प्रबोधसुधाकर - मनोलयप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


मनोलयप्रकरणम् ।
संसारतापतप्तं नानायोनिभ्रमात्परिश्रान्तम्‍ ॥
लब्ध्वा परमानन्दं न चलति चेत: कदा कापि ॥१५०॥
संसारांतील अनेक तापांनीं (कष्टांनीं) श्रमून गेलेलें आणि नानाप्रकारच्या योनी फिरण्यानें  दमून गेलेलें अंत:करण परमानंदाची प्राप्ति झाल्यावर कधीं कोणत्याही ठिकाणीं चंचल होणार नाहीं. ॥१५०॥

अव्दैतानन्दभरात्किमिदं ? कोऽहं? च कस्याहम्‍? ॥
इति मन्थरतां यातं यदा तदा मूर्छितं चेत: ॥१५१॥
आणि त्या ब्रह्मानंदाच्या भरांत मी कोण? हें काय ? हा कोणाचा? वगैरे अनेक प्रश्न उत्पन्न होऊन जेव्हां त्याची (विचाराची) गति खुंटते तेव्हां तें मूर्छित होतें. ॥१५१॥

चिरतरमात्मानुभवादात्माकारं प्रजायते चेत: ॥
सरिदिव सागरयाता समुद्रभावं प्रयात्युचै: ॥१५२॥
समुद्रास मिळालेली नदी जशी समुद्ररुप होते तसें पुष्कळ काल आत्मस्वरुपाच्या अनुभवामुळें हें मनच आत्मस्वरुप होतें. ॥१५२॥

आत्मन्यनुप्रविष्टं चित्तं नापेक्षते पुनर्विषयान्‍ ॥
क्षीरादुध्दृतमाज्यं यथा पुन: क्षीरतां न यातीह ॥१५३॥
दुधापासून निराळ्या काढलेल्या तुपाचें ज्याप्रमाणें पुन:दूध होत नाहीं; त्याप्रमाणें आत्मस्वरुपांत लीन झालेलें मन पुन: विषयांची इच्छा करीत नाहीं. ॥१५३॥

दृष्टौ द्रष्टरि दृश्ये यदनुस्यूतं च भानमात्रं स्यात्‍ ॥
तत्रोपक्षीणं चेच्चितं तन्मूर्छितं भवति ॥१५४॥
(मण्यांतील दोर्‍याप्रमाणें) ज्ञान, ज्ञाता, (जाणणारा) व ज्ञेय (जाणावयाचें तें) यांत जें सारखेंच भरुन राहिलें असून जें केवळ  जाणिवेच्या स्वरुपानेंच अनुभवास येतें; अशा आत्मस्वरुपामध्यें जेव्हां चित्त लीन होतें तेव्हां तें मूर्छित होतें म्हणजे पुन: विषयचिंतनास असमर्थ होतें. ॥१५४॥

याति स्वसंमुखत्वं दृडमात्रं वा यदा तदा भवति ॥
दृश्यद्रष्टविभेदो ह्यसंमुखेऽस्मिन्न तद्भवति ॥१५५॥
ज्यावेळीं ज्ञान आपल्या समोर येतें (म्हणजे आपण निराळा आणि ज्ञान निराळें अशी भावना असते) त्यावेळी दृश्य पदार्थ आणि पाहाणारा ह्यांत भेद असतो. आणि तें ज्ञान समोर नसतें तेव्हां दृश्य पदार्थ आणि द्रष्टा (म्हणजे जाणणारा आणि जाणीव) यांत भेद असत नाहीं. ॥१५५॥

एकस्मिन्‍ दृडमात्रे तत्र द्रष्टादिकं हि समुदेति ॥
लीने द्रष्टरि दृश्ये दृडमात्रं शिष्यते पश्चात्‍ ॥१५६॥
(प्रथम) ज्ञान (जाणीव) हेंच असतें त्यांत (मागाहून) द्रष्टा ॥ज्ञाता॥ व दृश्य (ज्ञेय) हीं उत्पन्न होतात; (आणि शेवटीं ज्यावेळीं अभ्यासयोगानें) ज्ञाता आणि ज्ञेय हीं त्या ज्ञानांतच लीन होतात तेव्हां ज्ञान हेंच एक शिल्लक राहतें. ॥१५६॥

दर्पणत: प्राक्पश्चादस्ति मुखं प्रतिमुखे तदाभासे ॥
आदर्शेऽपि च नष्टे मुखमस्ति मुखे तथैवात्मा ॥१५७॥
मुख आरश्याच्या पूर्वीं असतें आणि मग तें आरशांतील प्रतिबिंबरुप आभासांत दिसतें व तो आरसा नष्ट झाला तरीहि मुख मुखाचे ठिकाणींच असतें. त्याप्रमाणें आत्माहि आत्म्याचे ठिकाणींच असतो असें समजावें. ॥१५७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T02:57:41.4630000