वैशाख वद्य ३०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


मराठी राज्याचें उदक सुटलें

शके १७४० च्या वैशाख व. ३० रोजीं शेवटचा पेशवा बाजीराव हा अशीरगडाजवळ ढोलकोट येथें जनरल मालकम याच्या स्वाधीन झाला आणि त्यानें मराठी राज्याचें उदक इंग्रजाच्या हातावर सोडलें !
अठराव्या शतकांत मराठयांच्या राज्यास उतरती कळा लागली.शके १७३९ च्या पावसाळयांत बाजीराव पंढरपुराहून माहुलीस गेला व तेथें इंग्रजांशीं युध्द करण्याची तयारी करुं लागला. त्याचा मुख्य सेनापति बापू गोखले हा होता. पण अल्प तयारीनें तरबेज इंग्रजांशीं तोंड देणें कठीण होतें. खडकी, कोरेगांव, अष्टी या ठिकाणीं लढाया होऊन मराठयांचा पराभव झाला. नागपूरकर भोंसलेहि पराजित झाला. शेवटीं बाजीरावानें पळ काढला आणि नर्मदा उतरुन शिंद्याची मदत मिळवण्याचा प्रयत्न चालू केला. पण त्यांतहि त्याला यश आलें नाहीं. बाजीराव अगदीं कंटाळून गेला होता. बहुतेक आश्रितांनीं त्याला सोडलें होतें. सैन्यांतील अरब, पुरभय्ये असे आडदांड लोक बंडखोर होण्याच्या मार्गावर असल्यामुळें बाजीरावास शरण जाण्याखेरीज मार्ग नव्हता. त्यानें आपला वकील महू येथील छावणींत असणार्‍या जनरल मालकमकडे पाठविला. मालकमनें त्याला सालिना आठ लक्ष रुपये जहागिरी देण्याचें कबूल केल्यावर बाजीराव त्याच्या छावणींत येऊन राहिला. “मी दक्षिणेंत कधींहि परत जाणार नाहीं व मी किंवा माझे वारस पेशवाईच्या गादीवर किंवा मुलुखावर हक्क सांगणार नाहींत.” अशी कबुली बाजीरावानें दिली. मराठी राज्याचें सौभाग्य त्या ठिकाणीं हरपलें ! मराठयांची राज्यलंक्ष्मी आपण होऊन इंग्रजांच्या घरांत गेली ! बाजीरावास गंगाकांठीं राहण्याची परवानगी मिळाली. आणि बरीच चौकशी होऊन कानपुराजवळ बिठूर ऊर्फ ब्रह्मावर्त हें क्षेत्र बाजीरावानें पसंत केलें, तेव्हां त्याची तिकडे रवानगी झाली.
छत्रपति शिवराय यांनीं संस्थापिलेल्या, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, माधवराव यांनीं वर्धिलेल्या मराठी राज्याचा अशा विपरीत रीतीनें अंत झाला.
- ३ जून १८१८

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP