मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
ढगापाठीमागें ढग जमुनि हे ...

कृष्णशास्त्री राजवाडे - ढगापाठीमागें ढग जमुनि हे ...

मराठी शब्दसंपत्ति


ढगापाठीमागें ढग जमुनि हे थाट असती
जसे योद्धे अंगीं धरुनि कवचें कृष्ण दिसती ।
पुढें वारा सेनापतिच सरसावूनि हटवी
तपर्तूतें मागें अणिक बहु तच्छक्ति घटवी ॥
सूं सूं अगोदर सुटे घनघोरा वारा
मागोनियां सरसरा पडताति धारा ।
व्योमीं विजा लखलखा लवताति भारी
गर्जे बहू कडकडा घन भीतिकारी ॥
घेतो जनाकडुनियां नृपती धनातें
जैसा पुन्हाहि समयीं धन देइ त्यातें ।
तैसाच आठ महिने जळ सूर्य घेतो
भूयिष्ठ वर्षुनि पुन्हा समयींच देतो ॥
आकाश हें सगुण त्यास धरूनि राहे
हें इंद्रचाप गुनसंगतिनेंच शोभा
हें जाणती धरिति ते गुणसंगलोभा ॥
चंद्र प्रकाशित करी सकळा घनातें
त्याचेंचि रूप घन झांकिति हे पहा, तें ।
आहे तयास फ़ल अल्पदिनांत हानी
साहंकृती मलिन जो गुरुला न मानी ॥
अभ्रांत मेघ भरले बहु दाट वारा
वाहे, प्रचंड मुसळासम अंबुधारा ।
ह्या लोटती, कडकडा लवती विजाही
गेल्या दिशा भरुनियां तिमिरांत दाही ॥
शेतें, मळे सकल हे जळबंब झाले
हा कोण पाउस महापथही बुजाले ।
ओढ्यांतुनी खळखळा जळ वाहताहे
धों धों चहूंकडुनियां वनवात वाहे ॥
पूरें नद्या भरुनि ह्या दुथडी वहाती
पांथस्थ हे अडुनि ऐलथडी रहाती ।
नौकाद्युपाय न चले न कळेच कांहीं
व्यापारशून्य बसले जन ठायिं ठायिं ॥
तीरावरी बहुत कर्दम आणि कांटे
लागूनियां प्रतिपदीं किति अंग फ़ाटे ।
तन्नापि हे बक तिथें करिताति वास
मूढास निंद्य विषयीं न सुटेचि आस ।
आला वसंत म्हणतां म्हणतांचि गेला
गरीष्मर्तु येउनि तसाचि समाप्त झाला ।
वर्षा ऋतू प्रगटुनी सुचवी जगातें
कीं धुंद होउंच नका जग सर्व जातें ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP