिचे अंतुरीं । ऐसा श्रीशिवरामसद्गुरुभजा भक्तासि जो उद्धरी ॥१॥
लीळा मानववेष भावसदृशही वर्त्ते जनासारिखा । कर्माकर्मि अलिप्त निश्चळ मनें जे दृश्य त्या पारिखा । स्वभावें सदयानिधी भवगजा लक्षोनिया संव्हरी । ऐसा श्री० ॥२॥
जो विश्वीं विलसे बिजीं दृम जसे माया समंध तसा । नाहीं आदि न मध्य अंत भरला साकारतेचा ठसा । सर्वी व्याप्त अलिप्त देशिकपणें हस्ताब्ज ठेवी शिरीं ऐसा श्री०॥३॥
मिथ्या हा जगभास आत्म विलसे सत्यत्व दावीतसें । आदर्शी दुसरे दिसे मुखपरी तेथें दुजें पैं नसे । मायोपाधि विकार अद्वय मुळीं सत्ता गमें ईश्वरी । ऐसा श्री० ॥४॥
राहे जो अपचंदवास करुनी बेणी तोरेच्या तिरीं । स्थापी वायुकुमारमूर्ति बरवी देवालया भीतरीं । त्यातें सूर्यकवी स्मरोनि हृदईं घे पादुकातें शिरीं । ऐसा श्रीशिवराम सद्गुरु भजा भक्तासि जो उत्धरी ॥५॥
हे श्लोकपंचक मुखीं पठती स्वभावें । त्यांलागि तेचि समईअ शिवराम पावे । येथें विकल्प धरि रौरव त्यासि होती । हें सूर्य गर्जुनि वदे शिवराममूर्ति ॥६॥

॥वोवी॥ हें आसो होतसे सदा संतर्पण । दोनशत गाईचें होतसे दूभण । ताकपीठाचें वाढल महिमान । अटकाव कारण नसेचि ॥७३॥
सदा हि वागती हरिदस सज्जन । हे सहकारीं कळतां वर्तमान । तो गांव दीधला जाहागिरी नेमुन । नूतन कौलानें वस्ती जाली ॥७४॥
पाटील रायाजीपंत सत्सिष्य । कुटुंबसह सेवा करी हरुष । जंव प्रतिष्ठोन चालिले महारुद्रास । आडविला जाऊं न देतां ॥७५॥
तुजकरितां मी आलो बाहेरी । न जाई बा मजला करुन दुरी । महंती आणिके देशांतरीं । करसील कां येथ करुं नये ॥७६॥
तेणें ते स्थळीं समुदाव सहित । राहिले जनाला दावीत सुपथ । पावोन भक्तीला रामदाससमर्थ । भेटोन स्थान विलोकिलें ॥७७॥
दासबोधीं जो विरक्त प्रमय । तारक मार्गाचा जो जो उपाय । वर्तोन जनाला दाविती सोये । विन्हा प्रत्यय न बोलती ॥७८॥
नसे कवण हि देणें उश्रमा । न प्रार्थिती किमपी मध्यमा अधमा । सित्धि साध्याची नाहीं दमगमा । भजती श्रीरामा निर्मळ मनें ॥७९॥
निष्कामबुत्धिचें जेथें राहष्टण । विभव सौख्याला काय उण । जाहगीर जाली प्रयत्नेंविण । चित्तापूर प्रांतीं मुडबळ ॥८०॥
द्वयग्राम मुंबळी दिसे जनाला । ऐवज न पुरे ते येक धर्माला । पुण्यतिथ्यादि उत्छाव सोहळा । भिक्षावरुन होतसे ॥८१॥
चौथाया वोपिल्या पुण्यवंतांनीं । इनाम दिधलें वंदवंदोनी । कांहींच पुरेना हें असो स्वामिनी । करविलें मंडपा हरिदेउळा ॥८२॥
मंडळी राहिली आपचंद मठांत । पांचजण सिष्यसह गुरुनाथ । असतां नागाईयल्लुंबाचेथ । उत्धवमाहाराज पातला ॥८३॥
तो चिद्धनस्वामीचा सिष्य योग्यवंत । कवन जयाचें रसाळ बहुत । जयास मानिती साधुसंत । धारुरग्रामीं मठ ज्याचा ॥८४॥
रामनौमीचा उत्छाहामधें । बेदरचे पीडो पाहतां अविंद्ध । पावोन हरीनें केला निर्वेध । काजखांब खचला साक्षी असे ॥८५॥
मुक्तेश्वरकृत जे भारथग्रंथ । लिहिवाऊन आणिले येक्या रात्रींत । चरित्र संताची वानिली बहुत । कीर्ति विख्यात जयाची ॥८६॥
जाऊं वेंकोबा पातला तेथ । ऐकोन जाणती कळतां वृतांत । भेटोन गुरुदेवा सांगुन हितमित । बोलत उल्लासें बैसले ॥८७॥
जाणोन तयाचें आयुष्य सरल । यथार्थ चि कळवितां दयाळ । तया ज्ञान्याचा निश्चय अढळ । परतावें हें न वाटे ॥८८॥
ह्मणे संताच होतां दर्शन । सकळ ही सौख्या होय कारण । काय करील तें बापुडें विघ्न । पडो कीं राहो देह हा ॥८९॥
मग सांभाळून आणूं तयालागी । संगीक जाले स्वयें शिवयोगी । संकट देवाला पडोन वेगीं । भेटोन केले समजाविसी ॥९०॥

॥अभंग॥ धन्य वेंकटेश कृपावंत होये । होत आहे साह्य भक्तालागीं ॥१॥
कलयुगांमाजी व्यकंटनायक । भजका क्षणयेक विसंबेना ॥२॥
साजीर गोजीर रुप तें सुंदर । रमा मनोहर शोभीवंत ॥३॥
भूषणमंडीत सुहास्य श्रीमूख । लीळेच कौतुक न वानवे ॥४॥
स्वात्मानंदसुख वोपूं भक्तालागी । शेषनामनगीं धाम केले ॥५॥

॥वोवी॥ व्यं पातक कट ते छेदकर्ता । न सरे भक्ताला पदवी देता । दीन तिम्मपा ह्मणती वृथा । रड्डी नव्हे तो श्रीनिवास ॥९१॥
तो भक्तरायाचा जाणोन आग्रह । तेथें चि दाविलें गीरी ऐश्वर्य । सफळ जाला हो यात्राकार्य । रामदासस्वामिच्या कटाक्षें ॥९२॥
तुष्टोन तेव्हां श्रीरमावर । वरदान माग बा म्हणतां त्रिवार । गुरुपुत्र सज्ञानीं तो धुरंधर । मागीतलें ऐका कवण्यापरी ॥९३॥

॥पद॥ ज्याचे वंशीं कुळधर्म रामसेवा । त्याचे वंशी मज जन्म देगा देवा ॥धृ०॥ ज्याचि वाणी रंगली रामनामीं । त्यासि मजसी संवाद घडो स्वामी ॥१॥
वारंवार विनंती ऐकावी । माझे स्वामिनीं सर्व सित्धि न्यावी ॥२॥
ह्मणे उद्धवचिद्धन महाराज । रामदासाचा संग घडो मज ॥३॥

॥वोवी॥ हें ऐकोन तुष्टला गुप्तला देव । स्वस्थळासि गेला बावाउत्धव । आपचंदाप्रती येउन गुरुराव । तारीत भक्ताला राहिले ॥९४॥
सिकविले बहुतां कीर्तन करुं । बहुतां बहुपरी दीधले वरु । धन्य शांतमूर्ति होइय सद्गुरु । जाला अवतारु तारक ॥९५॥
स्वामीराजयाची कृपा ऐसी । उल्हास येकदां वाटोन मानसीं । करित करित भिक्षा अनयासी । सवाल घातले भक्ताघरीं ॥९६॥
रायाजीपंताची भार्या सिष्यिणी । भागुबाई शुभदायवदनी । साता दिवसाची होती गर्भिणी । भिक्षा घेऊनी पातली ॥९७॥
हांसोन बोलिले ते भीक घाली । घाबिरोन भोवती पाहे माउली । सर्वानंदमुनी गर्भमंडळी । पातला बाईग वोपी त्या ॥९८॥
वदोन तथास्तु घालितां भीक । स्वस्थळाप्रती पातले देशिक । आठमास भरले तो कळविली वाक्य । गर्भरत्न जालेंसे गुरुअर्पण ॥९९॥
प्रपंचीक ते घातला किंत । माये ही जाली मायाभ्रमित । उदर थोर जालें न होय प्रसूत । द्वादश मास लोटले ॥१००॥
पति आला तो पुसे सतीत । काय नवस चुकला सांग काय हेत । येरु कळवितां दत्तवृत्तांत । धिग ह्मणे सटवे भुललीस ॥१॥
तनुमनधनाच जालें अर्पण । कांहींच न करी तूं कृपणपण । मन रुजू जालें प्रबोधवचनें । प्रसवली जन्मला सलक्षणी ॥२॥
स्वामीस कळवितां वर्तमान । जाऊन सकृपें पाहिलें वदन । लागो दे ह्मणता अब्द येक तब रिण । प्रतिपाळुन । अर्पिलें तैसें ची ॥३॥
वळखोन रक्षिता आपुलें ठेवणें । वागविता हा जाणोन निशान । लाऊनि वृयांत झोळिच धन । नामकर्णादि विधान सारिती ॥४॥
नित्य तीनदां गुरुदर्शन । करुन बाळा माय देत स्तन । रामचंद्र हें साजे अभिधान । बाळ संतयोगी वरदपुत्र ॥५॥

॥अभंग॥ काय गुरुलीळा होत आहे काय । दाविती जे सोय न कळे ची ॥१॥
काय देवराय होतो सानकूळ । खेळवितो खेळ परमार्थ ॥२॥
जयाच चरित्र वानितां अखंड । थोतांड पाखांड न बाधे ची ॥३॥
न येऊन येती जन्मकासयाचा । ठेवा सुकृताचा उघडला ॥४॥
धन्य ते भक्ताचा उजळल दैव । आत्मारामदेव साहकांरी ॥५॥

॥वोवी॥ रामचंद्रप्रभु तो सुकृतखाणी । पांचा वरुषांचा वाढला सद्गुणी । कोठें न टिकती सद्गुरुवांचुनी । नेणती खेळादी मूलपण ॥६॥
उल्हास वाटला गुरुरायांत । करवोन सर्व ही सांग साहित्य । आरंभिलें मौंजीबंधनात । मीनले जाणते द्विजगण ॥७॥
आपण पाहिजे जे जे ग्रंथ । सत्य मानावी तेवढी च मात । शोध न घेतां अनुभवपंथ । धरुन सेवटा न गेले ॥८॥
दत्तहोमाच उकलून पुस्तक । नरकोत्तारण हें काढिता वाक्य । आण्णाभट्ट तो शाहणा भाविक । स्वामिरायाचा प्रिय सिष्य ॥९॥
तो स्वामिरायाचा पुरोहित । संकल्प करणें हा न मनें त्यांत । गलबला करिती विप्रीं समस्त । हटनिग्रहानें वाचाळी ॥११०॥
तत्समईं पातला कासीकर । ऐकतां तयाच निर्धारउत्तर । खेडेगांविचे ते झाकिलें वक्र । दानार्थ संकल्प करविला ॥११॥
गवसतां वोपिता परदेशियाला । विक्रिय किं नवसाचा शरण आला । विरक्त किं मठाचा सिष्य नेमिला । तरि मुक्तसंकल्प वरावा ॥१२॥
धर्ममुंजिला पाहण कायस । गोत्रास मीळवितां कासाविस । हें असो गुरुशिष्या येक चि असे । भारद्वाजगोत्र प्रवरसह ॥१३॥
ससांग जालें मौंजीबंधन । संतर्पणादि उरकल विधान । रामचंद्र स्वामीगुणनिधान । ब्रह्मविद चि उपजला ॥१४॥

॥अभंग॥ धन्य साधुजन मुक्त होउनिया । करुनि सत्क्रिया दाविताती ॥१॥
वेदांत पाहुनि वेदाज्ञा मानिती । न पालटे स्थिती निश्चयाची ॥२॥
सर्वत्रासि वाटे आह्मावरी प्रीती । सगट करिती समाधान ॥३॥
स्वात्मानंदरस सेवविती बळें । वारुनिया खेळ माया मृष ॥४॥

॥वोवी॥ हें चरित्र उरलें तें ऐकाल पुढारी । एक्या बाईला बोधितां भवारी । ठसेना जपमाळ होती जे करी । स्मरुन श्रीरामा सरागें ॥१५॥
कोप नव्हे हो करूणावृष्टी । सुदिता माळ ते भाविकी कंठीं । बोधसार बिंबलें तेणें हृत्पुटीं । तरुन ताराया योग्य जाली ॥१६॥
नमोन विनवि ते वोपिजे माळ । कां होईना ह्मणतिलें हांसोन दयाळ । परि उपास्यबळाच जाणिजे हें फळ । सप्रेम सेवेनें फळलेसें ॥१७॥

॥अभंग॥ भाविकाचि चिंता वाहती ते संत । फळ अघटित वोपीताती ॥१॥
विश्वासबळानें तरले अनेक । हरीहरादिक वश्य होती ॥२॥
वसिष्ठकृपेनें हरिश्चंद्रराजा । येशाचिया ध्वजा उभारिल्या ॥३॥
ऐशापरी बहु तरले तयाची । संख्या करुं कैची शक्ति सांगा ॥४॥
गुरु देती त्याला कैचीं उतराई । स्वात्मानंदपाई भावठेवा ॥५॥

॥वोवी॥ धन्य दयाळु सद्गुरुदाता । अपाजीस कथिलें सह आर्थ गीता । येकदां सिष्यांनीं धरुन अहंता । हा मम आर्थ सत्य ह्मणतिला ॥१८॥
येरु समजाविलें हा पंडितार्थ । तरि ही रुजेना तयाच चित्त । कोपोन वदले ऊठ जा त्वरित । येरी कापत पळाला ॥१९॥
गीता गुरुगीता मनश्लोक । पाठांतर जे होती अनेक । कांहीं च तयाला नसे स्मारक । शापानुग्रह या नांव ॥१२०॥
धीर न धरवें व्याकुळ जाला । तैं सुकृतांश सेवेचा फळासि आला । सद्गुरु जनकापासी पातला करुणा भाकित दीनरुप ॥२१॥
धीर देऊन येक्या दिवसीं पातले सुसमई पुत्रापासी । नमोन अज्ञापिजे ह्मणतां मुलासी । सनाथ करी बा ह्मणतिलें ॥२२॥
वदसील तुह्मीच करावी दया । तरि क्षमा प्रेम ते गुरु तुष्टलिया । अवस्य हो वदतां ऐकुनिया । तो दंडप्राय पडला सन्मुखी ॥२३॥
उठविलें होउनि कृपावंत । सर्वही स्फुरल जाला कृतार्थ । आणिखी ही होऊं सुसौख्य प्राप्त । उच्छिष्ट प्रसाद वोपिले ॥२४॥

॥अभंग॥ गुरुत्व वाहोन राखों नेणे क्रम । स्तोमामाजी भ्रम पैसावेल ॥१॥
बेबंद जालिया न घडे सार्थक । होय ठाऊक अपमान ॥२॥
यालागीं सीक्षेच बळ संपादीजे । नांव न घेईजे नाहींतरी ॥३॥
कानकोंड होतां न मानिती कोणी । यालागीं करणी व्हावी चांग ॥४॥
सर्वा वळुं जाणे ठावा सर्व वर्म । ज्याला आत्माराम साह्य सदा ॥५॥

॥वोवी॥ ऐका मतिमंदु येक ग्रहस्थ । आर्जितु गुरुसेवा बोधानिमित्य । शेष विडेचा देतां तयात । योग्यवंत योगी जाला तो ॥२५॥

॥अभंग॥ सर्व रुचिकर साखरचे फळ । अमृत रसाळ सदा मिष्ट ॥१॥
तैसे पुण्यपुरुष लीळा सर्वगोड । भक्तासी सुघड फळदाये ॥२॥
कर्तृत्व तयाचे सर्व ही योग ची । धन्य सत्ता त्याची उत्धारक ॥३॥
वांया तीळ मात्र न जाय सन्नुता । आत्मारामदाता वश्यगुणें ॥४॥

॥वोवी॥ आणिक ऐका भक्तिचरित्र । मारुतीरायांनीं केलें विचित्र । लिंगंमा लिंगप्पा चितापुरकर । आसस्तां नाघोरीं सणार्था ॥२६॥
भाउबंदांनीं निंदिती पतिला । निगुरी पशु हा भवी आंधळा । ऐकोन सतीतें अनुताप आला । गेले वधुवर स्वस्थळासी ॥२७॥
न गवसती शोधितां योग्य संताला । माहेर गुरुजागा नावडे तिजला । नेमुनिया शिवरामस्वामिला । यावें तरि गांवीं नाहींत ॥२८॥
करित अध्यासु राहिले ठिकाणीं । प्राणोदार हो पाहतां येक्यांदिनीं । उपदेश दीधला पावोन स्वप्नीं । खुणाविती येरुयेरा ॥२९॥
ते स्मरत आसतां अंतर्यामीं । पुढें बहु दिवसां पातले स्वामी । कर्तृत्व जे आसे सिष्यधर्मी । वर्तो लागले तैशा ची ॥१३०॥
कळऊन स्वामीला वर्तमान । साहित्य केलें करुं पूजन । जाले उपदेशी प्रत्यक्षविधान । असती परमार्थी सादरें ॥३१॥
सद्गुरुकृपेच लेऊन भूषण । पतिसहा माहेरा आली मानें । ऐकोन तीयेच प्रत्ययज्ञान । ग्रहस्थ सर्व पायां लागले ॥३२॥
आणवोन तेथें गुरुरायात । पूजा करविली पितियाहातें । राहिले आराधना होय परियंत । संतमहंतीं नवाजिलें ॥३३॥
परि मागें पुढें बरळती निंदक । होती गुरुमार्गी निपुत्रीक रंक । तेणें बाईच उतरल मुख । वळखोन देशिक वर वोपिलें ॥३४॥
येक पुत्र कां चौघे होती । सेवटवरी भोगिसी संपती । ऐकोन तयाची तोषली वृत्ती । तैस चि संसारी जाले सुखी ॥३५॥

॥अभंग॥ धन्य गुरुभक्ती धन्य गुरुकृपा । मार्ग होय सोपा दोही लोकी ॥१॥
देती जयालागीं मान ब्रह्मादिक । काय उणें सौख्य सांगा त्यासी ॥२॥
परी नैराशता आवडे तयासी । सर्वदा मानसीं संतुष्टता ॥३॥
प्रसन्न तयासी । आत्मारामदेव । मनोरथ पुरवाया ॥४॥

॥वोवी॥ धन्य धन्य स्वामीची शांति ऐसी । मुडबळाची करुं कमाविसी । सिष्य येक नेमिला तयापासीं । गावगुंडयानीं सांगीतलें ॥३६॥
काढुन तुह्माला दुसरा येणार । राजी रुजु तुह्मा आह्मी सर्वत्र । भीड तयाची न धरितां अणुमात्र । करोन निकुर पलवाव ॥३७॥
सहवासाचा लागुनि दुर्गुण । सत्य चि वाटलें त्याचें बोलणें । तों अवचट स्वामीचें जाले येणें । पडले फिरोन गांवकरी ॥३८॥
वळख न धरिलें प्यादडयानीं । विमृष न केले कारभार्‍यानी । भरभरुन बदुखा कोळियांनीं । बत्या द्यावया सिद्ध जाले ॥३९॥
रंजक न लागे घाबिरे जाले । कांहीं सुचेना कापूं लागले । महंताचे हातपाय गळाले । निरखितां आलेति गुरुराज ॥१४०॥
मारुताजवळी गुरुदयाघन । उतरले सिष्य तो पातला शरण । हात बांधलासे वाळल वदन । घाम सुटोन कांपतसे ॥४१॥
पडला सन्मुखी दीर्घदंडवत । कंठ दाटलासे न निघे मात । द्रवले कृपेने सद्गुरुनाथ । अवस्था त्याची देखुनी ॥४२॥
ऊठ जा ह्मणतिलें करी सयपाक । तो भावी तरलों मी गेला हरिखें । कांहीं न सीक्षितां जेऊनि देशिक । जाउनि उतरले चित्तापुरीं ॥४३॥
मीनले तोषले भक्त सिष्यवर्य । साधुसंत तें केलें आश्चिर्य । धन्य शांत्यागरु सद्गुरुराय । दाविती उपाय तारक ॥४४॥

॥पद॥ धन्य शांतिच । भूषण । लेइल तो सज्जन ॥धृ०॥ त्यागात्छांति हें हरिवाक्य । सर्वां दे बहुसौख्य ॥१॥
सकळ ही साधनीं हें मुख्य । जग चि होय सख्ये ॥२॥
हें ची निजधाम । विश्राम । भाळे आत्माराम ॥३॥

॥वोवी॥ सर्वज्ञराजा होय गुरुराव । दाव ऐसा कीं यमांनीं भ्याव । राजे ही जी जी ह्मणावें भ्याव । अगुणी दडावें सांदितें ॥४५॥
जयावरी भाळेल दयाळ । नांव तयाच न घे चि काळ । ऐकतां जयाच वाक्यरसाळ । संशयविटाळ न होये ॥४६॥
अवरंगबादीं मराठा येक । सिष्य स्वामिचा परिस्त्रीलुब्धक । न दावी कवणा दारेच मुख । रखवालीमाजी रक्षितु ॥४७॥
म्लान जरि जाल वनितातोंड । हृदय तयाच होय दुखंड । स्मरणास आलिया अन्नउदक गोड । न लागे पळतु अंत:पुरीं ॥४८॥
बाप हो भाउ हो कां सखा होईना । कीर्तन कीं यात्रा पुजा सुवाष्ण्या । येवोत साधु कीं योगिराणा । ललना दृष्टीस न पडावी ॥४९॥
घरद्वार आळिला करुनि गोषा । नरनारीस येवों नेदी सहसा । तीर बंदुख घेऊनि हमेशा । आर्डतु येत्या मारीन ॥१५०॥
अवचट स्वामीच होतां आगमन । पातला पाणी जोडुन शरण । गुरुवर्या विदित तें वर्तमान । बाहतां प्रसन्न न होती ॥५१॥
वदले उतराया न मिळे स्थळ । पराधेन सर्वाच होय देउळ । दुकानीं राणीं देतील सळ । चावडींत होईल उपद्रव ॥५२॥
पराव्या घरीं येईल निमित्य । कचेरींत राहण नीच कृत्य । बंकात उतरण कारण फजीत । यास्तव पुढारी जाऊं दे ॥५३॥
यापरी खोंचितां शब्दभाला । अनुताप आला क्रॄरशूराला । मानितु मम जन्मु वाया गेला । गुरुकृपासोहळा न भोगित ॥५४॥
मग न बोलवें बोलिला सद्गदीत । अटकाव कायसा स्वामिरायात । हवेलींत उतरावें मंडळीसहित । संशयो किंचित न धरी मी ॥५५॥
आरे संगीक ते नेणती मर्यादा । भीड कोणाची न धरिती कदा । जरि होता तयाला अपशब्दबाधा । मारुतीराय कोपेल । आत्मगोपाळ तो तुला ठाऊक । मोगलासि लाविल नाकखूणधाक । तेवि तूं क्रमि कांहीं येक । चुकतां पडसील संकटीं ॥५७॥
लोक बहु येती आह्मासाठीं । अंत:पुरसदनीं होईल दाटी । किती लपोन राहव गोरटी । हद्दबद्द गोषाच राहीना कीं ॥५८॥
गंहिवरुन येरु लागतां पाई । जावोन सकृपें उतरले गृहीं । बाहेरी राहिले सिष्यसांप्रदाई । आज्ञाप्रमाणें वर्तती ॥५९॥
खर्चितां सिष्यांनीं तूप गूळ तीळ । न मनीच खेदू मराटा प्रेमळ । पदार्थनाशाची नसे तळमळ । येकदां बारसी दिनीं ऐका ॥१६०॥
प्राणाहुती घेतल्यानंतर । आणिली भृत्यांनीं घृताची घागर । टाकीरे वदता उकरडयावर । तैसा चि केला भाविकांनीं ॥६१॥
येकदां स्वामीच जाल स्नान । धोतरछयाटीच राहिले धुणें । तो मराठा येतां नेऊं नये तें आह्माकारण । तुम्हीं न धोवे मानस्थ पूर्ण । राहूं दे सिष्य येईजे तों ॥६३॥
नमोन येरु कांतेस धाडुन । आणविला गांवाबाहेरी धुउन । स्वामिराज जाले प्रसन्न तेणें । स्थितिसंपन्न होठेला ॥६४॥
प्रबोध ठसला जाला सर्वज्ञ । समजाउनिया वोपुनि वरदान । तारुन दंपत्या गुरुदयाघन । पुसोन सर्वत्रां चालिले ॥६५॥

॥अभंग॥ धन्य गुरुराय स्नेहाळु कृपाळ । प्राकृतासि बळ तारिताती ॥१॥
नानापरी श्रम भोगुनि आपण । लाविती साधन मान्य होउं ॥२॥
अन्याय क्षमुनी वोपिती सौख्यासी । मानिती सिष्यासी जीवप्राण ॥३॥
स्वात्मानंदभोग भोगविती सदा । जाणा त्याचा धंदा परमार्थ ॥४॥

॥वोवी। सिष्यजनाच्या ईक्षतां वृत्ती । येकमेकी न माती न भीती । लपोन ठेविती चोरुन खाती । खबर न ठेविती सेवेची ॥६६॥
आलस्यभेदाला करिती पाळण । निद्राक्षुधेच आवडे लालन । ऐस व्हावया ह्मणाल कारण । सर्दाराचेथें जंव पातले ॥६७॥
उतरले बाहेरीं नावडे साधन । मिष्टान्नमेवेच होतसे सेवन । पाठांतर कीजे हें नसें चि भान । दावावें कोण भल्याला ॥६८॥
मुख्य सद्गुरु सन्मुखी नसती । यास्तव भक्तीची विचळली वृत्ती । जाणोन गुरुराजा उतरले पर्वतीं । सेवा अनुदिनीं घडतसे ॥६९॥
पात्र साहित्य तें कैंची सर्व । तुवां चंबुनें उदक आणाव । दूरदूर गांवाला भिक्षेसी जाव । सर्वदां तिष्ठावें दृष्टीपुढें ॥१७०॥
तेणें तयाच उतरल मद । सर्वापरीनें जाले सावध । मग घेऊन तयाला करीत प्रबोध । येऊन स्वस्थळीं राहिले ॥७१॥

॥पद॥ नाहीं वाढविला परमार्थ । तो गुरु काचा । स्वरुपीं न राहे निवांत ॥१॥धृ०॥
न लवी सिष्यासि साधन । क्रीया न दावी चालून । तो०॥२॥
भलत्या भलतें चि वोपितो । भलतें भकोन शापीतो ॥तो०३॥
सोय कळोन बोधीना । स्वहित होयाच साधीना ॥तो०॥४॥
आत्मारामीं जो मीळेना । अहंता जयाची गळेना तो गुरु काचा ॥५॥

॥वोवी॥ ऐसे निंद्य जे गुणाविरहित । शिवरामस्वामी दाता समर्थ । जयाचे सिरीं ठेविती हात । प्रबुत्ध होठाती तात्काळी ॥७२॥
नागुरगांवीचा नारोपंत । नदीतटीं आसतां जपनेम साधित । प्रयोग आला तो स्मरतां गुरुत । न बाधितां उदकीं पडियला ॥७३॥
येक सद्भक्तां घेरितां तस्करी । गुरुनाम स्मरिल तेणें वैखरी । भयानक दीसतां पळाले दुरी । घरासि पातला सुखरुप ॥७४॥
उग्र जीवजंतू पिशाच्च व्याघ्र । रोगसंकटादि विघ्न अनिवार । न बाधिती जयाच नामस्मरणमात्रें । मोक्षादि संपदा लाभे कृपें ॥७५॥
धन्य धन्य स्वामीच साधकपण । सर्वदां करिती दासकाव्यलेखन । दासबोधप्रती अकरा लिहून । भक्तसंतासी वोपिले ॥७६॥
याही वेगळे नित्यशा लिहिण । नानापरीचे प्रबंदकवन । आस्थावंताला वोपिती कृपेनें । शाहणपण सिकविती बहुतांपरी ॥७७॥
येकदां उत्सावीं मांडल संकट । परसैन्य पातल करीत लूट । यात्रा होपाहे भयानें फूट । जातां न जातां निर्व्हा नसे ॥७८॥
संकट तयाच होऊं निरशन । येशास सर्वदां घडो निर्विघ्न । रामदूताच करुनि स्तवन । गाऊन सर्वत्रा ऐकविलें ॥७९॥

॥पद॥ सत्यत्व भीम आमुचा साहकारी ॥धृ०॥ आम्ही आनाथ अपराधी । हीनदीन सर्वाबत्धी । आम्हा सांभाळी त्रीशुत्धी । कपीराज निर्धारी ॥१॥
नाना संकटीं रक्षित । पूर्ण करी मनोरथ । निजभक्तासी तारीत । पवनात्मज वनारी ॥२॥
सेवकाचें साभिमान । समर्थाच हें लक्षणें । उणें पडताची जाण । शब्द येईल त्यावरी ॥३॥
राम वैकुंठासी गेले । दास मारुती निरविलें । माझें स्मरणीं रातले । त्यासी भवाब्धी उतरी ॥४॥
राम भीम नाहीं भिन्न । तेचि कल्याण संपूर्ण । शीव तत्पदीं आपण । आत्मरुपीं विचारी ॥५॥

॥वोवी॥ हे खालीं न पाडितां सद्भक्तवाणी । कटकासि फिरविल कपिवीरांनीं । धन्य स्वामीची अद्भुत करणी । न वानवे ची पवाडे ॥१८०॥
बंधू स्वामीचा बावा भैरव । आंगीं आसोन महंतीशाहणीव । विघड न होववे करितां मनाव । हांसोन बोलिले तव इछा ॥८१॥
इनाम दिधलें होऊं पोषण । चिंचनसूरगांवीं करविलें स्थान । पावत ते स्छळीं गौरव मान । राहिले कुटुंबवछळ ॥८२॥
दुजा धाकटा कृष्ण बावा भाउ । आग्रह बहु करितां संग्रहीं राहु । विरक्तीच बिंबवोन गौरउ । वरयुक्त धाडिलें गंगाकडे ॥८३॥
महंती करुन बहु तामशांत । मग मैसागांवजवळी सिराळ्यांत । समाधिस्त जाले पुण्यवंत । कीर्ति अपार वानिती ॥८४॥
हें आसो येक शिष्याच सरल आयु । घटांमाजील निघाला वायु । गुरुतीर्थ वदनीं घालितां उपायु । जाला जीवला बहुकाळ ॥८५॥
दाविती लीळा बहुत कांहीं । प्राकृत लोकांतें नुमजे सर्व ही । रामचंद्र वरपुत्रा सर्वदा ही । प्रतिपाळ केले प्रीतीनें ॥८६॥
जेंवि यात्रेला जाऊनि समर्थ । खानदेशीं येक्या सदनांत । बैसले श्रीराम भजन करित । मूल तयाच निमाल ॥८७॥
अन्याय जाला ह्मणती सर्व ही । रामनाम स्मरावें मरणसमई । जादुखोर हा दिसे गोसावी । प्राण बहुताचे खाईल ॥८८॥
तेणें अनर्थ करुं पाहती । तंव छेडी सत्तेची जे होती हातीं । फिरवितां शवाला पावला मारुती । उठिल बाळ ते संतोषले ॥८९॥
जे ते छडीची धरिती आस । ह्मणोन दहनीं केले अदृश्य । ते राख ही तारिले बहुतेकास । रामनाममहिमा वानिती ॥१९०॥
समर्थसत्ता ते जनीं विशेष । तैसें चि क्रिडती सिष्य दाससिष्य । धन्य जे तयाची धरितील कास । तेही बहुतांस उत्धारिती ॥९१॥

॥अभंग॥ दासपरब्रह्म देशी ब्रह्मदेव । जालों मी स्वमेव कीर्तिवानु ॥१॥
चतुर्विधा भक्ती चतुर्विधा मुक्ती । तोंड न पुरती वानावया ॥२॥
लीळा अनुक्रम हा ची सृष्टीक्रम । सार सर्व ब्रह्म साजे येथ ॥३॥
नियंता उपाव वेद ते जाणीव । त्यांत अनुभव गुरुकृपा ॥४॥
आत्माराम कृपें दाउनि सत्क्रिया ॥ जग तारावया योग केला ॥५॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम महिमा । न वानवे जेथील जाणता गरिमा । भक्तसखा जो आत्मयारामा । प्रियपात्र थोर होयील ॥९२॥
इति श्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । शिवाजीस्वामीचरित्र । सर्ग येकसे सतरा ॥ जयजयराम ॥११७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP