प्रबोधसुधाकर - सगुणनिर्गुणयोरैक्यप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


सगुणनिर्गुणयोरैक्यप्रकरणम् ।
श्रुतिभिर्महापुराणै: सगुणगुणातीतयोरैक्यम्‍ ॥
यत्प्रोक्तं गूढतया तदहं वक्ष्येऽतिविशदार्थम्‍ ॥१९५॥
वेद आणि अठरा पुराणें यांनीं (यांत) जें परमेश्वराच्या सगुण निर्गुण स्वरुपाचें ऐक्य गूढ रीतीनें सांगितलें आहे. तें मी विशद (स्पष्ट) करुन सांगतों. ॥१९५॥

भूतेष्वन्तर्यामी ज्ञानमय: सचिदानन्द: ॥
प्रकृते:पर: परात्मा यदुकुलतिलक: स एवायम्‍ ॥१९६॥
ज्ञानस्वरुप, सश्चिदानंदमय, प्रकृति म्हणजे माया तीहून श्रेष्ठ,  जो सर्व प्राण्यांच्या हृदयांत वास करितो तोच हा यदुकुलाला भूषविणारा श्रीकृष्ण परमात्मा होय. ॥१९६॥

ननु सगुणो दृश्यतनुस्तथैकदेशाधिवासश्च ॥
स कथं भवेत्‍ परात्मा प्राकृतवद्रागरोषयुत: ॥१९७॥
॥शंका॥ अहो! सगुण, शरीर धारण करणारा, एका ठिकाणीं असणारा, प्राकृत जनांसारखा विषयांत आसक्त असणारा हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमात्मा कसा होईल? ॥१९७॥

इतरे दृश्यपदार्था लक्ष्यन्तेऽनेन चक्षुषा सर्वे ॥
भगवाननया दृष्टया न लक्ष्यते ज्ञानदृग्गम्य: ॥१९८॥
॥उत्तर-॥ ज्या दृष्टीनें इतर पदार्थ दिसतात त्या दृष्टीनें भगवान्‍ पहातां येणार नाहीं. कारण, तो ज्ञान दृष्टीनेंच जाणतां येणारा आहे. ॥१९८॥

यव्दिश्वरुपदर्शनसमये पार्थाय दत्तवान्‍ भगवान्‍ ॥
दिव्यं चक्षुस्तस्माददृश्यता युज्यते नृहरौ ॥१९९॥
भगवान्‍ श्रीकृष्णानें अर्जुनाला विश्वरुप दाखवितेवेळीं प्रथम त्याला दिव्य दृष्टि दिली. यावरुन त्याचें स्वत: चें रुप सामान्य दृष्टीला दिसणारें नाहीं (तें अदृश्य आहे) हें सिध्दच आहे. ॥१९९॥

साक्षाद्यथैकदेशे वर्तुलमुपलभ्यते रवेर्बिम्बम्‍ ॥
विश्वं प्रकाशयति तत्‍ सर्वै: सर्वत्र दृश्यते युगपत्‍ ॥२००॥
वाटोळें सूर्यबिंब जसें एका ठिकाणीं असून तेथून तें सर्व जगास प्रकाशित करतें व एकाच वेळीं सर्व ठिकाणीं तें सर्वांस दिसतें ॥२००॥

यद्यपि साकारोऽयं तथैकदेशी विभाति यदुनाथ: ॥
सर्वगत: सर्वात्मा तथाऽप्ययं सच्चिदानन्द: ॥२०१॥
त्याचप्रमाणें हा यादवांचा राजा श्रीकृष्ण जरी साकार व एका ठिकाणीं असल्यासारखा वाटतो तरी तो सर्वव्यापक, सर्वाचा आत्मा सचिदानन्दरुप आहे असें समजावें. ॥२०१॥

एको भगवान्‍ रेमे युगपद्रोपीष्वनेकासु ॥
अथवा जगाम गेहे जनकश्रुतदेवयोर्हरिर्युगपत्‍ ॥२०२॥
यास प्रमाण असें की, एकटा श्रीकृष्ण भगवान्‍ एका वेळीं अनेक गोपींबरोबर खेळला. तसेच जनक आणि श्रुतदेव या दोहोंच्या घरीं तो एका वेळींच गेला. ॥२०२॥

अथवा कृष्णाकारां स्वचमूं दुर्योधनोऽपश्यत्‍ ॥
तस्माव्द्यापक आत्मा भगवान्हरिरीश्वर: कृष्ण: ॥२०३॥
किंवा युध्दाचे वेळीं दुर्योधनास आपली सर्व सेना कृष्णरुप दिसली. (इत्यादि अनेक प्रकारांवरुन) श्रीकृष्ण हाच भगवान ईश्वर व व्यापक आत्मा होय असें सिध्द होतें. ॥२०३॥

वक्षासि यदा जघान श्रीवत्स: श्रीपते: स किं व्देष्य: ॥
भक्तानामसुराणामन्येषा वा फलं सदृशम्‍ ॥२०४॥
नारायणाच्या हृदयावर लत्ताप्रहार केल्यानें उत्पन्न झालेलें श्रीवत्स चिन्ह त्याच्या क्रोधास कारण झालें काय? (नाहीं) तात्पर्य, भक्त, असुर किंव इतर उदासीन या सर्वास तो सारखाच पावतो. ॥२०४॥

तस्मान्न कोऽपि शत्रुर्नो मित्रं नाप्युदासीन: ॥
नृहरि: सन्मार्गस्थ: सफल: शाखीव यदुनाथ: ॥२०५॥
म्हणून त्या भगवंताचा कोणी शत्रू नाहीं, मित्र नाहीं, आणि उदासीन म्हणजे उपेक्षा करण्यास योग्य असाहि कोणी नाहीं, या करितां राजमार्गावरील फलें व छाया ॥सर्वास सारख्या तर्‍हेनें देणार्‍या ॥ वृक्षाप्रमाणेंच ते भगवान आहे. ॥२०५॥

लोहशलाकानिवहै: स्पर्शाश्मनि भिद्यमानेऽपि ॥
स्वर्णत्वमेति लोहं व्देषादपि विव्दिषां तथा प्राप्ति: ॥२०६॥
अनेक लोखंडी सळ्यांनी परिसाच्या दगडास जरीं फोडलें तरीं त्या लोखंडी सळ्या सोन्याच्या बनतात. त्याप्रमाणें भगवंताचा व्देष करणार्‍यांसहि त्या व्देषानें परमेश्वरप्राप्तिच होते. ॥२०६॥

नन्वात्मन: सकाशादुत्पन्ना जीवसन्ततिश्चेयम्‍ ॥
जगत: प्रियतर आत्मा तत्‍ प्रकृते च संभवति ॥२०७॥
हे सर्व प्राणिमात्र आत्म्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. आणि आत्मा हा जगास अत्यंत आवडणारा आहे. ही गोष्ट श्रीकृष्णाबद्दलहि अनुभवास येते. ॥२०७॥

वत्साहरणावसरे पृथग्वयो-रुप- वासना-भूषान्‍ ॥
हरिरजमोहं कर्तु सवत्सगोपान्विनिर्ममे स्वस्मात्‍ ॥२०८॥
एकदां गोकुळांत ब्रह्मदेवानें वासरें व गोपाळ पळविले तेव्हां ब्रह्मदेवाचा गर्व दूर करण्यासाठीं निरनिराळ्या वयाचे, वासनांचें; आणि निरनिराळे अलंकार घालणारे गोपाल आणि वासरें स्वत: पासूनच निर्माण केलीं. ॥२०८॥

अग्रेयर्था स्फुलिडा: क्षुद्रास्तु व्युच्चरन्तीति ॥
श्रुत्यर्थ दर्शयितुं स्वतनोरतनोत्स जीवसंदोहम्‍ ॥२०९॥
अग्रीपासून ज्याप्रमाणें लहान लहान ठिणग्या उत्पन्न होतात तसे जीव ब्रह्मापासून उत्पन्न होतात हा श्रुतीचा अर्थ निदर्शनास आणण्यासाठीं स्वत:च्या शरीरापासून अनेक जीवांस निर्माण केलें . ॥२०९॥

यमुनातीरनिकुज्जे कदाचिदपि वत्सकांश्च चारयति ॥
कृष्णे तथार्यगोपेषु च वरगोष्ठेषु चारयत्सवारात्‍ ॥२१०॥
तिकडे यमुनेच्या तीरावरील कुंजांत (वेलींनी बनलेल्या घरांत) एकदां श्रीकृष्ण आणि बलराम वांसरांस चारीत असतां व दुसरे गोप गाईस चारीत असतां ॥२१०॥

वत्सं निरीक्ष्य दूराद्राव: स्नेहेन संभ्रान्ता: ॥
तदाभिमुखं धावन्त्य: प्रययुर्गोपैश्च दुर्वारा: ॥२११॥
त्या कृष्णरुप वासरांना दुरुन पाहिल्यावर गाई प्रेमानें भारुन गेल्या आणि गोपांस न जुमानतां आपापल्या वासरांजवळ धांवत आल्या. ॥२११॥

प्रस्रवभरेण भूय: सुतस्तना: प्राप्य पूर्ववव्दत्सान्‍ ॥
पृथुरसनया लिहन्त्यस्तर्णकवन्त्य: प्रपाययन्प्रमुद: ॥२१२॥
त्या गाईनां जरी घरीं लहान वांसरें होतीं तथापि आज त्या मोठया वासरांस पाहिल्यावर त्यांना प्रेमानें पान्हा फुटला. त्या गाई त्या कृष्णरुप वांसरास जिभेने चाटीत चाटीत पुन्हा पाजू लागल्या. ॥२१२॥

गोपा अपि निजबालाज्जगृहुर्मूर्धानमाघ्राय ॥
इत्थमलौकिअकलाभस्तेषां तत्र क्षणं ववृधे ॥२१३॥
त्याप्रमाणेंच गवळ्यांनीं सुध्दां आपल्या मुलांचें मस्तक हुंगून त्यांस जवळ घेतलें. याप्रमाणें त्या कृष्णरुप बालकांविषयींचें प्रेम प्रत्येक क्षणाला जास्त जास्त वाढूं लागलें. ॥२१३॥

गोपा वत्साश्चान्ये पूर्व कृष्णात्मका ह्यभवन्‍ ॥
तेनात्मन: प्रियत्वं दर्शितमेतेषु कृष्णेन ॥२१४॥
गोपाल आणि वांसरें हीं पूर्वीं ब्रह्मदेवानें हरण केलीं त्याबरोबर तीं कृष्णरुप झालीं. यावरुन श्रीकृष्णानें आत्म्याचें प्रियत्व गोपाळ व वांसरें यांचें ठिकाणीं दर्शविलें. कारण ॥२१४॥

प्रेय: पुत्राव्दित्तात्‍  प्रेयोऽन्यस्माच सर्वस्मात्‍ ॥
अन्तरतरं यदात्मेत्युपनिषद: सत्यताऽभिहिता ॥२१५॥
आत्मा हा पुत्रापेक्षां, द्रव्यापेक्षां, आणि इतर सर्व वस्तूपेक्षांहि प्रिय आहे, तो अत्यंत जवळचा आहे. अशी उपनिषदांनीं आत्म्याची सत्यता वर्णिली आहे. ॥२१५॥

नन्वुच्चावचभूतेष्वात्मा सम एव वर्ततेऽथ हरि: ।
दुर्योधनेऽर्जुने वा तरतमभावं कथं नु गतवान्‍ स: ॥२१६॥
श्रेष्ठ किंवा कनिष्ठ अशा प्राण्यांमध्यें आत्मस्वरुपानें हरि सारखाच आहे. मग दुर्योधन आणि अर्जुन यांच्यांत एक चांगला व दुसरा वाईट अशा रीतीनें त्यांची प्रसिध्दि कां झाली? (अर्थात्‍ आत्म्याच्या दृष्टीनें दोघेहि सारखेच आहेत. मात्र अज्ञान्यास ते निरनिराळे भासतात एवढेंच) ॥२१६॥

बधिरान्धपगुमूका दीर्घा: खर्वा: सरुपाश्च ।
सर्वे विधिना दृष्टा: सवत्सगोपाश्चतुर्भुजास्तेन ॥२१७॥
बहिरे, आंधळे, पांगळे, मुके , उंच, ठेगणे आणि सुंदर असे गोपाळ आणि वांसरें हीं सर्व त्या ब्रह्मदेवाला चतुर्भुज श्रीकृष्णरुप दिसलीं. ॥२१७॥

भूतसमत्वं नृहरे: समो हि मशकेन नागेन ।
लोकै: समस्त्रिभिर्वेत्युपनिषदा भाषित: साक्षात्‍ ॥२१८॥
श्रीकृष्ण हा सर्व प्राण्यांत सारखाच असल्यामुळें तो चिलट आणि हत्ती किंवा स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक यांत सारखाच एकरुपानें भरुन राहिला आहे असें प्रत्यक्ष उपनिषदांनीं सांगितलें आहे. ॥२१८॥

आत्मा तावदभोक्ता तथैव ननु वासुदेवश्चत्‍ ।
नानाकैतवयत्नै: पररमणीभि: कथं रमते ॥२१९॥
जर आत्मा भोक्ता नाहीं आणि तोच श्रीकृष्ण आहे तर अनेक कपटनाटकें करुन तो परस्त्रियांशीं ॥गोपस्त्रींशीं॥ रमला; हें खरें कसें ठरणार ? ॥२१९॥

सुन्दरमाभिनवरुपं कृष्णं दृष्टा विमोहिता गोप्य: ।
तमाभिलषन्त्यो मनसा कामाव्दिरहव्यथां प्रापु: ॥२२०॥
श्रीकृष्णाचें तें त्रिभुवनांत सुंदर आणि अपूर्व असें रुप पाहून स्वत: गोपीच अत्यंत मोहित झाल्या आणि मनानें त्याची इच्छा करुं लागणार्‍या त्या विरहव्यथेनें पीडित झाल्या ॥२२०॥

गच्छन्त्यस्तिष्ठन्त्यो गृहकृत्यपराश्च भुज्जाना: ।
कृष्णं विनाऽन्यविषयं  समक्षमपि जातु नाविन्दन्‍ ॥२२१॥
त्यावेळीं चालतानां, उभ्या रहात असतां घरांतील कामकाज करीत असतां, किंबहुना सर्व क्रिया असतां ते ते विषय पुढें आले तरी त्यांस श्रीकृष्णावांचून कशाचेंहि भान राहिलें नाहीं. ॥२२१॥

दु:सहविरहभ्रान्त्या स्वपतीन्‍ ददृशुस्तरुन्नरांश्च पशून्‍ ।
हरिरयमिति सुप्रीता: सरभसमालिडयांचक्रु: ॥२२२॥
याप्रमाणें सहन करण्यास कठीण अशा विरहामुळें उत्पन्न झालेल्या एकप्रकारच्या भ्रमानें आपल्यासमोर येणार्‍या पति, इतर माणसें, किंवा पशु वृक्ष वगैरेंस श्रीकृष्ण असें मानून अत्यंत प्रेमानें त्या गोपींनीं दृढ आलिंगन दिलें. ॥२२२॥

काऽपि च कृष्णायन्ती कस्याश्चित्पूतनायन्त्या: ॥
अपिबत्‍ स्तनमिति साक्षाव्द्यासो नारायण: प्राह ॥२२३॥
(तसेंच त्या प्रेमानें वेडया झालेल्या गोपींस श्रीकृष्णाचा इतका ध्यास लागून राहिला कीं, त्या स्वत: श्रीकृष्णानें गोकुळांत केलेल्या लीला करुं लागल्या.) एका गोपीनें श्रीकृष्ण बनून पूतनेचा वेष घेतलेल्या गोपीचें स्तनपान करावें; असें व्यासरुपी नारायणानें सांगितलें आहे. ॥२२३॥

तस्मान्निजनिजदायितान्कृष्णाकारान्व्रजस्त्रियो वीक्ष्य ॥
आपुरमृतमिति तासामन्तर्यामी हरि: साक्षात्‍ ॥२२४॥
गोकुलांतील स्त्रियांस आपला पति हाच श्रीकृष्ण आहे असें वाटून त्यांस प्रत्यक्ष मोक्षप्राप्ति झाली; त्यावरुन श्रीकृष्ण प्रत्यक्ष त्यांच्या हृदयांत वास करीत असे हें उघड आहे. ॥२२४॥

परमार्थतो विचारे गुडतन्मधुरत्वदृष्टान्तात्‍ ॥
नश्वरमपि नरदेहं परमात्माकारतां समायाति ॥२२५॥
परमार्थदृष्टीनें गूळ आणि त्याच्या अंगची गोडी ह्या दृष्टांतावरुन पाहिलें असतां नाशिवंत असा देहसुध्दां आत्म्याच्या ध्यानानें आत्मरुप होतो असें सिध्द होतें. ॥२२५॥

किं पुनरनन्तशक्तेर्लीलावपुरीश्वरस्येह ॥
कर्माण्यलौकिकानि स्वमायया विदधतो नृहरे: ॥२२६॥
मग स्वत:च्या मायेनें अलौकिक कृत्यें करणारा, सर्वशक्तिमान्‍ पुरुषश्रेष्ठ जो ईश्वरस्वरुप श्रीकृष्ण त्यानें यालोकीं धारण केलेलें लीलाशरीर प्राकृत नव्हतें हें काय सांगावें? ॥२२६॥

मद्भक्षणेन कुपितां विकास्य वदनं स्वमातरं तस्मिन्‍ ॥
विश्वमदर्श्यदखिलं किं पुनरथ विश्वरुपोऽसौ ॥२२७॥
मृतिकाभक्षणानें रागावलेल्या आपल्या मातेला श्रीकृष्णानें आपलें मुख उघडून दाखविलें तेव्हां यशोदेला त्यांत सर्व विश्व दिसलें. मग हा श्रीकृष्ण मानव नव्हे विश्वव्यापी असा परमेश्वरच आहे हें पुन: काय सांगावें? ॥२२७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T03:01:19.9170000