अध्याय ९० वा - श्लोक ८६ ते ९०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यूयं द्विजाग्र्‍या बत भूर भागायच्छश्वदात्मन्यखिलात्मभूतम् ।
नारायणं देवमदेवमीशमजस्रभावाभजता विवेश्य ॥८६॥

यास्तव द्विजश्रेष्ठ हो तुम्ही । बहुपुण्यात्मे तपादि नियमीं । परमभाग्याचे निष्कामकामी । कीं पुरुषोत्तमीं अनुसरलां ॥६॥
इहपरकाम सांडूनि सर्व । सर्वान्तर्यामी वासुदेव । नारायण जो देवाधिदेव । ज्यां नाहींच देव आणिक ॥७॥
कोण्या हेतूस्तव म्हणाल जरी । तरी ईश सर्वांचा नियमनकारी । ऐसियातें निजान्तरीं । भजतां निर्द्धारीं प्रवेशवून ॥८॥
श्रीहरीचें वास्तवरूप । निजानुभवें निर्विकल्प । अभेदभावें आपेंआप । चिन्तूनि अकंप भजतात ॥९॥
धन्य धन्य तुमचें जन्म । धन्य धन्य तुमचें कर्म । धन्य धन्य तुमचें काम । कीं पुरुषोत्तमपर जालां ॥९१०॥
आजि तुमच्या भाग्योत्तमा । सहसा नेणवे मातें उपमा । भजनें लंघिलें कलिमलछद्मा । कैवल्यधामा साधियलें ॥११॥

अहं च संस्मारित आत्मतत्वं श्रुतं पुरा मे परमार्षित वक्त्रात् ।
प्रायोपवेशे नृपतेः परीक्षितः सदस्यृषीणां महतां च शृण्वताम् ॥८७॥

आणि मजवरहि उपकार थोर । द्विज श्रेष्ठ हो तुमचा फार । जाला असे कीं हें सार । परमार्थर स्मरविलों ॥१२॥
परम ऋषि जो श्रीशुकमुनी । परिसिलें तयाच्या मुखाहूनी । आत्मतत्व म्यां निज श्रवणीं । पूर्वीं रंगणीं संतांच्या ॥१३॥
जैं प्रायोपविष्ट नृप परीक्षिती । तयाचे संसदीं यथानिगुती । ऐकत असतां महंत सुमती । तैं दैवोदितीं हें लाभलें ॥१४॥
तें बहुतां दिवसांचें स्मरविलें । हरिकीर्तनोत्साहें निवविलें । माझेंचि मजला दृढाविलें । मज जालें येणें बहु सुख ॥९१५॥
वनश्री जेंवि कां वनोदरीं  थोकली राहे जीर्णाङ्कुरीं । वसंतसंगें जयापरी । सुमनादिभारीं रूपा ये ॥१६॥
ऐसें मुनिश्रोतयां सूत । प्रमोदूनियां तोषभरित । यावरी भागवताची तथ्य । महिमा कथित फळयुक्त ॥१७॥
तेचि फळश्रुति आणि महिमा । कैवल्यदायक अत्युत्तमा । श्रोतीं परिसावी धरूनि प्रेमा । सांडूनि गरिमा आविद्यक ॥१८॥

एतद्वः कथितं विप्राः कथनीयोरुकर्मणः । माहात्म्यं वासुदेवस्य सर्वाशुभविनाशतम् ॥८८॥

सूत म्हणे विप्र हो हें । उत्कृष्टकर्म वसुदेवतनयें । त्या वासुदेवाचें माहात्म्य स्वयें । कथिलें कथनीय तुम्हांसि म्यां ॥१९॥
कथाया योग्य हेंचि कैसें । ऐसें कल्पाल जरि मानसें । तरी अशुभाचें आपैसें । नाशक असे महिम्न हें ॥९२०॥
पाप ताप दुःख दरिद्र । शोक मोह अपयश क्षुद्र । अज्ञानादि अशुभमात्र । नाशक चरित्र हरीचें ॥२१॥

य एवं श्रावयेन्नित्यं यामक्षणमनन्यधीः । श्रद्धावान्योऽनु शृणुयात्पुनात्यात्मानमेव सः ॥८९॥

ऐसें अखिल मंगळायतन । परमार्थ विधीनें याम क्षण । हें सद्भाविकां करवीं श्रवण । अनन्यधिषण जो कोण्ही ॥२२॥
आणि श्रद्धावंत जो ऐके श्रोतीं । आस्था अंतरीं धरूनि पुरी । तो तत्काळ नर निर्द्धारीं । पवित्र करी आपणातें ॥२३॥
जैसा वक्ता तैसाचि श्रोता । या भागवताचा भक्त पुरता । केवळ आपणातेंचि स्वता । करी सर्वथा पुनीत ॥२४॥
स्नानादिकीं देहचि पूत । होय तैसें हें नव्हे निश्चित । साक्षात आत्मा चेतनानाथ । जो भ्रमें म्हणवीत मी जीव ॥९२५॥
तें जें आपुलें निजरूप । अविद्याविनाशें निष्कंप । सच्चिदानंद निर्विकल्प । श्रवणें पठनें करी नर ॥२६॥
नित्य होतां श्रवण पठन । कळे नित्यानित्यविवेक पूर्ण । तेणें होय निजात्मज्ञान । जननमरणभय लोपे ॥२७॥
स्वप्नामाजि दुःखें नाना । जागृति उपाय तन्निरसना । तद्वत उपाय निजमोक्षणा । आत्मज्ञानावीण नसे ॥२८॥
स्वप्नभ्रमाचा परिहार । जागृति जालिया उशीर । करावया न लगे किंचिन्मात्र । हेंहि स्वतंत्र तैसेंची ॥२९॥
तेंचि आत्मज्ञान नव्हे सानें । त्यीर्थें यज्ञें तपें दानें । सगुणनिर्गुणश्रवणें पठनें । वांचूनि आनें केवळ ॥९३०॥
म्हणाल अंतःकरणशुद्धीवीण । कैसें होईल निजात्मज्ञान । तें यज्ञादिक्रियेनें साधे पूर्ण । परी हिंसादि दूषण तेथ वसे ॥३१॥
जे जे सोपाधिक पुण्यक्रिया । ते ते पापेंवीण नये आया । देशकाळादि प्रत्यवाया । पाविजे विधिनिषेधीं ॥३२॥
तेथ पापपुण्याचें जोड फळ । बहुधा लाहिजे केवळ । तथापि विरळा पुण्यशीळ । अस्पृष्टशमल निर्मळ ॥३३॥
यास्तव चित्तशुद्धि आणि ज्ञान । होती दोन्हीहि करितां पूर्ण । श्रीमद्भागवताचें सेवन । जाणा सर्वज्ञ श्रोते हो ॥३४॥
सगुणलीलावतारचरित्रें । नामें अनेकें अतिपवित्रें । ये ग्रंथीं कथिलीं जीं विचित्रें । ती श्रोतृवक्त्रें सेविता ॥९३५॥
पाप आकल्प क्षणें नाशे । पुण्योत्कर्षें अपार पोषे । मग कथिलें येथ वास्तव जैसें । अपरोक्ष तैसें बोधा ये ॥३६॥
यास्तव श्रीमद्भागवताचा । वक्ता श्रोता स्वयेंचि साचा । घोट भरूनि अविद्येचा । पुनेत आपणा करितसे ॥३७॥
आतां पर्वादिविशेषें । महिमा ज्यापरि वाच्य असे । तोहि परिसा प्रेमोत्कर्षें । स्वस्थमानसें अमोघ ॥३८॥

द्वादश्यामेकादश्यां वा शृण्वन्नायुष्यवान्भवेत् । पठत्यनश्नन्प्रयतस्ततो भवत्यपातकी ॥९०॥

विष्णुव्रतां माझारी थोर । द्वादशी एकादशी पवित्र । मोक्षमार्गींचें अग्रहार । किंवा वज्र अघनगा ॥३९॥
या पुण्यदिवशीं पढे ऐके । नियमाचरें पृथक्पृथकें । तेणें फळ होय तेंही आशिकें । कथितों निकें व्यासोक्त ॥९४०॥
एकादशीचे पुण्यदिनीं । केवळ निराहारी असोनी । ऐके पढे आनंदोनी । होय तो जनीं अपातकी ॥४१॥
शुष्कें आर्द्रें सांसर्गिकें । महापापें उपपातकें । तीं सर्व श्रवणें पठनें ऐके । नाशती विवेकें भ्रमापरी ॥४२॥
पारणा सारूनि द्वादशीसी । प्रयत होत्साता दिवानिशी । पडे ऐके जो विवेकराशी । होय तो विशेषी आयुष्मान् ॥४३॥
तयाचीं अपमृत्यादि विघ्नें । होती संपूर्ण हीं भग्नें । राहे सर्वदा अरोगपणें । शुभलक्षणें विराजित ॥४४॥
म्हणाल अनन्यभक्ति करून । करितां श्रीभागवतसेवन । पारमार्थिक साधे पूर्ण । व्यवहारसधन केंवि घडे ॥९४५॥
तरि तैसें नव्हे हें एकदेशी । भुक्तिमुक्तिद कल्याणराशी । येथ ऋद्धि सिद्धि तिष्ठती दासी । ऐका संक्षेपेंसीं ते गोष्टी ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP