प्रबोधसुधाकर - प्रबोधप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


प्रबोधप्रकरणम् ।
माधुर्य गुडपिण्डे यत्तत्त्तस्यांशकेऽणुमात्रेऽपि ॥
एवं न पृथग्भावो गुडत्वमधुरत्वयोरस्ति ॥१५८॥
गुळाच्या खडयांत जी गोडी असते ती गोडी त्याच्या अणु एवढया भागांतहि असते. तात्पर्य गूळ व त्याची गोडी यांमध्यें भेद॥निराळेपणा॥ नाहीं. ॥१५८॥

अथवा न भिन्नभाव: कर्पूरामोदयोरेवम्‍ ॥
आत्मस्वरुपमनसां पुंसां जगदात्मतां याति ॥१५९॥
किंवा कापूर आणि त्याचा सुवास यांत भेद नाही. याप्रमाणें सर्वत्र आत्माच भरुन राहिला आहे अशी ज्यांची भावना झाली (त्यांस जग व आत्मा यांत भेद दिसत नाहीं म्हणजे) ते जगच आत्मस्वरुप मानितात. ॥१५९॥

यद्भावानुभव: स्यान्निद्रादौ जागरस्यान्ते ॥
अन्त: स चेत्स्थिर: स्याल्लभते हि तदाऽव्दयानन्दम्‍ ॥१६०॥
निद्रेच्या आरंभीं आणि जागें होण्याच्या सुरवातीस मनुष्याची जी वृत्ति असते; तीच वृत्ति जर अंत:करणांत स्थिर होईल तर पुरुष ब्रह्मानंदाचें सेवन करील ॥१६०॥

अतिगम्भीरेऽपारे ज्ञानचिदानन्दसागरे स्फारे ॥
कर्मसमीरणरतला जीवतरडावलि: स्फुरति ॥१६१॥
फार खोल, दुसरीं तीर (अर्थात दुसरी अवस्था- स्थिति) नसलेल्या आणि विशाल अशा प्रकारच्या ज्ञानरुप चैतन्यसागरांत कर्मरुपी वायूनें चंचल होणारी ( उसळ घेणारी) जीवरुप लाटांची ओळ स्फुरण पावते. ॥१६१॥

खरतरकरै: प्रदीप्तेऽभ्युदिते चैतन्यतिग्मांशौ ॥
स्फुरति मृषैव समन्तादनेकविधजीचमृगतृष्णा ॥१६२॥
अत्यंत प्रखर अशा किरणांनीं तळपणारा चैतन्यरुपी सूर्य उदयास आला असतां नानाप्रकारचे जीव हेंच ॥खोटें॥ मृगजल सर्व ठिकाणीं भरुन राहिलें आहे असें वाटतें. ॥१६२॥

अन्तरदृष्टे यस्मिज्जगदिदमारात्‍ परिस्फुरति ॥
दृष्टे यस्मिन्‍ सकृदपि विलीयते काप्यसद्रूपम्‍ ॥१६३॥
आत्मस्वरुपाचें ज्ञान झालें नाहीं म्हणजे जग आपल्या जवळच आहे असें वाटतें; पण आत्मस्वरुपाचें एकदां ज्ञान झालें म्हणजे हें खोटें जग कोठच्या कोठें गडप होतें. ॥१६३॥

बाह्याभ्यन्तरपूर्ण: परमानन्दार्णवे निमग्रो य: ॥
चिरमाप्लुत इव कलशो महार्‍हदे जन्हुतनयाया: ॥१६४॥
आंत आणि बाहेर सर्व ठिकाणीं व्यापून राहिलेल्या परमानंदरुपी समुद्रांत जो बुडेल तो गंगेच्या मोठया डोहांत कायमच्या बुडालेल्या घागरीसारखा (फिरुन केव्हांहि वर न येणारा) होय. ॥१६४॥

संपूर्णावरणांबुतैलनिवहे ब्रह्माण्डभाण्डोदरे ॥
सूत्रे सत्रिगुणात्मके समुदिते शश्वत्परं ज्योतिष: ॥
अज्ञानान्धतमोनिवारणपटौ बोधप्रदीपोदये ॥
शुध्दज्ञानवतां पतन्त्यनुदिनं चेत: पतगा इह ॥१६५॥
ब्रह्मांडरुपी भांडयांत पृथ्वी वगैरेस आच्छादन करणारें पाणी हेंच कोणी तेल त्यांत (भिजविलेल्या) त्रिगुणात्मक सूत्राच्या (वातीच्या) योगानें युक्त असलेला आणि अज्ञानरुप अंधकार निवारण करण्याविषयीं समर्थ असलेला परब्रह्माचा ज्ञानरुप दिवा प्रज्वलित झाला असतां त्यावर शुध्दज्ञानवान पुरुष पतंगासारखे एकसारखे उडी घेतात- पडतात. ॥१६५॥

पूर्णात्पूर्णतरे परात्परतरेऽप्यज्ञातपारे हरौ ॥
संवित्स्फारसुधार्णवे विरहिते वीचीतरडादिभि: ॥
भास्वत्कोटिविकासितोज्ज्वलदिगाकाशप्रकाशे परे ॥
स्वानन्दैकरसे निमग्रमनसां न त्वं न चाहं जगत्‍ ॥
जो पूर्णाहून पूर्ण, पराहून पर, ज्याचा अंत कोणासहि लागत नाहीं, लहान मोठया कोणत्याहि लाटा ज्यावर मुळींच नाहींत; अशाप्रकारचा ज्ञानरुपी विशाल अमृतसमुद्रच आणि कोटयवधि सूर्यानीं प्रकाशित जें देदीप्यमान दिशारुपी आकाश त्यामध्यें व्यापून राहणार्‍या (अर्थात स्थिरचर व्यापून राहणार्‍या) भगवंताचे ठिकाणीं ज्यांचे अंत:करण निमग्र (तल्लीन) झालें आहे,त्या पुरुषाची तूं, मी आणि जग अशी भेदबुध्दि राहात नाहीं. (ते सर्व ठिकाणी परमेश्वरबुध्दीनेंच पाहतात).॥१६६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T02:58:29.9800000