अध्याय ९० वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


कृष्णस्तु तत्स्तनविषज्जितकुङ्कुमस्रक् क्रीडाभिषङ्गधुतकुन्तलवृन्दबन्धः ।
सिञ्चिन्मुहुर्युवतिभिः प्रतिषिच्यमानो रेमे करेणुभुइरिवेभपतिः परीतः ॥११॥

त्या ज्या क्रीडमाना स्वाङ्गना । तदालिंगनें स्रक्संपूर्णा । तत्स्तनकुंकुमास्तव जाणा । रंगल्या सघना जयाच्या ॥७२॥
निडळपट्टिके ऊर्ध्वभागीं । कुरळ केश द्विरेफरंगीं । तन्निचयजटिका चांगी । कुटिलानेकीं आकर्णा ॥७३॥
ते कुन्तळकदंबबंध । क्रीडाभिनिवेशें अमंद । जवें कपायमान विविध । विलसित प्रसिद्ध जयाचें ॥७४॥
ऐसा कुंकुमरंजित स्रग्वी । कंपितकुंतळवृंदीं सर्वी । विराजमान रुचिरावयवीं । लीळानुभावी श्रीकृष्ण ॥१७५॥
नद्योदकें तो वारंवार । सिंपित असतां स्त्रीनिकर । भंवता स्त्रियांहीं सिंपिला स्वैर । नर्मानुकार दावूनी ॥७६॥
एवं मिथा क्रीडमान श्रीधर । जळीं रमता जाला मनोहर । जेंवि करेणुसह महाकुंजर । क्रीडे दुर्धर निःशंक ॥७७॥
वसंतकाळीं चलदलोद्भव । कोमल लसलसित पल्लव । भक्षूनि इभइभीसमुदाव । होताति सर्व कामाकुल ॥७८॥
तया उत्कृष्ट कामोद्दीपना । अगाध हदिनी करिणीगणा । सहवर्तमान परिभ्रमणा । क्रीडे विदान गजराज ॥७९॥
शुंडेमाजि घेऊनि नीर । भोंवताल्या परिघाकार । शिंपिती कुंजरी कुंजर । जवळी ना दूर होत्सात्या ॥१८०॥
तैसाचि तोहि कामान्वित । स्वकरें तवांबरी सिंचित । इतस्तता उपसर्पत । रमे अद्भुतक्रीडाभरें ॥८१॥
करिणी कई शुंडादंड । मेळवी स्पर्शी तदंग दृढ । वरि वरी प्रोक्षी वारि उदंड । आळंगी प्रौढ सम्मीळनें ॥८२॥
तया गजपतीचिया परी । जळीं तरुणींसह श्रीहरी । रमता जाला नर्माचारी । चिरकाळवरी प्रमोदें ॥८३॥
त्यावरी रमणींसह निवान्त । स्वतनु कुंकुमाद्यंकित । क्षाळूनियां विलासभुक्त । निघाला त्वरित बाहेरी ॥८४॥

नटानां नर्त्तकीनां च गीतवाद्योपजीविनाम् । क्रीडालङ्कारवासांसि कृष्णोऽदात्तस्य च स्त्रियः ॥१२॥

शुष्कवाळुवंटा उपरी । येऊनियां सस्त्रीनिकरीं । क्रीडालंकार वसनें सारीं । जीं भिजली नीरीं क्रीडतां ॥१८५॥
तीं नटनर्तकीनर्त्तकगण । गीतवाद्योपजीवी जन । तयां देता जाला कृष्ण । अन्यें परिधान करूनियां ॥८६॥
तैशाचि परी तयाच्या स्त्रिया । भूषाम्बरा क्रेडाकाळींचिया । देत्या जाल्या आनंदमया । सर्वहि तया सुभूषिता ॥८७॥
त्यानंतरें जगदीश्वर । क्रीडाविरामानुकार । स्वयें दावी मानवाकार । जो परात्पर अविच्युत ॥८८॥
सुन्दर वाळुवंट तें मवाल । विस्तृत आणि समानशीळ । चंद्रप्रकाशें अतिसूज्ज्वळ । विलसे ढवळ रमणीय ॥८९॥
कुसुकुसुमित द्रुमाचिया पंक्ती । तटाकीं बहुधा विराजती । ह्रदीं कुमुदें प्रफुल्लें अति । शशिदीधितिसंयोगें ॥१९०॥
तया वरूनि मंद सुगंध । शीतळवायुप्रवाह शुद्ध । येणें सद्गुणी विश्रामद । कूतप्रमोद केवळ ॥९१॥
तेथ स्वमुखें रमारमण । मृदुळास्तरणावरी शयन । करिता जाला तैं आपण । विश्रान्ति पूर्ण पावावया ॥९२॥
तंव निकट संपूर्ण ही युवती । रतिरसलालसा कामाकृति । वेधल्या मानसें कृष्णेंङ्गितीं । तयांची स्थिति शुक सांगे ॥९३॥

कृष्णैस्यैवं विहरतो गत्यालापेक्षितस्मितैः । नर्मक्ष्वेलिपरिष्वगैः स्त्रीणां किल हृता धियः ॥१३॥

एवं म्हणिजे पूर्वोक्त । सक्रीड श्रीकृष्णांचें चरिते । सविलासगतिगामज्यकृत । विनोदयुक्त बोलणें ॥९४॥
डोळे मोडूनि चंचलतर । विकसित अर्धोन्मिलीत वक्र । रोहेक धरूनियां चिरस्थिर । स्मर्शराकार ईक्षित ॥१९५॥
तैसेंच मंदोच्च उच्चतर हास्य । नर्मक्रीडा उपहास्य लास्य । चुंबनासंघट्टनें आस्य । मन्मथावेशें आलिंगनें ॥९६॥
ऐसिया उद्दामक्रीडानुकारी । इंगितीं मन्मथक्षोभकरीं । चाटुचटुललीलाप्रकारीं । हरिल्या बुद्धि स्त्रियांच्या ॥९७॥
म्हणोनि केवळ तदात्मक । क्रीडानुवेधे निष्टंक । जाल्या विरहिणी समसम्यक । नाठवे आणिक हरिवीण ॥९८॥
जेंवि अमृताची धणी न पुरे । कीं सुखवेळेची मेधा नुतरे । आयुष्यवृद्धीचा हर्ष न सरे । कीं संपत्ति नोसरे सदैवांची ॥९९॥
तेंवि उत्कर्षें चिरकाळ । क्रीडला असतां गोपाळ । तथापि उत्कंठा अळुमाळ । न शमे केवळ अबळांची ॥२००॥
प्रेमोत्सुक अधिकाधिक । मानसीं प्रवृद्ध साभिलाष । रेखिलीं अंतरीं सम्यक् । तीं इंगितें अशेख आठवती ॥१॥
तयांहूनि अन्यचिंतन । विसरल्या मानिनी संपूर्ण । वेधल्या मानसें धृतध्यान । निद्रा निपटून ज्यां न लागे ॥२॥
ऐसिये अवस्थे माझारी । बरळती सर्वा विदेहापरी । प्रेष्ठलीलाभिलाषीं अंतरीं । शुकवैखरी तेंचि वदे ॥३॥

ऊचुर्मुकुन्दैकधियोऽगिर उन्मत्तवज्जडम् । चिन्तयत्योऽरविन्दाक्षं यास्ता मे गदतः श्रृणु ॥१४॥

शुक म्हणे गा विष्णुराता । त्या मुकुंदैकबुद्धि निभ्रान्ता । ज्यांच्या मुकुंदचि अंतरीं पुरता । भरला तत्वता अतिवेधें ॥४॥
देह गेह कीं जन विजन । विसरल्या दैहिक संपूर्ण । चिंतित होत्सात्या विगतमन । प्रेष्ठनलिननयनातें ॥२०५॥
जेंवि परिपक्कयोगी समाहित । निर्विकल्प विलीनचित्त । आत्मचिंतनें तन्मयस्वस्थ । केवळ निवृत्त गुणनाशें ॥६॥
तैशा मुकुंदैकनिष्ठा । चिंतनोत्कर्षें ध्यानाविष्टा । क्षणभरी होऊनि मौनिष्ठा । केवळ विनटा मनोन्मना ॥७॥
मग उन्मत्तापरि जड । जीं वाक्यें बोलिल्या वितंड । तीं मज वक्तयापासून रूढ । ऐकें सुहादशिरोमणि ॥८॥

महिष्य ऊचुः - कुररि विलपसि त्वं वीतनिद्रा न शेषे स्वपिति जगति रात्र्यामीश्वरो गुप्तबोधः ।
वयमिव सखि कच्चिद्गाढनिर्भिन्नचेताः नलिननयनहासोदारलीलेक्षितेन ॥१५॥

कृष्णेङ्गितें हृतधी वनिता । चिंतित असतां तया स्वकांता । बाणली विदेह उन्मदावस्था । तंव देखिली उडतां टिवटिवी ॥९॥
टिवटिवीचा सहज स्वभाव । करूनियां उच्चविराव । ओरडत उडावें सदैव । बोलती स्वयमेव तयेसी ॥२१०॥
श्रीकृष्णविलास साकांक्षा । करूनि स्वकल्पित उत्प्रेक्षा । स्वेच्छा वदोनियां कमलाक्षा । करिती अशेषा जानवणी ॥११॥
अवो ये कुररी आक्रोशें । निद्राहीन किन्निमित्तवशें । विलपसी कां तूं विशेषें । स्वसंतोषें कां न निजसी ॥१२॥
इये जगीं रात्रीच्या ठायीं । सौषुप्तविश्रांति सर्वही । प्राणिमात्र घेती पाहीं । निश्चिंत हृदयीं होऊनी ॥१३॥
प्रत्यक्ष अवलोकीं पां येथ । त्रिजगच्छास्ता जगन्नाथ । जगासमान जगीं स्वस्थ । स्वयें निद्रित ये कालीं ॥१४॥
स्वयंभ हृदयाचा परवरी । निजबोधाची संपत्ति सारी । निक्षेपूनियां पूतनारी । जाला निर्द्धारीं गुप्तबोध ॥२१५॥
तूं विलपूनियां दीर्घ रवें । निद्रा भंगिसी स्वभावें । हें उचित नोहे जाण जीवें । सखे सदैव विचक्षणे ॥१६॥
अथवा तुझा हा विरुद्ध । सहसा नोहेचि अपराध । क्कचित आम्हांसारिखी प्रसिद्ध । जालीसि निर्विद्धचित्त तूं ॥१७॥
कोण्या योगें ह्मणसी । तरी तेही ऐकें गोष्टी सरिसी । बाणे अनुभव तव मानसीं । निश्चयेंसी तें बोलों ॥१८॥
कमलनयन जो श्रीकृष्ण । त्याचें सविनोद हास्य जाण । तत्सह उदार लीलेक्षण । तेणेंकरून अतिशयें ॥१९॥
सये भेदिलीं आमुचीं चित्तें । म्हणोनि नपवों विश्रांतीतें । निद्रा न लागे तीव्र आर्त्तें । मनोमोइतें विलपतसों ॥२२०॥
बहुतेक ऐसेंच घडलें तुला । यास्तव करिसी वो गलबला । वृत्तान्त आमुतें जाणवला । तुझा आपुल्या प्रत्ययें ॥२१॥
ऐसिया कुररीतें मोहिता । बोलती जंव त्या अवचित्या । तंव चक्रवाकी देखोनि आर्ता । बोलती वनिता तयेसी ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP