प्रबोधसुधाकर - कर्तृत्वभोक्त्तृत्वप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


कर्तृत्वभोक्त्तृत्वप्रकरणम् ।
यव्दत्सूर्येऽभ्युदिते स्वव्यवहारं जन: क्रुरुते ॥
तं न करोति विवस्वान्न कारयति तव्ददात्माऽपि ॥१३३॥
जसें सूर्योदय झाल्यावर जो तो मनुष्य आपापल्या उद्योगास लागतो. पण तो उद्योग सूर्य करीत नाहीं व करवीतहि नाहीं, त्याप्रमाणें आत्मासुध्दां कांहीं करीत नाहीं व करवीतहि नाहीं. ॥१३३॥

लोहे हुतभुग व्याप्ते लोहान्तरताडयमानेऽपि ॥
तस्यान्तर्गतवन्हे: किं स्यान्निर्घातजं दु:खम्‍ ॥१३४॥
अग्रींत तापवून लाल केलेल्या लोखंडावर कितीहि घणाचे घाव घातले तरी त्या प्रहाराचें दु:ख अग्रीस असतें काय? (नाहीं) . ॥१३४॥

निष्ठुरकुठारघातै: काष्ठे संछेद्यमानेऽपि ॥
अन्तर्वर्ती वह्रि: किं घातैश्छेद्यते तव्दत्‍ ॥१३५॥
तसेंच कुर्‍हाडीच्या कठोर प्रहारांनी (घावांनीं) लांकूड तोडीत असतां त्या लांकडाच्या आंत असलेला अग्रि तोडला जातो काय ? अर्थात्‍ नाहीं त्याप्रमाणें ॥१३५॥

तनुसंबन्धाज्जातै: सुखदु:खैर्लिप्यते नात्मा ॥
ब्रूते श्रुतिरपि भूयोऽनश्रन्नन्योऽभिचाकशीत्यादि ॥१३६॥
आत्मा शरीरांत वास करीत असला तरी शरीराला होणार्‍या सुखदु:खांनीं तो लिप्त होत नाहीं. ॥म्हणजे तीं सुख- दु:खे त्यास होत नाहींत॥ आणि देहाहून निराळा असलेला आत्मा सुखदु:ख न भोगतां स्वत:च्या सामर्थ्यानें प्रकाशमान मात्र असतो वगैरे अर्थाची श्रुतीहि हेंच सांगते. ॥१३६॥

निशि वेश्मति प्रदीपो दीप्यति चौरस्तु वित्तमप्रहरति ॥
ईरयति वारयति वा तं दीप: किं तथाऽऽत्माऽपि ॥१३७॥
रात्रीं घरांत दिवा तेवत असतो आणि चोर येऊन द्रव्य चोरुन नेतो. तेव्हां तो दिवा त्या चोरास चोरी कर, किंवा नको करुं  अशा प्रकारची प्रेरणा किंवा निवारण करतो काय? (नाहीं). तसाच आत्मा कोणतेंहीं कार्य करीत-करवीत नाहीं. ॥१३७॥

गेहान्तर्दैववशात्कस्मिंश्चित्समुदिते विपन्ने वा ॥
दीपस्तुष्यत्यथवा खिद्यति किं तव्ददात्माऽपि ॥१३८॥
किंवा दैवयोगानें (दिवा तेवत असतां) घरांत कोणी जन्मास आलें अथवा मरण पावलें वा दुसर्‍या कोणत्या तरी संकटांत पडलें,  तथापि त्यामुळें त्या दिव्याला सुखदु:ख होतें काय ? ॥नाहीं.॥ आत्म्यासंबंधीसुध्दां तसेंच समजावें. ॥१३८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T02:55:07.1830000