मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
निघे दंडका राम कोदंडपाणी;...

आनंदतनय - निघे दंडका राम कोदंडपाणी;...

मराठी शब्दसंपत्ति


निघे दंडका राम कोदंडपाणी;
सवें चालिली जानकी कीरवाणी; ।
कराया वनईं स्वामिसेवा, स्वभावें
सवें चालिला लक्ष्मण स्वानुभावें. ॥१॥

त्वरित चरणचाली चालिला घोर रानीं,
दृढतर मनिं भावें पूर्ण ज्याची शिरणी; ।
प्रतिदिवस दिनांसीं पावती ते श्रमांसी;
ऋषिवर मग त्यांस्सी आणिती आश्रमासी ॥२॥

तीघें यापरि चंडदंडकवनीं स्वच्छंदशी हिंडती,
तों तेथें शबरी अखंड विचरे, पापें तिचीं खंडती, ।
वाचे राघवनाम संतत जपे, तें ध्यानही अंतरीं;
वांछी दर्शनलाभ होइल  कधीं ? शोधी अरण्यांतरीं. ॥३॥

आला राम वना म्हणोनि ललना ऐकोनि आनंदली,
“ मी वंदीन परावविद ” म्हणुनी जातां पथीं मंदली,
“ माझा राम असेल तो क्षुधितसा चंडाशुच्या आतपें,
त्यातें मी दृढ चित्तिं ठेविन बरा, ज्याकारणें हीं तपें ” ॥४॥

ज्या वनीं करिति झिंकृत झिल्ली,
दाट तें हुडकि कानन भिल्ली; ।
जेथ वृक्ष बहु पक्क फ़ळांचे,
प्रांत तेथ फ़िरती अबलांचे. ॥५॥

मोठ्या श्रमें वळघुनी सफ़ळा तरूतें,
तोडी फ़ळें, वदनिं गात जगद्गुरूतें,
ओटीं भरी, चतुर ते उतरोनि भूमीं,
भेटी निघे, “ नयनिं पाहिन तो विभू मी. ” ॥६॥

दाही दिशां देउनियां निरेक्षा,
मार्गीं फ़ळांची करि ते परिक्षा; ।
चाखी मुखें, गोड कडू कळाया,
टोंचूनि दांतें रसहि कलाया. ॥७॥

कट्वम्ल त्याचि रसहीन फ़ळास टाकी,
लागे मधू सरस तें वनवांस झांकी; ।
आली वना निकट उत्तम भिल्लिणी ते,
जेथें जगज्जनक लक्ष्मण जानकी ते. ॥८॥

ज्याच्या मस्तकिं दीर्घ नूतन जटा, फ़ेटा दिसे टोप तो,
माजीं वेष्टित वल्कलें झळकती, दूजा म्हणे कोण तो ? ।
आश्चर्या अति पावली, बघुनियां तूणीर पाठीवरी,
राजीवाक्ष असा विलोकुनी, वधू धांवे जशी बावरी. ॥९॥

देखोनि डोळां हृदयाभिरामा
रामापुढें धांवतसे सुकामा. ।
पुष्टांग झाली स्वसुखें भजाया,
साष्टांग बंदी रघुराजपायां ॥१०॥

रामांघ्रि वंदुन नमी, न उठेच कांहीं,
रामें करांबुजयुगें उचलोनी बाहीं, ।
आलिंगिली स्वहृदयीं शबरी बरी ते;
आनंदले अमर भाविति बावरी ते. ॥११॥

‘ बहू दीससी राघवा तूं भुकेला;
तुवां पाहिजे बा ! फ़लाहार केला; ।
तुझ्या कारणें म्यां फ़ळें गोड रामा !
अगा ! आणिलीं सेविं सीताभिरामा ! ’ ॥१२॥

सारीं क्षतांकित फ़ळें निरखून डोळां,
“ कां हो ! अशीं ? ” तिस पुसे रघुराज भोळा ।
“ चंचूपुटेंच बहु चोखिलां पांखरांनीं,
नेणो दिला प्रतिफ़ळास नखांक रानीं. ’ ॥१३॥

‘ चंचूक्षतें हीं नव्हती कृपाळा !
मी कां तशीं आणिन ? का कपाळा !
म्यां आपुल्या चावुनि शुब्द दांतें,
चाखूनि घें मींच करें तुम्हांतें. ॥१४॥

मधुरतर फ़ळांची पूर्ण घेऊनि गोडी,
मग मज रघुनाथा !  ठेविता होय खोडी; ’
निरखुनि रघुराजें भाव त्या भिल्लिणीचा,
परम मनिं सुखावे नाथ तो जानकीचा. ॥१५॥

भिल्ली बोलुनि बोल सुंदर असे, रामाकरीं तीं फ़ळें
घाली, नेणुनि शास्त्रषिद्ध पुरुषा उच्छिष्ठ देतां बळें,
प्रेमें प्रेमभरें, प्रसन्नहृदयें, भक्ताजनांचा पिता,
आत्माराम रमापती निजमुखीं झाला फ़ळें अर्पिता. ॥१६॥

भिल्लिच्या वनफ़ळें मन धालें,
लोकनायक म्हणे ‘ सुख झालें. ’ ।
प्रेम रामहृदयीं बहु आलें,
तोयबाप्प नयनांत निघाले. ॥१७॥

रामचंद्र विभु आचरणासी
लक्षुनी, विनटली चरणासी; ।
वंदिता बहु सुखेंच, वधू ते
बाष्पकेंकरुनि ते पद धूते ॥१८॥

आलिंगिली पुनरपी प्रमदा किराती,
जे अंतरीं सतत चिंतित दीसराती; ।
जोडूनि अंजलि नमी, स्तवितां तियेतें
‘ मागे ’ म्हणे वरद, ‘ जें स्वमनास ये तें ’ ॥१९॥

‘ माझें मनोगत वियोग तुझा न व्हावा,
रूपीं तुझ्या दृढ असेन महानुभावा ! ’
स्वामी म्हणे, ‘ तुज वियोग कधीं न वाटे,
जा, शेवटीं मिळसि चिन्मयराजवाटे ” ॥२०॥

देतां असे वर तिसी रघुनायकानें, ।
झाली कृतार्थ शबरी, परिसोनि कानें, ।
आलिंगुनी, अग तिचें निघती वनातें.
आनंदनंदन म्हणे परिसा जनातें. ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP