लक्षणे - १४ ते १७

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१४
करावे तें काये तेणें होतें काये । अनुमानें कायें प्राप्त होतें ॥१॥
प्राप्त होतें काये ऐसेंही कळेना । नये अनुमाना सर्व कांहिं ॥२॥
सर्व कांहिं येका आत्मज्ञानेंविण । दिसताहे सीण वाउगाची ॥३॥
वाउगाची लाभ प्रचीतीवेगळा । उगाचि आगळा दीसताहे ॥४॥
दिसातहे फळ लोकचि म्हणती । आपुली प्रचीती कांहिं नाहीं ॥५॥
कांहिं नाहीं पूर्वजन्माचें स्मरन । होये विस्मरण सर्व कांहिं ॥६॥
सर्व कांहिं मागें जाहलें कळेना । म्हणोनी फळेना केलें कर्म ॥७॥
केलें कर्म कोणें कोणासी पुसावें । अनुमानें व्हावें कासावीस ॥८॥
कासावीस जाला कर्में जाजावला । व्यर्थ भ्रमें गेला अंतकाळीं ॥९॥
अंतकाळीं गेला सर्व सांडुनीयां । भ्रमला प्राणी या विस्मरणें ॥१०॥
विस्मरण जाये सद्गुरूकरितां । दास म्हणे आतां गुरू करीं ॥११॥

१५
आतांची ये देहीं मुक्ति पाविजेना । तरी कां सज्जना शरण जावें ॥१॥
शरण जातां भावें सज्जनचि व्हावें । सीघ्र उद्धरावें निरूपणीं ॥२॥
निरूपणें निजस्वरूप सांपडे । गुज ठाईं पडे अकस्मात ॥३॥
अकस्मात ठाव न दिसे आपुला । निरंजनीं जाला निरंजन ॥४॥
निरंजन जाला ये लोकीं असोनी । अन्मनीगीन्मनी नाडळती ॥५॥
नाडळती जेतें कांहिं देहभाव । तत्त्वज्ञानें वाव देहबुद्धी ॥६॥
देहेबुधी गेली देखत देखतां । मी हें कोण आतां सांपडेना ॥७॥
शुद्धी मीपण पाहातां । मीपण तें जातां वस्तुरूप ॥८॥
वस्तुरूप बोधें अरूप होईजे । विवेकेंचि कीजे विचारणा ॥९॥
विचारणा जाली रामीरामदासीं । आतां या जन्मासी ठाव नाहीं ॥१०॥
ठाव नाहिं ऐसें राघवाचें देणें । थोराहुनि होणें थोर स्वयें ॥११॥

१६
प्रातःकाळ जाल्या राम आठवावा । हृदई धरावा क्षण येक ॥१॥
क्षण येक राम हृदई धरीजे । संसारीं तरीचें हेळामात्रें ॥२॥
हेळामात्रें रामनामें होय गती । भाग्यवंत घेती सर्व काळ ॥३॥
सर्व काळ राम मानसीं धरावा । वाचे उच्चारावा नामघोष ॥४॥
नामघोष वाचे श्रवण कीर्तन । चरणीं गगन देवाळया ॥५॥
देवाळयां जातां सार्थक जाहालें । कारणीं लागलें कळेवर ॥६॥
कळेवर त्वचा जोडुनी हस्तक । ठेवावा मस्तक रामपांई ॥७॥
रामपांईं शिळा जाली दिव्यबाळा । तैसाची सोहळा मानवांसीं ॥८॥
मानवांसीं अंतीं रामनामें गती । सांगे उमापती महादेव ॥९॥
महादेव सांगे जप पार्वतीस । तोची तो विश्वास रामदासीं ॥१०॥

१७
धन्य त्याचें कुळ धन्य त्याचा वंश । जे कुळीं हरिदास अवतरला ॥१॥
धन्य ते जननी धन्य तीची कुसी । जे हरीप्रियासी प्रसवली ॥२॥
धन्य ते संबंधी संतांचे सोईरे । संसर्गें उद्दरे कुळ त्यांचें ॥३॥
धन्य तो पै ग्राम धन्य तो पै देश । जेथें हरिवास वैषवाचा ॥४॥
धन्य त्यांचे सखे वैष्णवी सर्वदा । ते सर्व गोविंदा जीवलग ॥५॥
धन्य ते भाविक वंदिती हरिदास । तया हृषीकेश वंदितसे ॥६॥
धन्य ते निंदक निंदिती सज्जन । येणें भावें धान्य घडे त्यांचें ॥७॥
धन्य दासदासी सज्जनसेवेसी॥ ते सुरवरासी वंद्य होती ॥८॥
धन्य पशु श्वान वैष्णवा गृहिंचें । कळिकाल त्यांचे पाय वंदी ॥९॥
रामदास म्हणे तरीच धन्य होणें । जरी संग लाधणें सज्जनाचा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP