दारुबंदी पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


महाराष्ट्रातील एक यशस्वी होतकरु शाहीर श्री. मारुतराव हळबे यांनी दारुबंदीचे प्रसंगी केलेला पोवाडा खाली छापला आहे. श्री. हळबे यांना पूर्वी म. प्रां. काँ. कमेटीनें मागवलेल्या काँग्रेसच्या पोवाड्यामध्ये बक्षिस (सुवर्ण पदक) मिळाले असून त्यांनी सातारच्या त्यांच्या शाहीर मंडाळास पुष्कळ कवने करुन दिली आहेत. महाराष्ट्र सरकारने दारुबंदी पोवाड्‍यास रु. २५ बक्षीस दिले आहे. दारुबंदी काँग्रेसकरी मुंबई शहरांत । त्याची चळवळ जोरात होणार आँगस्ट महिन्यांत । पंधरा आँगस्टला सुरवात । हिंदु मुसलमान त्यांत । गिरणी मालक मजुरांत । आणि गरीब श्रीमंतात । भेद नसे कवणांत । चढा ओढ लागे त्यांत । असे कार्य जिथे होणार । यश खात्रिनेच मिळणार ॥
मदिराकरी खरोखरी सर्वस्वाचा नाश, नसे क्षणाचा अवकाश बळी पडे जो व्यसनास, झोळी येईल हातास, होळी संसाराची खास, मानधन विलयास, रावरंक एक रास, शेवटी घेई प्राणास, मान्य नसे कवणास, हो असें दुष्ट व्यसन हे खास ॥
पिऊन दारु झिंगुन आला, दौलता घरांत, पत्नी सारजा दारात, गेली दुर्गंधी नाकात, झाली चकीत क्षणांत, पति निशेच्या भरात, झोका गेला त्या दारांत, पति अशा स्थितिंत पाहुनी । हो लोटले अश्रु लोचनीं  ॥२ ॥
(चाल शाखांवरी)- पतिरायाला सारजा म्हणे दारुला । अशी अवदसा कां आठवली करील घाताला ॥
घेईल मदिरा अंती तुमच्या खासचिं प्राणाला । संसाराची राख रांगोळी करता कां बोला । निशेत पहिले उत्तर दिधले काय कळे तुजला । लज्जत दारुचीया माहित आहे ग मजला ॥
ब्रम्हानंदाहुनी गमे मज मजा दारुची या । घेई न जो या पेया त्याचा जन्म जाई वाया । पुर्ण निशा दारुची चढली पाहुनिया पतिला । निराश होऊनि स्वस्थ बैसली करिल काय बोला । दुसरे दिवशी त्या वेळेला दौलू चालला । गुत्याच्या बाजूस पाहूनी पत्नि म्हणे त्याला ॥
आज तरी ऎका हो माझे दारु नका घेऊ । पदर पसरूनी भीक मागते नका पुढे जाऊ ॥
लाथाडुनि पत्नीस चालला तोंच पुढे आला । मालु नका आईस ऎसे बाळ त्यास वदला ॥
त्यालाही मारुनी पातला दौलू गुत्याला । दया न माया व्यसनधिन जो झालेला त्याला ॥
घेऊनि मांडीवरि बाळाला उगे करी त्याला । अश्रुपूर परि तिच्या लोटला होता नयनाला ॥
पाहूनि तिजला बाळ विचारी रडसी कां काला । सांगणार ती काय, कंठ परि गहिवरुनी आला ॥
(चा. मो) झिंगुनि पडला होता दौलू इकडे गटारांत, गर्दि झाली तिथें दाट, जो जो म्हणे याचि वाट,काय करावि इतक्यांत, गांधिसेवक काढि वाट, म्हणे दूर सरा सर्वास हो, म्हणे आम्ही नेतो घरीं यास ॥
चौक २ रा
दारुपायि पैसा गेला जमिन जुमला पार । बायकोला देई मार, मोल मजुरि करणार, त्याचे पैसे मिळे चार, त्यावर गुजराणा करणार, परि दौलू ते घेणार, हो मग पोट कसे भरणार  ॥१ ॥
कटाव:- सखे जाऊ चला मुंबापुरी, करुया नोकरी, पैसा मिळे भारी सुखाची सरी, काय वर्णु तरी, जिवाची मुंबई करु या ग ॥
पतिराज ऎका वैरवरी, मीठभाकरी, एथलि हो बरी, नको ती नोकरी मुंबईचि भारी, आक्काबाई परी, करिल धुळधाणि संसाराची  ॥२ ॥
पोटासाठी आला दौलू मग मुंबईस तिथें पगार चाळीस, परि दारुपायी वीस कासावीस, कधि खर्ची सत्तावीस, कधि पगार खलास करणार, हो मग मुले काय खाणार ॥
चाल शाखांवरी- बाळ आजारी पडला परि ना उपचार पैसा । पडली चिंता आई म्हणे हा वखत रे कैसा ॥
समजु लागले बाप जाहला दारुबाज ऎसा । बाळ म्हणे आईस सागुकां मार्ग पहा खासा ॥
अधीस झाली ऎकायाला बाळाच्या बोला । सांग म्हणे मज गोड बोल लवकुर - वाळुनि त्याला ॥
आठवतो कां आई तुला तो गांधीचा चेला । पडलेल्या बाबांना घेऊनी नव्हाता कां आला ॥
दाविला ग तो मार्ग चांगला आई आपल्याला । पहातोच जर केव्हा दिसला गांधीचा चेला ॥
नामि काढलिस युक्ती बाळा आई म्हणे त्याला चाळीत आपुल्या येईल तेव्हा विचारीत त्याला ॥
दुसरे दिवशीं आला जेंव्हा तो काँग्रेसवाला । सांगुनि सगळी स्थिती. विनवले औषध घ्यायाला
काँग्रेस इस्पीतळात घेऊनि चला तुम्ही बाळा । तेथे औषध पाणी उत्तम मिळेल बाळाला ॥
दारुबंदी करण्या झटते काँग्रेस सरकार । व्यसनापासुनि येतिल तुमचे पति ताळ्यावर ॥
दारु चोरुनि घेईल त्याला तुम्ही काय करणार । दारुबाज जो अट्ट्ल त्याचा कैक कसा जिरणार जो जो घेईल दारु त्याला शिक्षा होणार । चिंता त्याची नको तुम्हाला खंबिर सरकार ॥
तुमच्या तोंडी पडो साखर गांधि खरा देव । भाकर देईल बेकारांची त्यास खरी कीव ॥
चाल मोडते - गांधी चेला घेऊन बाळा माते बरोबर । काँग्रेस दवाखान्यावर । दिले औषध सत्वर । चिंता नको खरोखर । असें म्हाणाला डाँक्टर । परि मातेचे अंतर, काळजीने गेले करवून । हो इतक्यात दु:ख दारुण ॥
चौक ३ रा
पिऊन दारु दौलू चाले होऊनि बेहोष दिसी भिकार्‍याचा वेष्म चढला दारुचा आवेश मुखीं दारुचा संदेश, जगा देई उपदेश नसे भीती लवलेश, स्वारि डुलत डुलत चालली हो मोटार खालि सापडली ॥
काँग्रेस सेवक धावत आला दौलताजवळ गर्दी जाहली पुष्कळ घेऊनी पाण्याची ओंजळ, मुखि घालुनिया जळ हाक मारली प्रेमळ परि शुध्दिवर येईना हो तात्काळ नेले दवाखान्या ॥
(चाल- शाखांवरी) पाहुनि त्याला पति सारजा घाबरुनी गेलीं । गरिबामागे दु:खे येती कोणि न कां वाली ॥
पुत्र आजारी पति शय्येवरि शुध्द न ज्या काहि ॥
अंत किती रे देवा पाहसि द्या न कां तुजशी ॥
घाबरु नका येईल शुध्दी दौलूला आता । औषध जाता शुध्दीवर तो आला दौलता ॥
आंनदी आंनद दाटला माता पुतांना । धन्यवाद मग त्यांनी दिधले गांधि सेवकांत ॥
दौलूनें मग प्रणाम केला गांधि सेवकांना । पुनर्जन्म तुम्ही माझा केला दास मी चरणाचा काँग्रेस सेवक म्हणति असे हा प्रताप गांधीचा । करा प्रतिज्ञा आतां सोडा नाद दारुचा ॥
घरदाराचे झाले वाटोळे काँग्रेसचे ऎका । दारु सोडा पैसा जोडा । समय आला बाका ॥
दारुपायी कितीक राज्ये गेली विलयाला । दारुपायी किती आजवरि मुकले प्राणाला ॥
व्यसनाधिन होऊनी करु नका घट्ट दास्य पाश । निर्व्यसनी होउनी संघटित तोडून पाश ॥
देशा देईल स्वराज्य एक़चि संस्था काँग्रेस । दारु सोडून मदत करा तुम्ही दारुबंदीस ॥
दौलू म्हाणाला पटले तुमचे म्हणणे आज मला । गांधि नाही दारु पेय़ाला । दौलू लागला दारुबंदी प्रचार कार्याला ॥
(चा. मो.) दारुबंदी जारी करी काँग्रेस सरकार, बहुजनांचा आधार, दारुबाजाच उद्धार, करी कलाल संहार, शत्रूमाहि ठार करि, स्वातंत्र्य त्वरित येणार, हो जर शिस्त सर्व पाळणार ॥
(कटाव)- गल्ली गल्ली मध्ये व्याख्यानाची घाई, त्यात पोवाडे मिठाई, शाहीर दामुअण्णा देई, कोणी करी रोषणाई, काय वर्णावी नवलाइ, गर्दी झाली ठाई, गांधी टोप्या डोई, कोणी करी तो शिष्टाई, दारुद्याची चपळाई, परि तिथे पोलिस भाई पाहूनि होई त्यानी आई, पोलिस अधिकारी जाई, चहूकडे पाहून येई, मंत्रीकरी चतुराई, कार्यक्रम नीट होई, जन थक्क होऊन जाई काँग्रेस कार्य करणार, हो तिचे तिथें काय नाही होणार ॥
टिळकांपासुन पिके-टिंग चळवळ जोरात । झाली अखिल देशांत, त्याचे पायी तुरुंगात, हाल सोशिलें अगणित, यत्न केले अटोकाट, परि इंग्रजांचा हात, काँग्रेस द्रोह करण्यात, त्यातें यशाची ना वाट, दिसली कोणाच्या टप्यात, येता काँग्रेस अधिकारांत, केली इंग्रजांवर मात, दारुबंदीच्या कार्यात, यास्तव स्फ़ूर्ति कवनास, हो आत्माराम तनयं शाहिरास ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP