मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|
ॐकारगीता

ॐकारगीता

ॐकारगीता


अर्जुन म्हणाले, हे पुरुषोत्तमा, ओंकाराचे माहात्म्य, रुप, स्थान अणि श्रेष्ठ तप असे सर्व मी ऐकू इच्छितो. ते तू मला सांग. ॥१॥
श्रीभगवान म्हणाले, हे पराक्रमी पार्था, हे तू मला विचारलेस हे फारच उत्तम केलेस. हे सर्व मी विस्ताराने सांगतो. ते तू एकाग्र चित्ताने ऐक. ॥२॥
प्रणवाचा पहिला अंश असणार्‍या ‘ अ’ या अक्षरात पृथ्वी, अग्नी , ऋग्वेद, भूलोक, ब्रह्मा इ. लय पावले आहेत. ॥३॥
प्रणवाचा दुसरा अंश असणार्‍या ‘ उ’ या अक्षरात अंतरिक्ष, यजुर्वेद, वायू, भूवलोक आणि सनातन विष्णू लय पावले आहेत. ॥४॥
प्रणवाचा तिसरा अंश असणार्‍या ‘ म ’ या अक्षरात द्युलोक , सूर्य , सामवेद आणि महेश्वर सामावले आहेत. ॥५॥
हे धनंजया, ह्या अकार, उकार, मकारातून हा एक ज्योतीरुप असा ओंकार (ऊँ) चांगल्या रीतीने निष्पन्न झाला आहे. ॥६॥
‘अ’ कार पिवळ्या रंगाचा असून रजोगुणातून उत्पन्न झाला आहे. ‘उ’ कार सत्त्वगुणयुक्त असून शुक्लवर्णी आहे. तर ‘म’ कार काळ्या रंगाचा असून तमोगुणप्रधान असा आहे. ॥७॥
पहिले ब्रह्म ऊँ कार असून मौन हे दुसरे (ब्रह्म) आहे. आत्मज्ञान तिसरे असून सत्त्व हे चौथे (ब्रह्म) आहे. ॥८॥
ओंकार (ऊँ) हे वेदांचे सार असून विशेषत्वाने ते शास्त्रांचे सार आहे. ओंकार हे श्रेष्ठ तत्त्व असून ओंकार हाच श्रेष्ठ ईश्वर आहे. ॥९॥
ओंकार हाच सर्वोच्च मोक्ष असून ओंकार हाच प्रभवेश्वर आहे. (स्वर्ग, पृथ्वी, पाताळ) हे तिन्ही लोक, सर्व स्थिर अस्थिर वस्तुमात्र ओंकारापासूनच निर्माण झाले आहेत. ॥१०॥
तीन स्थाने असणार्‍या , तीन मात्रा , तीन ब्रह्म, तीन अक्षरे असणार्‍या या साडेतीन मात्रांना जो जाणतो तो सर्व जाणणारा होतो. (आता चौदा भुवने सांगितली आहेत.) ॥११॥
या ऊँ स्वरुप पुरुषाच्या पायांमध्ये तल (लोक) जाणावा. (उरलेल्या) अर्ध्या पायात वितल, जंघाप्रदेशात तलातल तर गुडघ्यात स्वतल समजावा. ॥१२॥
गुह्यजागी सुतल तर मांडयांमध्ये रसातल आणि सातवा पाताल कटिप्रदेशी जाणावा. ॥१३॥
नाभिमध्ये ‘भू’ लोक, कुक्षिमध्ये ‘भुव’ लोक, हृदयात ‘स्व’ र्लोक तर छातीमध्ये ‘मह’ लोक जाणावा. ॥१४॥
कंठात जनलोक, कपाळात तपलोक, तर मस्तकात सत्त्वलोक जाणावा. ही चौदा भुवने आहेत. ॥१५॥
आत्मस्वरुप असणारा हा भगवान्‍ ओंकार तीन मात्रांत स्थित आहे. मानव त्याच्या फक्त उच्चारणानेच श्रेष्ठ ब्रह्माप्रत जातो. ॥१६॥
अकरातून ब्रह्माचा उद्‍भव, उकरातून विष्णूचा व मकारातून रुद्राचा उद्‍भव झाला आहे. अर्धी मात्रा ही चौथी आहे. ॥१७॥
आठ अंगे, तीन स्थाने, पाच दैवते. असणार्‍या ओंकाराला ब्राह्मण नाव धारण करणारे कोण जाणत नाहीत ? ॥१८॥
असे ऊँ हे श्रेष्ठ रुप, तीन पद्यांच्या ठिकाणी स्थित झाले आहे. त्याच्यापासून निर्मिलेले देव व परमेश्वराचे स्वरुप जाण. ॥१९॥
ऊँ भूर्भुव: स्व: असे याचे शरीर आहे असे जाणावे. प्रणवाचे ध्यान करावे. ॥२०॥
र्‍हस्वोच्चारण सर्व पापांचा नाश करते. तर दीर्घ (उच्चार) मोक्षदायक आहे. प्लुप्त (उच्चार) सर्व सिध्दी प्राप्त करुन देणारा आहे. असा हा ओंकार त्न प्रकारचा जाणावा. ॥२१॥
तेलाच्या अखंड धारेप्रमाणे आणि घंटेच्या दीर्घ निनादाप्रमाणे असणारे, वाणीतून निर्माण न होणारे, प्रणवाचे अग्र जो जाणतो तो सर्व जाणणारा होतो. ॥२२॥
धृती हा अग्नी असून मन यूप आहे व संतोष समिधा मानल्या आहेत. अनेक इंद्रियांना मारुन दीक्षित आत्मा जिंकतो. ॥२३॥
आत्म्याला अरणी करुन प्रणवाला उत्तराणी करावे. ध्यान, मनन आणि अभ्यासामुळे (ज्ञानी) देह मूढवत्‍ पाहातात. ॥२४॥
प्राण नेहमी मुख आणि नासिकेत संचार करतो. म्हणून सर्व काळी ज्ञान व ध्यानपर असावे. ॥२५॥
विष्णू हा प्राणायाम करणारा आहे. शिवही प्राणायामपर आहे. परब्रह्मस्वरुप असणारे ब्रह्मही प्राणायामपर आहे. ॥२६॥
ब्रह्म हा पूरक जाणावा. कुंभक हा विष्णू म्हणावा, आणि रेचकाला रक्षारक्षपर शिव जाणावे. ॥२७॥
अर्जुन म्हणाले, सर्व बिंदुंना सामावणारी ही सर्व अक्षरे आहेत. बिंदूंच्या नादानेच (त्यांचे) तेज असते. तो नाद कशाने भेदला जातो ? ॥२८॥
श्रीभगवान्‍ म्हणाले, ओंकार ध्वनीच्या आवाजाने वायुसंधारणादी आधाररहित होतात ज्यामुळे नादाचा लय होतो. ॥२९॥
सर्व नाद निरालंब झाला असता आणि चित्ताचा लय झाल्यावर ते श्रेष्ठ कनिष्ठाचे ज्ञान झाल्यावर सर्व क्रिया परत फिरतात . (करावयाचे काही शिल्लक रहात नाही. ) ॥३०॥
दुसर्‍या नादाने निर्माण होणारे ऊँ हेच श्रेष्ठ रुप असून परब्रह्माचे प्रकाशन असणारे असे प्रवाहक असे ऊँ हेच श्रेष्ठ रुप आहे. ॥३१॥
हा परमानंद चालूच्या मुळाशी तीन भागात ठेवलेला आहे. त्यापैकी अध व ऊर्ध्व भागाचा निरोध केला असता जो मध्यम भाग तोच मध्यक होय.॥३२॥
ब्रह्मरंध्रात निवास करणारी विरोधोक्ती उदरात आहे. जर अमर श्रेष्ठ असेल तर संहार करणार्‍या भ्रमराचा त्याग करावा. (?) ॥३३॥
गम आणि आगम यांमध्ये राहणार्‍या , गमनादिशून्य सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात प्रदीप्त झालेल्या घनदाट अंधकाराला जे पाहतात त्या परमात्मरुपी हंसाला नमस्कार असो. ॥३४॥
अनाहत शब्दाचा जो ध्वनी आहे त्याला प्रणव असे जाणावे. त्याचे ध्यान करावे. तेच श्रेष्ठ स्थान आहे. ॥३५॥
त्या ऊँ रुपी ध्वनीच्या अंतर्गत ज्योती आहे. ज्योतीच्या अंतर्गत मन आहे. मन ज्योतीत विलीन होते. ते विष्णूचे श्रेष्ठ स्थान आहे. ॥३६॥
नाभीतून उत्पन्न झालेल्या या कमळाची नाळ (देठ) दहा अड‍गुलांमध्ये आहे. कोमल नाल असणारे ते पद्‍म नेहमी अधोमुख असते. ॥३७॥
कदलीपुष्पाप्रमाणे, चंद्रकांतीवत्‍ तेजस्वी, विशालदलानें पूर्ण असणारे, सुंदर व अतिशय निर्मळ असे ते कमळ आहे. ॥३८॥
अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जाणण्यास अवघड, दुराध्यक्ष, शमन करण्यास कठीण, खाली मुख असणारे हे कमल जड होऊन हृदयात कशाच्या सहाय्याने जाते ? ॥३९॥
श्रीभगवान म्हणाले, प्रणवाच्या साहाय्याने अधोमुख अशा या हृदयस्थानी प्रवेश करुन पद्मकोशात जाऊन विकाररुपी व्याधींचा नाश होतो. ॥४०॥
त्यानंतर आठ पाकळ्यांनी युक्त व बत्तीस केसर असणारे हे हृदयकमळ सर्व गात्रांना सुखावणारे कमळ होते. ॥४१॥
हृदयात असणार्‍या या आठ पाकळ्यांच्या, सुंदर कर्णिका व केसर असणार्‍या कमळात पुराण पुरुष असणारा अंगुष्ठमात्र विष्णू आहे, असे मुनी ध्यानाने जाणतात. ॥४२॥
त्याच्यामध्ये सूर्य जातो. सूर्यामध्ये चंद्र, चंद्रामध्ये अग्नी व अग्नीमध्ये तेज असते. ॥४३॥
तेजामध्ये अनेक रत्नांनी मढलेले , अग्नी व सूर्याप्रमाणे तेज असणार्‍या अनेक रत्नांनी भरलेले पीठ आहे. ॥४४॥
त्यामध्ये कमलनेत्र असणार्‍या , वक्षस्थळावर श्रीवत्स व कौस्तुभ असणारा अच्युत, अनामय असा नारायण देव आहे. ॥४५॥
बाहुभूषणे , पैंजण , मेखला, कुंडले धारण करणार्‍या प्रसन्नव्दन असणार्‍या त्या हरीचे ध्यान करावे. ॥४६॥
आपल्या आठ हातांत शंख, चक्र, गदा, पद्‍म, मुशल, खड्‍ग, धनुष्य व बाण धारण करणार्‍या त्या हरीचे (स्मरण करावे) ॥४७॥
जोपर्यंत (हंसरुप) खगाकार पाहिला जातो, तोपर्यंत ज्ञानाचा विचार करावा. आकाशरुपात स्वत:ला पहावे व स्वत:मध्ये ‘खगा’ला जाणावे. ॥४८॥
हा पुरुषोत्तम शुध्द, सूक्ष्म , आकाररहित , विकाररहित, निरंजन, अप्रमेय, जन्मरहित, नित्य आहे असे जाणावे. ॥४९॥
शुध्द स्फटिकाप्रमाणे असणार्‍या , चंद्राप्रमाणे तेजस्वी ,कोटी सूर्यांचे तेजस्वरुप अशा, तप्त सुवर्णाप्रमाणे (झळाळणार्‍या) अशा पुरुषोत्तमास जाणावे. ॥५०॥
हे पार्था, तेल आणि अग्नी व वात यांनी युक्त असणार्‍या धूरविरहीत ज्योतीप्रमाणे असणार्‍या अनन्तक अशा त्याच्या श्रेष्ठ रुपाचे स्मरण करावे. ॥५१॥
कृत (युगात) हरी श्वेतवर्णाचा जाणावा. त्रेता (युगात)लाल रंगाचा, व्दापार (युगात) पिवळ्या रंगाचा आणि कलीयुगात नीलवर्णाचा जाणावा. ॥५२॥
हे अर्जुना, खाताना, झोपताना, थांबताना किंवा जाताना नेहमी पवित्र असावे. म्हणून सर्व प्रयत्न करुन तू योगाने परिपूर्ण हो. ॥५३॥
युध्दात, संकटात, रणभूमीवर, अश्वारुढ किंवा हत्तीवर विराजमान असलेला, या देवाचे नेहमी ध्यान करणाराच परब्रह्माप्रत जातो. ॥५४॥
प्रत्येक देहात असणारा भूतात्मा एकच आहे. तसेच पृथ्वीही एकच आहे. ती पाण्यातल्या चंद्राप्रमाणे दिसते. ॥५५॥
गायी अनेक रंगाच्या असल्या तरी (त्यांचे) दूध एकाच रंगाचे असते. गायींचा एक रंग पाहिला जात नाही. तर दुधातले चैतन्य पाहिले जाते. ॥५६॥
अर्थ स्पष्ट नाही. ॥५७॥
टीप- शब्द नीट लागत नसल्याने श्लोक क्र ५८ अर्थ दिलेला नाही. ॥५८॥
प्रणवाला धनुष्य मानून आत्म्याला बाण मानावे. त्याचे लक्ष्य म्हणजे ब्रह्म होय. हे सर्व शुध्द चित्ताने जाणल्यास देह तन्मय होतो. ॥५९॥
देव, यज्ञ तसेच वेद, मुनी, सुरगण, इ. ऊँ कारातून उत्पन्न झाले आहेत. म्हणून ऊँकाराचा आश्रय करावा. ॥६०॥
हृदयरुपी कमलामध्ये असणार्‍या वसुदेव पुत्र सुरेशाला जो सर्व भुवनांचा नाथ आहे अशा त्या शंख, चक्र , गदा व पद्‍म धारण करणार्‍या , शरद ऋतूतील कमलाप्रमाणे तेजस्वी नेत्र असणार्‍या , सावळ्या, मुरारी, पद्‍मनाभ मुकुंदाला जो नेहमी नमस्कार करतो. (तो सर्व पापांतून मुक्त होतो) ॥६१॥
हे गीतासार असून, शास्त्र आहे. गीतासाराचा साठा आहे. वेदशास्त्रांनी समन्वित झालेले हे पवित्र ब्रह्मज्ञान आहे. ॥६२॥
संसाररुपी मलाचा नाश करणारे हे सार सर्व सारांचे सार आहे. जो हे वाचेल किंवा ऐकेल तो सर्व पापांतून मुक्त होतो. ॥६३॥
(सर्व) पापांचा नाश करणारे हे पुण्य असून संसाराचा नाश करणारे, धन्य आहे अशाप्रकारे जो ध्यान करतो त्याला परब्रह्माची प्राप्ती होते. ॥६४॥
सुवात , मध्य व अन्त शून्य असणार्‍या, तीन शून्यांनी युक्त अशा निरामय तत्त्वाला जो जाणतो तो सर्व बंधनातून मुक्त होतो. ॥६५॥
शून्यभाव असलेला हा भावात्मा साक्षात्‍ पुण्यप्रदच आहे. ते पापांनी बध्द होत नाही. सर्व शून्यमयच असे ते श्रेष्ठ  पद आहे. ॥६६॥
त्या परतत्वाचे (सोऽहं) श्रेष्ठ ध्यान हेच ब्रह्म म्हटले जाते. इडा, पिंगला व तिस्री सुषुम्ना नाडी आहे. ॥६७॥
ईडा नाडीत चंद्र असतो, पिंगला सूर्याचे वहन करणारी आहे. सुषुम्ना शम्भुरुप असून तो हंसस्वरुपक आहे. ॥६८॥
शब्द स्पष्ट नसल्याने अर्थ दिलेला नाही. ॥६९॥
डाव्या नाडीचा प्रवाहक शक्तिरुप चंद्र आहे. उजव्या नाडीचा प्रवाहक शंभुरुप सूर्य आहे. ॥७०॥
मात्रा, शब्दरहित, स्वर, व्यंजनविरहित , बिंदुकला इत्यादींनी वर्जित अशा अक्षराला जो जाणतो तो सर्व जाणणारा होता. ॥७१॥
अर्जुन म्हणाले, अदृश्य भावना नसते. दृश्यमानाचा नाश होतो. मग  योगी लोक वर्णनातीत असणार्‍या परब्रह्माचे ध्यान कसे करतात ? ॥७२॥
श्रीभगवान म्हणाले, आतमध्ये, बाहेर आणि मध्ये पूर्णरुपाने असणार्‍या , सर्वपूर्ण स्वरुप अशा आत्म्याला समाधी हे ज्याचे लक्षण आहे (ज्याला ज्ञानी माणूस पाहातो.) ॥७३॥
ज्याप्रमाणे अंध माणसाला शास्त्र दर्पण ठरते त्याप्रमाणे तर्कसंगतीने युक्त असा माणूस स्वत:ला स्वत:च्या अंतरंगात पाहतो. ॥७४॥
देह नष्ट झाल्यावर बुध्दी कोठून? बुध्दिहीनाला स्मरण कोठून? स्मरण नष्ट झाल्यावर ज्ञान कसे होणार ? ज्ञानहीनाला कोणती गती मिळणार ? ॥७५॥
देह अत्यंत मलिन असून इतर (गोष्टींनी) तो निर्मल होतो. त्यांच्यामधले अंतर जाणून पावित्र्य कसे निर्माण होते ? ॥७६॥
देह नऊ छिद्रांनी युक्त बनविला आहे. वायू, श्लेष्म इ. त्यातून बाहेर येते. जोपर्यंत ब्रह्म जाणले जात नाही. तोपर्यंत बाह्य पावित्र्य (स्वच्छता) राखणे सोडले जात नाही. ॥७७॥
अनेक प्रकरची धर्मशास्त्रे, चार वेद यांचे पठण करुनही जे आत्म्याला जाणत नाहीत त्या सर्वांना पशू मानावे. ॥७८॥
जे लोक तीर्थक्षेत्रांमधून, पशुयज्ञांत, लाकूड, पाषाण आणि माती यांच्या मूर्तीतच भ्रमण करतात ते मंदबुध्दी होत. ॥७९॥
देहातच असणार्‍या ईश्वराचा त्याग करुन जो बाहेर भटकतो तो दुर्मती जणू घरातील खिरीच्या (मिष्टान्नाचा) त्याग करुन बाहेर भिक्षार्थ भटकतो. ॥८०॥
हे फल आहे, हे तीर्थ आहे असे मानून मूढ लोक (निरर्थकच) नमन करतात. आत्मारुपी तीर्थाला ते जाणतच नाहीत. त्याखेरीज इतर तीर्थे निरर्थक होत. ॥८१॥
ज्याप्रमाणे तिळामध्ये तेल, दुधामधे तूप आणि लाकडांमध्ये अग्नी असतो त्याप्रमाणेच हृदयात आत्मा जाणावा. ॥८२॥
देह ज्ञानाने उजळवला जातो व हृदयातील ब्रह्माचे स्मरण केले जाते. नेहमीच ब्रह्मज्ञानाच्या अग्नीनेच पापपुण्यांचा नाश करावा. ॥८३॥
 ज्याप्रमाणे पाण्यात पाणी, दुधात दुध, तूपात तूप मिसळले असता एकरुप होते, त्याप्रमाणे आत्मा परमात्म्याशी एकरुप होतो. ॥८४॥
योगात एक क्षण जरी मन एकाग्र केले तरी  शेकडो जन्मांची पापे नित्य नष्ट होतात. ॥८५॥
अठरा पुराणे, नऊ व्याकरणे व चार वेदांचे मंथन करुन मुनींनी (महा) भारत निर्माण केले. ॥८६॥
भारतरुपी दही घुसळून, गीतारुपी लोण्यातले सार काढून कृष्णाने अर्जुनाच्या मुखी घातले. ॥८७॥
कलियुगात मलाचा नाश करणार्‍या , ब्रह्मवृक्षापासून उत्पन्न झालेल्या गीतेचा आस्वाद का घेत नाही ? ॥८८॥
ज्याप्रमाणे (शरीरावरचा) मळ काढून टाकण्यासाठी माणूस दररोज पाण्याने स्नान करतो. तसेच संसाररुपी मलाचा नाश करण्यासाठी एकदाच गीताभक्तित स्नान करावे. ॥८९॥
====================================
ऊँ ऋभु गीतेतील आत्मज्ञान (तिसर्‍या खंडाचे मर्मस्थान)
विविधा गीता प्रकल्पातील तिसरा खंड म्हणजे ब्रह्मज्ञानविषयक विचारांचा ‘अमृत-संचय’ आहे. त्यात तीन ऋभुगीता समाविष्ट झाल्या आहेत. ऋतंभरा प्रज्ञा असलेले ऋभू नावाचे एक सद्‍गुरु आहेत, तर निदाघ हे तप: पूत मुनिवर्य आहेत. त्या उभयतांमधील ब्रह्मसंवादातून ‘आत्मा- अनात्मा-विवेक’ ज्ञानाचे शाश्वत निधान आपणास प्राप्त होते.
वस्तुत: हे ब्रह्मविषयक ज्ञान शब्दांच्या रेखामात्रेत सामावणारे नाहीच ! हे सनातन आत्मतत्त्व जो जाणतो, तो ‘सान्त’ आहे, ते तत्त्व मात्र अनादी अनंत आहे, अन्वय -व्यतिरेकाने आत्मज्ञानविषयक अनुभूती शब्दातून घेताना, काही समजले असे वाटताच, काही समजलेच नाही, असेही वाटते !
त्रिपुटीमध्ये पाहणारा एक म्हणजे ‘द्रष्टा’ असतो, तो जे पाहतो ते ‘दृश्य’ वेगळे असते ‘द्रष्टा दृश्य पाहतो’ , पण त्याची दर्शनाची जी अनुभूती असते, ती स्व-तंत्र असते. शब्दातीत असते. गारगोटीचा तुकडा किंवा खडीसाखर हातात घेतल्यावर, नजरबंदी होऊन नेमकी वस्तू काय आहे हे डोळ्याने पाहून समजत नाही.जिभेने स्पर्श करुन, आपण खडीसाखर कोणती आहे ते सांगू शकतो, गारगोटीला चव नाही. खडीसाखरेला गोडी आहे ती जिभेला समजली तरी प्रत्यक्ष खडीसाखरेपासून ती गोडी स्वतंत्र अशी , अलग करुन दाखविता येत नाही. द्रष्टयाने दृश्य पाहिले, तरी त्याची दर्शनानुभूती शब्दाने साकार करता येत नाही. गारेचा खडा आणि खडीसाखर यांतील भेद स्पष्ट करणारी ‘गोडी’ नजरेला दिसत नाही, शब्दाने सांगता येत नाही. स्पर्शाने किंवा वास घेऊनही ती कळत नाही. आपल्या जिभेला ती समजली तरी, आजारी माणसाच्या जिभेला ती़च गोडी जाणवेल अशी शक्यता नसत ! म्हणजे ‘गोडी’ ही स्वयंभू असून ज्याची त्यालाच अनुभवता येणारी असते !
काच आणि हिरा यांतील भेद, ज्याची ‘नजर’ परिपुष्ट झाली आहे, असा रत्नपारखीच सांगू शकतो. स्वरांतील फरक पिढिजात गवईच ओळखतात, पण आपली ही सर्व जाणण्याची इंद्रिये (ज्ञानेंद्रिये) ब्रह्मतत्त्वाला मात्र जाणू शकत नाहीत !
ब्रह्मतत्त्व हे इंद्रियातीत असते, अखंड एकरसात्मक असते. गुरुने शिष्याला ‘तत् त्वं असि ’, असे सांगितले , आणि गुरुकृपेने शिष्याच्या ‘अहं’ ला त्याचा बोध झाला तरी, त्या ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान ‘अहं, त्वं, तद्‍’ अशा सर्वनामांनी होते. म्हणजे सर्वनामाइतकेच अल्पांशाने होते ! सर्वनामे ज्या नामांची दर्शक असतात ते ‘नाम’ अक्षरबध्द होऊच शकत नाही ! अगदी ‘ब्रह्मवाक्य’ सांगायचे असले तरी, ते संस्कृत सर्वनामांनीच सजविलेले असते !
ऋभू व निदाघ संवादातून ब्रह्मातत्त्वासंबंधी आस्तिक्यभाव ठेवून आपणास ब्रह्म जाणून घेता येईल, पण ते शब्दाने सांगता येणार नाही.  ब्रह्म सगुणही आहे, निर्गुणही आहे आणि त्या दोहीच्या पलीकडे गुणातीत असेही आहे ! ब्रह्मतत्त्व हे वाच्यार्थाने समजून घेता येत नाही. ‘इदं’ किंवा ‘अहं ’ या स्वरुपात ते जाणता येत नाही. ते संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी आपल्या पहिल्याच ओवीत सांगितल्याप्रमाणे ‘स्वसंवेद्य’ मात्र आहे ! ते नित्य, शुध्द, बुध्द आणि मुक्त आहे. ते चिद्‍घन आहे, प्रकाशमय आहे, आनंदस्वरुप आहे, परिपूर्ण सत्‍ -स्वरुप आहे. ते तर्क , न्याय, भाव अशा लौकिक परिमाणांनी सिध्द करता येत नसेल तरी, ते ‘असतचि असे !’ देहाची व मनाची पातळी सोडून ते ‘परमार्थाने’ किंवा आत्मभावाने जाणून, आत्मरुप होऊन ‘मुक्त’ व्हावे ! असा ऋभुगीतेतील ‘अमृत-योग’ हीच या खंडाची विशेषता आहे.
शिवरहस्य पुराणात ऋभु-निदाघ यांचा हा ब्रह्मसंवाद आलेला आहे. हा पुराण ग्रंथ मुख्यत:शिवस्तुतीपर आहे. शिव हे आदितत्त्व आहे. तेच परब्रह्म आहे. उत्पत्ति - स्थिती आणि लय, या विविध अवस्था जेथे सागरातील लाटाप्रमाणे निर्माण होताना दिसतात आणि तेथेच विलीन होतात, ते स्थल आपण कल्पना करुनही जाणू शकत नाही. ते जाणण्यासाठी दृष्टान्ताचा उपयोग केला तर, बुध्दी उपमान म्हणून दुसर्‍याचा आधार घ्यावा लागतो. वस्तुत: परब्रह्म वर्णनातील अनादी अनन्त आणि केवलस्वरुप आहे, हे अव्दैत जाणून घेतले, तर जाणणारा वेगळा उरतच नाही !
ब्रह्म तत्त्व हे सत्‍ , चित्‍ , आनंद ’ या तीन शब्दांनी व्यक्त होत असले तरी, सत्तामात्र असे शिवत्व शाश्वत रुपातच असते. त्याची त्याच्या स्पंदनाने होणारी क्रियात्मकता म्हणजे चित्‍ होय व त्यामुळे होणारा परिणाम म्हणजे आनंद असे मानता येईल. म्हणजे शिवतत्त्व हे केवळ सत्‍ स्वरुपीच असते. ते तुरीय अवस्थेच्या पलीकडे असलेल्या उन्मनी स्थितीतच जाणता येते. विशेष असे की, ते जाणले आहे असा बोध स्वत: बोधरुप झालेला असल्याने, तेथे वाणी, मन , बुध्दीचे परिघ उरलेलेच नसतात !
या शाश्वत शिव तत्त्वात व्दैतभाव नाहीच. रुप-अरुप,सगुण-निर्गुण, साकार- निराकार यांचे अव्दैत हेच ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान होय. तीच अव्दैत सिध्दी होय !
हे ब्रह्मज्ञान गुरुशिष्य संवादातून प्रगट होते. ज्ञानरुप सद्‍गुरु आणि वृत्तिरुप शिष्य या अव्दय स्वरुपात हा ब्रह्मविषयक संवाद एकत्वात अवतरतो. बोधरुपाने उरतो.
याच खंडात आलेल्या ‘ऊँ कार ’ गीतेनेही ते ब्रह्मतत्त्व ‘ऊँ ’ च्या साडेतीन मात्रांतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते तत्त्व त्यातही सामावत नाही. ते सदा- शिव -मंगल, आनंदस्वरुप व कल्याणस्वरुप असे असते. ते जाणल्याने ‘जाणणार्‍याला’ कैवल्यपद प्राप्त होते ! असे हे ‘शिव विज्ञान’ आहे. त्या सदा -शिवाने आमच्या अंगीकार करावा. कारण याच्या श्रवणमनाने ‘ब्रह्मैव भवति स्वयम्‍ ’ असे सद्‍गुरु ऋभूंचे ‘वरद वचन’, या गीतेतून आपणास प्राप्त होते. त्या परावाणीला आम्ही शतश: नमन करतो.
- एक ब्रह्मजिज्ञासू

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP