आर्या (गीति)

सर्गस्थितिलयकारण आवरणीं जो धरीत विश्वास ।
प्रभुवर तो कलिमय भय वारुनि तारील हाच विश्वास ॥१॥      

ही पहाटेची वेळ, कितीतरी आनंददायक !

पद [चाल - हा सकल देह०]

सुप्रभातसमय रुचिर सुखवि लोक सारा ।
कांचनरस लेउनि निज करि उषा विहारा ॥
अज्ञानी निद्रेनें । गढलीं जों लोकमनें ।
उठवाया रविकिरणें । करिति जगिं पसारा ॥१॥

परमेश्वराची लीला कितीतरी अगम्य; सहस्त्ररश्मि चंडकिरण, ताप देत असतां, सारे लोक, पशुपक्षीदेखील, उघड्या जगांत हिंडत फिरत असतात, आणि शीतल चंद्राच्या प्रकाशांत, निद्रेचें आमरण घेऊन, घरें, घरटीं, गुहा यांत स्वस्थ पडत असतात, याचें कारण काय असावें ? आतांचा हा उष:काल -

पद [चाल-दिसली पुनरपि०]

ब्राह्मणवर्णा ब्राह्ममुहूर्ती ब्रह्मानंदचि भासवितो ।
शब्दब्रह्म तो वेद पढाया उक्त काल हा जाणवतो ॥
अज्ञानाची रजनी सरली येई वरता ज्ञानरवी ।
तमोहारिणी भास्कररमणी उषादेवता जग सुखवी ॥
दिनकररथ नि:शंक चालण्या अर्ध्या देती विप्रमणी ।
अप्रतिहत ही नियमित चाले विश्वेशाची जगिं करणी ॥१॥

काय पण, या दिवसांत सरस्वतीच्या जलांत नवीनच प्रकार चालला आहे. जन्मांत न पाहिलेला फुलबाग, या नदींत कसा उत्पन्न झाला, मनमोहक लतावेळींचे मंडपच दिसतात ते कोठून आले, हें काहीच तर्कात येत नाहीं. आणि -

पद [चाल-दिसली पुन०]

मंजुल गायन वीणावादन कोठुनि येतें वनांतरी ।
चित्त वेधतें, कांही न दिसतें मोह वाढतो मनावरी ॥
दिसती कांही स्त्रिया चपलशा गुप्त होति कीं दिसती वरी ।
अंत न लागे शांत मनाला उत्सुकता किती हृदय भरी ॥१॥

सारें खरें, पण या तपोवनांत स्त्रिया म्हणजे चित्रांत जलदेवता, वनदेवता म्हणतात त्या असतील, कांहीच लक्षांत येत नाहीं, असो. त्यांकडे दुर्लक्षच करणें सुलक्षण आहे; .... पण मनाचा वेग त्यांकडस ओढतो तो कां ? काल असें झाले -

पद (जाल-सदर)

सुगंधवातें मस्तक भरलें रुप भासलें वीज खरी ।
स्वर्गदेवता कां वनदेवी स्पष्ट कळेना अजुनि तरी ॥

आकांशांतुनि उषादेवता स्नाना आली भूमिवरी ।
सरस्वती ही प्रत्यक्षचि कीं शुद्ध मानवी वेष धरी ॥१॥

पण, त्या स्त्रियांनीं काय आरंभलें आहे ? त्या उषादेवता असोत किंवा निशादेवता असोत -

पद [चाल-रुचती का तीर्थ०]

भीति नसे काय त्यांना श्रीगुरुची वाटतें ।
शापाग्नीमाजि काया का सहजीं होमिते ॥
उग्र तपोतेज ज्याचें स्वर्गाला भिववितें ।
खेद गमे व्यर्थ प्राणी प्राणान्ता पावते ॥१॥

कसेंहि असो, गुरुमहाराजांची दृष्टि त्यांच्याकडे न पावो म्हणजे झालें, त्यांना स्त्री हा शब्द वेदपाठांतदेखील रुचत नाहीं. स्त्रियांचें स्मरण योगधारणेला अध:क्रमण करतें, असें ते नेहमीं म्हणत असतात ... , अरे , पण हा तिकडे कोण ? कौडिण्य ! अशा वेळीं इकडेतिकडे काय म्हणून फिरतो आहें ? ...... अरे कौडिण्य ! अशा वेळीं इकडेतिकडे काय म्हणून फिरतो आहें ? ... अरे कौडिण्य ! कौडिण्य ! काय कर्णरंध्रें भरलीं का थंडीनें ? .... कौडिण्य ! कौडिण्य ! काय कर्णरंध्रे भरलीं का थंडीनें ? .... कौडिण्य ! काय मस्तक फिरल्यासारखा दिसतो ! अगदीं जवळ आलों तरी दिसत नाहीं कीं काय ? हो, हो, वत्स ! इकडे कोणीकडे ? ही वेळा पहाटेची का रात्रीची ? काय सूर्य उजाडला, का चंद्र निजला ? कौडिण्य ! काय निजसुरा आहेस, सारखे डोळे पूस; पण, एक सांग, गुरुमहाराज कोठें आहेत ? वत्स ! गुरुमहाराज, गुरु, जयजय परब्रह्म सद्‍गुरु: गुरुला क्षय नाहीं, नाम नाहीं, अक्षय अनामरुप अद्वय चिद्धन परात्परु: गुरु भगवान्‍ की जय. कौडिण्य ! भूतपिशाच्चबाधा झाली कीं काय ? वत्स ! पंचमहाभूतात्मक जग आहे, सर्वत्र भूतें आहेत. कौडिण्य ! वेळा झालास का वेड पांगरतोस ? कौडिण्य ? असा भिऊं नकोस, घाबरुं नकोस, डोळे तर भयंकर दिसतात; पण सांग, गुरुमहाराज कोठें आहेत ? वत्स ! गुरुमहाराज सर्वत्र आहेत, सर्व जगांत भरुन आहेत. गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेष्वरा: हें चिन्ह कांही ठीक दिसत नाहीं. कौडिण्य ! इकडे ये, अगदी घाबरूं नकोस, येथे बैस, शांत हो जरा, हें पहा डोळ्यांस पाणी लावतों. फक्त गुरुमहाराज कोठें आहेत तें सांग, तूं होतास कोठें, आलास कधीं; सारखें सांग. वत्स ! कसें सांगूं, नक्षत्रें पाहून सांगूं, का लग्नघटी पाहून सांगूं ? ज्योतिषशास्त्रांत सारें भूतभविष्य कळतें ना ? तूं तर महान्‍ ज्योतिषशास्त्रज्ञ आहेस, जन्मकुंडली पाहून ज्योतिषी, जन्मवेळ, महिना, वर्षे अगदीं बरोबर सांगतात, लग्नकुंडली पाहिली म्हणजे मुलींचे रुप, गुण, बंधु, वगैरे सारें कळते ना ? लग्नापूर्वी नवर्‍यानें नवरींस पाहूं नये, तिचे सारे गुण, गण, लग्नकुंडलींत कळतात, असें नाहींत का म्हनत ? भिन्न नाडी झाली म्हणजे हाताची नाडी पाहण्याची गरज नाहीं, प्रीति षडाष्टक जुळलें म्हणजे दांपत्यांत कलह म्हणून होणारच नाहीं, मग पहा, पादच्छाया घालून लग्न स्पष्ट कर, आणि गुरुमहराज कोठें जलांत आहेत का स्थलांत आहेत ते. प्रत्यक्षं ज्योतिषं शास्त्रं, मग प्रत्यक्षाला का प्रमाण पाहिजे ?  कौडिण्याला इतकें वक्तृत्व कोठून प्राप्त झालें ? कौडिण्य ! प्राण कासाविस होत आले, जरा उपकार कर आणि गुरुमहाराज कोठें आहेत, तें सांग. तूं काल त्यांच्याबरोबर होतास कीं नाहीं ? सारखा वृत्तांत सांग. जरा शांत हो, उगीच मला घाबरवूं नकोस. वत्स ! कालचा वृत्तांत ? पहा -

पद (चाल-नीरक्षीरालिंगन०)

सरस्वतीच्या स्वच्छ जलांतरि पुष्पवाटिका पाहोनी ।
मन्मन तल्लिन झालें आतांनच ओढवतें फिरवोनी ॥
सुस्वर गायन ऐकुनि झाला लुब्ध देह हा बधिर तसा ।
वीणावादन - गायन - नादें भ्रमित जाहलों नाग तसा ॥१॥

हेंच तें पिशाच्च ! त्या फुलबागा, त्या स्त्रिया, तें गायन, आलें लक्षांत, पण एक सांग, गुरुमहाराजांची दृष्टि गेली नाहीं ना त्यांच्याकडे, बिचार्‍या स्त्रिया, शापाग्नीत भस्म होऊन जातील. कौडिण्य ! गुरुमहाराज कोठें आहेत तें थोडक्यांत सांग, प्रात:संध्येचा वेळ होऊन गेला. वत्स ! थोडकें, तुटकें कसें सांगूं ? आधीं मंगलाचरण, मग कथेंचें निरुपण. आधीं आचमन, मग पूजन. कौडिण्य ! असें सांगूं नकोस, वाद घालण्याची ही वेळ नाहीं. गुरुमहाराज आतां कोठें भेटतील तें स्पष्ट सांग, प्राण डोळ्यांत आले. वत्स ! प्राण डोळ्यांत म्हणजे, आधीं तोंडांतून नाकांत का जातात ? गुरु म्हणजे सर्व शिष्यांचे गुरु, त्यांत भेदभाव नाहीं, मित्र शत्रु नाहींत, गुरुदेवता माउली, आणि शिष्यांवर तिची साउली. कौडिण्य ! असें करुं नकोस, जरा उपकार करुन सारखें वृत्त निवेदन कर. वत्स ! सारखें सांगतों, मध्येंच मात्र मला घोंटाळवू नकोस, पहा, गुरुमहाराजांमागून काल मीं गेलों. तेव्हां -

पद (चाल-नीरक्षीरालिंगन०)

पुष्पवाटिका रम्य मनोहर जलांतरीं किति वर्णावी ।
लतामंडपा सुंदर ललना हावभाव सुंदर दावी ॥
गायनवादन ऐकुनि सहजीं मोह उपजवी चित्ताला ।
संध्यास्नाना भानचि नुरलें देहभाग हा गहिंवरला ॥१॥

हं, आलें लक्षांत, त्या स्त्रियांच्या कुभांडांत कौडिण्य सांपडला खास; पण गुरुमहाराजांचें वर्तमान कांहीच सांगत नाही; कौडिण्य ! जरा उपकार कर आणि गुरुमहाराज कोठें आहेत, इतकें स्पष्ट सांग. वत्स ! तूं पहिला वेदान्ती नैय्यायिक आणि मी साधा पुराणिक; आमची जोडी कशी जुळेल ? सारी हकिकत सांगतों. स्वस्थ, पाहिजे तर तटस्थपणानें ऐक. पहा -

पद (चाल - सदर )

सरस्वतीच्या नदीतटाकीं दीपपंक्तिशा बहु दिसल्या ।
नयनज्योति ती गुप्त जाहली, चित्तवृत्ति त्या स्थलिं रमल्या ॥
आकाशांतिल नक्षत्रावलि लोपुनि गेल्या कीं नकळे ।
पेटवितो तरि कोणि न दिसतो वाळवंट तें शांत जळे ॥१॥

आतां कसें करावें ? हा काय बरळतो, कीं खरें सांगतो, हेंच तर्कात येत नाहीं; खोटें म्हणवत नाहीं आणि खरे भासत नाहीं. पण या सार्‍या कृत्यांत, त्या स्त्रियांचे कांहीं कपटजाल आहे खरें. कौडिण्य ! हेंचे तें. शांत रीतीनें ऐकतोस तें हेंच का ? श्रोत्याचे श्रवण एकाग्र नसले म्हणजे, पुराणाचें पूर्वनिरुपण स्मरणांतून जात असतें, हें खरें प्रमाण कीं नाहीं ? .... ऐक --

साकी

गुरुवर तेव्हां सरस्वतीच्या पाण्यावरती चलती ।
विस्मय वाटे मच्चित्ताला, लतावल्लरी पळती ॥
गायन मंद बंद झालें । मज तों भानचि नच उरलें ! ॥१॥

कौडिण्याच्या भाषेचा अर्थ जुळत नाहीं. सत्य काय आणि असत्य काय ? आमच्या गुरुकुलांत वाढलेला कौडिण्य अनृत भाषण करील हें तर अगदीं अनुचित, साराच संशय, विस्मय भासतो; आतां पहा, आमचें हें तपोवन, यांत त्या स्त्रियांचे आगमन काय म्हणून ? वीणावादन, गायन, नर्तन येथें कशाकरतां ? दीपराग आळवला म्हणजे दीपमाला प्रकाशल्या असें दिसतें म्हणतात, तसाच प्रकार नसेस कशावरुन ? कौडिण्य ! मला समजण्यासारखें शुद्ध भाषेंत सांग, गुरुमहाराज कोठें आहेत ? तितकें मला मला पुरे आहे. वत्स ! गुरुमहाराजांची माहिती विचारली म्हणजे, तुझी महति वाढणारच; मात्र ही प्रश्नाची अतिताईच आहे; शुद्ध कसें बोलावें, आणि शुद्ध कसें लिहावें, हें व्याकरण शिकल्यावांचून कसें कळेल ? आम्हां पुराणिकांना, व्याकरणाची आकारणी तरी कशाला ? परमेश्वराचें एक नामस्मरण केलें म्हणजे, नाम, सर्वनाम, सामान्य-विशेषनामाची गरजच लागत नाहीं ....
कौडिण्य ! क्षमा कर, गुरुमहाराज पाण्यावरती चलती, म्हणजे, काय तें तरी स्पष्ट सांग. वत्स ! स्पष्ट काय, माझें आणखी अदृष्ट सांगावयाचें ? गुरुमहाराज पाण्यावरती चालतात, लतावेली पळतात, फुलबागा धांवतात, असा मला भास होऊं लागला; दीपमाला लोपल्या, जलदेवता कोपल्या, सारा झाला अंधार, मी झालों निराधार; जलांत आहे कीं स्थलांत आहे हेंच कळेनासें झालें; वरती अंधार आणि खालीं अंधकार, इतक्यांत जरा अरुणोदय झाला, दिशा फांकल्या, तेव्हां जरा, सावध झालों; फुलबाग नाहीं, दीपमाला नाहींत, स्त्रिया दिसेनात, गुरुमहाराज भासेनात,सरस्वतीचें निश्चल जल आणि त्यांत माझी खळबळ; जरा थोडक्यांतच स्नान करुन आलों तों
तुझी भेट झाली; स्वप्न म्हणावें कीं दृश्य गणावें हेंच अद्याप कळत नाहीं. कौडिण्य ! तुझ्या इतक्याहि सांगण्यांत गुरुमहाराजांचा शोध लागत नाहीं; जलावरोह योगसिद्धीचा गुरुमहाराजांनी दुरुपयोग केला; मी काल त्यांच्याबरोबर नसलों, थोडासा चुकलों आणि घोर संकटांत पडलों; गुरुचरणासं मुकलों, व्यर्थ झालों. कौडिण्य ! आतां तरी शोध लावशील का ? माझ्या सांगण्याचा वत्सास बोधच होत नाहीं, भयंकर खग्रास ग्रहणाच्या वेधांत मी सांपडलों, आणि गुरुमहाराज अंतरलों, अंत समयांतूण वांचलों हें भाग्य कीं दुर्भाग्य ? हाय, हाय ! कौडिण्य ! गुरुत्व हरवलें, गेलें; दुष्ट मायावी स्त्रियांनीं, ओढून नेलें; हाय !

पद (चाल-दिसली पुनरपि०)

व्यर्थ जन्म मम झाला देवा, मरण बरें हें मज गमतें ।
गुरुपद सेवामृत पानातें आंचवलों सत्यचि पुढतें ॥
मायबाप-जन सोडुनि आलों सार्थ कराया देहाला ।
सद्‍गुरुचरणा अनन्यभावें रमलों सोडुनि गेहाला ॥
कोण विवशि त्या राक्षसि बाया आल्या ऐशा तपोवनीं ।
गुरुरत्नाला चोरुनि नेलें मायापटला बांधोनी ! ॥१॥

वत्सा ! काय बरळतोस, मी शुद्धीवर नाहीं आणि तूं तर बेशुद्धच दिसतोस; गुरुमहाराज काय लहान बालक, ओटींत भरुन नेलें, येतील, भेटतील, करतील झालें. या दोन दिवसांत अनध्याय होणारच; मी जरा झोंप घेतों. कौडिण्य ! काय निजतों म्हणतोस, छे ! गुरुमहाराजांचा शोध लागेपर्यंत जलदेखील विषासारखें आहे. ऊठ ----- वत्स ! सारी रात्र जाग्रण, भयंकर मरण चुकवून जरा येथें आलों, आणि त्यांत तुझें अधिकरण ? गुरुमहाराज यावयाचे असतील तर येतील, मी काय, निजलों, उठलों, म्हणून अधिक काय होणार ? ‘भवितव्यता बलियसि:. कौडिण्य ! हाच काय तुझा पुरुषार्थ ? कर्तव्यशून्यांनीं भवितव्य म्हणावें, यत्नहतांनी प्राक्तन गणावें, हे पहा आपले सहाध्यायि खेळत खेळत येतात. वत्स ! तुझा यत्नप्रयत्न प्रारब्धापुढें कांहीच उपयोगाचा नाहीं. उगीच जीव त्रासांत घालूं नकोस, देहाला श्रम आणि बुद्धीला भ्रम आणशील. कौडिण्य ! तूं मनुष्य आणि त्यांत ब्राह्मण, हा भित्रेपणा स्त्रियांनीं, मूर्ख लोकांनीं, मनांत आणावयाचा; होणार तें होणार, आणि घडणार तें घडणार ? पुरुषार्थ म्हणजेच प्रयत्न. वत्स ! यत्न करुन कार्यसिद्धि होईल असें असल्यास सहजच तशी बुद्धि प्राप्त होत असते, नपेक्षां महायत्नच देहान्तास कारण होत असतो. कौडिण्य़ ! शाबास, यत्न करुन सिद्ध होत नसल्यास मग आपल्याकडे दोष नाहीं. वत्स ! काय प्राक्तनाकडे दोष ? भवितव्यतेचा मात्र रोष होईल. विधिलेखनावर अतिताई तर देहाची मातीच होईल. जरा शांत विश्रांति घेतों. तूंही जरा मनाची खंती सोडून दे, शांति, विश्रांति ही सुखाची संपत्ति असें म्हणतात. कौडिण्य ! बरें तर, व्यक्ति तितक्या प्रकृति, मति तितक्या गति, पण माझा सिद्धांत तर प्राणान्त होईपर्यंत यत्न सोडावयाचा नाहीं. ...... देवी सरस्वती !

पद [चाल - अधम किती०]

दुष्ट दुर्जन कशा कपाटे ललना । नष्ट नीचा महा भ्रष्टवदना ॥
दिव्य तप तेज बल, गुरुवरानुग्रहें, शारिरें माझ्या वसे अग्निसम तें ।
शाप पावक झणीं, पेटवुनि या क्षणीं, सर्व जगतीतला भस्म करितें ॥१॥

या अधम नीच स्त्रियांना, शापमोहाग्नींत भस्मच करुन टाकणार होतों, ........ पण नको, गुरुमहाराजांची भेट झाल्यावांचून कोणत्याच कार्यास नेट घ्यावयाचा नाहीं ....... गुरुमहाराज की जय !

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP