अध्याय ८८ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजोवाच - देवासुरमनुश्येषु ये भजन्त्यशिवं शिवम् । प्रायस्ते धनिनो भोजा न तु लक्ष्म्याः पति हरिम् ॥१॥

देव असुर आणि मानव । त्यां माजि भजती अशिव शिव । ते प्रायशा भोगवैभव । भोगिती होवोनि धनवंत ॥५४॥
अशिवविशेषणें व्याख्यान । कीं शिव जयाचें अभिधान । परंतु शिवचि आचरण । तें सलक्षण परिसावें ॥५५॥
भोगीं धरूनियां त्रास । श्मशानीं राहे विशेष । चिताभस्म सर्वांगास । चर्ची संतोष पावूनी ॥५६॥
आणि पिशाचांसीं करी संग । भूषणें मिरवी भुजंगभोग । गजादिचर्मीं वेष्टी आंग । जाळिला अनंग सक्रोधें ॥५७॥
करीं धरूनि नरकपाळ । स्वयें होय भिक्षाशीळ । एवं आचरण अमंगळ । असे केवळ जयाचें ॥५८॥
ऐसा ही अर्थ कोणी करिती । परी येथील इतुकी च व्युत्पत्ति । अशिव म्हणिजे भोगसंपत्ति । न सेवी निश्चिती कदापि जो ॥५९॥
तो तिरस्कृतभोग जासनीळ । तद्भक्त धनाढ्य भोगशीळ । आणि साक्षाल्लक्ष्मीपति केवळ । त्रैलोक्यपाळ श्रीहरि ॥६०॥
तयातें जे जे कोणी भजती । ते विशेषें निर्धन होती । परंतु भोगवैभव न पावती । स्वयें श्रीपति आराधितां ॥६१॥
लक्ष्मीपति या विशेषणें । अभिप्राय ऐसा जाणणें । सर्वभोगयुक्त ऐश्वर्यगुणें । असे पूर्णपनें श्रीविष्णु ॥६२॥
लक्ष्मीपति तेथ सर्व सिद्धि । सिद्धि तेथ भोगसमृद्धि । समृद्दि तेथ विलासवृद्धि । म्हणोनि सौभाग्यनिधि लक्ष्मीश ॥६३॥
तयाचे जे निश्चयें भक्त । ते बहुतेक होती भोगत्यक्त । अकिंचन आणि विरक्त । दरिद्र्ययुक्त सर्वदा ॥६४॥
परीक्षितीनें ऐसा प्रश्न । शुकासि केला आशंकोन । याचें रहस्य जाणती सुज्ञ । तें परिसा संपूर्ण प्रकटवें ॥६५॥
प्रायशा धनवंत भोगभुज । शिवभक्त ऐसें कथिलें गुज । निर्धन होती जे भजती अज । येथ तात्पर्यबीज या परी ॥६६॥
प्रायशा म्हणिजे बहुतेक । शिवभक्त भोगिती भोगसुख । क्कचित मोक्षहि सविवेक । होवोनि विरक्त पावती ॥६७॥
विष्णुभक्त बहुतकरून । विरक्त मुमुक्षु भोगहीन । क्कचित धनिक ही भोगसंपन्न । होती हा श्लेष येथींचा ॥६८॥
परि वैष्णव न पवतीच वैभव । शाम्भव न पवती मोक्षगौरव । हा नव्हे येथील अभिप्राव । वैशिष्ट्यभाव बोलिला ॥६९॥
असो नृप म्हणे शुकाचार्या । वंद्या विपश्चिता प्रबुद्धवर्या । ऐसी विपरीत कां हे चर्या । आम्हां ज्ञानसूर्या प्रकाशीं ॥७०॥

एतद्वेदितुमिच्छामः संदेहोऽत्र महाह्रि नः । विरुद्धशीलयोः प्रम्भोर्विरुद्धा भजतां गतिः ॥२॥

हें संदिग्ध अभिप्रेत । जाणों इच्छितसों यथार्थ । कीं संदेह मोठा येथ । होय निश्चित आम्हांसी ॥७१॥
म्हणती संदेह किन्निमित्त । तरी विरुद्ध जयांचें आचरित । ते हरिहर प्रभुसमर्थ । तद्भक्तां विपरीत गति होय ॥७२॥
जेणें सर्वभोगां तिरस्कारिलें । जया अशिवत्व आंगीं बाणलें । तया शिवातें जे जे भजले । ते भोगाथिले सर्वस्वें ॥७३॥
आणि सर्व भोगांचा जया योग । ऐसा जो साक्षात श्रीरंग । तद्भक्त केवळ सविराग । दरिद्र अभंग तयांसी ॥७४॥
हेंचि विपरीत गमे मना । निःसंशय कथीं या निरूपणा । ऐसें ऐकूनि योगिराणा । वदे त्या वचना अवधारा ॥७५॥

श्रीशुक उवाच - शिवः शक्तियुतः शश्वत्त्रिलिङ्गो गुणसंवृतः । वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिधा ॥३॥

म्हणे ऐकें गा राजर्षी । मुकट मणि तूं चातुर्यशीर्षी । तव प्रश्नाख्याम्बुदवर्पी । मम वक्तृत्ववृक्षी टवटवी ॥७६॥
आस्थावंत आणि विरक्त । प्रेमळ विचक्षण सयुक्त । पृच्छक सम्यक प्रसंगोपात्त । तव सम श्रोता दुर्लभ ॥७७॥
संदेहयुक्त तां केला प्रश्न । तो म्यां परिसिला साद्यंत कृत्स्न । याचें जेणें होय निरसन । तें उत्तर संपूर्ण अवधारीं ॥७८॥
शिवभक्त धनवंत आणि भोगी । विशेषें विषयीं सानुरागी । किन्निमित्त हे अर्थभंगी । कथितों तुज लागीं विस्तारें ॥७९॥
शिव निरंतर मायायुक्त । ते माया सहजें त्रिगुणान्वित । तद्योगें गुणसंवृत । अत एव निश्चित त्रिलिंग जो ॥८०॥
त्रिलिंग म्हणिजे तिन्हीं चिन्हें । असती जयातें सगुणपणें । तीं कैसीं म्हणसी तरी विशेषणें । तुज कारणें निवेदितों ॥८१॥
तमा पोटीं झाला सत्त्व । सत्वगर्भीं रजोद्भव । तो तमचि अवघा सावयव । जो त्रिविधत्व पावला ॥८२॥
तया परस्परोपमर्दें करून । तमासि त्रैविध्य असे जाण । यास्तव शिव निश्चयें त्रिगुण । अहंलक्षण जाणिजे ॥८३॥
सात्त्विक राजस तामस । एवं अहंकार जो प्रत्यक्ष । तया पासूनि षोडश । विकार अशेष जाहले ॥८४॥

ततो विकारा अभवन्षोदशामिषु कंचन । उपधावन्विभूतीनां सर्वासामश्नुते गतिम् ॥४॥

ते षोडश विकार म्हणसी कैसे । मनइन्द्रियभूतरूप अपैसे । देवतालक्षणनिश्चयवशें । जाण विशेषें चंद्रादिक ॥८५॥
ते जे इन्द्रचंद्रसूर्यप्रमुख । इद्न्रियरूप सुर सम्यक । यां माजी भजे जो कोणी एक । देवता निष्टंक सद्भावें ॥८६॥
तो ते देवता उपाध्यनुरूप । विभूतीचें पावे स्वरूप । तत्संपदा भोगी अनल्प । हा विषद अनुकल्प येथीचा ॥८७॥
एवं मायायुक्तगुणवेष्टित । सगुण केवळ शिव निश्चित । म्हणोनि गौणप्राप्ति तद्भक्त । पावती यथार्थ सोपाधिक ॥८८॥
आतां विष्णुभक्त मोक्षावाप्ति । कैसेनि विशेषें पावती । हेंही राया तुझिये मति । उमजे ते रीती अवधारीं ॥८९॥

हरिर्हि निर्गुणः साक्षात्पुरुषः प्रकृतें परः स सर्वदृगुपद्रष्टा तं भजन्निर्गुणो भवेत् ॥५॥

श्रीहरि केवळ निर्गुण । साक्षात् पर जो प्रकृतीहून । उत्तमपुरुष विकारहीन । परमात्मा पूर्ण सन्मात्र ॥९०॥
सर्वदृष्टा सर्वसाक्षी । अलिप्त सर्वदा प्रवृत्तिपक्षीं । हीं सहेतुक विशेषणें दक्षीं । व्युत्पत्तिचक्षीं पहावीं ॥९१॥
साक्षी होत्साता सर्व पाहे । यास्तव प्रकृतिपर निश्चयें । प्रकृतिपर म्हणोनि स्वयें । निर्गुण अन्वयें या जाणा ॥९२॥
ऐसिया हरीतें जो भजे । तो निर्गुणचि होय सहजें । ऐसे परीक्षितीसी ऋषिराजें । कथिलें वोजें श्रीशुकें ॥९३॥
आतां येथील रहस्य गूढ । परीक्षिति उमजला प्रौढ । तें स्पष्टार्थें कथिलें रूढ । जेणें भाविक मूढ न गुंतती ॥९४॥
श्लोकत्रयाचा अभिप्राय । साद्यंत विवरूनि सान्वय । धीमंत करिती जो निश्चय । तो निःसंशय अवधारा ॥९५॥
हरिहर उभयतां उभय गुणीं । सत्वतमात्मकमायावरणीं । ऐसें प्रसिद्ध लौकिकीं पुराणीं । असतां निरूपणीं हें कथिलें ॥९६॥
कीं शिव केवळ गुणात्मक । मायावरणावृत निष्टंक । विष्णु निर्गुण सर्वदृक । मायाकळंक अस्पृष्ट ॥९७॥
तरी विष्णु कैसेनि गुणातीत । शिव कैसेनि गुणसंवृत । हें निरूपण संदेहरहित । द्वैपायनोक्त स्फुट ऐसें ॥९८॥
सच्चिदानंद वस्तु परम । जेथ नसेचि क्रियाधर्म । तेथ अनादिमायसंभ्रम । अहंब्रह्म हा गुणमय ॥९९॥
तेव्हां गुणमयीयोगें गुणसंब्म्ध । होतां झालें रूप द्विविध । शुद्ध शबळ ऐसें प्रसिद्ध । गुणधर्म योग योगास्तव ॥१००॥
जेंवि आकाश घनमंडळें । स्वभावें जितुकें आच्छादिलें । तितुकेंचि तदावृत बोलिलें । याहून उरलें निर्मळ तें ॥१॥
तेंवि जें मायावरणाथिलें । चैतन्य तें सगुण बोलिलें । तेंचि ईश्वरसंकेत पावलें । त्या शिव ही कथिलें श्रतींहीं ॥२॥
आतां पदार्था सारिखा विवर्त भासे । कीं रूपावच्छिन्न च्छाया दिसे । प्रतिबिम्ब बिम्बाचिया सरिसें । हें सर्वां उमसे साधारण ॥३॥
ज्या कारणाचें जें कार्य । तें तद्भावयुक्त हा निश्चय । सच्चिदानंदीं विवर्तप्राय । माया गुणमय भासली ॥४॥
ते मायेचे तीन गुण । सत्वरजस्तमाभिधान । सच्चिदानंदभावें भिन्न । अवभासमान जाहले ॥१०५॥
केवळ सद्भावें सत्व प्रकटला । चिदत्वें रजोगुण भासला । अनंदें तम उमगला । हा विसर्ग झाला समकाळीं ॥६॥
जेंवि सदादि अभिन्न असती । तेंवि सहत्वेंचि गुणही वराती । परंतु शक्त्युद्रेकें भासती । पृथक् स्वस्थितिविकारें ॥७॥
म्हणाल सदत्वें झाला सत्व । चिदत्वें रजःप्रादुर्भाव । आनंदेंचि तमोद्भव । यासी प्रमाणभाव कायसा ॥८॥
तरी प्रत्यक्षचि येथ प्रमाण । अनुभवीं वोळखे खूण । हेंचि विशद संपूर्ण । ऐका विचक्षण श्रोते हो ॥९॥
सहज सत्वीं ज्ञानशक्ति । जी क्रियाशक्ति निश्चिती । अज्ञानशक्ति तमा प्रति । द्रव्योत्पत्ति ज्यास्तव ॥११०॥
सत् म्हणिजे केवळ अस्तित्व । जेथ अस्तित्व तेथ ज्ञानत्व । आस्तिक्या वांचूनि सर्वथैव । आत्मप्रत्यय कैसेन ॥११॥
अविद्यायोगें जीवदशे । जह्री स्वविसरें चैतन्य भ्रंशे । पश्चादियोनित्वें ही विलसे । परिस्फुटे मी ऐसें स्वप्रत्ययें ॥१२॥
तो नैसर्गिक सद्भाव । स्फूरद्रूपचि स्वयमेव । सतें सत्वासी प्रादुर्भाव । कथिला यास्तव ज्ञानत्वें ॥१३॥
चिदीं असे प्रकाशत्व । चेतनादिवेधकत्व । म्हणोनि क्रियाशक्तिगौरव । रजीं सदैव विक्षिप्त ॥१४॥
अणि आनंदीं स्तब्धता । ते केंवि म्हणाल जरी तत्वता । तरी कळे सूक्ष्मत्वें विचारितां । अनुभवितां निजान्तरीं ॥११५॥
मायिक आनंदावाप्ति जरी । सौपुप्त वैषयिक होय तरी । वृत्तिविलय होवोनि अंतरीं । ताटस्थ्य निर्धारीं बाणतसे ॥१६॥
मां परमानंदीं स्तिमितत्व । हा बोलणेंचि न लगे भाव । अनुभवीं अर्थगौरव । जाणती तत्व अभिवेत्ते ॥१७॥
असो आनंदीं तमोद्रेक । म्हणोनि तमीं मूढता सम्यक । एवं विनिमय त्रिगुणात्मक । सच्चित्सुख विवर्त हा ॥१८॥
तया त्रिगुणांसी व्यापून । असे तें ईश्वरचैतन्य । केवळ मायावच्छिन्न । जाणिजे सगुणविग्रही ॥१९॥
हा त्रिगुणमयीमायायोग । अविनासंबंध शिवीं साङ्ग । अनादि परस्परानुराग । असे चांग प्रकृतिपुरुषीं ॥१२०॥
त्यां माजि मायेचा सत्वगुण । तो केवळ शुद्ध ज्ञानघन । तत्संबंधें ईश्वर पूर्ण । अनुभवसंपन्न स्वबोधें ॥२१॥
आणि तम रज हे द्रव्यक्रिया । शक्तिक द्योतक प्रवृत्तिकार्या । यांच्या योगें होय तयां । प्रपंच उदया सापेक्ष ॥२२॥
म्हणोनि प्रवृत्तिनिवृत्तिपक्षी । समानत्वें आपणा रक्षी । स्वानुभवें प्रपंचसाक्षी । स्वयें अनुलक्षी पूर्णत्वें ॥२३॥
मी निर्गुण निराकार । सच्चिदानंद निर्विकार । केवळ अद्वैत परात्पर । हा सत्वोद्गार वास्तव ॥२४॥
ऐसा निरंतर स्वरूपस्थित । म्हणोनि नोहे गुणाभिभूत । गुणनियंता सुनिश्चित । परमात्मा अमूर्त तो विष्णु ॥१२५॥
आणि प्रवृत्त्यवलंबें स्वाभिमान । सर्वज्ञ सर्वकर्ता आपण । सर्वनियंता सर्वकारण । हें तमगर्भस्फुरण अहंमय ॥२६॥
एवं स्वरूपानुभवें केवळ । शुद्ध परमात्मा निर्मळ । आणि प्रवृत्त्यालंबें शबळ । सगुण प्राज्जळ तोचि शिव ॥२७॥
असो हे सत्वादि भाव । ईश्वरीं अव्यक्त सर्व । असतां ययांचें स्पष्टत्व । झालें अभिनव तें ऐका ॥२८॥
पूर्णत्व आपुलें स्मरतां । किंचित्स्वरूपीं झाला दुचिता । तंव संकल्प उठिला अवचिता । न रमवे आतां एकत्वें ॥२९॥
तेव्हां बहुत व्हावें आपण । ऐसें प्रपंचाचें अनुसंधान । करितां प्रकृतीस अनुसरून । तदहंपणें वेंठला ॥१३०॥
जें स्वरूपाचें अनवधान । तेथ तमाचें आधिष्ठान । ज्या म्हणती अव्यक्त कार्ण । रुद्राभिमान तेथींचा ॥३१॥
त्या तमान्धकारीं ज्ञानप्रकाश । स्वसत्ता स्फुरला तो विशेष । एकत्वीं न रमवे व्हावें बहुवस । या महत्तत्वें विष्णूस जाणावें ॥३२॥
अव्यक्तमहत्तत्त्वपरिणाम । रजासह तमसत्वोद्गम । समुच्चयात्मक झाला सुगम । अहंकार नाम तयासी ॥३३॥
हा त्रिगुणात्मक अहंकार । सृष्टि स्थिति आणि संहार । कारण जाणिजे प्रवृत्तिपर । पृथगाकार गुणभेदें ॥३४॥
आतं इतुकें कथनाचें तात्पर्य । तें येथ उमजे निःसंशय । तो स्पष्ट ऐका अभिप्राय । पूर्वोक्त सोय विवरूनी ॥१३५॥
जेंवि वाम दक्षिण उभयाङ्गें । एकचि देहा म्हणावें लागे । तेंवि शुद्ध शबल उभयलिंगें । चैतन्य अवघें परमात्मा ॥३६॥
शुद्धत्वें केवळ महाविष्णु । ज्ञानस्वरूप पूर्ण चैतन्य । शबलत्वें जाणिजे ईशान । जो शिव सगुण ईश्वर पैं ॥३७॥
तो प्रकृतिसंगें अन्वीयमान । अव्यक्त महत्वत्वीं आपण । सृष्टिकर्तृत्वाचा अभिमान । वेंठला धरून त्रिगुणत्वें ॥३८॥
तेव्हां सृष्टिकार्याकारणें । सशक्तिगुणांचें आविष्करणें । विविध झालें तें परिसणें । विशद निरूपणें नावेक ॥३९॥
पृथक् गुणांची स्पष्ट दशा । अन्य गुणांवीण नोहे सहसा । गुणव्यभिचारें उमटे ठसा । परी एकीं उभयांचा उपमर्द ॥१४०॥
जेव्हां अन्योपमर्दें उत्कर्ष । जया गुणाचा होय विशेष । जेव्हां पूर्णत्वें स्पष्टत्व यास । लोप इतरांस अंशत्वें ॥४१॥
ऐसे परस्परोपमर्देंकरून । स्वप्राधान्यें प्रकटले गुण । त्यांसि पूर्णत्वें अभिव्यापून । वर्ते अभिन्न परमात्मा ॥४२॥
म्हणाल द्वयोपमर्दें एक गुण । तत्सहकारीं आविष्कारण । प्रधानत्वें कैसा कोण । ते प्रतीतिखुण अवधारा ॥४३॥
तिहीं गुणांचा पृथक् सर्ग । तत्तच्छक्ति करूनि साङ्ग । झाला तोही त्रिविध चांग । अन्यगुणयोग अंशत्वें ॥४४॥
जें कां अंतःकरण पंचक । सात्विक सर्ग ज्ञानशक्तिक । तेथ निर्विकल्पस्फुरणात्मक । केवळ सात्त्विक श्रीविष्णु ॥१४५॥
तो समष्टि अंतःकरण । जेथ निर्विकल्पक स्फुरण । निर्विकल्पक स्फुरणलक्षण । कैसें तें पूर्ण कथिजेल ॥४६॥
विकल्प म्हणिजे विपरीत कल्पन । नव्हे तें निर्विकल्पक स्फुरण । केवळ वास्तव स्फुरें जें मीपण । स्वसत्ते करूनि नैसर्गिक ॥४७॥
तेंचि हृदयस्थानाचें रूप । अनुभवी जाणे निर्विकल्प । एथ आशंकेचें स्फुरेल रूप । श्रोतयां स्वल्प मज गमे ॥४८॥
कीं सविकार अंतःकरण । आत्म्याहूनि तरी जें भिन्न । विष्णु समष्टीचें अंतःकरण । अविकार पूर्ण केंवि घडे ॥४९॥
तरी येथील तत्वविचार । ऐका नावेक सादर । जैसा एकचि वैश्वानर । अन्वयाकार इन्धनीं ॥१५०॥
तेथ इन्धनाकार वर्ते । परी दाहकत्वादि स्वधर्मातें । न सोडी ज्यापरी निरुतें । तैसेंचि येथें जाणावें ॥५१॥
कीं सत्वादि उपाधि माजी । अन्वीयमान ईश सहजीं । प्रकाशमान संवित्पुञ्जी । न मोडे तयाची अखंडता ॥५२॥
स्वयें निर्विकार पुरुषोत्तम । विष्णुत्वेंही तद्रूप परम । सविकारता ते जीवधर्म । तो ही अनुक्रम अवधारा ॥५३॥
जीव अविद्येस्तव सविकार । तोचि अंतःकरणादि लिङ्गाकार । या स्तव ते जाणिजे विकारपर । ईशीं विकार ते न पहावे ॥५४॥
जेंवि प्रतिबिम्बीं विकार होती । कैंची बिम्बीं तयांची स्थिती । तेंवि जीवधर्म ईश्वरा प्रती । सहसा नसती या रीती ॥१५५॥
आतां असोत या गोष्टी अमूप । सत्वें विष्णु अविकाररूप । या वरी विपरीतबोधारोप । सविक्षेपें रजतमें ॥५६॥
संकल्पविकल्पात्मक मन । तें रजोमिश्रसत्वें करून । तो मूर्तिमंत अमृतकिरण । करी भ्रमण सर्वदा ॥५७॥
आणि सत्वगर्भीं रजांश । तेणें झाला बुद्धिप्रकाश । विपरीतबोधीं निश्चयास । करी विशेष तो ब्रह्मा ॥५८॥
तैसेंच रजस्तममिश्रित चित्त । त्यासि नारायण हा संकेत । अनुसंधानात्मक निश्चित । जेणें अध्यस्त संसार ॥५९॥
अध्यस्ततादात्म्यें अहंकार । सत्वगर्भींचा तमांकुर । तोचि जाणीजे गौरीवर । जो ईश्वर त्रिवपूचा ॥१६०॥
ईश्वर म्हणिजे अनुशासक । प्रवृत्तिपक्षीं जो सम्यक । सर्वेन्द्रियांसी प्रवर्तक । विषयोन्मुखें करूनी ॥६१॥
स्थूळ लिंग आणि कारण । तिहीं वांचूनि कर्माचरण । न घडे सहसा विषयसेवन । अन्योन्ययोगें कार्यपट ॥६२॥
कारण तें केवळ अज्ञान । लिङ्ग तेंस ऊक्ष्मवृत्तिस्फुरण । स्थूळ तरी जडचि साधारण । कार्यहीन पृथक्त्वें ॥६३॥
म्हणोनि परस्परानुमेळें । एकीभूतत्वें क्रिया विवळे । एवं वर्म हें सुज्ञा कळे । कीं वपुगण चळे अहंकारें ॥६४॥
मनीं अनेक संकल्प उठती । तेथ निश्चय करी धिषणावृत्ति । अनुसंधान तें बाणे चित्तीं । तत्कार्यप्रवृत्ति अभिमानें ॥१६५॥
यास्तव दैहिककर्मकर्तृत्वीं । प्रधानत्व अहंभावीं । तो समष्टि अभिमान भव भवीं । सत्वगर्भीं तमोमय ॥६६॥
ऐसा सात्विकसर्ग त्रिविध । सत्ववैशिष्ट्यें कथिला विविध । आतां राजस सर्ग जो प्रसिद्ध । तोही प्रबुद्ध त्रिधा कथिती ॥६७॥
ज्ञानेन्द्रियें कर्मेन्द्रियें । आणि पंच प्राण जे निश्चयें । या पंचदशांची उत्पत्तिसोये । रजीं होय क्रियेस्तव ॥६८॥
दिग्वायुसूर्य वरुणनास्त्य । अग्नीन्द्रोपेन्द्रप्रजापति सत्य । निरृति या देवता समस्त । करणस्थित समष्टीच्या ॥६९॥
तेथ ज्ञानेन्द्रियें तत्वात्मक । कर्मेन्द्रियें रजें सम्यक । जडत्वें प्राण तामस मुख्य । परी रजाचें विशेखं प्राधान्य ॥१७०॥
यां माजी ही सूक्ष्म रीति । पृथक्पंचकें त्रिगुणव्याप्ति । कथितां वाढे व्याख्यान अति । जानती मुकुळितीं तत्ववित् ॥७१॥
आणि अज्ञानशक्तीस्तव जडें । पंचभूतें सविषय कोडें । तमा पासूनि झालीं वितंडें । त्रिगुण पवाडे तेथ ही ॥७२॥
सत्वप्रधान बोलिजे आकाश । रजःसत्वात्मक जाणिजे वायूस । रजोवैशिष्ट्यें प्रकाशे हुताश । उदक विशेषें तमर जें ॥७३॥
तैसी तमवैशिष्ट्यें धरणी । हे संपूर्ण तमाची करणी । एवं परस्परें गुणांची गुणीं । व्याप्ति तत्तत्प्राधान्यें ॥७४॥
म्हणोनि अन्यगुणावीण स्वतंत्र । कोणी गुण नसे हा निर्धार । परंतु द्वयोपमर्दें जो समग्र । दिसे आविष्कार तयाचा ॥१७५॥
जयाचा पूर्णत्वें आविकार । तोचि बळिष्ठ स्वशक्तिप्रचुर । सामर्थ्यहीन द्विगुण इतर । असतां एकत्र अंशत्वें ॥७६॥
ऐसें हें सत्व रज तम । त्यां माजी व्यापक पुरुषोत्तम । प्रवृत्त्यवलंबें अहंनाम । गुणसंभ्रमसंयोगीं ॥७७॥
गुणपरत्वें पृथक विभूति । हरिहरकमलासनाख्य मूर्ति । अभेद होत्साता तत्तच्छक्ति । प्रकाशी निगुती एकात्मा ॥७८॥
सत्वें ज्यासी म्हणिजे विष्णु । तोचि तमोगुणास्तव ईशानु । रजोगुणें कमलासनु । अभिन्न परि भिन्न गुणयोगें ॥७९॥
ऐसा गुणोपाधीस्तव त्रिविध । परमात्माचि झाला अभेद । ब्रह्मविष्णुरुद्राभिध । हें उमजे विशद उदाहरणें ॥१८०॥
वस्तुतः जैसा शुद्ध स्फटिक । सित कुङ्कुमकज्जलोपाधिक । होतां तदात्मकचिं निष्टंक । दिसे सम्यक नयनांसी ॥८१॥
तेथ कुङ्कुमकज्जलोपाधिक । उपाध्यनुरूप अवभासक । असतां अविकार घडे लुक । नैसर्गिक तद्रूप ॥८२॥
कज्जलीं स्फटिक ठेविला । दिसे केवळ कज्जलगोळा । कीं कुङ्कुमीं सहज स्थापिला । तो भासे सकळां तत्पिण्ड ॥८३॥
म्हणोनि कुङ्कुमकज्जलोपाधिक । वास्तवस्वरूपाचे सम्यक । पाहतां ज्ञान नेदी तात्काळिक । सन्निकर्षें प्रापक चिरकाळें ॥८४॥
आणि सितोपाधिक स्वरूपें । वास्तव प्रकटत्वें उद्दीपें । उपाधियोगें सहसा न लोपे । असाक्षेपें शुद्ध दिसे ॥१८५॥
तैसा सत्त्वोपाधिक शुद्ध । कीं सत्वीं ज्ञानशक्ति प्रसिद्ध । यास्तव शान्तिरूप स्वतःसिद्ध । जे स्वयंबोध सन्मात्र ॥८६॥
सताचा जो केवळ भाव । तें प्रसिद्ध जाणिजे सत्त्व । म्हणोनि सत्त्वस्वरूपगौरव । न लोपी वास्तव विरोधें ॥८७॥
सूर्य न झांकी सूर्यप्रभा । कीं लहरी न लोपी जेंवि अंभा । कीं अवकाश जयापरी नभा । तेंवि स्वयंभा सत्वगुण ॥८८॥
आणि इतर जे अंशें असती । ते पूर्णसत्वीं लोप पावती । सामर्थ्यहीन सहजस्थिती । लाहती उपहती अल्पत्वें ॥८९॥
या कारणें सत्वोत्कर्षें । स्वयंबोध स्वसंतोषें । गुणातीत विष्णु विशेषें । बोलिलें मुनीशें मूळपदीं ॥१९०॥
निर्गुण म्हणोनि प्रकृतिपर । परमपुरुष सविन्मात्र । यास्तव साक्षी सर्वद्रष्टार । परात्पर महाविष्णु ॥९१॥
तयाचीं त्रय स्थानें चांग । त्रिधा वैकुण्ठें जी पृथग । भूभाग दुर्गाभाग श्रीमाग । तीं ही साङ्ग अवधारा ॥९२॥
श्री जे केवळ चिच्छक्ति । मूळप्रकृति पूर्णस्थिति । नैसर्गिक अजस्र चित्तीं । अभेद निश्चिती सन्मात्रीं ॥९३॥
भास्वतीं अभेद जैसी प्रभा । तेंवि पूर्णाची पूर्णता स्वयंभा । तेथें पूर्णत्वेंच ज्याची शोभा । तो श्रीभाग विष्णु परमात्मा ॥९४॥
आणि सप्तावरणात्मक ब्रह्माण्ड । तेथींचें सप्तमावरणप्रचंड । महत्तत्वाख्य प्रकृति वाड । जेथ निवाड हिरण्यगर्भ ॥१९५॥
तये महत्तत्वीं स्वप्रकाश । सत्यलोकाहून पर प्रत्यक्ष । दुर्गाबाग दुर्निरीक्ष्य । हे असे साक्ष ग्रन्थान्तरीं ॥९६॥
तैसेंच ब्रह्माण्डीं अवनीवरी । तृतीय वैकुण्ठ आनंदकारी । क्षीरसमुद्रा भीतरीं । भूभाग निर्धारीं जाणिजे ॥९७॥
परी हे भूभागादि स्थानभेद । कथिले असती एवंविध । तेथ परमात्मा एक अभेद । पूर्णबोध श्रीविष्णु ॥९८॥
भद्रासनीं आणि अंतःपुरीं । कीं मृगयायानीं जयापरी । एकचि राजा निज निर्धारीं । भेदकुसरी तेथ नसे ॥९९॥
महोदधि आणि अत्नाकर । कीं सर्वसाधारण समुद्र । म्हणतां समुद्रचि हा निर्धार । परि स्थानपर अभिधानें ॥२००॥
तेंवि परमात्मा आदिपुरुष । तो श्रीभाग पूर्ण परेश । आणि सृष्ट्यवलंबीं प्रकृतीस । अधिष्ठितां प्रकटलें महत्तत्व ॥१॥
तया मत्तत्वा माजी स्थित । तो दुर्गाभाग सुनिश्चित । आणि सृष्ट्युदयीं ब्रह्माण्डांत । भूभाग म्हणिजे तयासी ॥२॥
ज्याचें क्षीराब्धि अधिष्ठान । जो भक्तां कारणें सावयव पूर्ण । केवळ निर्गुणचि गोठून । अवभासमान सगुणां परी ॥३॥
जळ गोठूनि होय गार । कीं गंध गोठूनि कर्पूर । घृत गोठूनि कणिकाकार । तेंवि साकार श्रीहरि ॥४॥
जो साकारचि निराकार । कीं निराकारचि साकार । केवळ ज्ञानविग्रही परात्पर । करुणाकर भक्तांसी ॥२०५॥
आणि तमप्रधान शबळ । तमीं अज्ञानशक्ति प्रबळ । प्रपंचानुसंधानें केवळ । कथिलें प्राञ्जळ दुचितेपण ॥६॥
मुळीं मायाधिष्ठित ईश्वर । तोचि अव्यक्तीं बोलिजे रुद्र । पुढें समष्टिअहंकार । जो शंकर मूर्तिमंत ॥७॥
दधिसमुद्रीं कैलासभुवन । तेंचि जयाचें वसतिस्थान । जो स्वभक्तां समृद्धिदान । करी तोषून भक्तीनें ॥८॥
प्रवृत्त्यवलंबें प्रकृति अधिष्ठी । तादात्म्य पाहूनियां समष्टी । अहंपणें आपणा वेंठी । म्हणोनि वाक्पुटीं शुक वदला ॥९॥
कीं शिव निरंतर मायायुक्त । त्रिलिङ्ग आणि गुणसंवृत । केवळ सत्वरजमाङ्कित । अहंमूर्त निश्चियें ॥२१०॥
तेथ तमाचा पूर्णोत्कर्ष । अल्पत्वें अन्यगुणांचे अंश । म्हणोनि मूढता विशेष । शिवीं प्रत्यक्ष तमाधिक्यें ॥११॥
तैसाचि रजोत्कर्षें भारतीवर । जया क्रियेस्तव सृजनाधिकार । म्हणोनि विक्षेप निरंतर । तया समग्र रजोगुण ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP