अध्याय ९० वा - श्लोक ७१ ते ७५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


दशन्तं तक्शकं पादे लेलिहानं विषाननैः । न द्रक्ष्यासि शरीरं च विश्वं च पृथगात्मनः ॥७१॥

तेव्हां निर्विकल्पस्वरूपस्थित । तुज जालिया दृश्य समस्त । आठवेनाच बहिर्भूत । देहासहित कांहीं ही ॥८॥
तक्षक येऊनियां आपण । विषाननें करूनि तीक्ष्ण । डसेलच धरणीं जर्‍हि जाण । कीं चाटील पूर्ण तव देहा ॥९॥
तर्‍ही तूं तया तक्षकातें । अथवा आपल्या देहातें । किंवा संपूर्ण विश्वातें । आपणा वेगळें न पाहसी ॥८१०॥
अवघा तूंचि तूं ओतप्रोत । परिपूर्ण अंतर्बाह्यातीत । तेथें कैंची दुर्मृत्युमात । आनंदभरित अक्षय तूं ॥११॥
सर्पा आंगींची त्वचा जैसी । पडतां भंगतां जळतां त्यासी । नाठवेचि केवळ तैसी । काया आपैसी तुजलागीं ॥१२॥
इतुका नृपातें निर्वाणबोध । श्रीशुकें केला परमशुद्ध । अभय दाविलें परमपद । देहादि विरुद्ध निरसूनी ॥१३॥
यावरी शिष्याची कृतार्थता । परीक्षावया शुक तत्वता । जाला तयातें स्वयें पुसता । तें ही श्रोतां परिसावें ॥१४॥

एतत्ते कतितं तात यथाऽऽत्मा पृष्टवान्नृप । हरेर्विश्वात्मनश्चेष्टां किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥७२॥

शिष्यस्नेहें कळवळून । परीक्षितीतें शुक भगवान । म्हणे बापा नृपाळा प्रश्न । मज लागून त्वां केला ॥८१५॥
विश्वाचा जो आत्मा हरि । त्याचें चरित्र सविस्तरीं । पुसता जालासि तूं ज्या परी । प्रेमा अंतरीं धरूनियां ॥१६॥
तें हें कथिलें तुजकारणें । यावरी पुनः काय श्रवणें । ऐकों इच्छिसी निजमनें । तीं तों वचनें मज सांगें ॥१७॥
इतुकें नृपातें पुसूनि शुक । तुष्णीम्भूत जाल सम्यक । येथ पंचमाध्याय निष्टंक । जाला अशेख समाप्त ॥१८॥
या वरी श्रीशुकातें नृपती । पुसलियाचें उत्तर निगुती । कृतार्थपणें देत सुमती । तें शौनकाप्रति सूत कथी ॥१९॥

एतन्निशम्य मुनिनाभिहितं परीक्षिद् व्यासात्मजेन निखिलात्मदशासमेन ।
तत्पादपद्ममुपसृत्य नतेन मूर्ध्ना बद्धञ्जलिस्तमिदमाह स विष्णुरातः ॥७३॥

सूत म्हणे भो भो शौनकमुनी । ग्लौसमान तूं श्रोतृभगणीं । भगवद्गुणश्रवणगगनीं । प्रेमज्योत्स्नीं विराजसी ॥८२०॥
तरी ऐकें पुढील अभिप्राय । जेंवि मात्रा देऊनि अनामय । वैद्यें पुसतां आनंदमय । सांगता होय विगतगत ॥२१॥
तेंवि हें कथिलें व्यासात्मजें । निखिलात्मदृशें पुण्यपुञ्जें । महापुराण करुणावोजें । अभयकाजें भवहंतें ॥२२॥
तेणें निर्भय जाला राव । ऐसा अंतरीं कळला भाव । तथापि पडताळावया अनुभव । शुकें सगौरव पदखळिलें ॥२३॥
ऐकूनि परीक्षिति सद्भावें । माथा लपवूनि सप्रेमजवें । मग त्या नम्रशीर्षें देवें । तत्पदराजीवें स्पर्शिलीं ॥२४॥
एवं चरण वंदूनि शिरीं । बद्धाज्जलि नम्रप्रकारीं । श्रीशुकाप्रति निजनिर्द्धारीं । वदला वैखरी विष्णुरात ॥८२५॥
तें तयाचें प्रतिभाषण । जेंवि तृप्तोद्गार सुप्रसन्न । श्रोतीं परिसावें सावधान । निजसमाधान परिसतां ॥२६॥

राजोवाच - सिद्धोऽस्म्यनुगृहीतोऽस्मि भवता करुणात्मना । श्रावितो यच्च मे साक्षादनादिनिधनोहरिः ॥७४॥

नृप म्हणे भो सद्गुरुनाथा । परम सदया विपश्चिता । तव प्रसादें कृतकृत्यता । आत्मपूर्णता लाधलों ॥२७॥
होतों देहात्मभावें गुणग्रस्त । तुवां करुणात्मनें अनुग्रहीत । जालों म्हणोनि कृतकृतार्थ । भवनिवृत स्वबोधें ॥२८॥
कीं सकळ जीवांचें कारण । श्रीहरि जो अनादि निधन । मज ऐकविला संपूर्ण । प्राप्तिसाधन समवेत ॥२९॥
हा तुमचे कृपेचा मंहिता । वर्णितां न लगे सहसा सीमा । कीं तुमच्या कृपेनें जीवां अधमां । सच्चिदात्मा अवगमे ॥८३०॥

नात्यद्भुतमहं मन्ये महतामच्युतात्मनाम् । अज्ञेषु तापतप्तेषु भूतेषु यदनुग्रहः ॥७५॥

परि अत्यद्भुत मी न मनीं । महंता अच्युतात्म्याची करणी । कीं अनुग्रह करणें अज्ञानजनीं । तापत्रयाग्निसंतप्तीं ॥३१॥
म्हणाल कोण्या हेतुस्तव । तरि जे करुणेचेचि सावेव । आर्तिहरण सहजस्वभाव । ज्यांचा सदैव केवळ ॥३२॥
सहज उगवूनियां तमारी । जगाचें अंधत्व जैसें वारी । प्रकाशें केवळ देखणें करी । स्वाधिकारीं प्रवर्तवी ॥३३॥
कीं गंगा वाहोनि पवित्र जळीं । पाप ताप जगाचें समूळीं । निवारूनि पुण्यबहळीं । त्रिदशमेळीं वंद्य करी ॥३४॥
हें नैसर्गिक सामर्थ्य याचें । तेंवि सहजशीळ महंतांचें । दुःखनिरसनें प्रबोधें साचें । भवभीतांचें आविद्यक ॥८३५॥
अभीष्टोत्तरीं या अनुमोदून । शुकाचार्यातें नृप सज्ञान । पुन्हा दतनुग्रहलक्षण । कृतार्थपण स्वयें कथी ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP