मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
धर्माख्यान

धर्माख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने


ओव्या - द्वेतवनी अद्वैत चित्त । धर्मराजा वधु रहित । सवें द्रोपदी धौम्य पुरोहित । आश्रम करुनि राहिले ॥१॥
कोणाचाही द्वेष न करी । दयादृष्टी सर्वावरी । अजात शत्रु नाम निर्धारी । म्हणोने लोकीं पावला ॥२॥
सहा धर्मी त्याची रती । संकटीही न चळे मती । धनें पाळी प्रजेप्रती । म्हणोनि धर्मराज म्हणती तया ॥३॥
साधुसंगे समाधानें । वर्ते सत्कर्मे अनुष्ठाने ॥ भ्रष्ट पद ही क्लेश नेणे । वैराग्य भाग्यें संतुष्ट
दिंड्या -- असें ऐकुनि संतप्त होय चित्तीं । म्हणे दुर्योधन जाऊं वना प्रती कळी काढूनि पांडवा रणीं मारूं ।
दूर संकट जो तोचि त्या निवारुं ॥१॥
सवें दु:शासन आणि इतर वीर । निघे घेउनि चतुरंग सैन्यभार । शीघ्र वेगें चालता पथीं घोर ।
विघ्न उद्‍भवले त्यांसि दुर्निवार ॥२॥
आर्या --- विपिन द्वारा रोधी गंधर्वाधीश चित्रसेन दळ । या जिंकोनि रिघाया न शके कुरुसैन्य होय जरि प्रबळ ॥१॥
गाठूंनि चित्रसेना दुर्योधन त्यासिं उग्र समर करीं । परि दुष्कर्म विपाकें जो जित त्या विजयभाग्य केविं वरी ॥२॥
छिन्नास्त्र भग्नरथ कुरुपति होता शत्रु साधके विकळ । धरिली अरिनीं वेगें जिंकुनि तद्वंधुवर्गही सकळ ॥३॥
ते वृत्त धर्मराया कळविति कुरुमंत्रि भीत पद नमुनी । म्हणती बाधा सोडवि भ्रात्या गंधर्वराज बळ दमुनी ॥४॥
साक्या --- ऐकुनि भीम म्हणे खळ आम्हां छळावयासीं आला । भक्तसखा हरिभक्त वैरिया दंडिल कां न तयाला ।
झाले हें बरवें । कौरव धरिले गंधर्वे ॥१॥
मिळवुनि दळ चतुरंग प्रयासें जे आम्हीं टाळावें । अरिष्ट तें परयत्नें टळतां आड कसें त्या यावें ॥ झालें हे बरवें ।
कौरव धरिले गंधर्वे ॥१॥
अन्यायें जे वर्तति विपरित फळ तें पावती अंती । कपट द्युंति कुमति सुयोधन कां आतां करि खंती ॥
झाले हे बरवे । कौरव धरिले गंधर्वे ॥३॥
वसतां येथ सुखांत आमुचा जेणे हरिला भार । चित्रसेन तो मित्र तयाचे कां न स्मरु उपकार ॥ झाले हे बरवे ।
कौरव धरिले गंधर्वें ॥४॥
शीत वात आतपा सोसुनी तापसि कष्टे काळ । कंठिति बंधु तया भेटाया येतो कीं कुरुपाळ । झाले हें बरवे ।
कौरव धरिले गंधर्वे ॥५॥
श्लोक --- भीमवाक्य अति निष्ठुर यापरी । ऐकुनी सदय भूपति अंतरी ॥
दु:ख पाहुनि म्हणे अनुजा तुला । कां गमे कुळहित कुलक्षय आपुला ॥१॥
आम्हांसवें जरि सुयोधन वैर भावें । वर्ते तरी तदरि अस्मदरि स्वभावे ॥
ज्ञाते न आठविति संकटकालि त्याशी ॥२॥
बापा नव्हे समय हा परुषोत्तराचा । दीना निवारणचि क्षत्रिय धर्म साचा ।
देवोनिया अभयदान स्वबांधवाते । जा सोडवा अरिशिं साम करुनि त्यांते ॥३॥
ओव्या --- भयार्त होवोनि शरण । आप्तां प्रती आले जाण ॥ संकट समयी कुरुनंदन । वदति ऐसे त्यासि कसे ॥१॥
तरी शरणागत रक्षणा । तैसेचि निज कुळत्राणा ॥ होवोनि सिद्ध रणांगणा । जातां विलंब न करावा ॥२॥
हो कां कुळवैरी आपुला । धांव म्हणोनि शरण आला । हस्त जोडोनि तो तयाला । आर्यजन न उपेक्षी ॥३॥
वर लाभ राज्य प्राप्ती । अपुत्रासी पुत्रोत्पत्ती । येवढे सुख लाभे तयाप्रती । जो शत्रुक्लेश निवारी ॥४॥
याहुनि श्रेय काय तुजला । आजि सुयोधन शरण आला । बळखोनि तव बाहुबळाला । जीवदान तुज मागे ॥५॥
गुंतलो नसतों यज्ञानुष्ठानीं । तरी जातों मीच धांवोनी । कौरव सोडवावया लागोनी । निश्चयेसी भीमसेना ॥६॥
श्लोक ---सामोपचारेंचि सुयोधनातें । गंधर्व सोडी तरिं इष्ट मातें ॥
शत्रु न ऐके जरि माम युक्ती । योजा तरी सौम्यचि दंड युक्ती ॥१॥
मृदुपणे उमजे नच तो जरी । तरि धरोनि तया प्रति संगरीं ॥
सकल बांधव सत्वर सोडवा । परि वृथा कळ हा नच वाढवा ॥२॥
दिंड्या --- करिति शिरसावंद्य ती सकळ आज्ञा । कोण ऐशा बंधुची करि अवज्ञा । निघति पांडव कौरवां सोडवाया ।
आर्तत्राणां जन्मली साधुकाया ॥१॥
असो जिंकुनि गंधर्व कौरवातें । मुक्त करुनी आणिती आश्रमातें । त्यांसि पाहुनि कळवळे धर्म चित्तीं ।
साधु परम दु:खे परम कष्टि होती ॥२॥
साक्या --- शांतवुनी त्यां म्हणे युधिष्ठिर बारे साहस ऐंसे । नका करूं कधिं पुन्हा साहसे होय तुम्हा सुख कैसें ॥१॥
सुखें बंधुसह सुयोधना बा जाय स्वगृही आतां । न करिं वैर कुणाशी त्रातो होय हरि दयावंता ॥२॥
यापरि सांत्वन करुनि बांधवा देत अनुज्ञा जाया । बंदुनि सकळां खिन्नवदन खळ जाती आपुल्या ठायां ॥३॥
श्लोक --- साधूतें छळिती सदा खळ परी क्षोभे न त्यांची मती ।
मात्सर्या विषमस्थ हीन धरिती तैसेचि लोभाप्रती ।
जे प्रेमें सुकृती हरिसी भजती तो एक ज्यांची गती ।
त्यां रक्षी हरि तोचि नित्य अशुभीं त्यांचे नसे कीं रती ॥१॥

भक्तिपर पद्यें
राग विभास - ताल एका. (भूपाळी).
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरा जगपाळक । शुभबुद्धीचीचा दायक । सुखकारक दासांसी ॥१॥
तोचि थोर या त्रिभुवनीं । त्याच्या समान नाहीं कोणी । तोचि देनांते निर्वाणी । पावे प्रेमे दीनसखा ॥२॥
भावें आठवुनी अंतरीं । ध्याऊं दीनांचा कैवारी । तोचि तारक भवसागरीं । उद्धरि वेगें निज भक्तां ॥३॥
गाऊं त्याचें मंगल नाम । तोचि योग्यांचा विश्राम । पावूं निश्चित निजसुखधाम । घेऊं दर्शन आनंदे ॥४॥
राग यमन बिलावल - ताल चौताल.
परमदयाळ दीननाथ सत्प्रेमें भज श्रीभगवान्‍ ॥धृ.॥ सकलविधी व्यर्थ जाण । अनुदिन स्मर कृपाघन । भवसिंधुतारक तोचि जनार्धन । परम ॥१॥
राग भैरवी - ताल त्रिवट.
वद वद वद वद रसने नाम मंगलाचें । कर कर कर सार्थक या अतुल जीवनाचें ॥धृ.॥ तोचि दीनबंधु हरिल ।
करुनि कृपा कुमति अखिल । सद्‍भावे हृदय भरिल । स्वीय सेवकाचें ॥ वद. ॥१॥
कोण प्रसूवीण सदय । सत्कायी देइल जय । घोर दु:ख टाळिल भय । दीन अनाथाचे ॥ वद. ॥२॥
आठविं तरि जगदीश्वर । तोचि एक भवभयहर । भजन अति प्रेमल कर । निशिदिनी तयाचें ॥ वद. ॥३॥
राग सारंग - ताल चौताल.
मानस सुद्ध करोनि स्मर भवकाननभयहारक भक्तजनतारक दीनांचा कैवारी ॥धृ.॥
सर्वेश्वर करुणाकर  परममंगलनिधान सर्वांतर शांतिसदन प्रेमें स्ववश कर तोचि एक दीनोद्धार कृपाळ । मानस. ॥१॥
राग गौडसारंग - ताल त्रिवट.
या हो करुनि निर्मल मन । करुं भगवंताचे भजन ॥धृ. ॥ जगदुद्धारक भवभयहारक । करी सकल सृष्टीचें पालन ॥ या हो. ॥१॥
विषयसागरीं बळेचि बुडूनी । कां भ्रमभावें आपुले मन ॥ या हो. ॥२॥
व्यर्थ अहंकृति मनीं न धरुनि । करुं देहबुद्धिचे भजन ॥ या हो. ॥३॥
सोडुनि मत्सरभाव मनींचा । बंधुप्रीतीचे वर्धन ॥ या हो. ॥४॥
होउनि नित्य लीन निरंतर । करुं प्रभुचें कौतुकवर्णन ॥ या हो. ॥५॥
राग धनाश्री - ताल चौताल.
मंगल गुणगान करुं मंगलगुण दीनशरण भवभयहरण भावबळे जोडुं प्रेमें सुखद प्रभु दीनोद्धार ॥ धृ.॥ करु सज्जनसंगति
पापनाश सकल वासना निरसुनि ॥ मंगल.॥१॥
राग धनाश्री - ताल त्रिवट.
या हो सकल, करुनि विमल मन, भजूं त्या जननीतें, पापसिंधु पार होऊं ॥ धृ.॥ धरुनि पदर सुदृढ जिचा, तरले बहुत बहुत तरती,
आदिशक्ति करुणामयी त्यजिल केवि ती आम्हासी ठेविल्या अनन्यभाव ॥ या हो. ॥१॥
राग मारवा - ताल चौताल.
भज भवभयभंजन पातकनाशन तोचि पतितपावन दीनशरण दयाळ संकटहर्ता करिल जाण ॥धृ.॥ काममदादि वैरी फार गांजिताती
अनुक्षण शिणतोसि व्यर्थ कां रे कर भगवत्पदाश्रय शुद्ध चित्तें शुद्ध भावें शुद्ध प्रेमें ध्याई ॥ भज. ॥१॥
राग कल्याणी - ताल चौताल.
सद्‍भावे पूर्ण प्रेमें हरीचे पदीं लागुं या तोचि एक भक्तसंकटहारी दयाळ ॥धृ.॥ दीननाथ षड्रिपुभयभंजन भवकाननहुताशन पदनतदु:-स्वशोषण सुखकर कृपाळ. ॥१॥
राग तोडी - ताल चौताल.
वर्णूं मीं पामर तूतें केवि विश्वपते, एक रसनामुख अगणित तव गुण ॥ धृ.॥ भक्त श्राशुकसनकादिक मुनिजन मनुव्यासादिक थोर थोर अंत न पावले गुणगातां ॥वर्णू.॥१॥
राग कल्याणी - ताल त्रिवट.
अति सुस्सह ताप सराया । साधन भजन तुझें प्रभुराया ॥ धृ. ॥ काममदादिक मकरिं ओढिता। सोडविण्यास नरा या । साधन.॥१॥
नाना विषयावर्ती भ्रमतां । आधारास धराया ॥ साधन. ॥२॥
विविध वासनालहरी हृदयी । उठता शांत कराया ॥ साधन. ॥३॥
उद्योगीं बहु झोंके बसतां । निश्चय चित्तिं ठराया ॥ साधन. ॥४॥
ऐसा दुस्तर हा भवसागर । दुबळ्या सहज तराया ॥५॥
राग प्रभाती - ताल एका.
आठवितों तुज देवा प्रेमें भक्तजनां तूं सखा । सांभाळुनियां निजदासातें देसी नित्य सुखा ॥ धृ. ॥ अतुल प्रेमा अपार करुणा अगम्य प्रभु तव कळा । अगाध महिमा ज्ञाना पार न सीमा न तुझ्या बळा । अतर्क्य चातुर्यानें केलें भूषित त्वां भूतळा । मिठी घालितों सद्‍भावानें तुझिया पदकमळा ॥ आठवितों. ॥१॥
त्रिभुवन गाई तुझी कीर्ति ती काय गावि मानवें । मंदबुद्धि तुज जोडूं पाहे आळवुनियां स्तवें । अनेक रिपु संसारी गांजिती त्यांसी वारावें । सन्मति देउनि सन्मार्गातें मजला लावावें ॥ आठवितो. ॥२॥
कृपा सदोदित दीनवत्सला दासावर बा असो । तुझ्या भक्तिची गोडी देवा हृदयीं माझ्या वसो । प्रभु तव विस्मृति पडेल ऐसी विषयवासना नसो । उन्नतिसाधनयत्नीं मन हें सदैव रमुनि असो ॥ आठवितो. ॥३॥
राग विभास - ताल सुरभक्ता. (भूपाळी.)
धांव जगदीश्वरा । पाव करुणाकरा । ठेविं या किंकरा । सतत पायीं ॥धृ॥. दुरितभारें अति । व्यथित मी जगपति । देइं मज सन्मति । दीननाथा ॥ धाव. ॥१॥
प्रेमपाशीं मला । बद्ध करिं वत्सला । म्हणविं मज आपुला । मायबापा ॥ धांव.॥२॥
तुजविणें दुसरा । मज नसे आसरा । उद्धरीं पामरा । दीनबंधो ॥ धांव. ॥३॥
राग विभास - ताल एका.
तूं पाच सदया सदया रे । हर हर हर भवभय कर सार्थ्क वर दे या ॥धृ.॥ घडिभरि तरि दर्शन दे । हृदयी प्रगटुनियां । मन तव पदिं रत करिं प्रभु । सेवक रक्षाया ॥ तूं ॥१॥
तारीं दीना भगवन्‍ गाइन तव महिम्या । लवकरि मृतिमय हरुनी । शांत करीं हृदया ॥ तूं. ॥२॥
राग असावरी - ताल चौताल,
दीनशरण दुरितहरण पावन करिं या दीना देइं भेटी एकवार ॥धृ.॥ विमल भाव सुद्दढ असो । सुजनबोध हृदयीं ठसो ।
मना नित्य तुझा ध्यास मी चरणीं लीन असें दास प्रभो निराधार ॥१॥
राग धनाश्री - ताल त्रिवट.
दीनदयाळा तारक तूं एकचि आम्हां । देउनि भक्ति सांभाळुनि ने निजधामा ॥धृ.॥ विसरुनि तुजला गुंतलो ममताजळी । सार्थक न घडे व्यर्थचि या देहा पाळीं । गाठिल काळ न गमे मज कोणे वेळी । तळमळ चित्ता मायबाप संकट टाळी. ॥ दीन. ॥१॥
परोपकारें सार्थक हो या देहाचें । मंगलनामें गाइन मी अनुदिन वाचे । तव गुणध्याईं विनटो हें मानस माझें । पुरवी सखया वांछित हें निजभक्ताचें ॥ दीन. ॥२॥
राग धनाश्री-ताल एका.
विश्वेश्वर प्रभु पतितोद्धरणा भक्तांची माउली । भवतापें संतप्त जाहलो सुखकर कर साउली ॥धृ.॥ कामादिक रिपु छळितां माझी चित्तवृत्ति काहावलि । तेणे होउनि व्याकुळ त्राणा तुजपाशी धांवली ॥ विश्वेश्वर. ॥१॥
बुडतां भवसागरीं तुझी रे भक्तिनाव लाधली । नेउनि सोडीं पल तीरा ठेविं सतत पाउलीं ॥ विश्वेश्वर. ॥२॥
राग पूर्वी - ताल चौताल.
धांवे पावें प्रभो । माझी करुणा तुजविण कोण करी रे ॥धृ.॥ दुर्विषयीं मन धांवत दुष्ट हें शांति कदाहि न धरी रे ॥धांवे.॥१॥
अनाथनाथ दीनबंधु सुखकर तारीं तूं लौकरी रे ॥२॥ कीर्ति तुझी जगी विश्रुत सदया पतितांसीही उद्धरी रे ॥ धांवे. ॥३॥
राग कानडा - ताल त्रिवट
पावें दीननाथ अनाथ सनाथ कर दयाळ भक्तजनप्रतिपाला ॥धृ.॥ थोर घोर महापापी नामस्मरणें मुक्त होती घेईं पदरी मज कृपाळा ॥१॥
राग बागेसरी - ताल चौताल.
दयामय दीनोद्धार दीनावरी कृपा करी भवभय निवारीं देईं भेटी दीननाथ ॥धृ.॥ धांव पाव मायबाप तारीं दयाळा मोहपाशीं पडलों मी दीननाथ ॥ दया ॥१॥
राग काफी - ताल एका
तारीं तारीं दीननाथा । गेला गेला जन्म वृथा ॥धृ.॥ विषयांमाजी गुंगचि झालों । क्षणिक सुखांनीं नाही धालों । वैराग्याच्या वाटे भ्यालों । वारीं वारीं मोहव्यथा ॥ तारी. ॥१॥
नाही केली शुद्ध स्वमति । केवि घडावी मग तव भक्ति । मार्गा चुकलो झाली भ्रांति । धरुनि हातीं नेई पंथा ॥ तारी. ॥२॥
आतां मजला अन्य त्राता । न दिसे तुजवाचूनि अनंता । धांवे वेगे करुणावंता । रंक पायीं ठेवी माथा ॥ तारी ॥३॥
राग सारंग - ताल एका
बंधु हो त्यजुनि अभिमाना प्रभुसि भजा एका भावें ॥धृ.॥ नाथ एक सकळ जगाचा मायबाप सकळां तोचि । तोचि पाळि पोशी तोची अखिल जगीं सत्ता त्यांची । नरनारी नाना देशी बालकें तयाचीं साचीं । चाल ॥ तुम्ही विसरुनि आपलें नातें । कां करिता व्यर्थ कलहातें । संनिध पहा विश्वजनकातें । एकचित्त त्यासचिं ध्यावें ॥बंधु.॥१॥
जेथ जेथ ज्या ज्या काळी उग्र होय धर्मग्लानि । सत्य सत्य लोपुनि अवघे जन होती बहु अज्ञानी । नयनीति टाकुनि सकळ रत होती असदाचरणी । चाल॥ तेथ तेथ प्रभु जगशास्ता । निर्मीतो धर्मनयत्राता । भक्तराज वंद्य समस्तां । परि त्याते प्रभु न गणावें ॥वंधु. ॥२॥
जो पाठवि आर्यावर्ती शाक्यसिंह वेदव्यासा । जो शूरीदेशीं प्रेषी भक्तवर्य मूशा ईसा । जो योजि इराणी अर्बी झरदुस्तमहंमददासां ॥चाल॥ तोचि एक पूज्य समस्तां । तो सकलधर्ममतिदाता । कां धरितां नाना पंथा । एकनिष्ठ तद्यश गावें ॥ बंधु. ॥३॥
राग कानडा -ताल त्रिवट.
मानवदेहीं तरिच बरे । हरिसि भजे प्रेमभरें ॥ धृ.॥ सद्वचनामृत श्रवणीं पडतां । सेवी परमादरें ॥ मानव.॥१॥
विवेक जागृत होऊनि निर्मळ । हृदयीं भाव ठरे ॥ मानव.॥२॥
प्रबळहि इंद्रियग्राम करुनि वश । यत्नें मन आवरे ॥ मानव. ॥३॥
भगवद्‍रुपीं आत्मा निर्भर । होतां क्लेश नुरे ॥ मानव.॥४॥
परोपकारपरायण जीवित । करुनि जनीं विचरें ॥ मानव. ॥५॥
राग झिंझोटी - ताक एका.
असा धरिं छंद । जाइ तुटूनि हा भवबंद ॥ धृ.॥ प्रपंचमोहे तूं भुललासी । काम मातला बहुत अधासी । घोर दुराशा तुजला ग्रासी । तूं झालासी धुन्द ॥ जाई. ॥१॥
धनमानादिक क्षणिक पसारा । बुडवी तुजे नौका जशि वारा । यांत सुखाचा न दिसे थारा । तूं झालासी अन्ध ॥जाई.॥२॥
भावें दृढ मन धरिं हरिपायीं प्रेमें त्यासि सदा स्मर हृदयीं । होइल विश्रांति त्या ठायीं । गाई आनंदकंद ॥ जाइ.॥३॥
न करी संगति विषयिजनाची । कांही लाज धरीं स्वमनाची । आवडी लागो तुज भजनाची । सोडीं सकल फंद ॥ जाइ. ॥४॥
राग बेहाग - ताल त्रिवट.
भवभयहर प्रभुवर घ्या नत व्हा रत व्हा हो पदकमलीं अभयीं कां रमता विषयी ॥धृ.॥ असारी संसारी भ्रमता क्लेश बहु जिवा झाले कीं सावध होऊनि आदरें सत्वर स्वहित उमगा पापतापनिरसक आठवा अनिश जोडा नित्यसुखा ॥भव.॥१॥
राग पिलू - ताल दीपचंदी
असा हरि विसरसि केविं तरी ॥धृ. ॥ जननीजठरीं अद्‍भुत योगें । प्राणत्राण करी ॥ असा.॥१॥
जन्मा येतां तूं पितरांच्या । हृदयी प्रेम भरी ॥ असा. ॥२॥
चुकतां मार्गी विवेकदीपक । दीप्त करी भितरीं ॥ असा॥३॥
राग झिंझोटी - ताल एका.
मना सावध सावध त्राणा रे ॥धृ.॥ क्षणिक सुखाचा लोभ धरुनियां । न विसरीं त्रिभुवनराणा रे ॥ मना. ॥१॥
होऊनि निश्चल अनुदिन भावे । करिं मंगल गुणगाना रे ॥ मना. ॥२॥
नित्य सुखावरि देउनि दृष्टि भुलूं नको धनमाना रे ॥ मना.॥३॥
या नरतनुचें सार्थक करिं बा । आठवीं पुरुष पुराणाअ रे ॥ मना.॥४॥
राग मुलतानी-ताल धुमाळी
दीननाथ माउली गे । माय माझी दीननाथ माउली ।धृ.॥ मदंत पाहूं नको त्वरित य्रे । उचलित या पाउलीं ॥माय.॥१॥
वत्सासाठीं जेविं वनांतुनि । धांवत ये गाउली ॥ माय.॥२॥
शरणांगत निर बाळावरि तूं । सुखकर कर साउली ॥माय. ॥३॥
स्तोत्र
त्राहि त्राहि मां षडरिपीडितहृदयं
पदनतमनन्यगतिं, भक्तजनवत्सल ।
याचे त्वां कुरु मानसमनिशं
त्वद्‍गुणगणाननिरतम्‍ ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP