अध्याय ८८ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अथापतद्भिन्नशिरा वज्राहत इव क्षणात् । जयशब्दो नमःशब्दः साधुशब्दोऽभवद्दिवि ॥३६॥

जैसा दुर्धर विद्युत्पात । होतां पाषाणही छिन्न होत । तेथें मनुजादि जंगमें समस्त । कवण मात तयांची ॥८२॥
ते तंव तत्काळ दग्धीभूत । होती केवळ हतजीवित । जैसा तीव्रतर वज्रघात । अनुपायित अपरिहार ॥८३॥
तयापरी वृकासुर । कर ठेवितांचि भिन्नशिर । पडतां झाला भूमीवर । दग्धशरीर अचेतन ॥८४॥
मूर्धा फुटोन भिन्न भिन्न । झाला होतां करस्पर्शन । भर्जित फळा सारिखें जाण । शरीर संपूर्ण दग्धलें ॥५८५॥
तंव क्षणामाजी ऐसें होतां । दैत्यप्रेत भूतळीं पडतां । जयशब्द नमःशब्द तत्वता । साधुशब्द नभीं झाला ॥८६॥
संकटीं पडिला सदाशिव । महर्षि पितर इन्द्रादि देव । घाबरे होवोनियां वास्तव । होते सर्व पाहत ॥८७॥
तिहीं अद्भुत हरिचरित्र । पाहोनि झाले सुखनिर्भर । हर्षें केला जयजयकार । वारंवार उत्कर्षें ॥८८॥
नमो नमो वासुदेवा । वदोनि प्रकटिलें सद्भावा । भला भला या शब्दगौरवा । देऊनि सकळीं अनुमोदिलें ॥८९॥
पापी दुरात्मा दुष्कर । मारिला असतां वृकासुर । एवं ऋष्यादि पितृसुर । सुखनिर्भर होत्साते ॥५९०॥

मुमुचुःपुष्पवर्षाणि हते पापे वृकासुरे । देवर्षिपितृगन्धर्वा मोचितः सङ्कटाच्छिवः ॥३७॥

नंदनादि वनोद्भवें । आर्थिलीं सुगंधगौरवें । नित्य नूतनें अम्लानत्वें । परमदिव्यें जीं सुमनें ॥९१॥
तयां पुष्पांचा वर्षाव । हरिवरी करिते झाले सर्व । कीं संकटापासूनि शिव । सोडविला माव प्रकटूनी ॥९२॥
यानंतरें रहितभय । विनिर्मुक्त पार्वतीप्रिय । परंतु सलज्ज कृतविस्मय । पराजितप्राय चाकाटला ॥९३॥
तया संकोच हृद्गत । निरसोनि करावया संतोषित । प्रवर्तला कमलाकान्त । प्रसंगोपात्त तें ऐका ॥९४॥

मुक्तं गिरिशमभ्याह भगवान्पुरुषोत्तमः । अहो देव महादेव पापोऽ‍यं स्वेन पाप्मना ॥३८॥
हतः को नु महत्स्वीश जन्तुर्वै कृतकिल्बिषः । क्षेमी स्यात्किमु विश्वेशे कृतगस्को जगद्गुरौ ॥३९॥

यश श्री आणि औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे पूर्णत्वें षड्गुणवर्य । असती अव्यय जयापें ॥५९५॥
तो क्षराक्षराहून परम । निर्विकार पुरुषोत्तम । विभु परमात्मा पूर्णकाम । बोलिला सुगम भवातें ॥९६॥
सकळ देवांमाजी वरिष्ठ । आपुला जिवलग परम इष्ट । महत्पदपूर्वक त्यासी सुष्ठ । कंबुकण्ठ संबोधी ॥९७॥
दावूनियां आश्चर्यभाव । म्हणे अहो देव महादेव । हा पापी दुष्ट दुःस्वभाव । परम अनर्ह कृतघ्न ॥९८॥
आपुलियाचि पापें करून । मृत्यु पावला जी आपण । येथें आश्चर्य करणें कोण । विचक्षण खूण जाणती ॥९९॥
महत् जे कां महानुभाव । लाधले शान्तिक्षमागौरव । सबाह्य शुद्ध जाणती वाव । संपूर्ण भव विवर्तवत् ॥६००॥
जयासी शत्रु मित्र सम । स्वरूपनिष्ठ ज्यां उत्तम । विकारहीन पूर्णकाम । यथार्थ स्वधर्म आचरती ॥१॥
ऐसिया संतांच्या ठायीं । जो कोणी जंतु पाहीं । अन्याय करी विरोधें कंहीं । दुर्बुद्धिप्रवाहीं पडोनी ॥२॥
तो कृतकिल्बिष सापराध । कोण क्षेमी होय प्रसिद्ध । तत्काळ अकल्याण विशद । पावे मतिमंद उन्मादें ॥३॥
मां साक्षात जो विश्वेश्वर । जगद्गुरु जगदाधार । तयाच्या ठायीं भ्रमनिर्भर । जो अविवेकपर कुतागस्क ॥४॥
तो परमेश्वराचा अपराधी । कल्याणवंत होय कधीं । हें बोलणेंचि नलगे निरवधी । उमजे बुद्धी भलतया ॥६०५॥
म्हणोनि अगाध तवैश्वर्य महिमा । आणि अमोघ तव वाक्यगरिमा । सफळ झाला विपरीत अधमा । विपरीतकर्मा आचरतां ॥६॥
एवं इत्यादि वाक्यगौरवें । शंभु गौरवूनि वासुदेवें । प्रमुदित पाठविला प्रभावें । गौरीसवें कैलासा ॥७॥
इतुकें साद्यंत वृकाख्यान । हरिहरांचें ऐश्वर्यलक्षण । प्रसादफळपरीक्षार्थ जाण । दर्शिलें उदाहरण श्रीशुकें ॥८॥
आतां श्रवणपठनाचें फळ । येथील कथी तें नृपातें विवळ । तें एकाग्र करूनि इंद्रियमेळ । ऐकिजे निर्मळ श्रोतृगणीं ॥९॥

या एवमव्याकृतशत्क्युदन्वतः परस्य साक्षात्परमात्मनो हरेः ।
गिरित्रमोक्षं कथयेच्छ्रुणोति वा विमुच्यते संसृतिभिस्तथारिभिः ॥४०॥

एवं म्हणिजे या प्रकारें । योगमायावलंबें श्रीधरें । शिवमोक्षण जें निर्धारें । केलें विचित्रें कौशल्यें ॥६१०॥
मना वाचेसि अगोचर । ज्याचा शक्तिसमुद्र अपार । जेथ शक्तिसरिता समग्र । मिळती विचित्र अधिष्ठानीं ॥११॥
सृष्ट्युदयीं गुणमेघद्वारें । ब्राह्मा रौद्री ऐन्द्र्यादि सुभरें । भरती जेथूनि नानाकारें । तो अव्याकृत शक्त्युदधि ॥१२॥
साक्षात् परमात्मा निर्विकार । गुणसाम्यक प्रकृतीहूनि पर । लीलाविग्रही करुणाकर । स्वभक्तनिकरसंगोप्ता ॥१३॥
तया हरीचें हें चरित । ब्रह्मादिकांसी परमाद्भुत । वृक निर्दाळिला कृतमोहित । रक्षिला भयभीत सदाशिव ॥१४॥
जो सद्भावें करी कथन । अथवा सर्पेम परिसे जाण । तयासी पुन्हा जन्ममरण । न होय गौण सांसृतिक ॥६१५॥
तो संसृतीपासूनि विनिर्मुक्त । होय तत्काळ निश्चित । आणि जो सांकडला रिपुभयें भीत । क्लेशयुक्त अतिशयें ॥१६॥
तोही श्रवणपठनमात्रें । महत्संकटाहून निर्धारें । मुक्त होय ऐसें व्यासकुमरें । कथिलें पवित्रें महिमान ॥१७॥
इतुकेन हा अष्टाशीतितम । अध्याय झाला परमोत्तम । येथ एकादशिनी अष्टम । संपली सुगमव्याख्यानें ॥१८॥
आतां शेवटीं पातलें ग्रंथायतन । कळसा आलें निरूपण । पुढील अध्यायद्वय तें पूर्ण । अलशस्थानीं अभिव्यत्क ॥१९॥
त्यामाजि ऊननवतितमीं । कथा ऐसी यथानुक्रमीं । सरस्वतीतटीं यज्ञकामीं । असतां संभ्रमीं मुनिगण ॥६२०॥
तिहीं सत्वपरीक्षेकारणें । त्रिदेवीं शान्त्यादिलक्षणें । कोण आथिला पूर्णपणें । भृगूसी यत्नें पाठविलें ॥२१॥
तेणें ब्रह्मेशान अवलोकून । निद्रितहरिवक्षीं पदताडन । केलिया पावला अतिसम्मान । तें कथिलें संपूर्ण ऋषीतें ॥२२॥
हा इतिहास संपल्यावरी । प्रतिज्ञोत्तरें द्वारकापुरीं । अर्जुन आपणा वैश्वानरीं । दाहितां श्रीहरिं कळवळिला ॥२३॥
तेव्हां तयासह महाकाळपुरा । जाऊनि तेथींची स्वमूंर्तिप्रवरा । प्रार्थूनियां आणिलें द्विजकुमारा । मृता अतित्वरा करूनियां ॥२४॥
तें भगवन्ताचें अद्भुतनाट्य । परिसावयार्थ सोत्कंठ । श्रोतीं होवोनि एकनिष्ठ । सुकृत यथेष्ट साधिजे ॥६२५॥
इतुकी सेवेसी विनवणी । अपत्याची करी जोडूनी । सद्गुरुवरदें वदेल वाणी । महाराष्ट्रवचनीं हरिचरित्र ॥२६॥
मी तों अत्यंत मंदमति । सगुरुकृपेची अद्भुत स्थिति । सज्जन स्वभावें जाणती । जे अनन्यगति अनुभवीं ॥२७॥
आदिनाथक्रमें लब्ध । श्रीएकनाथ चिदानंद । तत्कृपे सनाथ स्वानंद । भरी गोविन्द स्वात्मरसें ॥२८॥
तद्दयामृतासी सांठवण । श्रीकृष्णदयार्णव परिपूर्ण । कळिकळितजीवा उद्धरण । केलें जेणें ग्रंथमिसे ॥२९॥
तयाचे कृपेचें वैभव । मादृशां दीनांसी दे गौरव । जेंवि वैरागर स्वसंगें ग्राव । करी अर्ह श्रेष्ठजनीं ॥६३०॥
सूत्रधारी अचेतन पुतळी । नाचवूनि मिरवी सभामंडळीं । प्राकृत वाणी काव्य सरळी । तेंवि वदवी सहजस्थिती ॥३१॥
म्हणोनि सकळमंगळायतन । ऊर्जितोदयाचें अधिष्ठान । श्रीस्वामीचें चरणभजन । साधकीं खूण जाणावी ॥३२॥
श्रीमद्भागवत दशम स्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्नवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध अठ्यांशीवा ॥६३३॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्या संहितायां दशमस्कन्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां हरिहरोभयशीलपरीक्षार्थ्य वृकासुरोपाख्यानकथनं नामाष्टाशीतितमोऽध्यायः ॥८८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४०॥ ओव्या ॥६३३॥ एवं संख्या ॥६७३॥ ( अठ्यांशीवा अध्याय मिळून ओवी संख्या ४०७३२ )

अठ्यांशींवा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP