उध्दवगीता - अध्याय पंधरावा

उध्दवगीता

श्री भगवान्‍ म्हणाले, उध्दवा ! (भक्ती, ज्ञान व कर्म , हाच ज्यांची स्वरुपे आहेत) असे जे मी प्रणीत केलेले उत्तम पंथ तुला सांगितले, ते सोडून देऊन आपल्या क्षणभंगुर आयुष्यांत जे लोक क्षुद्र आशांची सेवा करण्यात निमग्र होतात, त्यांना जन्ममरणात्मक संसारात पडावेच लागते. ॥१॥
आपला जो वर्ण व जो आश्रम आहे, (त्याला योग्य असणार्‍या कर्तव्यांवर) त्यावर निष्ठा ठेवणे हा गुण होय, आणि त्याच्या उलट वागणे हा दोष होय. ॥२॥
एकच समान वस्तूंच्या बाबतीतही योग्य किंवा अयोग्य असा संशय उत्पन्न होतो, त्याचे निराकरण, शुध्दीचे म्हणजे योग्यत्वाचे व अशुध्दीचे म्हणजे अयोग्यत्वाचे नियम करतात. त्या नियमांप्रमाणे वागणे हा गुण, त्यास टाकणे हाच दोष. गुणाच्या स्वीकाराच परिणाम मंगलदायक होतो व दोषाचा परिणाम अशुभ (घातक) होतो.॥३॥
हे शुध्द मनाच्या उध्दवा ! धर्म , ऐहिक व्यवहार व जीवन यात्रा यांसाठीच धर्माप्रमाणे चालणार्‍या लोकांस हा धर्माचार व व्यवहाराचार मी सांगितला. ॥४॥
पृथ्वी, आप, तेज , वायू, आकाश या पांच महाभूतांच्या सूक्ष्म- तन्मात्रांनींच ब्रह्मापासून वृक्षपाषाणादि स्थावरापर्यंत सर्व चराचर शरीरे घडविली आहेत. या शरीरातच आत्मा जीवरुपाने राहतो. ॥५॥
शरीरे पांचभौतिक आणि जीव परब्रह्म असे सर्व प्राणी समसमान आहेत, तरी त्या त्या प्रत्येकाच्या पुरुषार्थसिध्दीसाठी वेदांनी जीवांच्या आत्मिक योग्यतेनुसार भिन्न वर्ण व भिन्न आश्रम यांची विषमता उत्पन्न केली आहे. ॥६॥
हे श्रेष्ठा भक्ता, वैषम्याप्रमाणेच देश, काल व वस्तू यांच्या संबंधानेही जे विषमतारुप गुणदोष सांगितले आहेत, तेही कर्माचे नियमन करण्यासाठीच ठरविले आहेत. ॥७॥
देशांपैकी अकृष्णसार म्हणजे काळ्या पाठीची हरिणे ज्यात असत नाहीत असा देश अब्रह्मण्य म्हणजे वेदोक्त कर्माला अयोग्य म्हणून अशुची असतो, आणि कृष्णसार देशात सुध्दा, सौवीर कीकट वगैरे प्रांत संस्कारशून्य व जमीन नापीक म्हणून कर्माला अयोग्य होत. ॥८॥
तसेच कालासंबंधाने होय. पर्वकाल असेल अथवा कर्मसामग्री सिध्द असेल तेव्हा विहित कर्म करणे योग्य होते, म्हणून तो काळ  गुणवंत होय. पण जेव्हा सामग्रीच नसते, असा काल, तसेच सोयरसुतक असते तो काल दोषवंत होय. ॥९॥
त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूची शुध्दी योग्यता व अशुध्दी अयोग्यता ही जलादी प्रोक्षण द्रव्यांनी, वेदवचनाने, संस्कारांनी , काळाने आणि त्या वस्तूच्या लहानमोठेपणावरुन ठरविता येते. ॥१०॥
त्याचप्रमाणे द्रव्याची शुध्दी जीवाच्या सामर्थ्यासामर्थ्यांवर, बुध्दीवर, संपन्नतेवरच ठरविली जाते. तसेच, सामान्यत: ज्याला ‘अशुध्द’ म्हणतात, ते आत्मविरुध्द पातकही द्रव्याच्या व जीवाच्या अवस्थांचा मग दूर पाहून ठरवितात. ॥११॥
आणि द्रव्यशुध्दी -धान्य, काष्ठे, काष्ठपात्रे, अस्थी, तंतू, घृतादिरस, सुवर्णादी धातु, मृगासनादिकांचे चर्म व विटा वगैरे पार्थिव वस्तु यांची शुध्दि-काळ, वायू, अग्नी, पवित्र जल ही स्वत: अथवा इतरांशी सहकार्य करुन करतात. ॥१२॥
तसेच; जे (पीठ पात्र वा वस्त्र) अशुध्द झाले असेल ते विशेष द्रव्यांकरवी (उदाहरणार्थ तासणे, क्षार लावणे वगैरे) शुध्द करता येईल व पीठादिकांसही पूर्वस्वरुप येईल, असे शुध्दीकरण इष्टच आहे. ॥१३॥
स्नान, दान, तप,अवस्थाविशेष, सामर्थ्य, संस्कार यांच्या व ईश्वरस्मरणाच्या साह्याने आत्मशुध्दी झाल्यानंतर व्दिजाने विहित कर्म करावे. ॥१४॥
मंत्राचे पूर्ण ज्ञान गुरुकडून, कर्माची शुध्दी ईश्वरार्पण करुन करावी. याप्रमाणे शुध्द देश, शुध्द काल, शुध्द द्रव्य, शुध्द मंत्र, शुध्द कर्ता व शुध्द कर्म या सहा साधनांनी धर्माचरण होते. याच्या उलट अधर्म होय. ॥१५॥
केव्हा केव्हा दैवबलाने गुणाला दोषस्वरुप आणि  दोषालाच गुरुस्वरुप येते ! याप्रमाणे गुणदोषाचे नियामक जे शास्त्र तेच त्यांच्यामधील भेदांचा मात्र बांध करते.॥१६॥
एकच आचरण दोन पुरुषांनी केले , तर ते जो पतित असेल त्याला मात्र त्या आचरणापासून जास्त पातक लागत नाही. त्याप्रमाणें स्त्रीसंग यतीला घातक, पण गृहस्थाला कर्तव्यात्मकच होतो. ॥१७॥
विषयनिवृत्ती जसजशी वाढते, तसतसा जीव मोक्षाजवळ जातो. विषयांपासून पराड्‍मुख होणे हाच निर्भय करणारा आणि शोक, मोह आणि भय, यांचा नाश करणारा धर्म होय. ॥१८॥
विषयांवर गुणांचा अध्यास केला की विषयासक्ती उत्पन्न होते,  आसक्तीपासून काम (अभिलाष) आणि अभिलाषानेच पुरुषापुरुषांत भांडणे उत्पन्न होतात. ॥१९॥
भांडणांमुळे क्रोधाचा जन्म होतो, क्रोधामुळे मोह निर्माण होतो आणि त्याची बुध्दी मोहग्रस्त होते, त्याला कार्य काय आणि अकार्य काय याची विस्मृती होते. ॥२०॥
स्मृतिनाश म्हणजेच जीवाची शून्यावस्था होय. स्मृतिशून्यता म्हणजे मूर्च्छा. अर्थात्‍ असल्या मोहग्रस्त पुरुषाच्य पुरुषार्थाची हानी होते. ॥२१॥
एकदा, जीव विषयासक्त झाला म्हणजे त्याला आपले हिताहित समजेनासे होते. दुसर्‍यांचीही जाणीव नसते. वृक्षासारखा बुध्दिहीन होऊन तो पुरुष व्यर्थ जगतो. त्याचे जगणे म्हणजे लोहाराच्या भात्याप्रमाणे नुसते चालू किंमतींचे असते. ॥२२॥
औषधाबरोबर वैद्य कांही मध, साखर वगैरे रोचक देतो,  त्याप्रमाणे मोक्षाचे उद्दिष्ट ठेवणारी श्रुती ‘विहित कर्मे केली असता स्वर्गादी फले मिळतात’ अशी रोचक फलश्रुती सांगते. स्वर्ग जीवांचे प्राप्तव्य नव्हे. ॥२३॥
कारण जन्मत:च जीवास विषयांची, प्राणांची, पुत्रदारादिकांची लालसा उत्पन्न झालेली असते. ही लालसा आत्मघात करणारी आहे हे खरे; तथापि ती दृढ असते. ॥२४॥
विषयवश झाल्यामुळे आपला पुरुषार्थ कोणता हेच ज्यास समजत नाही, जे कामाच्याच वाटेने भ्रमण करतात, त्यांची जर वेदवाक्यांवर निष्ठा बसली, तर हा आपला सर्वज्ञ व सर्वकल्याणकारी वेद त्या आपल्या भक्तांस स्वर्गादिसुखांचे आमिष दाखवितो, ते रुचिउत्पादक आहे, इतकेच समजावे. वेदाचे ध्येय मोक्ष आहे. तेव्हा शहाणा वेद स्वभक्तांस वृक्षादी योनीत घालविणारे कर्म करण्यास सांगेल, हे संभ्वनीय नाहीच नाही. ॥२५॥
वेदाचे मनोगत माहीत नसत म्हणून कित्येक दुर्बुध्द लोक फलश्रुती सांगणार्‍या वेदाची फल सांगणारी मनोहर वेदवाक्ये मात्र मान्य करतात. ॥२६॥
हे विषयासक्त वैदिक कामुक, मंदमती म्हणून लोभी, फुलांसच फळ मानणारे, यज्ञयागांत उत्पन्न होणार्‍या धुरावरच प्रसन्न होणारे, धूममार्गाने जाऊन पितृलोकांत पडणारे असतात म्हणून त्यांस ‘स्वलोक’= सत्यलोक= परमात्मलोक- आत्मलोक ठाऊकच असत नाही. ॥२७॥
उध्दवा ! त्यांच्या हॄदयांतच राहणारा जो त्याची त्याना ओळख नसते. हे देणारे त्यांचे शस्त्र किंवा मंत्रस्थान असते. प्राणसंतोष हाच त्यांचा पुरुषार्थ ! खरेच आहे. ज्यांचे डोळे म्हणजे बुध्दी (स्वर्गसुखात्मक) धूमाने अंध झाली, त्यांस त्या धुरापलीकडे काय आहे, हे कसे समजावे?.॥२८॥
त्या या विषयलोलुप लोकांस वेदामध्ये अप्रत्यक्ष रीतीने सांगितलेला ईश्वराचा अभिप्राय समजतच नाही. ‘ ज्या पुरुषाला हिंसेची आवड जन्मत:च असेल त्याने यज्ञामध्ये मात्र पशुवध करावा’ ही जी मी वेदव्दारा केवळ हिंसानियमक परवानगी दिली, तिलाच कुबुध्दि लोक ‘हिंसा करावी, अशी वेदाज्ञा आहे’ म्हणतात. ॥२९॥
अशा अज्ञानामुळे स्वसुखासाठी मात्र हे हिंसाप्रिय लोक यज्ञ करतात; आणि पशुहिंसा करुन पितर, भूते, उग्रदेवता यास बली देतात.॥३०॥
उध्दवा ! श्रवणमनोहर असा जो स्वर्गलोक तो केवळ स्वप्नांतील सृष्टीप्रमाणे असताही त्याचीच प्राप्ती व्हावी असा संकल्प करुन हे अज्ञ लोक प्राप्त झालेले विषयही टाकून देतात. आशेवर सट्टे करणारा मूर्ख वैश्य जसा गांठचा पैसाही घालवितो, तसाच या विषयासक्तांचा कर्मव्यवहार असतो. ॥३१॥
रजोगुणादी मायाविकारांची सेवा करणारे हे लोक त्या गुणत्रयावर निष्ठा ठेवून त्रिगुणात्मक इंद्रादी देवतांची उपासना करतात; पण माझी आराधना करीत नाहीत. ॥३२॥
‘आम्ही यज्ञव्दारा इंद्रादी देवतास प्रसन्न करु, स्वर्गात जाऊन उत्तमोत्तम भोग भोगू, नंतर पुन: भूलोकी येऊन कुलीन व श्रीमंत होऊ’ अशा रितीच्या यांच्या वल्गना असतात. ॥३३॥
वेदाच्या आलंकारिक वाणीने ज्यांची मने भ्रष्ट होऊन विक्षिप्त झाली ते मोठ्ठे अभिमानी व हट्टी होतात. त्या विक्षिप्त, मानी व हटटी लोकांस माझ्या वार्ता सुध्दा सहन होत नाही, मग उपासना तर लांबच ! ॥३४॥
उध्दवा ! कर्म भक्ती आणि ज्ञान हेच ज्यांचे  विषय आहेत, ते वेद केवळ ब्रह्मात्मपर ‘ब्रह्म व आत्मा एकच होत’ असे सांगणारे आहेत. कारण, परोक्षपध्दतीच मला प्रिय आहे. ॥३५॥
शब्दब्रह्म म्हणजे  सर्व वेदांची राशी. तो यथार्थ समजण्यास अतिकठिण आहे. प्राण, इंद्रिये व मन यांचे तो अधिष्ठान आहे. तो अनंत, अपार व गूढ असून तरुन जाण्यास महासमुद्रासारखा अत्यंत दु:साध्य आहे. ॥३६॥
अनंत व अचिंत्यशक्ति सर्वव्यापक निर्विकार अंतर्यामी परमात्मा असा मी आहे. मीच ही स्फुरद्रूप वाणी प्रकट केली आहे.उध्दवा ! कमलाच्या देठांमध्ये जसे मऊ मऊअ लोकरीप्रमाणे तंतू असतात, त्याप्रमाणे ही वेदवाणी ज्ञात्याला लक्षित होत असते. ॥३७॥
ज्याप्रमाणे कोणी आपल्या हृदयांत असणारे उर्जातंतू आपल्या मुखांतून बाहेर काढतो, त्याचप्रमाणे नित्य घोष करणारा माझा अंश जो हिरण्यगर्भ प्रभू तो , शब्दच गुण आहे ज्या आकाशाचा, त्या आकाशांतील अस्पष्ट वर्णास मनोमार्गाने स्पर्शरुपी वर्णांचे (क पासून म पर्यंतचे २५ वर्णांचे) स्वरुप देऊन त्यास प्रकट करतो. ॥३८॥
हा छंदोमय वेद अमृतमयच आहे. तो मोक्षस्वरुप असून मोक्ष देणारा आहे. याला प्रभूने अनेक मार्गांनी मोक्षदायक स्वरुपाने प्रकट केला आहे . मूळ ओंकार त्यापासूनच उर व कंठ यांच्या संगतीने ‘क’ कारादि २५ स्पर्श , १६ स्वर, ‘श, ष, स, ह’ हे ४ ऊष्म आणि ‘य, र, ल,व’ हे चार अंतस्थ वर्ण, उत्पन्न झाले. ॥३९॥
अनेक भाषांमध्यें हिचा विस्तार झाला आहे. या वाणींत अनेक छंद आहेत. पहिल्या गायत्री छंदाहून दुसर्‍या उष्णिक्‍ छंदांत चार अक्षरे अधिक याप्रमाणे उत्तरोत्तर अधिक अक्षरे असणारे छंद झाले. ही वाणी प्रकट होते व सृष्टीसंहार झाला की ही लीन होते. ॥४०॥
वेदांत गायत्री, उष्णिक्‍, अनुष्टुप्‍, बृहती, पंक्ती , त्रिष्टुप्‍, जगती, अत्यष्टी, अतिजगती, विराट्‍ असे अनेक छंद आहेत. ॥४१॥
वेद काय विहित करतात, कसले स्वरुप प्रकट करतात, काय सांगून त्यांचाच विकल्प करतात हे अनुक्रमे कर्मकांड, भक्तिकांड व ज्ञानकांड यात सांगितले आहे. परंतु वेदवाणी परीक्ष असल्यामुळे वेदाचे मनोगत परमार्थत:काय आहे, व असले पाहिजे , हे उध्दवा ! माझ्यावांचून इतराला मुळीच कळत नाही. ॥४२॥
उध्दवा ! वेद काय सांगतो, हे समजून घेण्याची तुझी प्रबल इच्छा आहे, म्हणून तुला सांगतो की, मी परमेश्वर यज्ञरुपी आहे असे समजून कर्मकांडांतील विधि निष्कामत: पाळावे: यज्ञात सांगितलेल्या देवता मीच आहे असे समजून उपासनाकांडांत विहित करतो. वेद माझ्याच विधीचेच विधि सांगतो. माझेच वर्णन करतो. हा सर्व वेदार्थ मत्परच आहे. माझे अधिष्ठान करुन वेदश्रुति मजपासून भिन्नसा आभास होणार्‍या मायेचा समजुतीसाठी अनुवाद करुन तिचा निरास करते आणि मग प्रसन्न होते, शांत होते. ॥४३॥
अध्याय पंधरावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP